Sunday, 14 April 2019

श्री. एस. बी. सोहोनी साहेब....माझे पहिले आदर्श अधिकारी !

खाली फोटोत दिसत आहेत ते म्हणजे माझे आदरणीय साहेब , श्री. श्रीकांत भरत सोहोनी. ( श्री. भ. किंवा एस्. बी. सोहोनी साहेब )
मी मेरीत नोकरीला लागलो त्यावेळी ते आमच्या मृद् यांत्रिकी विभाग क्र. १ चे संशोधन अधिकारी होते. गोरापान रंग , चेहरा प्रसन्न , मध्यम उंची , डोळे घारे पण त्यात एक आदरयुक्त जरब , अशा व्यक्तीमत्वाचे श्री. सोहोनी साहेब , म्हणजे आमचे आदर्श साहेब ! अधिकार्‍याने आपल्या हाता खालच्या लोकांशी कसे वागावे याचा आदर्श नमूना म्हणजे श्री. सोहोनी साहेब ! साहेब कधी ही कुणाला ही आवाज चढवून टाकून बोलले नाहीत . पण त्यांच्या शांत आवाजात असणारी जरब समोरच्याला गार करीत असे.
साहेब प्रत्येक बाबीत " परफेक्शनिस्ट " होते. आमच्या मृद् यांत्रिकी विभागात (Soil Mechanics Division ) महाराष्ट्रातल्या विविध धरणा वरून हजारो मातीचे नमूने तपासण्यासाठी येत. त्यावर अभियांत्रिकी चांचण्या करून ते निष्कर्ष संबंधितांना पाठवले जात. इतक्या मोठ्या प्रमाणावर काम  करून हाता खालचे लोक , मातीचे निष्कर्ष शेवटी त्यांच्या सहीला पाठवत असत.  साहेबांची दृष्टी अशी सूक्ष्म असे की , किती ही निष्कर्ष त्यांच्या पुढे आले , तरी त्यातली नेमकी चूक कुठे आहे , ते त्यांना लगेच समजत असे. ती चूक व्यवस्थित, दुरूस्त झाल्यावरच ते त्या वर सही करत.
शासकीय आॅफिसमध्ये विविध प्रकारच्या , विविध विषयांच्या , तांत्रिक , अतांत्रिक अशा अनेक फाईल्स असतात. त्या फाईल्सना नंबर देण्याची एक विशिष्ठ पद्धत साहेबांनी अशी बसविली होती की , कोणती ही फाईल हतात घेतली आणि तिच्या वरचा नंबर वाचला की , ती कोणत्या विषयाची आहे , कोणत्या प्रकल्पाची आहे , कोणत्या अधिकार्‍याशी संबधित आहे , तांत्रिक आहे की अतांत्रिक आहे , हे सर्व एका क्षणात समजत असे. अशा व्यवस्थित नंबरिंग केलेल्या फाईल्स कुठे व कशा ठेवायच्या त्या विषयी ही त्यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या मुळे वेळेला अमूक एक फाईल सापडत नाही असे कधी ही होत नसे. शासकीय आॅफिसात फाईल्स सापडत नाहीत असे आपण अनेकदा ऐकतो. पण आदरणीय आणि शिस्तप्रिय अशा श्री. सोहोनी साहेबांच्या आमच्या  आॅफिसात असे कधी ही घडले नाही.
त्यांच्या कार्यकाळात अनेक संशोधन प्रबंध ही विविध काॅन्फरन्सेस मध्ये प्रसिध्द झाले. तसेच त्यांना विविध पारितोषिके ही मिळाली.
मेरीच्या, मृद् यांत्रिकी विभाग क्र. १ चा ,श्री. सोहोनी साहेब विभाग प्रमुख असतानाचा , काळ हा त्या विभागाचा सुवर्णकाळ होता , असे आम्हा सर्वांनाच वाटते.
श्री. सोहोनी साहेब १९७६ साली मेरी बाहेर बदलीवर गेले. तरी ही त्यांच्या बद्दल आमच्या सर्वांच्याचा मनात वसत असलेले आदरयुक्त प्रेम , स्नेह कणभर ही कमी झालेले नाही. साहेब कधी ही भेटले , दिसले तरी त्यांच्याशी आवर्जून जाउन बोलावे , खुशाली विचारावी असे सर्वांनाच वाटते.
साहेब नाशिकमध्येच रहात असल्याने मी मधून मधून आवर्जून त्यांच्या घरी जाउन भेटत असतो. त्यांना भेटले की , त्यांच्याशी बोलले की , मनाला दुर्मिळ असे समाधान मिळते.
अशा या अत्यंत सात्विक अशा श्री. सोहोनी साहेबांना त्यांच्या सौभाग्यवतींची समर्थ साथ आहे. फोटोत त्या ही दिसत आहेत. साहेबांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलगी अमेरिकेत असते. दोन्ही मुले भारतातच असतात .  मुले भारतात असणे  ही पण  आजच्या काळात एक समाधानाची बाब आहे. साहेब कधी मुलांच्याकडे कधी नाशकातल्या आपल्या बंगल्यात असतात. त्यांचे सध्याचे वय अंदाजे ८३ वर्षे असावे. परमेश्वर कृपेने त्यांची तब्बेत उत्तमच आहे.
त्यांना दोघांना उदंड व निरामय आयुष्य लाभो , अशी मना पासून प्रार्थना करतो आणि थांबतो......

No comments:

Post a Comment