Thursday, 8 October 2020

कै. लक्ष्मण रामचंद्र उर्फ नाना दीक्षित ...माझे परमपूज्य वडील.

 कै. लक्ष्मण रामचंद्र दीक्षित , माझे परमपूज्य वडील ! एक पुण्यात्मा ! अत्यंत धार्मिक , वेळेचे पक्के बांधील , व्यायामाची आवड असणारे , मित्रत्वाला जपणारे , मदतीला सदैव तयार , एखाद्याला आपलं मानलं की मना पासून प्रेम करणारे , असे अत्यंत आदरणीय व्यक्तीमत्व !

               आम्ही सर्वजण त्यांना, घरात " नाना " म्हणत असू. त्या मुळे या लेखात मी त्यांचा, तसाच उल्लेख करीत आहे. 

                  नानांचे लहानपण, कर्नाटकातल्या हुबळी धारवाड जवळील " लक्ष्मेश्वर " या गावी गेले. त्यांना उत्तम कानडी बोलायला येत असे. नंतरच्या आयुष्यात कानडी बोलणारा माणूस भेटला की ते ,अतिशय खूष होत असत.                                                                                           

               नानांना लहानपणा पासून ,व्यायामाची आवड होती. त्यांनी आपले शरीर व्यवस्थित कमावलेले होते. त्यांचा रोजचा व्यायाम कधी ही चुकला नाही. ते स्वर्गवासी होण्याचे अगोदर आठ दिवस आजारी होते. ते आठ दिवस सोडले तर ,त्यांनी आयुष्यभर  रोज न चुकता व्यायाम केला.

                     त्यांनी सांगली मिरज महापालिकेच्या " वाॅटर वर्क्स " मध्ये नोकरी केली. त्यांना शिफ्ट ड्युटी असायची. त्यांनी ड्युटीवर हजर राहण्याची वेळ कधी ही चुकविली नाही. नोकरीच्या २९ वर्षाच्या आयुष्यात, त्यांनी एक ही दिवस " लेट मार्क " घेतला नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे. 

                      नानांना मिलिटरीत जाण्याची फार इच्छा होती. पण त्यांना त्यांच्या वडीलांनी सोडले नाही. त्यांनी कांही दिवस होमगार्डमध्ये आपली सेवा दिली व आपली मिलिट्रित जाण्याची इच्छा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली. त्या मुळे नाना वाॅटर वर्क्सला नोकरीला जाताना, संपूर्ण खाकी ड्रेस घालून जात असत. सेवानिवृत्ती नंतर फिरायला जाताना, कायम त्यांच्या हातात  " वाॅकिंग स्टिक " असे. घरी त्यांनी विविध प्रकारच्या " वाॅकिंग स्टिक्स ", जमा करून ठेवल्या होत्या. त्यांना अंगठ्यांची खूप आवड होती. उजव्या हाताच्या चार बोटात, ते निरनिराळ्या खड्यांच्या अंगठ्या घालत असत. या अंगठ्या सोन्याच्या अजिबात नसत. विविध धातूंच्या व विविध प्रकारच्या अंगठ्या, जमा करण्याचा त्यांना छंद होता. तसेच  " जप " करण्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या माळा, त्यांनी आवर्जून जपून ठेवल्या होत्या.

                 नानांनी एखाद्याला आपलं मानलं तर, ते त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकत असत. त्यांचे सर्व थरात व सर्व धर्मिय मित्र होते. सांगलीचे लोकप्रीय नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कै. वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या नियमितपणाच्या वागण्याने ,सांगलीचे त्या  वेळचे एक डि. एस. पी. ,श्री. वेंकटाचलम यांच्याशी त्यांचा स्नेह होता. पोलिसात त्यांच्या भरपूर ओळखी होत्या. ते नोकरी साठी रेल्वेने सांगली मिरज जात येत असत.  त्या वेळी रेल्वेतले सर्व गार्ड , इंजिन ड्रायव्हर्स , टिसी यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. मी लहान असताना एकदा सांगली स्टेशन मधून सुटलेली रेल्वे , त्यांनी हात आडवा घालून थांबवली होती व आम्ही त्यात चढलो होतो, हे मला  आजही चांगलं आठवतय. नानांचे श्री. शंकरराव ताम्हणकर या नावाचे, एक मित्र होते. शंकररावांच्या शेवटच्या आजारपणाच्या दिवसात ,मित्राची सेवा करण्याचे मिषाने गप्पा मारायला , कांही धार्मिक वाचून दाखवायला , नाना  त्यांच्या घरी रोज न चुकता जात असत. ओळखीतलं कोणी आजारी असल्यास ,त्याच्या मदतीसाठी नाना आवर्जून धावून जात.

