Friday, 19 April 2019

श्री. डी. पि. कुलकर्णी (पंत )....शारीरिक व मानसिक फिटनेस आदर्श !

खाली फोटोत दिसत आहेत ते माझे स्नेही श्री. डी. पि. कुलकर्णी . माझ्या प्रमाणेच ते नाशिक मधील MERI या संस्थेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते मुळचे दामाजी पंतांच्या मंगळवेढ्याचे ! दामाजी पंत कोण हे मी येथे सांगत बसत नाही. तर त्या दामाजी पंतांच्या गावचेच डी. पी. कुलकर्णी असल्याने मी त्यांना " पंत " म्हणतो. पंतांचे वय आता अंदाजे ६७ वर्षे आहे. पण या वयात ही त्यांचा फिटनेस वाखाणण्या सारखा आहे. ते जेव्हां सेवानिवृत्त झाले , त्या दिवशी त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वेळी शिवलेला सूट घातला होता. सर्वसाधारणपणे लग्नातला सूट एका वर्षातच आउट डेटेड होतो , बसेनासा होतो. पण पंतांनी आपली शरीरयष्टी प्रयत्नपूर्वक अशी ठेवली होती ,की लग्नातला सूट रिटायरमेंटच्या दिवशी ही त्यांना फिट्ट बसत होता , व ते अभिमानाने ही बाब सर्वांना आवर्जून सांगत ही होते.
पंतांनी सेवानिवृत्ती नंतर ही आपला फिटनेस रहावा या साठी नियमित पोहण्याचा सराव कायम ठेवला आहे. अखिल भारतीय लेव्हलवर ते पोहण्याच्या स्पर्धेत आजही भाग घेतात आणि तिथे बक्षिसे मिळवतात.
खालच्या फोटोत त्यांनी या वर्षात मिळवलेली पोहण्याच्या स्पर्धेतील बक्षिसे मुद्दाम त्यांना गळ्यात घालायला लावून आणि अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत मिळालेल्या सर्टिफिकेटसह त्यांचा फोटो मी आवर्जून काढला आहे. ही अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळ बाब मला वाटते.
पंतांची दोन्ही मुले डाॅक्टर आहेत. ती पण फिटनेसच्या बाबतीत जागृत आहेत. पंताची एक नात पोहण्याच्या स्पर्धेत बक्षिसे मिळवून त्यांची गादी चालवत आहे. गंमत म्हणजे नाशिकमधील म्हसरूळ परिसरात पंतांचा बंगला ज्या सोसायटीत आहे , त्या सोसायटीचे नाव ही " फिटनेस " सोसायटी असेच आहे.
पंत फक्त शारीरिक फिटनेसचाच विचार करतात असे नाही हं ! त्यांच्या घरात एनसायक्लोपिडीया ब्रिटानिकाचे ग्रंथ ही आवर्जून दिसतील. एनसायक्लोपिडीयाचे ग्रंथ अतिशय महाग असतात. पण अशा प्रकारचे विविध ज्ञान देणारे अनेक ग्रंथ पंतांनी आवर्जून खरेदी करून आपल्या संग्रही ठेवलेले आहेत.
MERI मध्ये नोकरीत असताना पंतांनी कोणावरही अन्याय होउ दिला नाही. अन्याया विरूध्द ते नेहमीच बंड करून उठायचे व अन्यायाचे परिमार्जन झाल्या शिवाय कधीच स्वस्थ बसायचे नाहीत.
आता पंत त्यांच्या एका डाॅक्टर मुला सोबत हैदराबादला असतात. नाशकातल्या डाॅक्टर मुलाकडे अधून मधून आले की मला व आमचे दोघांचे काॅमन स्नेही श्री. दिलीपराव कुलकर्णी यांना आवर्जून भेटतात. त्या वेळी मधल्या काळात मिळालेली मेडल्स आणि सर्टिफिकेटस् दाखवायला आवर्जून आणतात.
तर अशा आमच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपणार्‍या स्नेह्याला परमेश्वराने उदंड व निरामय आयुष्य द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment