Sunday, 28 April 2019

कै. बी. बी. पाटील...." प्रेमळ ढाण्या वाघ ".

             फोटोत दिसत आहेत ते ,आमचे सर्व " मेरीकरांचे " जवळचे स्नेही, कै. बी. बी. पाटील. त्यांच्या नावा मागे कै. लिहीताना मनाला सहस्त्र इंगळ्या डसाव्यात अशा वेदना होत आहेत.
               त्या वेळच्या म्हणजे ,अंदाजे १९७० सालच्या मेरीतील सायंटिफिक केडर मधील दोन व्यक्ती ,आज हयात नाहीत. पहिले टी. डब्ल्यु. शूरपाल आणि दुसरे बी. बी. पाटील. मेरीच्या मृृृृृृृद यांत्रिकी विभागातील , शूरपाल ,पाटील आणि खरे अशी त्रयी ,त्यावेळी फार प्रसिध्द होती. तिघे ही एकाच पोस्टवर ,काम करत असत. पण तिघांच्यात जो समन्वय होता , तो अतिशय दुर्मिळ व वाखाणण्या सारखा होता.  कोणी ही इतर दोघांच्यावर कुरघोडी करून, आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नसे. तिघे ही एकमेकाला धरून असत. कामाला तिघे ही वाघ होते. फरकच करायचा झाला तर, असे म्हणता येईल की , शूरपाल म्हणजे शांत वाघ , खरे म्हणजे चतुर वाघ आणि पाटील म्हणजे " ढाण्या वाघ " !
            बी. बी. पाटील यांचा स्वभाव म्हणजे ,फणसा सारखा होता. बाहेरून तुम्हाला ते खुपणारे वाटतील ,पण त्याच वेळी आत, गोड गर्‍या सारखा मृदू स्वभाव , जाणवण्या सारखा होता. एकदा मेरीच्या गणेशोत्सवात ,कोणते तरी पद ,त्यांच्या कडे होते. मी शेवटच्या विसर्जनाच्या मिरवणूकीला, हजर नव्हतो. दुसर्‍या दिवशी आॅफिसात आल्या आल्या ,बी. बी. पाटील माझ्यावर कडाडले " दिक्षा,  तू काल मिरवणूकीला हजर नव्हतास , थांब मी तुझ्याकडे बघून घेतोच ! " पण त्याच वेळी ,माझी   मेरीच्या दुसर्‍या विभागात, प्रमोशनवर बदली झाल्या नंतर , माझ्या जवळ येउन पाठीवर हात ठेउन " दिक्षा , तू ताबडतोब प्रमोशनवर हजर व्हायला जा , इथली कुठली ही काळजी करू नकोस , मी सगळं सांभाळून घेतो , तुला कुठला ही त्रास होणार नाही , याची काळजी , मी घेतो " असं आपुलकीनं आणि जिव्हाळ्यानं म्हणणारे ,बी. बी. पाटीलच होते !
              पुढे कालांतराने ,बी. बी. पाटील विभाग प्रमुख झाले. त्यांचा काम करण्याचा आवाका, दांडगा होता. त्यांचे वरिष्ठ , त्यांच्या कामावर खूष असायचे ! पण त्याच वेळी ,वरिष्ठ अधिकारी एखाद्या बाबतीत १०० % चूक आहे ,अशी त्यांची खात्री झाली , तर तिथल्या तिथे त्यांना सुनवायला बी. बी. पाटील यांनी, कमी केले नाही.
              सेवानिवृत्त झाल्यावर ,बी. बी. पाटील आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या केरूर या गावी जाउन ,शेती करायला लागले. एका संध्याकाळी ते मोटार सायकल वरून, केरूर हून सोलापूरला येत असताना , पैशाच्या मोहाने ,त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात, त्यांची फार वाईट परिस्थिती झाली होती. त्या नंतर ते थोडे फार सावरले , पण पूर्ण सावरले नाहीत. त्यातच त्यांना ,डायबेटिसचा त्रास सुरू झाला. म्हणावे तसे पथ्यपाणी करण्याचा, त्यांचा स्वभाव नसल्याने ,त्यांची शुगर ८०० ते ९०० च्या आसपास गेली, पण ते कोमात गेले नाहीत. त्यातून ही ते बाहेर पडले . पण एकूणच तब्बेत खालावल्याने ,अंदाजे  दीड वर्षा पूर्वी ,त्यांचे निधन झाले.
                  त्यांच्या पाटील घराण्यात ,पहिले शिकलेले म्हणजे बी. बी. पाटीलच ! नोकरीला लागल्यावर ,त्यांनी आपल्या धाकट्या भावाला डाॅक्टर होण्यासाठी, सर्व प्रकारची मदत केली. बी. बी. पाटील  स्वतः हुषार होतेच ! त्यांची मुले ही हुषारच आहेत. थोरली अनुराधा , डाॅक्टर झाली. ती MD Pathology आहे. दुसरा मुलगा सोमनाथ इंजिनीयर असून , एका खासगी कंपनीत अधिकारी आहे. सर्वात धाकटा केदार , हा सुध्दा इंजिनीयर असून ,अमेरिकेत तो स्थायिक होत आहे. त्याची पत्नी अमेरिकन आहे.
               बी. बी. पाटील नेहमी म्हणत , मी कुठे ही पैसा गुंतवला नाही. माझी हुषार मुले, हीच माझी संपत्ती ! त्यांच्या शिक्षणात , मी माझ्या कडून ,कांहीही कमी पडून देणार नाही. तसेच वागून त्यांनी ,आपले शब्द सार्थ केले.
                      सर्व स्नेही मंडळींच्या ह्रदयात , कायम स्थान मिळविलेल्या , कै. बी. बी. पाटील यांना , या निमित्ताने,  विनम्र श्रध्दांजली.......
                      

Saturday, 27 April 2019

एक वेगळाच " सगीत " अनुभव...

                एके दिवशी संध्याकाळी ,नाशिकच्या काॅलेज रोड वरील ,श्रध्दा माॅल मध्ये, तरूणाईला आवडणार्‍या गाण्याचा आवाज आला व पाऊले तिकडे वळली. हे गाणं शास्त्रिय संगीत नाही , हिन्दी सिने संगीत ही नाही , हे समजत होते. हे कांही तरी वेगळेच संगीत आहे , आपण पूर्वी कधी ही, असले लाऊड संगीत ऐकलेले नाही ,हे समजून सुध्दा, मी तिकडे खेचला गेलो. गाणं मला कळत नव्हतं , पण हे तरूणाईला भावणारं आहे हे समजत होतं, जाणवत होतं.
               आत गेलो तर पाच पंन्नास तरूण , तरूणी त्या गायका भोवती उभे राहून, गाण्याचा आस्वाद घेत होते. माहोल एकदम चिअरफुल्ल होता.  स्पिकर्स फुल्ल व्हाॅल्युम वर असावेत , आवाजाचा घुमारा म्हणजे  " बास " , छान ठेवला होता ,कोण गात होता माहिती नाही , काय गात होता ते गाणंही माहिती नाही , फक्त दिसत होतं की ती तरूणाई, ते सर्व एंजाॅय करतेय.
            मला तरूणाईची अशी एंजाॅयमेंट ,नेहमीच आवडते. तो गायक गाण्याची ओळ, मधूनच अर्धवट सोडत होता , समोरची तरूणाई कोरस मध्ये, ती ओळ पूर्ण करत होती. थोडक्यात गाणार्‍याची व ऐकणार्‍यांची वेव्ह लेंग्थ जमली होती.   
             खूप आनंद वाटला ,तो माहौल पाहून व ऐकून ! आपण ही तरूण झाल्या सारखं वाटलं ! आयुष्यात असे योग ,फार थोडे येतात. एकूण " दिल खुष हो गया बाॅस " !
                  लै भारी.....

नाशिकची " साधना मिसळ "

              एके दिवशी सकाळी ,सौ. रजनीचा आत्तेभाउ ,श्री. प्रमोद दिवाण आणि फॅमिली बरोबर ,मिसळ खाण्यासाठी चि. आदित्यने ,नाशिकच्या गंगापूर रोड वरील "साधना "  , येथे सर्वांना नेले होते. तिथे कार पार्किंग झोन मध्ये, जवळ जवळ सत्तर ते पंच्याहत्तर कार्स ,शिस्तबद्ध रीतीने उभ्या केल्या होत्या.
             प्रत्यक्ष मिसळ खाण्याची जागा, कोंकणात जशी झावळ्यांची घरे असतात ,तशा प्रकारची होती. समोर बसके टेबल व दोन्ही बाजूने बसण्यासाठी बाजले, असा माहौल होता. मिसळीचे असंख्य चाहते, ताव मारत होते. आम्ही पण आॅर्डर दिली. दोन मिनीटात तळलेले पापड , देखण्या रीतीने चिरलेला बारीक कांदा आम्हाला सर्व्ह झाला. सोबत गुळाची जिलबी ही हजर झाली. आम्ही जिलबीची चव घेतोय ,तोवर लगेच मिसळ व दोन दोन मोठ्ठे बनपाव आणि सोबत दही सर्व्ह झाले. मिसळीला प्रत्येकाच्या आवडीची चव येण्यासाठी, वेगळ्या वेगळ्या लिक्विड मसाल्याचे नमूने, समोर आले.                         मिसळ अशा चविष्ट पध्दतीने खाता येते व ती ही अशा नवीन वेगळ्याच माहौल मध्ये , हे मी प्रथमच अनुभवत होतो. मिसळ आणि गुळाची जिलबी ,छानच होती.
                  मिसळ खाउन चहा पिउन उठलो. समोर पानाचा ठेला दिसला .पान खाण्याची हुक्की आली. वेगवेगळ्या प्रकारचे पानाचे विडे ,आकर्षकपणे मांडून ठेवले होते. त्यात मला "फायर पान " असा प्रकार दिसला. मी फायर पान म्हणजे काय, असे विचारताच , त्या पान वाल्याने मला मराठी नटी ,श्रुती मराठे हिच्या तोंडात पेटते ,म्हणजेच " फायर पान "घालतानाचा व्हिडोओ, त्याच्या मोबाईलवर दाखविला. त्याच्या अशा व्यावसायिक दृष्टीकोनाचे ,मला कौतूक वाटले. मी पण फायर पान खाताना ,माझा व्हिडिओ काढून घेतला. फायर पान खाताना, तोंडात चटका बसेल म्हणून मी घाबरून होतो. पण तसे कांही झाले नाही.
              तिथून बाहेर आलो तर समोर, एका ठिकाणी कळसूत्री बाहूल्यांचा खेळ ,चालू होता. सैराटच्या " झिंग झिंग झिंगाट " या गाण्यावर बाहूल्या ,अतिशय मोहकपणे नाचत होत्या. कमाल वाटली त्यांना नाचवणार्‍याची !
             तोवर नातू चि, निषाद उंटावर बसलेला दिसला , श्री. प्रमोदची सून व त्याची पत्नी सौ. निलीमा, यांनी बैलगाडीतून चक्कर मारली. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद, अतिशय बोलका होता. तिथे झोपाळा होता. त्यावर मी बसून आनंद लुटला.                     अशी एका शनिवारची सकाळ , वेगळ्या वातावरणात वेगळाच आनंद देउन गेली.
" लै भारी वाटलं राव " !

अनाकलनीय गुरू ????

               गेल्या रविवारी गुरू पौर्णिमा झाली.  तथाकथित अध्यात्मिक गुरूंचा आश्रम ,माझ्या एका मित्राच्या घरा जवळ आहे. ते अध्यात्मिक गुरू, सध्या त्यांच्या कांही " कर्मा " मुळे " बंदिवान " आहेत. आता अशा परिस्थितीत ,त्या आश्रमात गुरू पौर्णिमेला ,अजिबात गर्दी नसणार, असा माझा समज होता. पण माझ्या मित्राने सांगीतल्या प्रमाणे, तेथे तोबा गर्दी होती. मग मी स्वतः पहायला गेलो. मी पण आश्चर्यचकीतच झालो. त्या आश्रमा समोरच, एक वडाचे झाड होते. त्या वडाच्या झाडात ,त्या तथाकथित अध्यात्मिक गुरूंनी, आपले तेज सामावल्याने ,तो वृक्ष " कल्पवृक्ष " झाला असून , त्याला प्रदक्षिणा घातल्यास, आपली मनोकामना पूर्ण होते.  हा विश्वास त्यांच्या शिष्यांना असल्याने ,अक्षरशः झुंडीने भक्तगण त्या वृक्षाला , जप करीत प्रदक्षिणा घालीत होते. माझ्या मित्राने सांगीतल्या प्रमाणे , इतर दिवशी ही केंव्हा ही पाहिले तरी ,लोक त्या वृक्षाला मनोकामना पूर्ण होइल या आशेने, प्रदक्षिणा घालीत असतात. आता याला काय म्हणावे ? अतूट श्रध्दा की अंध श्रध्दा ?
              हे कांहीच नव्हे. माझ्या मित्राने या पुढे जाउन, जे सांगीतले ते ऐकून मी अाश्चर्याने थक्कच झालो. त्या बंदिवासात असलेल्या अध्यात्मिक गुरूंचे एक शिष्य, त्याच्या परिचयाचे आहेत. त्या शिष्याच्या प्रतिपादना नुसार , ते गुरू बंदिवासात का आहेत ? तर,  त्यांनी आपल्या शिष्यांची पापे ,आपल्याकडे घेतली आहेत . ते आपल्या शिष्यांच्या साठी बंदिवासात राहून ,त्या पापांचे परिमार्जन करित आहेत.  थोडक्यात काय तर , शिष्यांच्या साठी गुरू शिक्षा भोगीत आहेत.
              हे ऐकून मला भरून आलं ! धन्य ते गुरू व धन्य ते शिष्य ! अशी अढळ  ( अंध )श्रध्दा हवी.
          मग माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की, श्रीमदभगवत गीतेत भगवंतांनी सांगीतले आहे  , ज्याला त्याला आपल्या कर्माचे फल ,भोगावेच लागते. पण येथे तर गुरू, शिष्यांच्या कुकर्मा साठी , स्वतः क्लेष म्हणजे साक्षात तुरूंगवास भोगत आहेत ,अशी त्यांच्या शिष्यांची श्रध्दा आहे.
           खरं काय आणि खोटं काय कांही समजेनासं झालय !
याला अतूट श्रध्दा म्हणायचं  की अंध श्रध्दा ?

मॅरॅथाॅन....एक वेगळा अनुभव

              दि. ८ आॅक्टोबर २०१७ , या दिवशी  नाशिकमध्ये " महा मॅरॅथाॅन " ,आयोजित करण्यात आली होती. या मॅरॅथाॅन मध्ये भाग घेणे, माझ्या मनात ही नव्हते. पण आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील, ८२ वर्षांचे " तरूण " सेवानिवृत्त प्राचार्य, श्री. एस. डी. कुलकर्णी सरांनी या बाबतीत विचारल्यावर , चला सरांना कंपनी देउ  , या विचाराने मी त्यांच्या बरोबर ,या " महा मॅरॅथाॅन मध्ये भाग घ्यायचे ठरवले. या महा मॅरॅथाॅन मध्ये तीन सेगमेंट्स होते. पहिला २१ किमी चा " अर्ध मॅरॅथाॅन ". दुसरा १० किमी चा , तिसरा ५ किमी चा , चौथा ३किमी चा ! तीन किमीचा सेगमेंट, सिनीयर सिटीझन्स साठी होता. पण आम्ही स्वतःला सिनीयर सिटीझन्स समजत नसल्याने, तसेच १० किमी मध्ये भाग घेण्या एवढे  ,तरणे बांड नसल्याने " झाकली मुठ , सव्वा लाखाची " ,या म्हणीला अनुसरून ५ किमीच्या सेगमेंट मध्ये, आम्ही भाग घेतला.
                या वयात म्हणजे ७२ व्या वर्षी ,असल्या कांही उचापती करणार म्हटल्यावर, बर्‍याच जणांच्या कडून वेगवेगळ्या सूचनांचा पाउस ,आमच्यावर पडला. त्या सर्व सूचनांचा अर्थ एकच होता , " जरा जपून पळा , तुम्ही वृध्द आहात याची जाणीव ठेवा , अचरटपणा करू नका "
               रोज सकाळी मी ३.५ किमी फास्ट चालतोच ! मी हे ५ किमीचे अंतर सहज पार करू शकेन, असा मला विश्वास होता. श्री. एस. डी. के. सर मात्र, सकाळी फिरताना मधून मधून ,पळायची प्रॅक्टीस करायचे. माझे गुडघे दुखत असल्याने, आपण पळायचे नाही , फक्त छान एंजाॅय करायचे ,असे मी ठरविले होते.
                 शेवटी मॅरॅथाॅनचा दिवस उगवला. सकाळी सहा वाजता ,नाशिकच्या गोल्फ ग्राउंडवर जमायचे होते. माझा उत्साह पाहून, सौ. रजनी मला " चिअर अप " करण्यासाठी येणार ,असं म्हणाली. मग सौ. एस. डी. कुलकर्णी वहिनीही ,यायला तयार झाल्या. आम्ही चौघे माझ्या कारने, गोल्फ मैदानावर गेलो. गाड्या पार्किंगचा प्राॅब्लेम होईल असे वाटत होते. पण तसे कांही झाले नाही. पार्किंगची नीट व्यवस्था ,शेजारच्या " इदगाह " मैदानावर, करण्यात आली होती. तिथून गोल्फ मैदानाकडे जाणार्‍या वाटेवर, हिरव्या रंगाचे नेट अंथरले होते . प्रत्यक्ष मैदानात प्रवेश करताना, ज्यांनी मॅरॅथाॅनचा युनिफाॅर्म घातलेला आहे , त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची वृष्टी, बाजूला उभ्या असलेल्या तरूणी करत होत्या. या स्वागताने मन भरून आले.
                मैदानावर प्रवेश करताच, समोरच्या स्टेजवर " झुंबा " डान्स करणारी एक तरूणी, दिसत होती. तिच्या मागच्या मोठ्या पडद्यावर ,प्रेक्षक व ती नाचणारी तरूणी, " मोठ्या  ठळक "स्वरूपात दिसत होते. हे मॅरॅथाॅन सूरू होण्या पूर्वीचे, वाॅर्मिंग अप होते. तिथे हजर असलेल्या चार पाच हजार लोकापैकी, फारतर दहा टक्के लोक तिचे हावभाव पाहून त्या प्रमाणे, वाॅर्मिंग अप करण्याचा प्रयत्न करीत होते. बाकीचे नुसतेच एंजाॅय करत होते. तिथले म्युझिक , झुंबा नृत्य व जिकडे तिकडे मॅरॅथाॅनचा, एकसारखा युनिफाॅर्म घातलेले लोक...एकूण माहौल मोठा प्रसन्न होता. सकाळी सकाळी छान वाटले , आपण या उपक्रमात भाग घेतल्याचे समाधान जाणवले.
                 सातला आमची मॅरॅथाॅन सुरू होणार होती. पावणे सातला ,मैदाना वरून त्र्यंबक रोडवर जावे ,अशी सूचना मिळाली. मैदानातून जाताना, मी सौ. रजनीला व सरांनी त्यांच्या मिसेसला, जणू कांही आपण महायुध्दावर निघाल्या प्रमाणे, निरोप दिला. त्या दोघींच्या ही डोळ्यात, कधी नव्हे ते, आपल्या नवर्‍या बद्दल, कौतूकाचे भाव दिसले व आम्ही मार्गस्थ होण्यासाठी रोडवर निघालो.
                  रोडवर तुडुंब गर्दी होती. फोर लेनच्या रोड वरील ,आमच्या बाजूची लेन, पोलीसांनी केवळ स्पर्धकांसाठी ,राखीव ठेवली होती. समोर मोठ्ठे घड्याळ लावले होते. त्यात सहा पंचावन्न ही वेळ दिसत होती. आता ही पाच मिनिटे कधी संपतात, याची उत्सुकता सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होती. शेवटचे दहा सेकंद उरल्यावर ,उत्सुकता शिगेला पोचली व सर्वजण ओरडून एक्कावन , बावन् , त्रेपन्न .....एकोणसाठ आणि सहावाजून साठ मिनिटे होताच, सर्व स्पर्धक धावायला लागले. आम्हाला धावायला जागा मिळून ,प्रत्यक्ष धावायला सुरवात करण्यासाठी ,दोन मिनिटे लागली. तुतारी , पिप्पाणी , ताशे , ढोल या वाद्यांच्या गजरात ,आम्ही जग जिंकायला निघालेल्या नेपोलियन बोनापार्टच्या भूमिकेत ,कधी शिरलो ते समजलच नाही.
                   आणि मॅरॅथाॅन सुरू झाली. .....एक अविस्मरणीय अनुभव, या मॅरॅथाॅनने मला दिला व आयुष्य आणखीन समृद्ध झाले........

" मुघल ए आझम "....एक नाट्यानुभव....

                 " मुघल ए आझम " , १९६० सालचा एक भव्यदिव्य चित्रपट ! ज्यात शहेनशहा अकबराची भूमिका ,पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. पृथ्वीराज म्हणजे राज कपूरचे पिताश्री !  अकबराला, राजपूत पत्नी जोधाबाई, हिच्या पासून झालेला मुलगा, म्हणजे सलीम ! त्याची भूमिका केली होती दिलीप कुमार यांनी ! त्याची प्रेयसी, म्हणजे अकबराच्या दरबारातील नृत्यांगना अनारकली , ही भूमिका मधुबालाने केलेली होती. भव्य सेट्स व जबरदस्त अभिनय या मुळे, हा सिनेमा त्या काळी फार गाजला होता.
                 अशा गाजलेल्या सिनेमावर नाटक बेतणे, ही संकल्पना, मनाला फारशी पटणारी नाही. सिनेमात दाखविता येणारी भव्यता ,रंगमंचावर कशी दिसणार ? शिवाय तितक्या तोडीचे अभिनेते कसे मिळणार ? असे अनेक प्रश्न, हे नाटक पाहण्या पूर्वी ,कोणाच्या ही मनात येउ शकतात. तसे माझ्या ही मनात होते. शिवाय नाटकाचे तिकीट प्रति व्यक्ती रू. २५०० /- होते. नाटक मुंबईत NCPA ला होते. नाशिकहून नाटकासाठी मुंबईला जाणे ,केवळ अशक्यच ! पण तो योग आला व मी ते नाटक पाहिले.
                   नाटक पाहून आल्यावर ,मन अतिशय आनंदित झाले होते . रंगमंचा वरचा तो प्रयोग, केवळ अविस्मरणीय असाच होता . NCPA थिएटरही भव्य दिव्य व या प्रयोगाला साजेसेच होते. या नाटकाचे प्रयोग, फक्त मुंबई व दिल्ली येथे झाले आहेत. गेले वर्षभर झालेले सर्व प्रयोग, " हाउस फुल्ल " होते असे समजले.
                      या नाटकात स्टेजवर ,मुघल ए आझम या चित्रपटातील गाणी पाहणे ,हा एक आनंद योगच होता. उदाहराणार्थ सांगायचे तर ," प्यार किया तो डरना क्या " हे गाणे ,अनालकली व तिच्या अंदाजे पंचवीस ते तीस सख्या ,यांनी अतिशय सुंदर सादर केले . खरच डोळ्याचे पारणे फिटले ! हे  हिन्दी नाटक ऐतिहासिक व मुघल राजघराण्यावर आधारित असल्याने, सर्वांची वेषभूषा,  अतिशय देखणी व झगमगाटपूर्ण अशीच होती. स्टेजवर दाखविलेला, शहेनशहा अकबर व सलीम यांचा युध्दाचा प्रसंग ,अजोड असाच होता. नेपथ्यात ही वेगळेपणा होता. त्याला सिनेमाच्या तंत्राची जोड दिल्याने, स्टेजवर हुबेहुब त्रिमितीय भास निर्माण होत होता . भव्यता डोळ्यात भरत होती.
                     या नाटकात अनारकलीची भूमिका, मराठी अभिनेत्री प्रियांका बर्वे, हिने केली आहे. तिचा आवाज व नृत्य कौशल्य लाजवाबच ! एकूण हे नाटक पाहिल्यावर, आता रंगमंचावर पुन्हा कांहीही पाहिले नाही तरी चालेल , असा एक भव्यदिव्य आणि सुखद अनुभव, या नाटकाने दिला.
                  ज्यांनी हे नाटक पाहिले किंवा पुढे पाहतील, ते माझ्या या मताशी निश्चित सहमत होतीलच, असा विश्वास बाळगून थांबतो !

निरामय जाॅगर्सचे " ब्रह्मा , विष्णू , महेश "

                 फोटोत दिसत आहेत ते , नाशिक मधील , निरामय जाॅगर्स , या आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपचे,  " ब्रह्मा , विष्णु , महेश " !  डावीकडून श्री. गुजराथी सर , नंतर  श्री. एस. डी. कुलकर्णी सर , त्यांच्या नंतर  केसकर सर .
               या तिघांना ब्रह्मा , विष्णू आणि महेश , म्हणायचे कारण म्हणजे , फोटोत ते तिघे जसे बसलेले दिसतात , अगदी तसेच ते तिघे,  रोज  त्याच बाकावर आणि तसेच  बसलेले असतात. बाकी आम्ही सगळेजण , शेजारीच असलेल्या अरूंद कट्यावर बसतो. कांही जण उभेच राहतात.
                 तिघांच्यात नर्म विनोद चालू असतात. तिघे ही एकमेकांच्या, फिरक्या घेत असतात. हे सगळं आम्ही बाकीचे एजाॅय करत असतो. या तिघांच्या पैकी ,एकजण कोणी कांही कारणाने फिरायला आले नाही , तर बाका वरील ती जागा राकामी ठेवली जाते. त्या जागेवर रिकामी असून ही,  कोणी ही बसत नाही. तिघे ही वयाने सिनीयर असल्याने, त्यांचा मान ठेवला जातो.   
                 श्री. गुजराथी सर , फिजीकल केमिस्ट्रीचे पी. एचडी , श्री. एस. डी. कुलकर्णी सर म्हणजे काॅमर्स काॅलेजचे प्रिन्सिपाॅल आणि केसकर सर हे मराठीचे पी. एचडी ! असे तिघेही  शिक्षक असून ,ज्ञानाने खूपच मोठे असल्याने सर्वजण त्यांचा मान राखतात.
            एका वाक्यात सांगायचे तर , तिघे ही आमच्या " निरामय जाॅगर्स " या ग्रुपचे भूषण आहेत. तिघांना मानाचा मुजरा !

मी शिक्षक कसा झालो....

                   मी रोज संध्याकाळी, सहा ते साडेसात,  आठवीच्या मुलांना गणित  व सायन्स , हे विषय शिकवायला जातो . त्या मुलांचाच्या समवेत ,शनिवार दि. १६ डिसेंबर रोजी, काढलेला फोटो !
                 फोटोत माझ्या सोबत उभ्या आहेत त्या,  सौ, सुधा मेहता. यांनी बारा वर्षा पूर्वी ,ज्या मुलांना खासगी क्लासची फी परवडत नाही, त्यांना मोफत शिकविण्याचा उपक्रम सुरू केला. आज तागायत तो उपक्रम, अविरतपणे चालू आहे. पाचवी ते दहावी या  वर्गातील तील मुले, यात शिकतात. या मुलांच्या पालकांचे उत्पन्न ,अतिशय कमी आहे. कोणी वाॅचमन आहेत , कोणी रंगारी आहेत , कोणी न्हाव्याच्या दुकानात कारागीर आहेत . परिस्थितीवर मात करून ज्या मुलांना शिकायची इच्छा आहे , अशी मुले येथे शिकायला येतात. या मुलांच्या कडून ,शिकविण्याची फी घेतली जात नाही. मोफत शिक्षण दिले जाते. शिकविणारे शिक्षक, कोणतेही मानधन घेत नाहीत. सर्वजण स्वयंस्फूर्तिने येतात आणि शिकवतात .
               हा अनोखा क्लास ,नाशकातील गंगापूर रोडवर असलेल्या सावरकर नगर मधील ,विश्वास लाॅन्सचे मालक श्री. विश्वास ठाकूर ,ज्या बिल्डिंग मध्ये राहतात, त्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये किंवा अजूबाजूच्या मोकळ्या जागेतील ,झाडाखाली चालतो. थंडी व पावसाळ्यात, तो विश्वास लाॅन्सच्या इमारतीत ही चालतो. या क्लासला फी नसल्याने ,जागेचे भाडे कुठून देणार ? श्री. विश्वासजी ठाकूर, आपल्या जागेचा उपयोग, या कामासाठी मोफत करून देतात.
              सौ. मेहता मॅडम यांनी, बारा वर्षा पूर्वी हा उपक्रम सुरू केला व त्यात सातत्य राखले , ही बाब अभिनंदनीय आहेच ! क्लास मधील सर्व वर्गातली मुले ,त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करतात.
               आम्ही सावरकर नगरमध्ये रहायला आल्यावर ,आमच्या घराच्या बाल्कनीतून, मला हे वर्ग दिसायचे. कांही मुलं बसली आहेत व कोणीतरी त्यांना शिकवतं आहे . हे दृष्य पाहून, माझ्या मनात उत्कंठा निर्माण झाली. मी चौकशी केल्यावर, मला सौ. मेहता मॅडम यांचे नाव समजले, मी त्यांना भेटलो . या उपक्रमाची माहीती घेतली. मला उपक्रम आवडला. मी या उपक्रमात, सामिल होण्याची इच्छा प्रकट केली. त्या वेळी आठवीच्या वर्गाला शिकवायला, कोणी नव्हते. मी, ती जबाबदारी आनंदाने स्विकारली.
                  आज मी अत्यंत तृप्त आहे. निरपेक्ष वृत्तीने केलेल्या कामाचा ,आगळा वेगळा आनंद लुटत आहे. माझ्या क्लास मध्ये वीस ते पस्तीस मुले असतात . मुले जमीनीवर बसतात. मी शिक्षक या नात्याने , पार्किंच्या छोट्याशा  कट्यावर बसतो. शेजारी खांबाला टेकवून, एक छोटा फळा असतो. माझ्या क्लास मधील मुलांच्यात रममाण होउन , त्यांच्या सुखदुःखात सहभागी होउन , शिकविण्याचा आगळा वेगळा निरपेक्ष आनंद, मी घेतो आहे.
                 मी रोज उपस्थित मुलांची ,हजरी घेतो. हजरीच्या वेळी ,मी प्रत्येक मुलांला, एक बोधवाक्य म्हणायला लावतो. सलग पंधरा दिवसा नंतर मी वाक्य बदलून , दुसरे वाक्य देतो. मुले हजरीच्या वेळी, ते बोधवाक्य मला म्हणून दाखवितात. ही वाक्ये साधारण अशी असतात.
                 १.तोच तोच विषय, परत परत करणे, म्हणजे अभ्यास , विषयात बदल, हीच विश्रांती. २. जो अभ्यास करतो, तोच माझा मित्र. जो अभ्यास करत नाही, तो माझा मित्र नाही. ३. माझे आई वडील कष्ट करून मला शिकवतात , मी भरपूर अभ्यास करीन व आई वडीलांना सुखात ठेवीन. ४. मी पैसे मिळवायला लागल्यावर , दर महिन्याला किमान २५ % पैसे शिल्लक टाकीन. ५, मी पैसे मिळवायला लागल्यावर , रोजचा जमाखर्च डायरीत लिहील्या शिवाय ,झोपणार नाही. इत्यादी.....
                      मी संध्याकाळी क्लासमध्ये गेलो की ,मुलं मला " गुड इव्हिनिंग सर " असे म्हणायची . क्लास संपल्यावर " गुड नाईट सर " म्हणायची. मी ते बंद केले. त्या ऐवजी दोन्ही वेळी " जय हिंद "म्हणा ,असे मी सांगीतले, आता मुले मी गेलो की किंवा क्लास सुटल्यावर, " जय हिन्द , सर " असे न विसरता म्हणतात,
                महिन्याच्या शेवटी ,ज्या विद्यार्थ्याची १०० % हजेरी असेल ,त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थीनीला, मी बक्षिस देतो. पॅड , कंपास किंवा इतर कांही शैक्षणिक साहित्य , त्या त्या विद्यार्थ्याला विचारून , त्याची गरज लक्षात घेउन, विकत आणून  देतो. मुले खूष होतात . क्लासला १०० % हजेरी असावी ,असा प्रयत्न करतात.
                 या वर्षीच्या माझ्या वाढदिवसा निमित्त मी, माझ्या क्लास मधील सर्व विद्यार्थी , विद्यार्थिनींना " डिक्शनरी " भेट दिली.
                 अशा प्रकारे रोज संध्याकाळी, सहा ते साडेसात या वेळेत, अतिशय आनंदात, मी या उपक्रमाचा ,निरपेक्ष आनंद मिळवत आहे. या आनंदाची, इतर कोणत्या ही आनंदाशी, तुलना होउच शकत नाही.
                  सौ. सुधा मेहता यांनी ,मला या उपक्रमात सहभागी करून घेतल्या बद्दल ,त्यांना शतशः धन्यवाद !

एक मन हेलावून टाकणारी गोष्ट

                 खूप दिवस झाले त्या गोष्टीला ,पण आज आठवण झाली आणि सर्वांना सांगावीशी वाटली. फार सांगण्या सारखी आहे ,असं नाहीय. पण ह्रदयाला भिडणारी आहे , म्हणून सांगावीशी वाटते आहे ,इतकच !
               अंदाजे १९९४ - ९५ साल असेल. मे महिन्याच्या सुट्टीत, शाळेच्या अभ्यासात  अप्रगत असलेल्या  मुलांना , शिकवावं आणि त्यांची प्रगती व्हावी ,असे मिरजेच्या श्री. दिलीप आपटे सरांच्या मनात आलं .त्यांनी प्रत्येक महापालिकेच्या शाळेत जाउन ,अशा अप्रगत म्हणजे अभ्यासात मागे असलेल्या ,विद्यार्थ्यांचा शोध घेतला व १ मे रोजी, अशा सर्व मुलांना एकत्र जमवलं.
               सर्व साधारण पणे ,ही सर्व मुले, अतिशय गरीब परिस्थिती मधील होती. त्यांचे पालक साधारणतः मजूर किंवा त्या ही पेक्षा खालच्या ,गरीब परिस्थिती मधील होते. पहिली ते सातवी असे वर्ग होते.
                त्यांना शिकविण्यासाठी, ज्यांची १० वीची परिक्षा झाली आहे व जी मुले सुट्टीत कांही करू इच्छितात, अशा मुलांना आवाहन करण्यात आले. ज्यांना सामाजिक जाणिव आहे ,अशी मुले आवर्जून आली. शाळेतील शिक्षकांनी शिकविण्या पेक्षा ,विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकविल्यास ,फरक पडेल अशी त्या मागची प्रेरणा होती. या उपक्रमात मदतनीस म्हणून ,मी सहभागी झालो होतो. 
                 हा अप्रगत विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम ,मिरजेच्या तळ्यावरील गणपती मंदिराच्या प्रांगणात ,चालू होता. रोज सकाळी आठ ते दहा , या वेळात हे वर्ग चालत.
                 एक दिवस सर्व सुरळीत चालू आहे ना ? शिकविणार्‍या विद्यार्थ्यांना कांही अडचण नाही ना ? हे पहात असताना मला असे दिसले कीं , एक तिसरीतील  ९ -१०  वर्षाचा मुलगा ,वर्गात न जाता मंदिराच्या खांबाला टेकून बसून, रडत आहे . मी त्याच्या जवळ गेलो , " बाळ का रडतोस ? वर्गात का गेला नाहीस ? " असे विचारले. तो म्हणाला ," सकाळी  मी घरचा केर काढला नाही म्हणून ,आजीने मला कांही खायला दिले नाही व मारले , मला फार भूक लागली आहे...."...आणि तो मुलगा मोठ्याने हुंदके देउन ,रडायला लागला. शेजारी एक बेकरी होती. तिथे मी  त्याला नेले व पोटभर खाउ घातले. उद्या सकाळी येताना, तुझ्या आजीला मी बोलावलय म्हणून सांग, असे मी त्याला आवर्जून सांगीतले.
                  दुसर्‍या दिवशी ,तो त्याच्या आजीला घेउन आला. गाठी मारलेले व ठिगळ लावलेले पातळ , अस्ताव्यस्त  पांढरे केस  ,गळ्यात झोळी, असा त्या आजीचा पोषाख होता. मी त्या आजीला म्हटले , " काल हा तुमचा नातू ,तुम्ही खायला दिलं नाही व  घरचा केर काढला नाही म्हणून तुम्ही मारल्या ने रडत होता. ती म्हणाली " घरात खायला भाकर तुकडा न्हवता , मी बी कातावून गेलो हुतो ,  त्यात ह्यानं केर बी काडला न्हाइ , मला माजाच राग आला हुता , मग मी मारलं त्येला ! तुमाला काय सांगायचं सायेब , हे लेकरू माज्या वटीत सोडून ह्याचे आय आनि बा परागंदा झाल्यात. मी सकाळ झाली की , झोळी घीउन काय किडूक मिडूक गोळा करत्ये , ते इकून आमी कसं बरं पोट जाळतो. " ह्याचे आई वडील कुठं आहेत ? असं विचारताच त्या माउलीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. हुंदके देत ती बाई सांगू लागली " ह्येचा बा , तकडं नागपूराकडं शेंट्रिंगगच्या कामाला जातो म्हनून जो गेलाय तो तिकडचाच झालाय. आनि ह्याची आई कुना बरूबर पळून गेलीय , काय म्हाईती बी न्हाई . ह्ये लेकरू रोज आई बा येतील म्हनून डोळं लावून बसतय , पन त्ये काय येतीलसं दिसत न्हाई. मी ही अशी म्हातारी , झोळी घीउन फिरतो , कदी काय मिळतय ,कदी कायबी मिळत न्हाय. कसं बसं दिस वडतूया ह्या लेकरा साठी. काय म्हायती ह्येच्या नशिबात काय हाय ते ! " असं म्हणून ती म्हातारी ओक्साबोक्शी रडायला लागली . समाजातलं हे मन विदिर्ण करणारं वास्तव पाहून मी पण गलबलून गेलो............

श्री. सुधाकर केसकर सर...एक आदर्श दीपस्तंभ...

                   फोटोत दिसत आहेत ,ते आहेत ,आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील ,श्री. सुधाकर केसकर सर ! ते मुंबईत गोदरेज कंपनीच्या शाळेत ,शिक्षक होते , म्हणून आम्ही सर्वजण त्यांना, केसकर सर म्हणतो !                                            केसकर सरांची स्मृति म्हणजे ,अचाटच आहे. आमच्या ग्रुप मधील सर्वांचे वाढदिवस, त्यांना पाठ आहेत. इतकेच नव्हे तर ,सर्वांच्या लग्नाच्या , मुलांच्या जन्माच्या तारखा ही त्यांना मुखोद्गत आहेत.
                 एकदा मी त्यांच्या घरी गेलो असताना ,ते बोलता बोलता सहज म्हणाले, " दीक्षित , तुमच्या वडीलांची श्राध्दतिथी दोन दिवसावर आली आहे ! " ,हे ऐकून  मी चाटच पडलो . तारीख एखादे वेळेस लक्षात राहते , पण तिथी ही ! पुढे ते म्हणाले ,तुमच्या आईची श्राध्दतिथी ही, माझ्या स्मरणात आहे. मी त्यांचे पायच धरणार , पण त्यांनी अडविल्याने थांबलो.                   
                    केसकर सरांनी आमच्या ग्रुप मधील ,श्री. एस. डी. कुलकर्णी सरांना, ते पहिल्या शासकीय नोकरीला कधी लागले ? ती नोकरी सोडून ते नाशकात कधी आले ? नाशकात ,प्राध्यापकाच्या नोकरीसाठी त्यांचा इंटरव्ह्यु कधी झाला ?  ते जाॅईन कधी झाले ? त्यांचे पहिले लेक्चर कधी झाले  ? ह्या सर्व तारखा ,धडाधड सांगीतल्या . आम्ही सर्व आश्चर्याने, तोंडात बोटे घालणार होतो , पण अख्खा हातच तोंडात घालण्या सारखी, परिस्थिती निर्माण झाली.
                   केसकर सर मराठी , संस्कृत या भाषा  उत्तम जाणतात. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती विचारावी तर ,ती केसकर सरांनाच ! एकदा बोलता बोलता, कुणीतरी " गाढव गेलं आणि ब्रह्मचर्य ही गेलं ", ही म्हण वापरली. ती म्हण कशी तयार झाली , ते केसकर सरांनी आम्हाला सांगीतले आणि आम्ही लोटपोट हसलो. संस्कृत व मराठी भाषेचे विभक्ती प्रत्यय, त्यांना या वयात ही पाठ आहेत. एखाद्या शब्दाचा अर्थ , त्याची व्युत्पत्ती पाहिजे असल्यास , सरांना फोन केला की माहिती लग्गेच मिळणारच, याची १००% खात्री !
                 केसकर सर आणि सौ. वहिनी, या दोघांच्या बायपास शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.  सर स्वतःच्या व सौ. वहिनींच्या तब्बेती विषयी, अत्यंत जागरूक असतात. थोडंसं कांही वेगळं वाटलं की, डाॅक्टरांना दाखवून ते निराकरण करून घेतात. दुखणं किरकोळ आहे , कशाला डाॅक्टरकडे जायचं , असा विचार आपण करतो. पण ते तसे न करता ,जागरूकपणे योग्य वेळी, योग्य ती काळजी घेतात.
                   आजाराशी संबंधित मेडिकल टर्म्स आणि टर्मिनाॅलाॅजी ,सरांना पाठ आहे. डाॅक्टर लोकांशी बोलताना, ते त्यांच्या भाषेत बोलू शकतात किंवा डाॅक्टर लोकांची टेक्निकल भाषा ,ते समजू शकतात.
                  सरांचा आणखीन एक विशेष म्हणजे , त्यांनी स्वतःचे " इच्छापत्र " ( मृृृृत्युपत्र ) केलेले आहेच , पण त्यांनी " वैद्यकीय इच्छापत्र " ही ,तयार केलेले आहे ." वैद्यकीय इच्छापत्र " ही संकल्पना, आम्ही त्यांच्या कडून, प्रथमच ऐकली. वैद्यकीय इच्छा पत्रात, त्यांनी वयोपरत्वे आपल्याला असाध्य दुखण्याने गाठल्यास ,आपल्या तीन मुलींनी ,आपल्यावर कशा प्रकारे उपचार करावेत ,या विषयी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. शरीराला जास्त कष्टवू नये, असा त्याचा मथितार्थ आहे. या वैद्यकीय इच्छापत्रावर ,त्यांच्या फॅमिली डाॅक्टरची सही आहे. जेंव्हां हे इच्छापत्र, त्यांनी त्यांच्या फॅमिली डाॅक्टरला दाखविले , तेंव्हां ते ही आश्चर्य चकितच झाले. त्यांनाही ही संकल्पना, नवीनच होती. माझ्या ही माहितीत ," वैद्यकीय इच्छापत्र " केलेले एकमेव म्हणजे ,आमचे आदरणीय श्री. केसकर सरच !
                 केसकर सरांचे बोलणे, अतिशय शांत व मृदू असते ! पण त्याच वेळी ते, एखाद्याची टोपी उडविणारे ही असते !
                  आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मध्ये ,असे एका पेक्षा एक " हिरे " आहेत ! ही पहिल्या हिर्‍याची ओळख ! बाकीच्यांची सवडीने पाहूच !
                  श्री. केसकर सर आणि सौ. वहिनी यांना ,निरामय आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो !

उद्योगपति श्री. जयप्रकाश जोशी उर्फ जोटो....

                 आमच्या  सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स " या ग्रुप मध्ये,श्री. जयप्रकाश जोशी उर्फ जोटो (JOTO), या नावाचे एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व आहे . ते उद्योगपति आहेत. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ,कंपनीचे नाव JOTO असल्याने ,आम्ही त्यांना  "जोटो" या नावानेच हाक मारतो. श्री. जोटो ,म्हणजे एकदम मोकळं ढाकळं व्यक्तीमत्व ! पण तितकेच करारी ! अन्याया विरूध्द शेवट पर्यंत ,लढण्याची हिंमत राखणारे !
                   त्यांचा जन्म, अतिशय सामान्य कुटूंबात झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच ! त्यामुळे शिकण्याची इच्छा असून ही ,त्यांना त्या काळात त्यांना SSC च्या पुढे, शिक्षण घेता आले नाही. पण केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर आणि परिश्रमाने, त्यांनी आज नाशकात स्वतःचा कारखाना उभा केला आहे. त्यात छोटी छोटी ( मिनिएचर ) ग्रायंडिंग व्हिल्स बनविली जातात. मोठी ग्रायडिंग व्हिल्स बनविणारे ,खूप उद्योजक आहेत. पण मिनिएचर ग्रायडिंग व्हिल्स बनविणारे ,जगात फक्त पाच उद्योजक आहेत. त्या पैकी एक श्री. जोटो आहेत. ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्या उत्पादना पैकी ,जवळ जवळ १०० % उत्पादन  ,जगात ३५ देशात निर्यात होते . आपल्या देशाला त्या मुळे  ,भरपूर परकीय चलन मिळते. त्यांचा मुलगा ,त्यांना या व्यवसायात मदत करतो.
               अशा उद्योगपति  श्री. जोटोंना ,नुकत्याच झालेल्या " मॅग्नेटिक महाराष्ट्र " या समारंभात, महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्फत ,पारितोषिक देउन गौरविण्यात आले. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीचा ,आमच्या ग्रुपला अतिशय अभिमान आहे.
                आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी ,आमच्या ग्रुप तर्फे, श्री. जोटोंना सन्मानचिन्ह देउन, आम्ही सत्कार केला. त्या वेळी सन्मानचिन्हासह काढलेला हा फोटो !
                 परमेश्वराने श्री. जोटोंना, त्यांच्या प्रत्येक कामात यश द्यावे व त्यांच्या कर्तृत्व यशाची गुढी ,अशीच उंच उंच जात राहू दे ,अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.




माझ्या क्लासच्या पहिल्या बॅचचा निरोप समारंभ....

                आज आमच्या क्लासच्या पहिल्या बॅचचा ,निरोप समारंभ  होता. ज्या मुलांनी मला भरभरून प्रेम दिलं , मी शिकवताना, माझ्या शिकविण्यात रस घेउन , आपली प्रगती करून घेतली , त्यांना निरोप देताना मन भरून आलं होतं . त्यातल्या कांही मुलांच्या डोळ्यात, मला तोच भाव दिसला. शेवटी कोणाचा ही निरोप घेणं, हे क्लेशकारकच असतं .
                गेल्या वर्षीच्या (२०१७ ) जुलै महिन्यात, मी आठवीच्या मुलांना, गणित आणि विज्ञान शिकवायला सुरवात केली. अगदी मोफत . मोफत शिकविल्याने पैशाचा हिशोब , फी ची मागणी , हे कोणते ही सोपस्कार आमच्या या क्लास मध्ये नव्हते. फक्त शिकणे आणि शिकविणे , हेच एकमेव ध्येय होते.
               सुरवातीला माझ्या वर्गात, एकूण १८ मुले होती. त्यातल्या १० मुलांनी, क्लास सोडला. कांहींना परिस्थितीने नोकरी करावी लागली . कांही मुले लांब रहायला गेली . कांहींना शिकण्यात फारसा रस नव्हता . अशा अनेक कारणांनी, त्यांनी क्लास सोडला. शेवटी फक्त आठ मुले राहिली. त्यात तीन मुली व पाच मुले होती.
                   या मुलांची उच्च ध्येये होती. दोन मुलींना IPS व्हायचे आहे . एकीला डाॅक्टर व्हायचे आहे. मुलांच्या पैकी एकाला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. दोघांना अभियंता व्हायचे आहे. एकाला मिलिट्रित ब्रिगेडियर व्हायचे आहे. अशी त्यांची उच्च ध्येये आहेत. ही ध्येये साध्य करणे सोपे नाही . जाता जाता, कसाबसा अभ्यास करून, ही ध्येये साध्य होणार नसून, त्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल , हे त्यांच्या मनावर बिंबविण्याचा ,अटोकाट प्रयत्न मी केला. नुसते  ठराविक विषय शिकविण्या पेक्षा ,मी त्यांच्या मनावर सुसंस्कार करण्याचा ,खूप प्रयत्न केला आहे.
                   रोज क्लासची उपस्थिती घेताना, मी त्यांना खालील वाक्ये, म्हणायला सांगत असे... १. माझे आई वडील मला ,कष्ट करून शिकवितात . मी भरपूर अभ्यास करीन , खूप शिकेन व आई वडीलांना सुखात ठेवीन . २, मी विद्यार्थी आहे. अभ्यास करणे, हे माझे कर्तव्य आहे , ते मी पार पाडीनच . ३. मी पैसे मिळवायला लागल्यावर ,कमित कमी २५ % रक्कम ,दर महिन्याला, शिल्लक टाकीन. ४. मी रोज  जमा खर्च ,डायरीत लिहील्या शिवाय, झोपणार नाही. ५. तोच तोच विषय ,पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास ! विषयात बदल, हीच विश्रांती .६. जो अभ्यास करेल तोच माझा मित्र ! जो अभ्यास करीत नाही, तो माझा मित्र नाही ! इत्यादी इत्यादी.
                  तसेच क्लास सुरू होण्या पूर्वी आणि संपताना ,एकमेकांना गुड इव्हिनिंग  ,  गुड नाईट इत्यादी न म्हणता , "जय हिंद " असेच म्हणायचे , अशी माझी सक्त ताकीद होती. मुलांनी हे तत्व , तंतोतंत अंगीकारले होते.
                 मुले गरीब परिस्थिती मधील होती. पण त्यांना आपला उत्कर्ष व्हावा, याची जबरदस्त इच्छा होती. त्यांचे प्रत्येकाचे ध्येय, कितपत साध्य होईल माहिती नाही. पण दिशा दर्शनाचे काम , मी निश्चितच केले ,याचे मला समाधान निश्चितच आहे. परमेश्वराने मुलांना सुयश द्यावे , हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो !




श्री. एम्. व्ही. कुलकर्णी....मृृृृद यांत्रिकी विषयाचे महामहोपाध्याय.....

              आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , ते म्हणजे मेरी तील एक अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तीमत्व ,श्री. म.वि. कुलकर्णी उर्फ आम्हा सगळ्यांचे MVK.
                     MVK  , विज्ञान पदवीधर आहेत. घरच्या नाजूक आर्थिक परिस्थिती मुळे , MVK अभियंता होउ शकले नाहीत. ते जर अभियंता झाले असते तर , स्वतःच्या ज्ञानावर आणि कर्तृृृृत्वावर ते नक्की ,महाराष्ट्र राज्यात पाटबंधारे खात्यात ,किमान मुख्य अभियंता नक्की झाले असते, असा मला विश्वास आहे. ते जरी अभियंता होउ शकले नाहीत तरी , त्यांच्या बुध्दीमत्तापूर्ण अभ्यासाने, ते त्यांच्या मृृृृृृद यांत्रिकी ,( Soil Mechanics ) या  अभियांत्रिकी विषयाचे " महामहोपाध्याय " म्हणजेच  " संपूर्ण ज्ञानी " आहेत , असे माझे स्पष्ट मत आहे.
                  " मेरी " संशोधन संस्थेत , MVK , मृद यांत्रिकी विभागात वैज्ञानिक अधिकारी ,या पदावर कार्यरत होते.  संस्थेतील  अतिशय अभ्यासू म्हणून, ते प्रसिध्द होते. ते स्वतः भरपूर काम करत , तसेच हाता खालच्या लोकांच्या कडून ,आपल्याला आवश्यक ते काम करून घेण्याचे प्रशासकीय कसब , त्यांच्या कडे नक्कीच होते. ते जरी सायन्स ग्रॅज्युएट असले तरी , त्यांचे वाचन , निरीक्षण आणि मनन उत्तम असल्याने , अभियंता असलेले वरिष्ठ अधिकारी , त्यांना मानाने वागवत असत.
              श्री. MVK यांनी  , मृृृृृद यांत्रिकी (Soil Mechanics ) या अभियांत्रिकी विषयाचे   " Quality Control Hand Book"  लिहीले आहे. महाराष्ट्र शासनाने त्या पुस्तकाला ,अधिकृृृृृृृत रीत्या मान्यता  देउन , प्रसिध्द केलेले आहे. हे पुस्तक म्हणजे , Soil Mechanics या विषयाच्या Quality Control ची , "भगवद गीता" च आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मी कांही वर्षे  Quality Control ला ,साईटवर काम केल्याने ,त्या पुस्तकाचे महत्व मला चांगलेच ज्ञात आहे.
               MVK , नुसते शासकीय कामातच फक्त रस घेतात असे नाही. मेरी काॅलनीतील सांस्कृृृृतिक सोहळ्यात,   त्यांचा आणि त्यांच्या कुटूंबाचा, प्रत्यक्ष सहभाग असे. मेरीच्या सांस्कृृृृृृतिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, गणेशोत्सवात नाटके सादर केली जात असत. त्यात त्यांचा उत्साहाने सहभाग असे. कलेला आणि कलाकारांना उत्तेजन देणे , ही त्या मागची प्रेरणा होती.
                 MVK यांचा व आमचा ,कौटूंबिक संबंध आजतागायत कायम आहे. आम्ही एकमेकांच्या कौंटूंबिक सुख दुःखाच्या प्रसंगात, नेहमी बरोबर असतो. आमचा एकमेकांना ,सर्व प्रकारचा आधार होता व आज ही आहे.
             MVK यांना तीन मुले ! मुलगी चि. सौ. रोहिणी पुराणिक ही औरंगाबादला असते. तिने गांधर्व महाविद्यालयाची  संवादिनी वादनाची संगीताची सर्वोच्य पदवी प्राप्त केली आहे. ती संवादिनी वादन शिकवते ही ! मोठा मुलगा चि. मिलींद ,हा अभियंता आहे. तो " सीमेन्स " कंपनीत, उच्च पदस्थ अधिकारी आहे. दोन नंबरचा मुलगा चि. शिरीष ,हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम अधिकारात कार्यरत आहे. सर्वजण आपल्या आपल्या जागी ,सुस्थित आहेत.
                  MVK यांना सौ. वहिनींची समर्थ साथ आहेच !
सध्या MVK यांचे वय , ८० च्या पुढे आहे. पण वयाच्या मानाने , त्यांची तब्बेत उत्तम आहे. आमचा अनेक वर्षांचा घरोबा असल्याने , त्यांना आवर्जून भेटावेसे वाटते. त्यांच्या घरी गेले की , सर्वजण आगत्याने स्वागत करतात. 
                  अशा आदरणीय व्यक्तीमत्वाच्या, श्री. MVK आणि सौ. वहिनींना, परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे , अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

डाॅ. प्रा. नवनीतभाई गुजराथी सर...एक विविधांगी व्यक्तीमत्व...

                 फोटोत दिसत आहेत ते, आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील ,आदरणीय डाॅ. श्री. नवनीतभाई गुजराथी सर ! त्यांना सर म्हणायचे कारण म्हणजे, ते नाशिकच्या सुप्रसिध्द आर. वाय. के. काॅलेज मध्ये, एम्. एस्सी.  चे प्राध्यापक होते. ते फिजिकल केमिस्ट्री चे डाॅक्टरेट आहेत . ते नुसते प्राध्यापक नव्हते , तर  आपल्या विषयाच्या ज्ञानाचा उपयोग करून, त्यांनी नाशिकच्या उद्योजकांचे , आयुर्वेदिक डाॅक्टरांचे, केमिस्ट्री या विषयाशी संबंधित प्रश्न ,स्वतःच्या खासगी प्रयोग शाळेत, स्वतंत्र रित्या प्रयोग करून ,सोडविले आहेत.
                   सर्वसाधारणपणे, प्राध्यापक आपला विषय उत्तमात उत्तम शिकविण्याकडे ,नक्कीच लक्ष पुरवतात. पण आपल्या विषयाचा  , ज्ञानाचा ,समाजाला उपयोग व्हावा, या बाबीकडे फार थोडे प्राध्यापक, लक्ष पुरवतात. डाॅ. गुजराथी सर,  सामाजिक जाण असलेले प्राध्यापक आहेत. त्यांनी नोकरीत असताना, प्राध्यापकांचे प्रश्न ,अत्यंत हिरीरिने काॅलेजच्या  मॅनेजमेंट समोर आणि पुणे विद्यापीठात , स्पष्ट शब्दात मांडलेले होते. त्यांच्या वेळच्या प्राध्यापकांचे ,ते लढवया नेते होते .  सामाजिक जाणिवे सोबत, नेतृत्वाचे गूण  त्यांनी जोपासले होते.
                   त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांच्या घराण्यात शिकलेले ,ते पहिलेच ! आपल्या मामांच्या पासून प्रेरणा घेउन ,ते शिकले .  ते ही डाॅक्टरेट लेव्हल पर्यंत ! त्यांनी ज्या काळी डाॅक्टरेट केली , त्या काळातले त्यांचे अनुभव ,त्यांनी केलेले कष्ट ,ते कधी कधी सांगतात. त्या वरून त्या काळी डाॅक्टरेट करणे, किती कठीण होते, त्याची कल्पना येते.
                    श्री, गुजराथी सरांचे, आणखीन एक वैशिष्ठ्य आहे. त्यांना ट्रेकिंगची जबरदस्त आवड होती . नाशिकच्या काॅलेज विद्यार्थ्यात, ट्रेकिंगची आवड, त्यांनी त्या काळी, निर्माण केली .त्या काळी ट्रेकिंगचे शास्त्र ,आजच्या एवढे  प्रगत नव्हते.  हिमालयात ट्रेकिंगसाठी त्यानी विद्यार्थ्यांची बॅच त्या काळी नेली होती. महाराष्ट्राचे अत्त्युच्च शिखर कळसूबाई , गुजराथी सरांनी पंधरा वेळेला सर केले आहे.
                   विज्ञान निष्ठ असलेले डाॅ. गुजराथी सर " मराठी विज्ञान परिषदेचे " एके काळचे अध्यक्ष होते. आज ही त्यांना त्या परिषदे बद्दल जिव्हाळा आणि आस्था आहे. नुकताच " मराठी विज्ञान परिषदेने " त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा जाहीर सन्मान केला होता.
                  डाॅ. गुजराथी सर रोज बिनचूक आमच्या बरोबर फिरायला असतात, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. त्यांच्या बरोबर  विविध विषयावर चर्चा करताना , त्यांचा माहितीचा प्रचंड खजिना पाहून डोळे दिपून जातात.
                 डाॅ. गुजराथींचे आजचे वय आहे ८७ वर्षे ! वयाच्या मानाने तब्बेत उत्तमच आहे.
                डाॅ. गुजराथींना तीन मुले. मोठा मुलगा नाशिक मध्येच एका मोठ्या हाॅस्पिटल मध्ये " जनरल सर्जन " आहे. मधला मुलगा अभियंता आहे. तो ही एका खासगी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी आहे. सर्वात धाकटी मुलगी , ती ही " गायनॅकोलाॅजीस्ट " डाॅक्टर आहे. थोडक्यात सरांची तिन ही मुले उच्च विद्या विभूषित आहेत. सरांना सौ. भाभींची समर्थ साथ आहेच !
                   डाॅ. नवनीतभाई गुजराथींना आणि सौ. भाभींना , परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

संस्कृृृृृति हाॅटेल, नाशिक , भोजन

                     असेच एकदा नाशिक मधील, आमच्या सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स " ग्रुपचे सर्व मेंबर्स ,त्र्यंबकेश्वर रोड वरील संस्कृती हाॅटेलात ,आमरस पुरीचे जेवण घेण्या साठी  गेलो होतो . हे हाॅटेल, त्र्यंबकेश्वर रोडवर नाशिक पासून ,अंदाजे सात किलोमीटर अंतरावर आहे.
                 मस्त माहौल होता. एका बाजूला गणपति मंदिर आहे. तिथे आरती व मंत्रपुष्पांजली चालू होती. समोरच्या बाजूला ,पाटलाचा वाडा तयार केलेला दिसत होता. तिथे चुलीवर स्वैपाक चालू होता. जेवायला बसायला पाट , पुढे चौरंगावर ताट ,असा थाट दिसत होता. आम्ही सर्व सिनियर सिटीझन्स असल्याने ,टेबल खुर्चीवर बसून जेवणे पसंत केले.               
                  नाशिक  जळगाव या भागात ,आमरसा सोबत मांडे खाण्याची पध्दत आहे. इकडचे मांडे आणि बेळगावी मांडे ,यात फार फरक आहे. इकडच्या मांड्यात पुरण असते, पण गूळ अजिबात नसतो. हे मांडे माउ लुसलुशीत असतात. तर बेळगावी मांड्यात, तूप साखर असते व ते खुसखुशीत असतात.
                 आमच्या या जेवणात, पाहिजे तितका आमरस व मांडे , मांड्यांवर भरपूर तूप ,शिवाय पाहिजे असल्यास ,भाकरी व मिरचीचा झणझणीत ठेचा मिळत होता. तळलेल्या छान मिरच्या , काकडी टोमॅटो मिक्स कोशिंबिर , बटाट्याची भाजी आणि कटाची आमटी असा बेत होता.
                वाढणारे ,आग्रह कर करून वाढत होते. तर अशा मस्त वातावरणात,  समवयस्कांचे बरोबर मनसोक्त गप्पा मारत जेवणे , ही अतिशय आनंदाची व समाधानाची बाब होती.
जेवल्या नंतर सर्वांनी मस्त पान जमविले.
                  लक्षात रहील अशी मैफिल जमली होती. छान वाटले.

मिरजेतील सुप्रसिध्द " जिलबी चौक "....

                  सोबत जो फोटो आहे त्यात लिहीले आहे " जिलबी चौक ".. हे वाचून कोणाला ही प्रश्न पडेल की , हा असला कसला चौक ? जिलबी सारखा गोल गोल फिरायला लावणारा असेल , म्हणून जिलबी चौक हे नाव दिले असेल. हा कुठल्या गावातला चौक आहे , असा ही प्रश्न पडण्याची शक्यता आहे.
                  या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. हा चौक मिरज शहरातला आहे. या चौकाचे नाव जिलबी चौक पडण्याचे कारण म्हणजे ,या चौका पासून मिरजेतील मंगल कार्यालये सुरू होतात. एके काळी लग्न किंवा मुंज म्हटलं की, मुख्य जेवणाचे पक्वान्न जिलबीच असायचे ! सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे असे, हे पक्वान्न होते.
                  मिरजेत ब्राह्मण पुरी नावाचा भाग आहे. त्यात या जिलबी चौका पासून पहिले लागते, ते गोरे मंगल कार्यालय , नंतर येतो तो  सुरभी हाॅल , नंतर लवांकुश हाॅल , गजानन मंगल कार्यालय , दत्त मंगल कार्यालय ( हे सध्या बंद आहे ), काशिकर मंगल कार्यालय , तुलसीदास राम मंदिर कार्यालय  आणि आता नवीन झालेला अळतेकर हाॅल ! अशी एका पाठोपाठ आठ कार्यालये, एकाच गल्लीत आहेत.
                  एके काळी पुण्यानंतर ,सर्व सुविधा देणारी कार्यालये ,फक्त मिरजेतच होती. कर्नाटकात लग्नसराईत म्हणजे उन्हाळ्यात ,पाण्याचे दुर्भिक्ष असायचे. त्या मुळे कर्नाटकातील बरीच कार्ये ,मिरजेत व्हायची. मिरज जंक्शन असल्याने ,कधी ही आणि कुठून ही, रेल्वेने येणे जाणे सोयीचे  पडते.  लग्नाचा मुलगा बंगलोरचा आणि मुलगी मुंबईची ,मग मिरज मध्यावर असल्याने, कार्य मिरजेत असायचे. शिवाय पुण्या मुंबई पेक्षा मिरजेच्या कार्यालयांची भाडी , जेवणाचा दर बराच कमी असायचा. सर्व सामान्यांना तसेच श्रीमंतांना ही ,मिरजेत कार्य करून देणे परवडायचे.
                  मिरजेच्या गोरे मंगल कार्यालयाचे मालक, ( कै) चिंतामणराव गोरे सांगायचे की , साधारण १९७० ते ८० या कालावधीत त्यांच्या कार्यालयात, वर्षाला १३० ते १५० कार्ये व्हायची. कार्ये म्हणजे त्यात लग्न , मुंज , बारसे , डोहाळ जेवण , मंगळागौरी इत्यादींचा समावेश असायचा. आता गावोगावी, एका पेक्षा एक सरस कार्यालये झाली असल्याने ,मिरजेतील कार्यालयात होणार्‍या कार्यांचे प्रमाण ,खूपच कमी झाले आहे.
                १९७० ते ८० या दशकाचा मी वर उल्लेख केलेला आहे , त्या कालावधीचे आणखीन एक वैशिष्ठ्य होते. समजा ,तुम्ही जेवणाचे तुमचे चारशे पान सांगीतले आणि प्रत्यक्षात झाले सव्वातीनशे , तर कार्यालयवाले तुमच्या कडून फक्त जेवलेल्याच पानांचे पैसे घ्यायचे. ते म्हणायचे की , न जेवलेल्या पानांचे पैसे आम्ही घेणार नाही. अशी दानत होती , एकेकाळी !
                पण कालमान परिस्थिती प्रमाणे मिरजेचे कार्यालयवाले आता , तुम्ही सांगाल तेवढ्या पानांचे पैसे घेतात. बदलत्या परिस्थिती नुसार ते योग्य ही आहेच ! या सर्व एकाच गल्लीतील कार्यालयांना, ( अळतेकर हाॅल सोडून ) पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाचे स्वतंत्र पार्किंग नाही. आता वाहने ही भरपूर झाल्याने , उन्हाळ्यात सर्व कार्यालयात एकाच वेळी कार्ये असतील तर, त्या वेळी रस्ता चालायला ही शिल्लक रहात नाही , अशी अवस्था होते. तरी पण मिरजेतच कार्य करण्याची, लोकांची  आज ही हौस असते. अशी आहे आमच्या मिरजेच्या " जिलबी " चौका पासून, सूरू होणार्‍या कार्यालयांची सुरस कथा....
( जिलबी चौक फोटो....सौजन्य श्री. विनायकराव गोवित्रीकर )

श्री. रामभाऊ जोशी.... कलासक्त व सात्विक व्यक्तीमत्व.

                  फोटोत तुम्हाला एक रूबाबदार व्यक्ती दिसत आहे , ते म्हणजे आमच्या नाशिक मधील  सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील श्री. यशवंत जोशी ! पण आम्ही त्यांना " रामभाउ " म्हणतो. त्यांचे टोपण नाव " राम " असेल ,असा आमचा खूप दिवस समज होता.
                 परवा नाशिक मधील लोकल " मटा " मध्ये ,त्यांच्या मुलीने एक लेख लिहीला होता . तो वाचून, आम्हाला मोठा साक्षात्कारच झाला. लग्ना पूर्वी ,काॅलेजात एकत्र शिकत असताना,  " यशवंत जोशी " आणि " रोहिणी बापट " यांनी " रामलिला " या नाटकात, राम आणि सीता यांची कामे केली होती. नाटकात शेवटी रामसीतेचे लग्न झाले आणि नाटक संपले. पण यांच्या दोघांच्या जीवनातील खरे " नाट्य ", त्या नंतर सुरू झाले. या खर्‍या खुर्‍या नाटकाची परिणती ,त्या दोघांच्या विवाहाने झाली . त्या नंतर यशवंत जोशी यांना त्यांची खास मित्र मंडळी, " राम " म्हणूनच संबोधू लागली आणि आमचे " रामभाउ " अस्तित्वात आले. नाटकातील लग्न प्रत्यक्षात आल्यानं चि. सौ. कां. रोहिणी बापट या " सौ. सुहास जोशी " झाल्या. अशा प्रकारे स्टेजवरची " रामलिला " ,जोश्यांच्या घरी प्रत्यक्षात अवतरली.
                 आमच्या रामभाउंचे भारदस्त व्यक्तीमत्व पाहता ,ते मिलिट्रितून " जनरल किंवा तत्सम उच्च " पदा वरून सेवा निवृत्त झालेले असावेत किंवा पोलिस दलातून उच्च पदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले असावेत, असा कयास कोणी ही बांधू शकेल. भरदार शरीर यष्टी , भक्कम उंची , गोरापान सतेज रंग आणि त्याला शोभणार्‍या अक्कडबाज मिशा !  रामभाउंचे हे रूप पाहून ,ते जाॅन्सन अॅंड जाॅन्सन या मल्टि नॅशनल कंपनीतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झाले असावेत ,हे कोणाला ही खरे वाटणार नाही. पण वस्तूस्थिती तीच आहे. रामभाउंच्या औषधशास्त्रातील प्रचंड ज्ञाना मुळे ,सेवा निवृत्त होउन बरीच वर्षे झाली तरी ,जाॅन्सन अॅंड जाॅन्सन या कंपनीत नवीन भरती झालेल्या किंवा रिफ्रेशर्स कोर्स मध्ये " व्याख्यान " देण्यासाठी, त्यांना मोठ्या सन्मानाने आज ही निमंत्रित केले जाते.
               रामभाउंच्या कडे त्यांची नातवंडे आली की ,त्यांचा उत्साह ओसंडून वहात असतो. नातवंडांना घेउन ते पांडव लेणी , चामर लेणी ( चांभार लेणी ) , रामशेज किल्ला अशा ठिकाणी ट्रेकिंग करतात. कधी कधी गरज असेल तर नातवंडाला खांद्यावर बसवून, ते अवघड चढ चढून जातात. त्यांच्या या उत्साहाचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे .
                 प्रत्येक २६ जानेवारीलाआणि १५ आॅगस्टला ,रामभाउंच्या बंगल्या समोर आपल्या जवळच्या लोकांना बोलावून ,ते साग्रसंगीत " झेंडावंदन " करतात. त्या दिवशी झेंडा वंदनाला येणार्‍या सर्वांना, भरपेट " गुळाचा शिरा " ते आग्रहाने खाउ घालतात.
                  त्यांच्या पत्नी सौ. सुहास, या अतिशय उत्तम चित्रकार आहेत. चित्रकलेच्या वेगळ्या वेगळ्या शैलींचा त्यांचा अभ्यास, थक्क करणारा आहे. त्यांच्या ड्राॅइंग क्लास मधील विद्यार्थी, निरनिराळ्या स्पर्धा परिक्षात, अत्यंत उच्च दर्जाचे यश संपादन करतात.
                   रामभाउंच्या सासूबाईंना ,शेगावच्या गजानन महाराजांची " गजानन विजय " ही पोथी मुखोद्गत आहे. रामभाउंची एक कन्या ,उत्तम आर्किटेक्ट आहे. दुसरी पुण्याला असते.  आमच्या रामभाउंचे कुटूंब, अतिशय  कलासक्त आणि सात्विक आहे. त्यांना व त्यांच्या घरातील सर्वांना, मना पासून प्रणाम करतो आणि थांबतो !
                                जय श्रीराम !

आम्ही " मेरी" कर....

आम्ही तीन " मेरीकर " ....म्हणजे " मेरी " या संस्थेतून सेवानिवृत्त झालेले. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याशी संबंधीत सर्वांना " मेरी " हे प्रकरण काय आहे ते माहिती आहे.  मेरी (  "MERI " ) म्हणजे Maharashtra Engineering Research Institute. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याची स्थापत्य अभियांत्रिकीची एक नामवंत संशोधन संस्था ! ही नाशिकला आहे.
                फोटोतील मी , आदरणीय श्री. खरे साहेब व माझे परमस्नेही श्री. दिलीपराव कुलकर्णी उर्फ DGK , तिघेही या संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून , कार्यरत होतो . तिथूनच आता सेवानिवृत्त झालो आहोत. या संस्थेत जे जे वैज्ञानिक नोकरीत होते त्या सर्वांना या संस्थे विषयी अत्यंत जिव्हाळा आणि आदर आहे. आम्ही तिघेही मृद यांत्रिकी ( Soil Mechanics) या विभागात बरेच वर्षे कार्यरत होतो.                                 
    सन १९७० ते १९८५ हा मेरी या संशोधन संस्थेचा सुवर्णकाळ होता. या काळात प्रत्येक विभागातून राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन प्रबंध गौरविले गेले आहेत. त्या काळातील अधिकारी संशोधनाला मानणारे व संशोधनाला प्रोत्साहन देणारे होते. या काळातील श्री. अ. रा. कुलकर्णी , श्री. श्री. भ. सोहोनी , श्री. गजपथी राव , श्री. ढेकणे , श्री. न. कृृृ. फडके , श्री. मुंडीवाले , श्री. पत्तीहाळ इत्यादी संशोधन अधिकारी आणि सर्वांत मुख्य म्हणजे मेरीचे संचालक श्री. पां. कृृृृृृ. नगरकर यांची आठवण या निमित्ताने झाल्या शिवाय रहात नाही.
                  पुढे काळ बदलला. आता मेरी या संस्थेची अवस्था कशी आहे त्या विषयी सांगणे ही कठीण आहे. मला श्री. खरे साहेबांना  व DGK यांना सेवा निवृत्त होउन बराच कालावधी गेलेला आहे. संस्थेकडे विशेष जाणे होत नाही. पण त्या संस्थेशी संबंधीत कोणीही आजही भेटलं की आपुलकी वाटते , जिव्हाळा वाटतो.
                   अशाच एका समारंभाचे निमित्ताने आम्ही तिघे एकत्र भेटलो , त्या वेळचा हा फोटो........

श्री. विजयराव दुसाने...एक सच्चा शेजारी आणि स्नेही...

              फोटोत दिसत आहेत ते, नाशिकच्या आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील ,श्री. विजयराव दुसाने. कांही कालावधी पूर्वी ,आम्ही आणि श्री. दुसाने सख्खे शेजारी होतो. नाशिकच्या पारिजात नगर मधील " गुरूपुष्प " अपार्टमेंट मध्ये रहायला गेल्या नंतर, आमचा जो स्नेह जमला तो आज तागायत, उत्तम प्रकारे टिकलेला आहे. नुसता टिकला नसून, दिवसे दिवस त्या स्नेहात वाढच होत आहे.
                 श्री. दुसाने पोस्टातून सेवानिवृत्त झालेले आहेत. अतिशय शांत स्वभावाचे श्री. दुसाने, कोणाला ही मदत करण्यास ,अतिशय तत्पर असतात. आमच्या ग्रुपमध्ये कोणाला कांही अडचण असल्यास आणि ती श्री. दुसानेंना समजल्यास, ते स्वतः होउन मदतीचा हात पुढे करतात . सर्व स्तरावर त्यांच्या ओळखी आहेत. ओळखी बर्‍याच जणांच्या असू शकतात. पण आपले वजन खर्चून ,दुसर्‍याची अडचण निवारतात ते केवळ  श्री. विजयराव दुसानेच !
                   रहदारीचे नियम, ते अत्यंत काटेकोरपणे पाळतात.  बाहेर जाताना अंतर थोडे असले तरी, ते हेल्मेट घालूनच स्कूटर चालवतात. स्वतःच्या तब्बेती विषयी ते, अत्यंत जागरूक आहेत. ठराविक वेळी, मुंबईला ठराविक डाॅक्टरना दाखवायला जाणार म्हणजे जाणारच ! त्यात खंड नाही किंवा कसूर ही नाही. त्यांच्या नवीन फ्लॅट मध्ये, सध्या ते फर्निचर करून घेत आहेत. त्यात ही ते अत्यंत चौकसपणे काम करून घेत आहेत. उगाच कोणाला तरी बोलावून ,कांही तरी काम उरकायचे ,हे त्यांच्या स्वभावातच नाही. शिस्तबध्दता हा त्यांचा गुणविशेष आहे. सकाळी ठराविक वेळी ते ट्रॅकवर येउन ,आपला फिरायचा कोटा शिस्तबद्धपणे पूर्ण करतात.
                   सौ. मंदाकीनी वहिनींची ही त्यांना उत्तम प्रकारे साथ आहे. त्या बी. एस. एन. एल. मध्ये सर्व्हीसला आहेत.  त्यांचा एकुलता एक मुलगा चि. निखीलेश ही व्यवस्थित मार्गी लागला आहे. असे हे आमचे  सर्वांचे स्नेही असलेले , आदर्श कुटूंब वत्सल व मदतीसाठी आदर्श असलेले ,श्री. विजयराव दुसाने आणि सौ. मंदाकीनी वहिनी ,यांना खूप खूप सदिच्छा देतो आणि थांबतो.

श्री. शिवाजीराव वाटपाडे....ग्रुप मधील पहिले पणजोबा !

                 फोटोत दिसत आहेत , ते म्हणजे आमच्या नाशिकच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील, श्री. शिवाजीराव वाटपाडे. आमच्या ग्रुप मधील एकमेव पणजोबा ! आम्ही बहुतेक सर्वजण अजोबा आहोतच ! पण आमच्या ग्रुप मधील एकमेव पणजोबा, फक्त तेच आहेत . वाटपाडे म्हणजे शांत व्यक्तीमत्व . उगीच कोणत्या ही वादात ते सहसा पडणार नाहीत.
                  ते महाराष्ट्र शासनाच्या भूमापनाशी संबंधीत खात्यातून ,सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या खात्यातील कामाची संपूर्ण माहिती त्यांना असल्याने , नाशकातले नावाजलेले वकील ,भूमापना संबंधी कांही शंका असल्यास ,आज ही त्यांची मदत घेत असतात. त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व बारीक सारीक गोष्टी किंवा भूमापनातले बारकावे, त्यांना आज ही लक्षात आहेत. आज त्यांचे वय ७५ वर्षे आहे , पण स्मरणशक्तीने त्यांना दगा दिलेला नाही.
                  त्यांचे लहानपण ,अतिशय कष्टात गेलेले आहे. पण सर्व परिस्थितीवर मात करून, त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले . फक्त स्वतःचेच केले असे नव्हे ,तर आपल्या लहान भावंडांचे शिक्षणासाठी ,त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. संसारात ही त्यांना परमेश्वराने  पुत्र वियोगाचा धक्का देउन ,घायाळ केले आहे . त्या धक्क्याचे वर्णन ऐकून, हे या गृहस्थाने कसे सहन केले असतील ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो .  पण आजच्या घडीला, ते शांतपणे आपले  जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या पत्नीची त्यांना उत्तम साथ आहे. त्यांची सून आणि नातवंडे, त्यांची मना पासून काळजी घेत आहेत. ही भाग्याची गोष्ट आहे.
                 ते परमपूज्य पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या
 " स्वाध्याय परिवारा " शी संबंधित आहेत.  त्या परिवाराशी संबंधित विचार, त्यांनी आत्मसात केल्याने, श्री. शिवाजीराव मनाने खरे खरे शांत आहेत. आमच्या ग्रुप मधील अध्यात्मिक विचाराने चालणारे व तसे वागणारे ,ते एकमेव व्यक्ती आहेत. टिव्हीवर सुध्दा ते कौटूंबिक किंवा इतर सिरीयल्स  न पाहता , आस्था किंवा संस्कार चॅनेलवरील  प्रवचने , तन्मयतेने ऐकतात.
                   अशा अत्यंत सत्शील अशा श्री. शिवाजीराव वाटपाडे यांना ,उदंड आणि निरामय ,सुख समाधान युक्त आयुष्य लाभो, हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना ! त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो !

श्री. आर. डी. जोशी उर्फ व्याही जोशी...एक निर्मळ व्यक्तीमत्व !

             आज नाशकातील आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील, श्री. आर. डी. जोशी ( व्याही जोशी ) यांना ८१ वर्षे पूर्ण झाली. त्या बद्दल चहापानाचा कार्यक्रम ,त्यांनी आमच्या नेहमीच्या, हाॅटेल " कृृृृृष्ण विजय " मध्ये ,अरेंज केला होता.
               श्री. जोशी ,हे खरं तर आमच्याच ग्रुप मधील, श्री. केसकर सरांचे व्याही ! केसकर सरांच्या मुलीचे ते सासरे आहेत. आम्ही सर्वजण त्यांना " व्याही " या नावानेच संबोधतो. अशा प्रकारे ते आमच्या ग्रुपचे " व्याही " झालेले आहेत.
               श्री. जोशीं, नाशिक जवळील ओझर येथील, " एच. ए. एल. " या मिग विमानांच्या फॅक्टरी मधून , सेवानिवृृृृृृत्त झालेले आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्यात ,एक प्रकारचा काटेकोरपणा आणि स्वयंशिस्त आहे. त्यांची तब्बेत वयोमानाचा विचार करता चांगलीच आहे. ते स्वभावाने तसे अलिप्त आहेत . आपल्या सोयीने ते कृषीनगर जाॅगिंग ट्रॅकवर येतात. आपल्याला जमेल तेवढा व्यायाम ,ट्रॅकवर उपलब्ध साधनांच्या सहाय्याने करतात . सूर्योदय झाला की , ट्रॅकच्या एका कोपर्‍यात उभे राहून, हात जोडून , सूर्याला मनोमन वंदन करून ,कांही मिनीटे शांत उभे राहतात . त्या नंतर ट्रॅकवर स्वतःला झेपेल तितकेच फिरून, मग सर्वांच्या गप्पात सामील होतात. ते बोलतात कमी, पण जे बोलतील ,ते अतिशय मार्मिक असते.
                 श्री. जोशी ,गुरूदेव रानडे यांचे अनुग्रहित आहेत. वर्षातून एकदा तरी " निंबाळ " ला जाण्याचा ,त्यांचा प्रघात आहे.
               अशा एक सात्विक व्यक्तीमत्वाच्या श्री. जोशींना, आमच्या सर्व ग्रुप तर्फे ,वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा ! त्यांचे पुढील आयुष्य निरामय , सुखाचे आणि समाधानाचे जावो , हीच सदिच्छा !

श्री. मुकूंदराव खाडिलकर...एक टिपटाॅप " सी.ई. ओ. "!

                  आमच्या नाशिक मधील सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील ,श्री. मुकूंदराव खाडिलकर मूळचे सांगलीचे ! पण आता नाशिककर झालेले ! त्यांचा व माझा चालण्याचा स्पीड जुळतो. तसेच सांगली मिरजच्या आठवणी हा आमचा समान दुवा असल्याने , आम्ही कृषी नगर जाॅगिंग ट्रॅकवर  एकत्र फिरतो.
                  मुकूंदराव  सेवानिवृत्त आहेत. त्यांची सर्व नोकरी नाशिकमधील बाॅश , सॅमसोनाइट इत्यादी मल्टीनॅशनल कंपनीत झालेली आहे. तिथे  ते बर्‍याच उच्च पदावर कार्यरत  असल्याने, त्यांच्या बर्‍याच ओळखी आहेत. श्री. मुकूंदरांच्या ओळखीतली माणसे, ट्रॅकवर फिरताना त्यांच्या समोर आली की मोठ्या अदबीने ,त्यांना नमस्कार करतात. आमच्या सांगली मिरजेच्या माणसाला, नाशकातले लोक आदराने नमस्कार करतात , हे पाहून माझाच ऊर अभिमानाने भरून येतो.
                   श्री. मुकूंदराव म्हणजे एक देखणे व्यक्तीमत्व आहे. गोरापान रंग , निळसर डोळे , भव्य कपाळ , तगडी उंची , शरीर अंगाबरोबर , थोडक्यात पाहता क्षणी यांच्याशी ओळख करून घेतलीच पाहिजे , असे वाटणारे देखणे व्यक्तीमत्व !
                  श्री. मुकूंदरावांना वावगं अजिबात खपत नाही. ते तिथल्या तिथे सांगून ,त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या संस्कृती बद्दल त्यांना खूप अभिमान आहे. देवादिकांची खिल्ली उडविणारे विनोद ,त्यांना पसंत नसतात. तसेच ते मोदी भक्त ही आहेत.
                   त्यांनी विविध विषयांचे वाचन आणि मनन केले आहे. नोकरीत असताना कारण परत्वे ,ते भरपूर देश व विदेश फिरले आहेत.  सेवानिवृत्ती नंतर सुध्दा, देश विदेशात भरपूर पर्यटन केले आहे. त्या मुळे त्यांच्या आचारात आणि विचारात एक प्रकारचा प्रगल्भपणा निश्चितच जाणवतो. त्यांना साहित्या बरोबरच संगीताचीही आवड आहे. साहित्य संगीताशी संबंधीत एखादा चांगला कार्यक्रम, नाशकात असला की , श्री. मुकूंदराव आणि सौ. वहिनी तेथे निश्चित हजर असतात ! सौ. वासंती वहिनी सुध्दा,  मुकूंदरावांच्याच प्रमाणे साहित्य आणि संगीताच्या रसिक आहेत. त्या उत्तम सतार वाजवितात.
श्री. मुकूंदरावांना सामाजिक जाणीव आहे. नाशकातल्या श्रीगुरूजी रूग्णालयाचे ते उपाध्यक्ष आहेत.  दिवसाचा ठराविक वेळ ते या रूग्णालयासाठी देतात . त्यांची ही निरपेक्ष सेवा आहे.
                  श्री. मुकूंदरावांना आणि सौ. वहिनींना नातेवाईक भरपूर आहेत. सर्व नातेवाईकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी ते आवर्जून हजर राहतात व आपली कर्तव्ये बिनचूक पार पाडतात.
                   असे हे आमच्या ग्रुपचा आधारस्तंभ असलेले श्री. मुकूंदराव, सध्या आपल्या लेकीकडे अमेरिकेत गेलेले आहेत. त्यांच्या येण्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पहात आहेत.
                   श्री. मुकूंदरावांना आणि सौ. वासंती वहिनींना निरामय आयुष्यासाठी ,भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

प्राचार्य श्री. एस. डी. कुलकर्णी सर....सळसळता उत्साह.

फोटोत दिसत आहेत ते आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील ,एक सळसळते उत्साही व्यक्तीमत्व ,श्री. एस. डी. कुलकर्णी , सेवानिवृत्त प्राचार्य , एच. पी. टी. काॅलेज ,नाशिक.
             आमच्या ग्रुपमध्ये वयानं दोन नंबरचे ज्येष्ठ. एक नंबरला आहेत डाॅ. गुजराथी सर ,  त्यांचे वय आहे ८४. एस. डी. के. सरांचं वय आहे ८२. पण त्यांच्या अंगातील सळसळता उत्साह पाहून ,त्यांचे वय २८ वाटते. ८२ व्या वर्षी ही ते अतिशय फास्ट चालतात. १० मिनीटाला १ किमी.
               आमच्या ग्रुप मधील कोणाचा ही वाढदिवस असो , सर त्यांच्या साठी स्वतःच्या बागेतील फुलांचा पुष्पगुच्छ बनवून आणतात व ज्याचा वाढदिवस आहे ,त्याचे गुणवर्णन करणारी स्वरचित कविता ही लिहून आणतात . त्यांची काव्य प्रतिभा या वयातही अतिशय सतेज आहे , ही दुर्मिळ गोष्ट आहे.                                सर्वसाधारण पणे ८२ व्या वर्षी माणूस, शारीरिक व्याधीने जर्जर व निरिच्छ बनतो. पण सरांना म्हणावी अशी कोणतीही व्याधी नाही व ते निरिच्छ अजिबात नाहीत. कोणत्या ही गोष्टीचा मनमोकळा आस्वाद कसा घ्यावा, ते सरांच्या कडून शिकावे. आमच्या ग्रुपमध्ये "नर्म विनोद " करावेत ते केवळ सरांनीच ! त्यांच्या  विनोदांनी सकाळच्या प्रहरी आमचा " निरामय जाॅगर्स ग्रुप " खळाळून हसतो. ग्रुपमधील कोणाकडून चहा कसा काढायचा ,ते सरांच्या कडूनच शिकावे. " आज तुम्ही फार स्मार्ट दिसताय ", असे सर कोणाला म्हणाले की ओळखावे ,आज त्या व्यक्तीला सर सगळ्या ग्रुपला चहा पाजायला लावणार ! एवढेच कशाला, कुणी फिरायचे  नवीन बूट खरेदी केले तर, डाव्या पायातील बुटाचा चहा आज व उजव्या पायातील बुटाचा चहा उद्या ,सरांनी मॅनेज केलाच म्हणून समजा. ते फक्त दुसर्‍या कडून  चहा काढतात असे नव्हे ,तर तेवढ्याच मुक्तपणे मना पासून, ते स्वतः ही चहा द्यायला तेवढेच तयार असतात. सरांचा वीक पाॅईंट म्हणजे " सुगंध " ! छान दरवळणारा सुगंध सरांना मना पासून प्रिय आहे.
               असे हे आमचे सर्वांचे प्रीय "सर " ,आता मुलाकडे मुंबईला रहायला जाणार आहेत. त्यांचा अॅबसेन्स आम्हाला सर्वांनाच जाणवणार आहे. त्यांचा अॅबसेन्स आमच्या पैकी   प्रत्येकालाच अतिशय कठीण जाणार आहे. सरांचे नर्म विनोद , त्यांच्या मुळे मिळणारा चहा , चहा घेता घेता रंगणारी गप्पाष्टके , सरांच्या वाढदिवसाच्या कविता , सरांचा आनंदी सहवास आता दुर्मिळ होणार,  म्हणून आम्ही सर्वजण अत्यंत व्यथित आहोत.
             सर आपल्या मुलाकडे रहायला निघालेत , हे काळा प्रमाणे योग्यच आहे. पण  सुप्रभाती मिळणार्‍या त्यांच्या प्रसन्न व आनंददायी  सहवासाला आम्ही सर्वजण मुकणार , याचे वैषम्य वाटते.
                सरांना व सौ. वहीनींना भरपूर आणि निरामय आयुष्य लाभो हीच परमेश्वरा जवळ  मना पासून प्रार्थना !
                 ( एक वाईट बातमी ...श्री. एस. डी. कुलकर्णी सरांचे ,मुंबई येथे दि. २९ जुलै २०२० रोजी निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो , हीच प्रार्थना ! )
                           " कालाय तस्मै नमः । "
आम्ही जातो अमुच्या गावा , अमुचा राम राम घ्यावा !

श्री. भीमसिंग ठाकूर...स्टेट बॅंक आॅफ इंडिया.....

                फोटोत दिसत आहेत ते ,आमच्या नाशिकच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील श्री. ठाकूर साहेब ! उंची भरपूर , शरीरयष्टी एकदम राजस , बोलका चेहरा , नेहमी टापटिपीने केलेला इन शर्ट , असे एकदम भारदस्त, उत्साही व्यक्तीमत्व म्हणजे श्री. ठाकूर साहेब !
                कोणत्याही सेलेब्रेशन साठी सदैव तय्यार ! ग्रुपमधील कुणाचा वाढदिवस असो  , कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असो , आणखी कांही कारणाने आनंद साजरा करायचा असो , श्री. ठाकूर साहेब त्या सर्वात उत्साहाने सतत पुढे असतात. दुसर्‍याच्या आनंदात मुक्तपणे कोणताही आडपडदा न ठेवता " झोकून " कसे सामील व्हावे ते श्री. ठाकूर यांचे कडूनच शिकावे !
                 श्री. ठाकूर साहेब स्टेट बॅंक आॅफ इंडिया मधून ,उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. बर्‍याच ठिकाणी कामा निमित्त बदल्या झाल्याने , मनुष्य स्वभावाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्या मुळे विविध किस्से त्यांच्या कडून ऐकणे , हा आमच्या सर्वांच्यासाठी एक हास्य सोहळाच असतो. ते कृषिनगर जाॅगिंग ट्रॅकवर फिरायला सर्वात आधी, म्हणजे पहाटे साडेपांच ते पावणे सहा वाजता येतात आणि सर्वात शेवटी ,गप्पा मारायला बसतात. त्यांचा चालण्याचा स्पिड ही जबरदस्त आहे. आमच्या ग्रुप मधील कोणी ही, त्यांना काॅम्पिट करू शकत नाही. त्यांच्या बरोबर फिरणारे त्यांचे दोस्त वेगळेच आहेत. आम्ही सर्वजण सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी, फिरून झाल्यावर गप्पाटप्पा करून, घरी जायला निघतो. पण श्री. ठाकूर त्या नंतर , ट्रॅक वरच्याच दुसर्‍या एका " हास्य क्लब " मध्ये सामील होतात. थोडक्यात ते कोणत्याही एका ग्रुपमध्ये, अडकून पडत नाहीत. ज्या वेळी जो ग्रुप असेल त्यात सामावून जाणे , ही मोठी दुर्मिळ गोष्ट श्री. ठाकूर साहेबांना , सहज जमते ! हे त्यांचे खास असे स्वभाव वैशिष्ठ्यच आहे.
                 त्यांचे घरी त्यांच्या पत्नी , मुलगा , सून , नातवंड असे सगळे एकत्र राहतात. आजच्या काळात " एकत्र कुटूंब असणे " फार कमी पहायला मिळते.  पण श्री. ठाकूर साहेबांनी आणि त्यांच्या कुटूंबाने , हे आवर्जून जपले आहे. हे दुर्मिळ आहे.
                 असे सदाबहार व्यक्तीमत्वाचे व समोर असेल त्या ग्रुप मध्ये ,स्वतःला " झोकून देउन " मिसळू शकणारे श्री. ठाकूर साहेब ,आमच्या ग्रुपचे एक वैशिष्ठ्यपूर्ण घटक आहेत , याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. श्री. ठाकूर साहेबांना उदंड आणि निरामय आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

श्री. वामनराव कुलकर्णी , एक अभ्यासू व सतशील व्यक्तीमत्व...

             फोटोत आम्ही चौघे आहोत. पुढे बसलेले श्री. व सौ. वामनराव कुलकर्णी , मागे उभे मी आणि श्री. वामनरावांचा भाउ श्री. राघवेंद्र !
              आज मी तुम्हाला माझे स्नेही, श्री. वामनराव कुलकर्णी यांच्या बद्दल सांगणार आहे. माझा व त्यांचा परिचय ,मी बदलीवर सांगली येथे गेलो असताना झाला. सांगलीच्या विश्रामबाग जवळील " वारणाली " परिसरातल्या ,आमच्या शेजारच्या आॅफीसमध्ये ,श्री. वामनराव सिनीयर क्लार्क होते. नंतर ते आॅफीस सुपरिंटेंडेंट झाले.
                 श्री. वामनराव अत्यंत सज्जन असल्याने, सर्वांशी त्यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे असायचे. आॅफिसात ते शासकीय नियमा प्रमाणे वागायचे , त्यात सहसा कसूर करायचे नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय नियमांचा, त्यांचा गाढा अभ्यास होता. शासनाचा तोटा न करता ,शासकीय नियमा प्रमाणे एखाद्या कर्मचार्‍याचा फायदा होत असेल ,तर तो करून देण्यात ते अग्रेसर असत. पण नियमाच्या बाहेर जाउन एखादी गोष्ट ,अनैतिकरित्या त्यांना कुणी करायला सांगीतली, तर मात्र ते त्याला सक्त विरोध करीत.
               श्री. वामनराव कांही दिवसांनी मिरजेतील " उमा रामेश्वर " या आमच्याच अपार्टमेंट मध्ये रहायला आले व आमचा घरोबा आणखीन वाढला. श्री. वामनरावांचे शिक्षण पुण्यातल्या अनाथ विद्यार्थी गृहात झालेले आहे. तिथल्या अनेक समारंभांना ते आवर्जून हजर राहतात .त्या संस्थेशी असलेली आपुलकी आणि जिव्हाळा या विषयी ते भरभरून बोलतात.
सेवानिवृत्ती नंतर शासकीय नोकरांच्या पेन्शन केसेस मोफत करून देण्याचे  " व्रत "त्यांनी अंगीकारले आहे. पेन्शन केस तयार करून देण्यासाठी पैसे घेउन काम करणारे अनेक आहेत. पण श्री. वामनराव निरपेक्ष बुध्दीने ते काम करतात , हे मुद्दाम सांगण्या सारखेच काम  आहे. तसेच ते मिरजेतील " ज्येष्ठ नागरिक संघाचे काम " ही असेच निरपेक्ष बुध्दीने व अत्यंत तळमळीने करतात.
श्री. वामनरावांच्या घरी सौ. वहिनी , मुलगा आणि सून व त्यांचा फोटोतला अविवाहित भाउ असे सर्व गुण्या गोविंदाने राहतात.
श्री. वामनरावांचे वय ८० च्या आसपास आहे. या वयातही सासुरवाडीला " मानाने " जाणारे असे माझ्या माहितीतले ते एकमेव आहेत. या वयाला "अति परिचयात अवज्ञा " या उक्ती प्रमाणे सासुरवाडीला कोणी ही बोलवत नाही,  हा सर्वसाधारण नियम झाला. पण श्री. वामनराव त्याला अपवाद आहेत. आज या वयाला देखील श्री. वामनरावांना त्यांच्या सासुरवाडीचे लोक आवर्जून बोलावतात व त्यांचा योग्य तो मानसन्मान करतात , हे दृष्य अत्यंत दुर्मिळ आहे. हे त्यांच्या निरपेक्ष चांगुलपणाचे फलित आहे , असे मी मानतो.
असे हे श्री. वामनराव आमच्याकडे नाशिकला नुकतेच येउन गेले. त्यांच्या आगमनाने आम्हाला झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच !
           श्री. वामनराव , सौ. वहिनी व त्यांच्या कुटूंबियांना उदंड व निरामय आयुष्य परमेश्वर कृपेने प्राप्त होवो , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

अनंत देशमुख...माझा सच्चा मित्र !

खालील फोटोत माझ्या शेजारी बसलेला आहे , तो म्हणजे माझा जीवश्च कंठश्च मित्र अनंत देशमुख ! अनंत मधुकर देशमुख , नगर जिल्ह्यातल्या जामखेडचा !
" मेरी " (MERI , i.e Maharashtra Engineering Research Institute , Nashik.4.) मध्ये मी नोकरीला लागलो त्या वेळी मेरीच्या कॅंटीन मध्ये आमची ओळख झाली. मला रहायला भाड्याने खोली हवी होती , ती मला त्याने मिळवून दिली आणि अशा प्रकारे मेरी जवळच्या " तारवाला नगर " मध्ये आम्ही शेजारच्या शेजारच्या बंगल्यात सख्खे शेजारी झालो. तिथे जी आमची मैत्री जमली , ती आज तागायत तशीच घट्ट आहे. आमची लग्ने ही तीन आठवड्यांच्या अंतराने झाली. एकूण आमची फॅमिली फ्रेंडशिप झाली.
अनंताचा स्वभाव अतिशय दिलदार आहे. तो स्वतःचा विचार करण्या पूर्वी समोरच्याचा विचार करतो. अतिशय प्रामाणिक माणूस ! शासकीय नोकरीत प्रलोभनाचे प्रसंग कधी कधी येतातच ! पण असल्या गोष्टीकडे त्यांने निस्पृहपणे ढूंकूनही कधी पाहिले नाही. कामात एकदम चोख असल्याने आणि उत्तम बुध्दिमत्ता असल्याने तो उगीचच कुणा पुढे झुकण्याचा प्रश्नच नव्हता. ज्या  अधिकारी वर्गाने त्याचे हे सदगुण जाणले त्यांनी त्याला कधी ही त्रास दिला नाही , किंबहूना त्याच्या कामाला सुयोग्य असा न्याय दिला.
माझ्या नोकरीची शेवटची चार वर्षे मी त्याचा असिस्टंट म्हणून काम केले. त्या अर्थाने तो माझा साहेब होता. साहेब आणि सबाॅर्डिनेट हे नाते म्हणजे सासू सुने सारखेच असते. पण त्या ही परिस्थितीत आमचे मैत्र अखंड टिकले याचे कारण त्याचा दिलदार स्वभाव !
त्याला तीन भाउ आणि एक बहीण ! हा सर्वात थोरला. ते सर्व भाउ आणि बहीण त्याला मोठ्या सन्मानाने वागवतात. आज काल हे अतिशय दुर्मिळ दृष्य आहे.
अनंताला दोन मुली व एक मुलगा ! सर्वजण उच्च शिक्षित असून आपापल्या घरी सुखात आहेत. त्याची मोठी मुलगी डाॅ. सौ. मृदूला हेमंत बेळे , हिने औषधांच्या पेटंट कायद्याचा अभ्यास करून जागतिक स्तरावर आपल्या ज्ञानाचा ठसा उमटविला आहे.
अनंता दोन हजार पांच साली सेवा निवृत्त झाला. सेवा निवृत्ती नंतर Resistivity meter च्या सहाय्याने शेतकर्‍यांच्या शेतात पाणी कोठे सापडेल , या शास्त्राच्या पूर्वी केलेल्या अभ्यासाचा प्रत्यक्ष उपयोग तो शेतकर्‍यांना करून देत आहे . हे काम म्हणजे समाजाचे त्र५ण फेडण्याचा त्याचा  एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. एकूण त्याने स्वतःला खूप बिझी ठेवले आहे.
माझ्या या अत्यंत अत्यंत जिवलग मित्रा विषयी किती लिहू , काय लिहू आणि त्याचे किती व कसे गुण वर्णन करू असे मला झाले आहे. मनातला प्रत्येक भाव मला योग्य शब्दात पकडता आलेला नाही. अजून खूप लिहावसं वाटतय . पण  ...........
माझ्या या मित्राला उदंड आणि निरामय आयुष्य लाभू दे , त्याला सर्व प्रकारची सुख समृध्दी लाभू दे , हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो आणि थांबतो.

Friday, 19 April 2019

श्री. दिलीपराव कुलकर्णी...एक शांत , अबोल स्नेही !

खाली फोटोत दिसत आहेत ते माझे प्रिय मित्र कम् स्नेही DGK उर्फ श्री. दिलीप गंगाधर कुलकर्णी. आम्ही दोघेही
" मेरीकर " असल्याने आमचा घट्ट स्नेह आहे. आम्हा सर्व " मेरीकरांचे एक वैशिष्ठ्य " आहे , आम्ही मेरीकर कुठेही असलो तरी मेरीचा विषय निघाला की आम्ही सर्व " हळवे " होतो. कान टवकारतो आणि एकमेकांच्या ह्रदयाचा ठाव घेतो.
मी आणि DGK सहा महिन्यांच्या अंतराने मेरीतून सेवानिवृत्त झालो. मी आमच्या गावी मिरजला गेलो. नंतर मुलगा चि. आदित्य याच्या नाशकातील नोकरीच्या निमित्ताने परत नाशिकच्या फेर्‍या सुरू झाल्या . मी आणि DGK एकाच कृषी नगरच्या ट्रॅकवर फिरायला जमू लागलो. श्री. DGK यांच्या मुळे ट्रॅक वरील इतरांच्या ही ओळखी झाल्या आणि आमचा स्नेह अधिक घट्ट झाला.
DGK म्हणजे हरहुन्नरी माणूस ! घरातील उपयोगी वस्तू स्वतः तयार करणे किंवा कुणाच्या तरी मदतीने करवून घेणे , हा त्यांचा छंद ! घरा वरील सोलर वाॅटर हीटर त्यांनी स्वतः बनविला आहे. त्यांचा  "मानस " नावाचा मोठा प्रशस्त दुमजली बंगला आहे. बंगल्या भोवती त्यांनी स्वतः मेंटेन केलेली उत्तम बाग आहे. बागेत विविध प्रकारची झाडे , फुले त्यांनी मोठ्या हौसेने वाढविली आहेत.
DGK यांनी कोणता ही विषय मनात घेतला की त्याच्या मुळा पर्यंत जाउन त्याचा अभ्यास ते करतात. नोकरीत असताना त्यांची Computer programming वर जबरदस्त हुकूमत होती.
तसे DGK शांत स्वभावाचे आहेत. आपण बरं की आपलं काम बरं हा त्यांचा स्वभाव ! एखाद्याला जाउन चिकटणं त्यांना आवडत नाही. पण एखाद्याशी एकदा नाळ जुळली की मग ते मोकळे होतात.
त्यांची सासुरवाडी कोकणातली , देवरूखची ! मे मध्ये ते सासूरवाडीला जाउन आले की , आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपला कोकणचा मेवा खाउ घालण्यासाठी ते सर्वांना आवर्जून आपल्या घरी बोलावतात. आग्रह करून सर्वांना तृप्त करतात.
आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपला त्यांनी शिस्त लावली आहे. सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनीटांनी मोबाईलचे गजर वाजतात आणि आम्ही घरी जायला निघतो. त्या मुळे आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपमध्ये सात अठ्ठावीसला " दिलीपराव टाईम " अशी संज्ञा प्राप्त झाली आहे.
श्री. दिलीपराव म्हणजे शांत , निगर्वी , चिकित्सक , दिलेली वेळ पाळणारे असे साधे व सरळ व्यक्तीमत्व आहे. ते एखाद्या दिवशी भेटले नाही तर सर्वांनाच चुकल्या चुकल्या सारखे वाटते.
अशा या स्नेहमयी श्री. DGK यांना उत्तम आयुरारोग्य लाभो , त्यांचे जीवन सुखाने ओतप्रोत भरो , ही सदिच्छा देतो आणि थांबतो.

श्री. शशिकांत गुडसूरकर सर...दिलदार व शांत व्यक्तीमत्व !

खाली फोटोत दिसत आहेत , ते नाशिक मधील आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील श्री. गुडसूरकर सर ! त्यांना सर म्हणायचे कारण म्हणजे ते नाशिक मधील एका नामांकित संस्थेच्या काॅलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य आहेत.
मध्यम उंची , सर्वसाधारण पणे आपल्याच विचार विश्वात दंग असणारे व्यक्तीमत्व , म्हणजे श्री. गुडसूरकर सर ! सर जेंव्हा ट्रॅकवर फिरत असतात तेंव्हा डावा हात पॅंटच्या खिशात , चालण्याच्या स्पिड बरोबर उजवा हात मागे पुढे हलणारा , मान खाली , आपल्याच विचारात दंग म्हणजे ओळखावे , हेच ते सेवानिवृत्त प्राचार्य श्री. शशिकांत गुडसूरकर सर !
सरांचा बंगला कृषीनगर जाॅगिंग ट्रॅकच्या जवळच आहे.
सर सकाळी लवकर उठतात आणि फिरायला  ट्रॅकवर येतात. आम्ही सर्वजण साधारण साडेसहाला ट्रॅकवर येतो. त्या वेळी सरांचे फिरणे झालेले असते व ते घरी गेलेले असतात किंवा जाण्याच्या मार्गावर असतात. आम्ही सर्वजण फिरून साधारण सात वाजून पाच किंवा दहा मिनिटांनी गप्पा मारायला एकत्र येउन बसतो. त्यावेळी गेटकडे पाहीलं तर पाच दहा मिनिटांच्या फरकाने सर गेट मधून खास आम्हा सर्वांना भेटायला परत ट्रॅकवर येत असतात. सर लवकर परत गेलेले असले तरी सर्वांच्यात मिसळून गप्पा मारायला त्यांना आवडते. एका नामांकित काॅलेजचा सेवानिवृत्त प्राचार्य आपले प्राचार्यपद विसरून जमिनीवर असतो आणि सगळ्यांच्या गप्पात मन मोकळेपणाने सामिल होतो , हा सरांचा विशेष लक्षात घेण्या सारखा गूण आहे. सर्वसाधारणपणे उच्च पदा वरून सेवानिवृत्त झालेली माणसे , आपले ते उच्च पद सेवानिवृत्ती नंतर ही कवटाळून बसलेली आपल्याला दिसतात. पण सर याला निश्चितच अपवाद आहेत.
सर आपल्या प्रकृती विषयी  अतिशय जागृत आहेत. फिरून झाल्यावर थोड्या वेळाने ते अर्धा पाउण तास महापालिकेच्या तरणतलावात पोहायला जातात. नंतर साधारण दहा साडेदहा वाजता परत जिममध्ये जाउन फिटनेससाठी आवश्यक असा व्यायाम करतात. हे अत्यंत दुर्मिळ आहे. सरांचे वय सत्तरीच्या आसपास आहे , पण या बाबतीतला त्यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असाच आहे.
सर घरी एकटे असले की , त्यांना आम्हा सर्वांना घरी बोलावून चहा पाजण्याची हुक्की येते. सर स्वतःच्या हाताने भरपूर दूध घातलेला चहा बनवतात. चहा बरोबर वेगळ्या वेगळ्या प्रकारची बिस्किटे समोर ठेवतात. सरांच्या घरचा चहा व गप्पांची मैफील , सर्वांनाच आगळा वेगळा आनंद देते.
सर प्राणीशास्राचे  ( Zoology ) डाॅक्टरेट आहेत. जेनेटिक्स हा त्यांचा पीएचडीचा विषय होता. त्या विषयावर कधी कधी चर्चा होते. त्या वेळी सरांचे त्या विषयाचे प्रगाढ ज्ञान पाहून , ऐकून आम्ही सर्वजण  अक्षरशः स्तिमित होतो. सरांचे संशोधन प्रबंध आंतर राष्ट्रीय पातळीवर  ही प्रसिध्द झालेले आहेत.
सरांच्या घरी ते व सौ, वहीनी असे दोघेच असतात. त्यांचा मोठा मुलगा डाॅक्टर आहे व तो अमेरिकेत असतो. धाकटा मुलगा इंजिनीयर आहे. तो इतके दिवस परदेशात होता पण तो आता भारतात परत आला आहे.
थोडक्यात सरांचे कुटूंब एक आदर्श आणि सुखी व समाधानी कुटूंब आहे.
अशा या आमच्या स्नेही कम् मित्राचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. अजूनी सरांच्या बद्दल खूप चांगलं लिहीता येईल.
सरांना आणि त्यांच्या कुटूंबियांना उदंड आणि निरामय आयुष्य लाभो , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि लेखन सीमा लक्षात घेउन थांबतो.

श्री. अरविंद उर्फ राजा वर्‍हाडे...आदर्श संसारी मित्र !

आज मी माझ्या अतिशय जवळच्या मित्राची ओळख करून देणार आहे. त्याचे नाव आहे श्री. अरविंद बाळासाहेब वर्‍हाडे . आम्ही सर्व मित्र त्याला " राजा " या नावानेच हाक मारतो. राजा हा मनाने खरोखरच " राजा माणूस " आहे.
माझ्या " मेरी , नाशिक " मधील नोकरीच्या काळातल्या जास्तीत जास्त शासकीय कामासाठी कराव्या
लागणार्‍या " टूर्स " राजा बरोबर केलेल्या आहेत. टूरचं प्लॅनिंग , टूरच्या खर्चाचे नियोजन हे सर्व राजा अत्यंत समर्थपणे सांभाळत असे. तो विज्ञानाचा पदवीधर असला तरी त्याचे अकाउंटिंग अतिशय चांगले आहे. हे त्याचे खास वैशिष्ठ्य आहे. तोंडी हिशोब तर तो इतके पटापट करतो की , संगणक ही त्याचा स्पिड पाहून चकित होईल ! आमच्या " वैज्ञानिक " लोकांची एक " आर्थिक सोसायटी " होती. त्याचे आर्थिक व्यवहार राजा अगदी चोखपणे सांभाळायचा . कधी ही एका पैशाचा घोटाळा त्याच्या कार्यकालात झाला नाही. सचोटी आणि प्रामाणिकपणा या राजाच्या गुणांना सलाम !
राजा " मेरी काॅलनी "च्या क्वार्टर मध्ये रहायचा. आम्ही क्वार्टरमध्ये राहणारे लोक जेवायच्या सुट्टीत घरी जात असू. पण राजा एकदा आॅफीसला गेला की आॅफीस सुटल्या नंतरच घरी येत असे. मधल्या जेवायच्या सुट्टीच्या वेळात मेरी कॅन्टीनमध्ये " काड्यापेटी " चे विविध खेळ खेळून टाईमपास करणार्‍या ग्रुपमध्ये तो सामिल व्हायचा. 
मेरीमध्ये वैज्ञानिक असलेल्या लोकांना अभियंते दुय्यम वागणूक द्यायचे. प्रमोशन्सपण कमी असायची , त्या मुळे आमच्या सर्वांच्या मनात एक प्रकारचे वैषम्य असायचे. राजा जेंव्हा रिटायर झाला , त्या वेळी त्याला मोठा " सेंडआॅफ " देण्यात आला. स्टेजवर मेरीतील मान्यवर बसलेले होते. त्या वेळी राजाने निरोपाचे भाषण करताना या वैषम्याला सर्वांच्या वतीने वाचा फोडली. तो म्हणाला " आम्हा वैज्ञानिकांच्यावर  शासनाने बराच अन्याय केलेला आहे , पण परमेश्वराच्या दरबारात न्याय असल्याने , त्याने या अन्यायाची भरपाई केलेली आहे. आमची सर्वांची मुले उत्तम शिकून आपल्या आपापल्याल्या क्षेत्रात नाव कमवित आहेत. "
राजाचे हे बोल त्याच्या मुलांनी सार्थ ठरविले आहेत. त्याचा मोठा मुलगा अभियंता आहे , दुसरा मुलगा डाॅक्टर आहे आणि तिसरा काॅमर्स ग्रॅज्युएट अाहे. राजाची तीन ही मुले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी आहेत. हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे.
खाली फोटोत श्री. व सौ. वर्‍हाडे दिसत आहेत. इतके उत्तम आणि त्याच बरोबर खर्चिक अभ्यासक्रम मुलांनी करायचे म्हणजे आर्थिक नियोजन जबरदस्त हवेच ! राजाला सौ. वहिनींची सुयोग्य साथ असल्यानेच हे सर्व शक्य झाले आहे.

उत्तम  नियोजन असल्याने स्वतःच्या कर्तृत्वाने
 राजा आज " स्वतःच्या बंगल्यात " शांत आयुष्य व्यतित करत आहे.
अशा या माझ्या कर्तृत्ववान मित्राला उत्तम निरामय आणि उदंड आयुष्य लाभो , हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.