Friday, 19 April 2019

सुधा मेहता...दिशा मोफत क्लासेस....सेवाव्रती !

समाजात अत्यंत श्रीमंत लोक जसे असतात तसेच अत्यंत गरीब परिस्थिती मधील ही लोक असतात. श्रीमंतांच्याकडे सर्वांचे लक्ष जाते. आपण ही असेच श्रीमंत व्हावे असे सर्वांनाच वाटते. पण गरीबांच्याकडे सहसा कोणाचेच लक्ष जात नाही. आपल्याला काय करायचं आहे ? ते त्यांच्या कर्माने गरीब राहिले आहेत , असा सोयीस्कर विचार करून समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.
पण गरीबांच्या उत्थानासाठी निरपेक्ष बुद्धीने काम करणारे फार थोडे लोक समाजात आहेत. त्या पैकी एक आहेत , नाशकातील सौ. सुधा मेहता ! मुले त्यांना ताई म्हणतात. आपण ही त्यांना ताईच म्हणू या ! बारा वर्षा पासून ताई ,  ज्यांना प्रायव्हेट क्लासेस परवडत नाहीत अशा दुर्बल घटकातील मुलांच्यासाठी " मोफत क्लासेस " चालवतात. पाचवी ते दाहवीतील मुले या क्लासमध्ये शिकतात. आठवी , नववी आणि दाहवीचे वर्ग एका अपार्टमेंटच्या पार्कींग मध्ये व पाचवी , साहवी आणि सातवीचे वर्ग त्याच परिसरात झाडाखाली बागेत भरतात.
सुरवातीला ताई या वर्गांना स्वतः शिकवत असत. पण नंतर त्यांच्या या उपक्रमात स्वखुशीने अनेक जण सामिल झाले आणि आता प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक मिळाला आहे. ताई आता या क्लासेसची मॅनेजमेंट पाहतात. एखाद्या दिवशी एखादा शिक्षक आला नाही तर त्या स्वतः उभ्या राहून तो वर्ग सांभाळतात व शिकवतात.
ताई  , निरपेक्ष बुध्दीने हे काम करत असल्याने क्लासमधील सर्व मुले त्यांच्यावर अनन्य साधारण प्रेम करतात. परवा ताईंचा वाढदिवस होता. मुलांनी त्यांच्या परीने तो झोकात साजरा केला. कांही मुलांनी त्यांच्या गुणवर्णनपर भाषणे केली किंवा कविता सादर केल्या. दर वर्षी ताई , नको नको म्हणत असताना ही मुले त्यांचा वाढदिवस आठवणीने साजरा करतात. ताई , त्या दिवशी मुलांना खाउ वाटतात.
क्लास मधुन शिकून बाहेर पडलेली मुले सुध्दा  त्या दिवशी आठवणीने ताईंच्या वाढदिवसाला हजर असतात.  मध्यंतरी या क्लासमधून शिकून परदेशी शिक्षणासाठी गेलेला एक विद्यार्थी , ताईंना भेटण्यासाठी आवर्जून आला होता. आपण गरीब परिस्थितीतून , अनंत अडचणीतून शिकून ताईंच्या मार्गदर्शनाखाली कसे परदेशी शिक्षणासाठी गेलो , ते त्याने सर्व मुलांना सांगीतले. त्याच्या अनुभव कथनाने क्लासमधील सर्व मुले अतिशय प्रभावित झाली.
ताईंच्या या क्लासमध्ये मी आठवीच्या मुलांना शिकवण्याचे काम करतो. ताईंच्या या बारा वर्षे सातत्याने चाललेल्या ज्ञानयज्ञात त्यांनी मला आश्रय दिला त्या बद्दल मी त्यांचा शतशः त्र५णी आहे.
खाली फोटोत दिसत आहेत त्या सौ. सुधा मेहता , म्हणजे आमच्या सर्वांच्या ताई ! त्यांच्या वाढदिवस मुलांनी कसा उत्साहाने साजरा केला , ते इतर फोटोत तुम्हाला दिसेल.
आमच्या या उत्साही आणि निरपेक्ष बुध्दीने काम करणार्‍या ताईंना परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.



No comments:

Post a Comment