Saturday, 13 April 2019

श्री. मोहनरावजी भागवत...सच्चा संघ कार्यकर्ता...स्नेही.

जीवनाच्या प्रवासात आपल्याला अशा कांही  व्यक्ती भेटतात  की , त्यांना भेटल्यावर किंवा त्यांच्याशी बोलल्यावर आपल्याला " परिसस्पर्श " झाल्या प्रमाणे आनंद मिळतो. मला अशा " परिसस्पर्श " करणार्‍या दोन व्यक्ती चटकन् आठवतात. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे , नाशिकचे कविवर्य कुसूमाग्रज , आणि दुसरी व्यक्ती म्हणजे श्री. मोहनराव भागवत !
               श्री. मोहनराव भागवत म्हटलं की , तुमच्या डोळ्या समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनरावजी भागवतच येणार याची मला कल्पना आहे. पण मी म्हणतोय ते सरसंघचालक नाहीत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीतच आहेत. त्यांचे नाव आहे श्री. श्रीधर राजाराम भागवत ! या आमच्या भागवतांना त्यांच्या घरचे व मित्र परिवारातले लोक मोहन या टोपण नावाने ओळखत असल्याने , आम्ही त्यांना श्री. मोहनराव भागवत याच नावाने ओळखतो.
                  मी नाशिक मधील " मेरी " ( MERI) या शासकीय संस्थेत नोकरीला लागल्यावर माझी व श्री. मोहनरावांची ओळख झाली. श्री. मोहनरावांचे व्यक्तीमत्व अतिशय प्रसन्न व आदर वाटावा असेच आहे. गोरापान रंग , अंगकाठी शरीरा बरोबर , चेहर्‍यावर सात्विकतेचे तेज , हास्य मुद्रा , एकूणच कोणीही पाहिले , तरी आदर वाटावा असे व्यक्तीमत्व म्हणजे आमचे श्री. मोहनराव भागवत ! शासकीय नोकरीत वरिष्ठ राजपत्रित अधिकारी आपल्या हाता खालच्या राजपत्रित नसलेल्या कर्मचार्‍याला " साहेब " ही उपाधी कधीही लावत नाहीत. पण श्री. मोहनरावांना त्यांचे वरिष्ठ " भागवत साहेब " असे म्हणत असत , हे मी स्वतः पाहिले आहे. त्याचे कारण ही तसेच होते. शासकीय काम करताना श्री. मोहनराव ,त्यात जीव ओतून व अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत असत. श्री. मोहनरावांनी लिहीलेला कोणता ही अहवाल , अतिशय उत्तमच असायचा. श्री. मोहनरावांचे देखणे हस्ताक्षर , मराठी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे असलेले प्रभुत्व , त्या त्या विषयाचा सखोल अभ्यास , नेमकी आणि चपखल वाक्य रचना , या मुळे वाचणारा माणूस , तो अहवाल वाचून खूषच होत असे.
                  एखादा तांत्रिक विषय समजावून सांगावा तर तो श्री. मोहनरावांनीच ! विषयाचा प्रगाढ अभ्यास , भाषेवर प्रभुत्व आणि अस्खलित प्रवाही वक्तृत्व , या मुळे ऐकणारा श्रोता , अवाक होउन ऐकतच रहायचा ! श्री. मोहनरावांनी कोणते ही शासकीय काम कधी ही टाळले नाही. प्रयोगशाळेतील काम असो , फिरतीवर जाउन करायचे काम असो , नवीन शासकीय अधिकार्‍यांना तांत्रिक माहिती देणे असो , प्रत्येक काम श्री. मोहनराव जीव ओतूनच करीत होते व आहेत.
               आहेत म्हणण्याचे कारण म्हणजे सेवानिवृत्ती नंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाला संपूर्णपणे वाहून घेतलेले आहे. शासकीय नोकरीत येण्या पूर्वी ते संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक होते. तसेच संघाचे प्रचारक म्हणून ही त्यांनी काम केलेले आहे. संघाचा प्रचारक होणे , ही साधी गोष्ट नाही. प्रचारक हा स्वतःचे सर्वस्व सोडून केवळ संघ कार्याला वाहून घेतलेला असतो. सामान्य माणसाला , संसार , पैसा  सोडणे केवळ अशक्य असते. पण श्री. मोहनरावांनी या गोष्टींना कर्तव्य भावनेने केले व तिथेच सोडून दिले. त्यात ते गुंतून पडले नाहीत.
               श्री. मोहनरावांना कारणपरत्वे नाशिकमधील फ्लॅट विकावयाचा होता. सर्व सामान्य माणसाने फ्लॅट मधील चिजवस्तू विकून त्याचा पैसा केला असता. पण श्री. मोहनरावांनी " इदं न मम " म्हणत सर्व वस्तू संघकार्यालयात दान देउन टाकल्या. असे आहेत आमचे श्री. मोहनराव भागवत ! ज्ञानी , विवेकी , कर्तव्यदक्ष आणि तितकेच निस्पृह ! त्यांच्या बद्दल माझ्या मनात असणारी आदरयुक्त भावना शब्दात पकडणे , केवळ अशक्य !
               श्री. मोहनरावांशी परिचय होणे व त्यांच्या संपर्कात येणे म्हणजे मी माझे परमभाग्य मानतो.
              अशा या आमच्या श्री. मोहनरावांचे सध्याचे वय ऐंशी पेक्षा जास्त आहे. पण त्यांची त्यांच्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा यत्किंचित ही कमी झालेली नाही.
              श्री. मोहनरावांना संसारिक बाबतीत अनंत धक्के पचवावे लागलेले आहेत, पण त्यांनी ते कधी ही विचलित झाले नाहीत.
" श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् ।
   स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत् ।।
हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने सिध्द केलेले आहे.
             श्री. मोहनराव भागवतांना दोन मुले. दोघे ही आपापल्या जागी उत्तम आहेत.
               अशा या आमच्या आदरणीय श्री. मोहनराव भागवतांना परमेश्वराने उदंड व निरामय आयुष्य द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment