Sunday, 14 April 2019

वैद्यराज अभय कुलकर्णी...दिव्यत्वाची जेथ प्रचिती.

सध्या रंगभूमी वरील अभिनेता श्री. प्रशांत दामले यांचे " साखर खाल्लेला माणूस " हे नाटक खूप गाजते आहे. त्याच नाटकाच्या नावाच्या धरतीवर " देव पाहिलेला माणूस " असे नाटक जर कुणी काढायचा विचार केला तर मी निश्चितच सांगेन , " होय मी देव पाहिला आहे ". तुम्ही म्हणाल " काय थापा मारताय , देव असा सहजासहजी कुणाला दिसतोय काय ? " त्या वर माझं उत्तर असं " होय मी खरा खरा देव पाहिलाय , मी माझ्या देवाच्या कायम संपर्कात असतो " आता तुम्हाला जास्त गोंधळात टाकत नाही. मला व माझी पत्नी सौ. रजनी आम्हा दोघांना वैद्यराज श्री. अभय कुलकर्णी यांच्या रूपाने देव भेटलाय.
माझी पत्नी सौ. रजनी हिला संधीवाताचा खूप त्रास होत होता. प्रथम अॅलोपॅथी नंतर होमिओपाॅथी ट्राय करून झाले , पण फरक पडत नव्हता. दिवसे दिवस तिचा त्रास वाढतच होता. बसायला उठायला त्रास होता. इतकेच कशाला टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून पाणी पिणेही तिला अवघड वाटायचे. आपण कधीच बरे होणार नाही , अशी तिच्या व आमच्या मनाची धारणा होत होती. माझा मुलगा चि. आदित्य व सून सौ. रमा हे दोघे ही सौ. रजनीला कसे बरे वाटेल या काळजीतच होते. आम्ही मिरजेत होतो आणि आदित्य व रमा नाशकात होते. एक दिवस आदित्यचा फोन आला. आई बाबा तुम्ही नाशिकला  लगेच या , आम्हाला एका वैद्यांचा पत्ता कळलाय व त्यांच्या कडून संधीवात बरा झालेल्या पेशंटचा ही पत्ता कळलाय. आम्ही चौकशी केली आहे , आपण वैद्यराज अभय कुलकर्णी यांना भेटू. एवढे प्रयत्न केलेत , हा ही एक करू , असे म्हणत आम्ही नाशकात इंदिरा नगर भागातील वैद्यराज अभय कुलकर्णी यांच्या आयुःश्री क्लिनिक मध्ये गेलो. वैद्यराजांनी नीट तपासले व सौ. रजनी संपूर्ण बरी होईल अशी ग्वाही दिली. दीड दोन वर्षे औषध घ्यावे लागेल , तेवढी सबूरी ठेवा असा त्यांनी सल्ला दिला. सौ. रजनी संपूर्ण बरी होईल या वर खरे तर आमचा विश्वासच बसत नव्हता......
पण वैद्यराज अभय कुलकर्णी यांच्या रूपाने आम्हाला खरोखर परमेश्वरच भेटला आणि साधारण अडीच वर्षे सातत्याने धीर न सोडता " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषुकदाचन " या गीतेतील उक्ती प्रमाणे सौ. रजनीने आयुर्वेदिक  औषधोपचार घेतला आणि आज ती संपूर्ण शंभर टक्के बरी झालेली आहे.
तिची औषधे बंद होउन दीड पावणे दोन वर्षे झालेली आहेत , पण ती ठणठणीत बरी आहे.
मग आता सांगा , आम्हाला परमेश्वर भेटला या आमच्या म्हणण्यावर तुमचा ही विश्वास बसला ना ?
वैद्यराज अभय कुलकर्णी हे पुस्तकी वैद्य नाहीत , ते पेशंटच्या शरीरा बरोबरच त्याच्या मनाचा ही अभ्यास करतात व त्या प्रमाणे औषधोपचाराची योजना करतात. ते व त्यांची पत्नी सौ. राजश्रीताई दोघेही एम्. डी. आयुर्वेद आहेत. दोघांनी सौ. रजनीच्या दुखण्यात लक्ष घातले व तिला संपूर्ण बरे केले.
वैद्यराज श्री. अभय कुलकर्णी हे नाशिकला असलेल्या " महाराष्ट्र शासनाच्या मेडिकल युनिव्हर्सिटीच्या " सिनेटवर ही आहेत. तसेच नवी दिल्ली येथील भारताच्या राष्ट्रपति भवना मधील आयुर्वेदाच्या  विशेष समितीवर ही नियुक्त आहेत. त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत व  मिळत ही आहेत. वैद्यराज अभय कुलकर्णी यांनी आयुर्वेदासंबंधात विविध प्रकारचे लेखन केले आहे व कांही पुस्तके ही लिहीली आहेत. त्यांचा या क्षेत्रातला व्यासंग जबरदस्त आहे. मोकळा वेळ मिळाला की ते आज ही अभ्यास करताना आम्ही स्वतः पाहिलेले आहे.
अशा अभ्यासू , ज्ञानी  आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाच्या आमच्या या परमेश्वराची ओळख करून देताना मला अत्यानंद होत आहे.
वैद्यराज श्री. अभय कुलकर्णी व त्यांच्या पत्नी वैद्या सौ. राजश्रीताई या दोघांना उदंड व निरामय आयुष्य मिळो व आमच्या सारखाच त्यांच्या रूपाने अनेकांना परमेश्वर भेटो ही प्रार्थना करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment