Sunday, 14 April 2019

श्री. अ.रा. कुलकर्णी..माझे आदर्श मामा !

खाली फोटोत दिसत आहेत ते माझे मामा , श्री. ए. आर . कुलकर्णी. माझ्यात व त्यांच्यात दहा वर्षाचे अंतर आहे. लहानपणी माझ्या आजोळी म्हणजे करोली ( ता. कवठे महांकाळ , जि. सांगली )या गावी , मी व मामा एकत्र खूप मजा करायचो. ते दिवस आठवले तरी अजून ही मन मोहरून जातं. 
              माझे मामा पूर्वीच्या अकराव्वीच्या एस. एस. सी. बोर्डाच्या परिक्षेत सांगली केंद्रात पहिले आलेले आहेत. शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट व त्रास सोसला आहे. लहानपणी म्हणजे अगदी मराठी चौथीत असताना त्यांनी गाव सोडले व शिक्षणाच्या ध्यासाने अनंत अडचणींचा सामना करत शिक्षण पूर्ण केले. पुण्याच्या इंजिनीयरिंग काॅलेज मधून त्यांनी B. E. (Civil) पदवी मिळविली व नंतर MPSC मार्फत त्यांचे सिलेक्शन होउन डायरेक्ट उप अभियंता या पदावर ते रूजू झाले. शासकीय नोकरीतून सेवा निवृत्त होताना अधीक्षक अभियंता ( Superintending Engineer) या पदावरून ते सेवा निवृत्त झाले. 
                 शासकीय नोकरीच्या काळात त्यांची जिथे जिथे बदली झाली , त्या ठिकाणी त्यांच्या हाता खाली काम केलेले लोक आज ही त्यांची अत्यंत आदराने आठवण काढतात. शासकीय नोकरीत त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अनेक मानसन्मान मिळाले.  पण त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहिले. त्यांनी कधी कोणत्याही गोष्टीचा गर्व केला नाही.
                 माझ्या आयुष्याला वळण लावण्यात व माझा संसार सुखाचा होण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. मी त्यांचा त्या बद्दल शतशः त्र५णी आहे.
                संसारिक जीवनात त्यांना अनेक धक्के सोसावे लागले , पण त्याने विचलित न होता , त्यांनी शांतचित्ताने मार्गक्रमण केले. आज त्यांचे वय ८३ वर्षांचे आहे. परमेश्वर कृपेने त्यांची व ती. सौ. मामींची तब्बेत उत्तम आहे. त्या दोघांना निरामय व भरपूर आयुष्य लाभो , अशी मना पासून प्रार्थना करतो.
                  त्यांच्या बद्दल आदराने किती लिहू काय काय लिहू असं झालेलं आहे. पण कुठं तरी थांबणे आवश्यक आहे , म्हणूनच थांबतो.

No comments:

Post a Comment