Friday, 19 April 2019

श्री. एम. बी. खरे...माझे सेव्हिंगचे मार्गदर्शक !

खाली फोटोत माझ्या बरोबर दिसत आहेत ते म्हणजे श्री. एम्. बी. खरे साहेब ! त्यांना दि. १७ नोव्हेंबर रोजी ८३ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी मी नाशकातील त्यांचे घरी गेलो होतो , त्या वेळचा हा फोटो आहे.
                  श्री. खरे साहेब , हे नाशिक मधील , मेरी (MERI )या संस्थेत मी नोकरी करीत असताना , माझे साहेब होते. माझे आणि त्यांचे संबंध, ते माझे साहेब होण्या आधी पासून , घरोब्याचे होते. आज तागायत ते तसेच आहेत.
                  श्री. खरे साहेब त्या काळातले M.Sc. आहेत. त्यांच्या भावंडात ते सर्वात थोरले. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते. वडील गेल्या नंतर सर्व भावंडांचे शिक्षण , लग्ने इत्यादी वडीलकीच्या नात्याने येणार्‍या जबाबदार्‍या, त्यांनी अतिशय व्यवस्थित पार पाडल्या आहेत. नोकरीत ही त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी त्यांचे संबंध अतिशय उत्तम होते. श्री. खरे साहेबांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे आपल्या वरिष्ठांना काय पाहिजे ते त्यांना पटकन् समजायचे. कांही लोकांना आपल्या वरिष्ठांना नक्की काय हवे ते कधीच चटकन् समजत नाही. पण श्री. खरे साहेबांना " ता म्हणायचा अवकाश,  ताकभात"  लग्गेच समजत असे. त्यांच्या common sense चा दर्जा अत्यंत वरचा होता. त्या मुळे व ते जिथे काम करीत असतील , तेथील विषयाच्या त्यांच्या अभ्यासामुळे,  ते , आपल्या वरिष्ठांच्या कायमच good books मध्ये राहिले होते. त्यांच्या हाता खाली काम करताना आम्हाला कधी ही एकटे वाटत नसे. आमच्या हातून एखादी चूक झाली तरी श्री. खरे साहेब आपल्याला सांभाळून घेतील हा आम्हाला आत्मविश्वास होता. या विश्वासाला कधी ही तडा गेला नाही.
                 महाराष्ट्रातील निरनिराळ्या पाटबंधारे प्रकल्पावर कामासाठी श्री. खरे साहेबांच्या बरोबर आम्ही अनेकदा गेलो आहे. कामासाठी बाहेरून आलेल्या अधिकार्‍यांच्यासाठी राहण्याची व जेवण्याची वेगळी व्यवस्था बहुतेक सर्व प्रकल्पावर असते. पण श्री. खरे साहेब या वेगळ्या व्यवस्थेत कधी ही राहिले नाहीत. ते कायम ,आपल्या हाता खालच्या लोकांच्या सोबतच राहिले व जेवले आहेत. आपण वरिष्ठ व आपल्या हाता खाली काम करणारे कनिष्ठ , असा भेद त्यांनी कधी ही मानला नाही , हे त्यांचे वेगळेपण सांगीतल्या शिवाय त्यांचे व्यक्तीमत्व पूर्णच होउ शकत नाही.
                   नोकरीत असताना, खरे साहेबांच्या सहवासात आल्या नंतर, त्यांनी मला पगारातून " सेव्हिंग " कसे करावे ते शिकविले. त्यांच्या मुळे माझी संसाराची आर्थिक बाजू भक्कम झाली. मला कधी ही कुठेही उसनवारी करावी लागली नाही.
                  वयोमाना नुसार श्री. खरे साहेबांची तब्बेत चांगलीच आहे. त्यांचे दात अजूनही बत्तीच्या बत्तीस उत्तम आहेत. सर्वसाधारणपणे या वयात "दंताजीचे ठाणे उठलेले असते " पण श्री. खरे साहेब याला अपवाद आहेत . त्यांचा गोरापान रंग , तेजस्वी आणि प्रसन्न चेहरा पाहून ते ८३ वर्षांचे झाले आहेत , हे सांगूनही "खरे " वाटणार नाही.
त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघे ही आपापल्या जागी व्यवस्थित आहेत. त्यांचा मुलगा नोकरी निमित्त मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे असतो. तो त्यांना व सौ.वहीनींना तिकडे या, असे सारखे सांगत असतो. पण नाशिक सोडून इतरत्र, श्री. खरे साहेबांना करमत नसल्याने , ते व सौ. वहिनी नाशकातच त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात राहतात.
                 सौ. वहिनींचे वय ही अंदाजे ७५ च्या आसपास आहे. त्याची श्री. खरे साहेबांना समर्थ साथ आहे.
माझे आदरणीय आणि आदर्श जोडपे असलेल्या , श्री. व सौ. खरे यांचे उर्वरित आयुष्य छान व निरामय जावो , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
( आदरणीय खरे साहेबांचे दि. २८ आॅगस्ट २०२० रोजी निधन झालेले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो , ही प्रार्थना )

No comments:

Post a Comment