Friday, 19 April 2019

श्री. अनिल कुलकर्णी....ज्योतिष शास्त्री मित्र !

फार म्हणजे फारच जुनी गोष्ट आहे. मी " मेरी " ( Maharashtra Engineering Research Institute  , याचा शाॅर्ट फाॅर्म MERI ) नाशिकमध्ये नोकरीला लागून थोडेच दिवस झालेले होते. आई , वडीलांची आणि घरची ओढ अजूनी स्वस्थ बसू देत नव्हती. नाशिकहून उडत उडत मिरजेला जावं असं वाटायचे दिवस होते ते ! मी काम करीत असलेल्या  विभागात , एक दिवस मिरजे पासून १५ किमी अंतरावरील नरसोबावाडीचे मातीचे नमूने चांचणीसाठी घेउन एक ट्रक आल्याची बातमी मला समजली. मी अक्षरशः धावतच गेलो. ट्रकचा ड्रायव्हर कुठेतरी गेला होता. ती संधी साधून मी ट्रकच्या टायर्सवरून प्रेमाने हात फिरवला. माझ्या गावा जवळच्या मातीतून तो आला होता. त्या मातीच्या  स्पर्शाने माझ्या डोळ्यात अश्रू तरळले.
त्या नंतर लगेचच मिरजेच्या जवळच्या कुरूंदवाडहून मेरीत आमच्याच विभागात जाॅईन व्हायला एक तरूण येणार असल्याची बातमी समजली. मी त्याची मना पासून वाट पाहू लागलो. नुकत्याच सासरी गेलेल्या मुलीला माहेरचे कोणीही येणार असल्यावर जसा आनंद होतो , तशी माझी अवस्था होती.
आणि तो तरूण आला....त्याचे नाव ....श्री. अनिल अप्पाजी कुलकर्णी उर्फ अ. आ. कुलकर्णी ....
त्या वेळे पासून जे आमचे मैत्र जमले ते आज तागायत तसेच फ्रेश आहे.
आम्हा दोघात एक काॅमन फॅक्टर आहे. तो म्हणजे आम्ही एकुलते एक आहोत. आम्हा दोघांना भावंड नाही. कानडीत एकुलते एक असले की त्याला " वब्ने " म्हणतात ! तसे आम्ही दोघेही " वब्ने " आहोत.
या माझ्या मित्राला आम्ही सगळे " अनिल " म्हणतो. मी , अनंत देशमुख आणि अनिल असा आमचा मैत्रीचा " कोअर ग्रुप " आहे.
अनिलचे लग्न ठरविण्यात माझ्या आईचा बराचसा वाटा होता . एकूणच आम्ही दोघे शेजार शेजारच्या गावचे " गाववाले " असल्याने आमच्या दोघात आणि आमचा काॅमन मित्र अनंत देशमुख , अशा तिघात लवकरच घट्ट बंध निर्माण झाले.  मी , अनिल , अनंत देशमुख अशी फॅमिली फ्रेंडशिप आहे. एकमेकांच्या वाढदिवसा दिवशी , बायकोच्या वाढदिवसा दिवशी , मुलांच्या वाढदिवसा दिवशी आम्ही न बोलवता एकमेकांच्या घरी संध्याकाळी जेवण्यासाठी अावर्जून जातो. सकाळी सकाळी शुभेच्छा द्यायच्या आणि संध्याकाळी ज्यांच्याकडे वाढदिवस असेल त्याच्या कडे जेवायला जाण्याचा आमचा परिपाठ कित्येक दिवस होता. 
आता वयोपरत्वे त्यात खंड पडत चाललाय. अनिल ही हल्ली बर्‍याचदा त्याच्या मुलाकडे व मुलीकडे पुण्यालाच असतो. मागच्या वर्षी अनिलची " बायपास " झाली. खरंतर अनिलला ब्लडप्रेशर नाही , डायबेटिस नाही , तरीही त्याला
" हार्ट अटॅक " कसा आला असेल हा गहन प्रश्न आम्हा मित्रांना अजूनही सुटलेला नाही. 
अनिलने आणि मी ज्योतिष शास्त्राच्या दोन परिक्षा एकत्रच दिल्या. प्रत्येक परिक्षेत तो पहिला व मी दुसरा असायचो.  पुढे त्याने ज्योतिष " शास्त्री " ही अत्युच्च पदवी ही प्राप्त केली. तो कांही दिवस ज्योतिष शिकवायला ही जात असे. 
अनिल हा अतिशय धार्मिक वृत्तीचा आहे. त्यांच्या गावाकडे म्हणजे घोसरवाड या गावी वर्षातून दोनदा " हलसिध्दनाथ " यांचा उत्सव असतो. तो अनिल कधीही चुकवत नाही. त्या उत्सवात त्याचा मोठा मान असतो. तिथे तो जे सांगेल ते खरे होते , असे आम्ही मोठ्या आदराने लोकांच्या कडून ऐकले आहे.
अशा माझ्या या जवळच्या मित्राचा मुलगा आणि मुलगी दोघेही पुण्यात असतात. दोघे ही उत्तम स्थितीत आहेत. अनिलला दोन गोड नातवंडे आहेत. अनिलची तब्बेतही आता चांगली आहे. सौ. मंजुषा वहिनींची ही त्याला समर्थ साथ आहे. 
माझ्या या मित्रा विषयी लिहीताना माझे मन भरून आले आहे. माझ्या या मित्राला त्याची संपूर्ण भक्ती असलेल्या
 " हलसिध्दनाथ " महाराजांनी उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , सर्व सुखांचा त्याच्यावर वर्षाव व्हावा , सदिच्छा देतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment