Saturday, 13 April 2019

नंदू बियाणी.....शेतातील पाणी शोधणारा संशोधक ...मित्र !

खाली फोटोत , प्रसन्न व्यक्तीमत्वाचा , दिसत आहे तो माझा मित्र, श्री. नंदलाल बालमुकूंद बियाणी. आम्ही मेरी ( MERI) , नाशिक येथे एकत्र नोकरीला होतो.
१९७२ / ७३ साल असेल. मेरी आॅफीसात एका संध्याकाळी "गणेशोत्सवा " संबंधी मीटिंग चालू होती. आम्ही गणेशोत्सवात एकांकिका सादर करण्या विषयी प्रस्ताव मांडला होता. अचानक एक तरूण उभा राहिला व " तुम्ही एकांकिका करताना तुमचे तुमचे मित्रच त्यात घेता , त्या व्यतिरिक्त इतरांना का घेत नाही ? " असा त्याने रोखठोक सवाल केला. त्या नंतर आम्ही त्या तरूणाला आमच्या एकांकिकेत , नंतर नाटकात घेतले आणि तो आमचा पक्का मित्र झाला. आमची ही मैत्री आजतागायत अबाधित आहे. हाच तो आमचा मित्र श्री. नंदलाल बियाणी. आम्ही त्याला " नंदू " म्हणतो....
नंदू म्हणजेच नंदलाल , नंदलाल म्हणजेच श्रीकृष्ण ! श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरला होता. त्या नंदलालात आणि आमच्या या नंदलालात काडीचा ही फरक नाही. त्याने पर्वत उचलला होता व आमच्या या नंदलालाने आपण कल्पना ही करू शकणार नाही अशा अनंत अडचणींच्यावर मात करत , " संसाररूपी पर्वत " उचलला होता व आहे ही !
नोकरीत असताना नंदू  मेरीतील " Public Health Dn." या विभागात कार्यरत होता. त्या विभागात  नंदूने " Corrosion ( धातूचे गंजणे ) " या अभियांत्रिकी  विषयाचा खूप अभ्यास केला होता व अक्षरशः मास्टरी मिळविली होती. नंदू स्वतः B.Sc. आहे. पण एकदा एखाद्या विषयाचा अभ्यास करायचं त्याने मनावर घेतलं की , त्याची तड लावल्या शिवाय तो कधी ही गप्प बसलाच नाही. त्या विषयाचं प्रचंड वाचन आणि मनन करून तो विषय आत्मसात केल्या शिवाय त्याला चैन पडतच नसे. पुढे त्याची त्या विभागातून बदली झाली अन्यथा Corrosion या विषयाचा तो एक आंतर राष्ट्रीय तज्ञ म्हणून नावाजला गेला असता , यात मला तरी शंका नाही.
नंतर त्याची विविध विभागात बदली झाली , पण Public Health Dn मधून झालेल्या बदलीने दुखावला गेलेला नंदू म्हणावा तितका सावरला गेला नाही.
आमच्या " मेरी कला मंडळ " या नाट्यवेड्या ग्रुपमध्ये नंदूने साष्टांग नमस्कार , भटाला दिली ओसरी , कथा कुणाची व्यथा कुणा , इत्यादी  नाटकातून उत्तम भूमिका केल्या , पण त्याची "साष्टांग नमस्कार " या नाटकातील " रावबहाद्दुरांची " केलेली प्रमूख भूमिका आमच्या सर्वांच्या आजही स्मरणातून जाणे केवळ अशक्यच !
नंदू काॅलेजात शिकत असताना घरी न राहता बोर्डिंग मध्ये रहायचा. बोर्डिंग मध्ये रहात असताना नंदूने मित्रांच्या सहाय्याने केलेल्या गमती जमती आम्हाला सांगीतल्या आहेत , आज ही त्या आठवल्या की आमची हसून हसून मुरकुंडी वळते. त्याचा एक मित्र सिनेमाचा वेडा होता.  त्याची , नंदू व त्याच्या मित्रांनी केलेली फजिती , तसेच मेरी आॅफीसमध्ये हुषार पण काॅमन सेन्स कमी असलेल्या सहकार्‍याची केलेली फजिती , आज ही आठवली तर हसून हसून गडाबडा लोळणे तेवढे बाकी राहते.
 नंदूच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक विषय मी आता सांगतो. या विषयाने नंतर नंदूचे संपूर्ण आयुष्यच व्यापून टाकले. नंदूने नोकरीत असताना " Soil Resistivity " चा अभ्यास केला. वर सांगीतल्या प्रमाणे नंदूचा अभ्यास म्हणजे सखोल वाचन व सखोल चिंतन ! या अभ्यासाचा उपयोग खर्‍या अर्थाने नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्याला झाला . त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून जमिनीत पाण्याचा साठा उपलब्ध आहे किंवा कसे ते समजू शकते. नंदूने या ज्ञानाच्या सहाय्याने अनेक शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात पाण्याचा साठा उपलब्ध आहे किंवा कसे ते सांगीतल्याने , शेतकर्‍यांच्यावर त्याने अनंत उपकार केलेले आहेत. नाशिक भागात अशा प्रकारे पाणी पाहण्याच्या प्रयोगाचा तो " जनक " च आहे , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नंदू आता ७८ / ७९ वर्षांचा आहे. पण वर सांगीतलेल्या पाणी शोधण्याचे व शेतकर्‍यांना मदत करण्याचे त्याने घेतलेले व्रत तो आजही तितक्याच जिद्दीने पाळतो. आता वयोमाना नुसार कांही कांही व्याधी त्याला जडलेल्या आहेत. पायी चालणे त्याला कांही वेळी अवघड होते. पण या ही परिस्थितीत आमचा नंदू धीराने व हास्य वदनाने आमचे सर्वांचे मोकळ्या मनाने स्वागत करतो. त्याच्या भेटीने आम्हा सर्वांना खूप खूप आनंद मिळतो.
नंदूला दोन मुले व दोन मुली. सर्वजण आपल्या आपल्या जागी सुव्यवस्थित आहेत. त्याचा डाॅक्टर झालेला मुलगा ( DM , Neurology ) त्याचे सोबतच असतो. सौ. वहिनी म्हणजे बियाणींच्या घरच्या खर्‍या अर्थाने " अन्नपूर्णा " च आहेत ! नंदूला त्यांचे संपूर्ण सहकार्य आहे. नंदूच्या घरात पाहूण्यांची सतत आवक जावक असते , पण सौ. वहिनी अतिशय आनंदाने सर्वांचे आगत स्वागत करतात. हा एक दुर्मिळ योग आहे.
आमचा मित्र नंदू व सौ. वहिनींना परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे व त्याच्यावर सर्व सुखांचा वर्षाव करावा अशी मनोमन प्रार्थना करतो व थांबतो.

No comments:

Post a Comment