                   नाना धार्मिक वृत्तीचे होते. नोकरीत असताना व सेवानिवृत्ती नंतर ,त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन करून , त्या त्या ग्रथांची स्वतःच्या हस्ताक्षरातील हस्तलिखीत  प्रत, तयार केलेली आहे. हा हस्तलिखित प्रत तयार करण्याचा, त्यांचा उपक्रम जवळ जवळ ५० वर्षे अव्याहत चालू होता. एखाद्या उपक्रमात इतके वर्ष सातत्य ठेवणे ,ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यांनी हस्तलिखित प्रत तयार केलेल्या धार्मिक ग्रंथात, फक्त आपले हिंदूंचे ग्रंथच होते असे नाही .त्यांनी कुराण व बायबलचा ही अभ्यास करून त्यांची हस्तलिखित प्रत तयार केलेली होती. लिहीलेला हस्तलिखित ग्रंथ ते आपल्या जवळ ठेवत नसत. उदाहरणार्थ..ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत आळंदीला , तुकारामांची गाथा देहुला जाउन तिथे अर्पण करायची . त्या नंतर मागे न पाहता ते निघून यायचे. आपण इतके ग्रंथ लिहीले, याचा अहंकार युक्त अभिमान  होउ नये म्हणून, ते असे करीत. ५० वर्षात त्यांनी किती ग्रंथ लिहीले ,त्याची यादी त्यांनी जवळ ठेवलेली नव्हती, कारण अहंकार होउ नये म्हणून !

                     नाना घरातल्या कोणत्या ही बाबतीत, कधीच लक्ष घालत नसत. नोकरीत असताना ते पगार व नंतर पेन्शन ,माझ्या आईकडे देत. ती सर्व घरखर्च पहात असे. नाना त्यांच्या ठरविलेल्या दिनक्रमात व्यस्त असत. नानांचा स्वतःच्या जिभेवर कंट्रोल ठेवण्याचा, एक वेगळाच मार्ग होता. ते एक वर्ष तंबाखू युक्त पान खात व एक वर्ष अजिबात खात नसत. हा त्यांचा वाखाणण्या सारखा उपक्रम होता. 

                  नानांना दोनदा  थोडा थोडा अर्धांगवायूचा त्रास झाला. पण त्यांचे व्यायामाचे शरीर असल्याने ,ते त्या दोन्ही वेळी संपूर्ण बरे झाले होते. नानांना शेवटी शेवटी अल्झायमरचा त्रास होत होता. शेवटचे आठदिवस ते अजारी होते. त्यांनी त्या काळात अन्नपाण्याचा त्याग केला होता. असे पुण्यात्मा असलेले माझे वडील " नाना " ,दि. १९ एप्रील  २००२ साली ,वयाच्या ८४ व्या वर्षी नाशिक या पवित्र क्षेत्री , शांतपणे स्वर्गवासी झाले. 

                 कै. नानांच्या पवित्र स्मृतिस त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.


सौ. रजनी दीक्षित... माझी पत्नी.

 सौ. रजनी दीक्षित. माझी पत्नी. जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहणारी , मनाने खंबीर , शंभर टक्के माझ्या पाठीशी उभीराहणारी , काटकसरी , उत्तम स्मरणशक्ती , अत्यंत सहनशील , परिस्थितीशी सतत जुळवून घेणारी , अशा शब्दात तिचे वर्णन करता येईल. 

               आमचे लग्न १९७३ साली झाले. आमचा प्रेमविवाह आहे. त्या बद्दल आता कांहीही बोलत नाही. तो एक वेगळाच " ग्रंथ " तयार होईल.

                  सौ. रजनीचे माहेर श्रीमंत ! लग्नानंतर तिला काटकसरीने रहावे लागले. पण मुळात तिचा काटकसरी स्वभाव असल्याने, तिने येईल त्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेतले. जीवनामध्ये आमच्या दोघांच्यावर, कांही कठीण प्रसंग आले . ती त्या सर्व प्रसंगी खंबीरपणे उभी राहिली. आमच्या  संसाराचे तारू तिच्या मुळे तरून गेले. आमचे लग्न झाले त्या वेळी सौ. रजनी पदवीधर नव्हती. लग्ना नंतर संसार सांभाळून, जोमाने अभ्यास करून,  तिने पदवी मिळविली. तिला नोकरी करण्याची इच्छा होती, पण केवळ माझ्या आग्रहानुसार, तिने तो विचार बाजूला सारला.

                   मला नाटकात काम करायची आवड होती , ज्योतिष शिकायची आवड होती,  अध्यात्माची आवड असल्याने मी, श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाच्या व शिवथर घळीच्या परिक्षा दिल्या. या सर्व बाबीत ती संपूर्ण तन मनाने ,माझ्या सोबत राहीली. तिने नाटकात कामे केली , ज्योतिष शिकली , अध्यात्माच्या परिक्षा माझ्या बरोबरीने अभ्यास करून दिल्या. जे समोर येईल त्याचा आनंदाने स्वीकार करून, आनंद मिळविण्याच्या आणि दुसर्‍याला आनंद मिळवून देण्याच्या, तिच्या स्वभावा मुळेच हे शक्य झाले. माझी पत्नी सौ. रजनी तन मनाने सतत माझ्या बरोबर असल्याने, मी जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेउ शकलो.

                 जीवनात सतत मना प्रमाणे दान पडते असे कधी ही नसते . तिथेच तुमच्या सहनशक्तीची  व सकारात्मकपणे जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची, परिक्षा असते. त्या प्रत्येक परिक्षेत, ती शंभर टक्के मार्क मिळवून पहिल्या नंबराने उत्तीर्ण झालेली आहे , असे मी अभिमानाने सांगू शकतो . 

                   मध्यंतरी तिला " संधीवाताचा खूप त्रास " झाला. परिस्थिती अवघड होती. पण तिने कधी ही मनात आलेला निराशेचा सूर ,तोंडातून बाहेर येउ दिला नाही. तिची अवस्था पाहून मीच निराशाग्रस्त होत असे . सतत जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याच्या आणि येईल त्या परिस्थितीशी खंबीरपणे झुंजण्याच्या तिच्या वृत्तीमुळे, ती त्या ही आजारातून संपूर्ण बरी झालेली आहे. तिची जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याची इच्छा आणि सहनशक्ती जबरदस्त आहे. 

                   तिने माझ्या आई वडीलांची गरजे प्रमाणे पडलेली जबाबदारी ,अतिशय उत्तमपणे , प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडलेली आहे. तिचा आणखीन एक दुर्मिळ गूण म्हणजे ,आपण केलीली कोणती ही चांगली गोष्ट ,ती पुन्हा पुन्हा बोलून घोकण्याचा तिचा स्वभाव नाही. सर्वसाधारणपणे आपण एखादी चांगली गोष्ट केली तर ती परत परत बोलून ,दुसर्‍याच्या मनात ठसविण्याचा स्वभाव असू शकतो. त्यात चूक आहे असे मी मानत नाही. पण सौ. रजनीने असे कधी ही केले नाही . " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन " ही तिची जीवन शैली  आहे. 

                     घरात संघर्ष टाळण्याची तिची वृत्ती आहे. समोरच्याची मते पटली नाहीत तर ,अशा वेळी ती गप्प बसते. आपली मते ठासून मांडण्याचा तिचा स्वभाव नसल्याने, आमच्या  कुटूंबात वाद कधी ही होत नाहीत. मतभिन्नता असू शकते पण वादावादी कधी ही होत नाही. हा दुर्मिळ गूण घरात शांतता राखतो.

                     तिची स्मरणशक्ती जबरदस्त आहे. आमच्या नातेवाईकांचे , मित्रांचे , घरातील सर्वांचे जीवनातील सर्व मुख्य दिवस ,तारीख  व वार या सह तिच्या बिनचूक लक्षात असतात. तसेच सर्व प्रकारचे मराठी " साहित्य " वाचणे, तिला मना पासून आवडते.

                    सकाळी फिरणे , घरी आल्यावर श्वसनाचे व कांही मोजके शारीरिक व्यायाम करणे , या गोष्टी  तिला मना पासून आवडतात . एखादी गोष्ट सातत्याने करायची तिने ठरविली की ,ते सातत्य टिकवण्यात तिला आनंद मिळतो. मॅगी , पिझ्झा , वडा , दाबेली असे पदार्थ खायला तिला आवडतात. जे खायचे ते " लिमीटेड पण चवीने खायचे " , हा तिचा स्वभाव आहे.

                     अशी गुणी पत्नी मला लाभली, हे माझे परमभाग्य होय. दुर्गा सप्तशती मध्ये, अर्गलास्तोत्र आहे. त्यात एक श्लोक आहे. तो श्लोक असा....

                   पत्नी मनोरमां देही

                   मनोवृत्तानुसारिणीम् ।

                    तारिणीं दुर्ग संसार

                   सागरस्य कुलोद्भवाम् ।।

अर्थ..कठीण संसार सागरातून तारून नेणारी , कुलीन , सुंदर व मना प्रमाणे वागणारी पत्नी ( हे अर्गला देवी ) मला दे. 

                   हा श्लोक सौ. रजनीला तंतोतंत लागू पडतो. तिची मला पत्नी या नात्याने जी साथ लाभली , त्या साठी मी जन्मोजन्म तिचा ऋणी आहे व राहीन.

                    इति लेखन सीमा ।


कै. सोनूताई दीक्षित..माझी आई.

 कै. सोनुताई दीक्षित ! माझी आई ! अत्यंत हुषार , ब्रीज चॅम्पियन  ,अधुनिक विचारांना , नाविन्याला जवळ करणारी , मैत्रिणींच्या गराड्यात रमणारी , कोणत्या ही बाबीचे उत्तम मॅनेजमेंट करू शकणारी , ज्याला जे आवडते ते आठवणीत ठेउन करणारी , उत्तम ज्योतिषी ,अशा अनेक गुणांनी युक्त असे तिचे विविधांगी व्यक्तीमत्व होते. 

                तिचे माहेर करोली. ता. कवठे महांकाळ , जि. सांगली.खेडे गाव. शिक्षणाची फारशी सोय नाही. त्या मुळे शिक्षणासाठी, तिला आजोळी जतेला मामांच्याकडे किंवा शासकीय नोकरीत असलेल्या ,काकांच्या घरी नाशिक जिल्ह्यातील  सटाणा , नाशिक इथे रहावे लागले. कांही ना कांही कारणाने ,शाळा सतत बदलावी लागायची. पण ती कुठल्या ही शाळेत गेली तरी तिने, पहिला नंबर कधी ही सोडला नाही. त्या काळी मुलींना शिकविण्याची फारशी प्रथा नव्हती. ती केवळ १५ वर्षांचीच असताना, १९४२ साली तिचे लग्न झाले व ती कु. सोनूताई राजाराम कुलकर्णीची, सौ. सोनूताई लक्ष्मण दीक्षित झाली. 

                       मिरजेत माझे अजोबा होते तो पर्यंत घरात त्यांचाच " कायदा " चालायचा. त्यांच्या निधना नंतर सर्व कारभार ,माझ्या आईच्या हातात आला. वडीलांना पगार फारसा चांगला नसल्याने , पैसे फारसे नसायचे . पण त्या ही परिस्थितीत, तिने कधी कशाची कमतरता भासू दिली नाही. कोंड्याचा मांडा करून तिने आपला संसार ,आनंदाने केला. जे आहे त्यात समाधान मानण्याची आईची व वडीलांची वृत्ती असल्याने, आमच्या घरात कायम समाधान असायचे.

                  आईला शिक्षणाची भरपूर आवड होती. लग्ना नंतर तिने मिरजला परिक्षेचे केंद्र नसल्याने कोल्हापूर केंद्र घेउन ,व्हर्नाक्युलर फायनल ( व्ह. फा. ) ही परिक्षा दिली. ती त्या केंद्रात पहिली आली. पण सासरच्या जबाबदारीत ,तिला पुढे शिकता आले नाही. तरी ही तिने ,हिंदी भाषेच्या प्रविण पर्यंतच्या परिक्षा दिल्या व प्रत्येक परिक्षेत ,उत्तम सुयश मिळवले. 

                     तिने हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला होता. हात पाहून ती बरोबर ज्योतिष सांगायची. त्या मुळे ती कुठे ही गेली की, तिला हात दाखवून आपले भविष्य जाणून घेणार्‍यांची, तिच्या भोवती गर्दी लगेच जमायची. पत्रिके वरून ही ती भविष्य सांगत असे. थोडक्यात आपल्या भोवती माणसे जमविण्यात ,ती वाकबगार होती.

                     तिला खेळांची आवड होती. पण सासरच्या चाकोरीबध्द वातावरणा मुळे तिला ,ती आवड विकसित करता आली नाही. पण बैठ्या खेळा पैकी, तिने " ब्रिज " सारख्या बुध्दीला आव्हानात्मक असलेल्या, खेळात प्राविण्य मिळविले. अनेक स्पर्धात भाग घेउन सतत प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले. ब्रिजच्या तिच्या पार्टनर्स श्रीमति उषाताई आगाशे , श्रीमति शकाताई कोल्हटकर , श्रीमति मंदाताई गाडगीळ , कर्नल पोंक्षेंच्या मिसेस , कै.सुमनताई लेले , कै. उषाताई देवल , आशाताई देवल ,श्रीमति अलका कोल्हटकर , कै. प्रभाताई कातगडे ,कै . इंदूताई दीक्षित , श्रीमति स्वाती सिध्दये , कै. माई चंदूरकर , कै. प्रभावती शिराळकर यांची या निमित्ताने मला आठवण होते आहे.

                  मिरजेला आमच्या घरा जवळ सात आठ कार्यालये असल्याने, पाहुण्यांची आवक जावक भरपूर असायची. आलेल्या पाहुण्याचे मना पासून स्वागत करून, ज्याला त्याला आवडणारा पदार्थ खायला घालून, त्यांच्या चेहर्‍या वरचा आनंद पाहण्यात, तिला धन्यता वाटत असे. असा साध्या साध्या गोष्टीतून सतत दुर्मिळ असा आनंद ती मिळवीत असे . 

                   घरी कोणी ओळखीचे आल्यास, त्याच्या कडून आपले एखादे काम गोड बोलून कसे करून घ्यायचे , यात तिचा हात धरणारा, दुसरा कोणी असूच शकत नाही. तिला एकवेळ रागावणे जमत नसे . पण गोड बोलण्याची तिची कला, असामान्य अशीच होती. 

                 ती सर्वाच्यात मिळून मिसळून रहात असे. समोरचा वयाने लहान असू दे किंवा  मोठा असू दे , त्याच्याशी सुसंवाद साधण्यात तिचा हातखंडा असे. ती सर्व वयाच्या लोकात ,चटकन सामील होउ शकत असे. तिला हुषार  व्यक्तींचे विशेष आकर्षण होते. अशा स्त्रियांशी तिची विशेष मैत्री जमायची. एकूणच बुध्दीने हुषार मैत्रिणींच्यात ती विशेष रमायची.

                   तिला बागेची खूपच आवड होती. आमच्या जुन्या वाड्याच्या परसदारी, तिने  फळांची व फुलांची झाडे मोठ्या हौसेने लावली होती. बागेची स्वच्छता व झाडांची निगा, ती स्वतः लक्ष घालून करायची. अशा कामात व एकूणच घर स्वच्छ  राखण्यासाठी जे कष्ट पडायचे, ते ती स्वतः आनंदाने करीत असे. 

                 तिला नाविन्या विषयी खूप आकर्षण होते. माझ्या मुलाने चि. आदित्यने , नवीन लॅपटाॅप घेतल्यावर मला लॅपटाॅप वापरायला शिकव ,असा लकडा तिने त्याला लावला होता. नवीन गोष्ट आपण शिकली पाहिजे व त्यात आपल्याला प्राविण्य मिळालेच पाहिजे, असे तिला नेहमी वाटायचे. 

                  राजकारण , आरोग्य , साहित्य ,क्रिडा क्षेत्र , अर्थकारण  , परराष्ट्र नीती , अध्यात्म अशा कोणत्या ही विषयांचे तिला वावडे नव्हते. सर्व विषयांचे वाचन करून, अपडेटेड राहणे तिला आवडायचे. मुख्य म्हणजे ,कोणत्या ही विषयाचा " गाभा " तिला चटकन समजत असे. तिची कोणता ही विषय  " ग्रहण करण्याची क्षमता" ,असाधारण होती. तिचे विचार सुटसुटित असत. अवघड विषय सुटसुटितपणे कसा मांडावा , याचे तिचे कसब अवर्णनीय असेच होते. 

                    तिला शिकायला मिळाले नाही , अन्यथा ती त्या काळची आय. सी. एस. परिक्षा सहज पास होउन " जिल्हाधिकारी  " नक्की झाली असती , असे आमच्या घरातील सर्वांचे प्रामाणिक मत आहे. 

                     अशी आई मला मिळाली, हे माझे परमभाग्य होय. दि. २६ आॅगस्ट २०१३ रोजी तिचे अल्पशा आजाराने ,वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले अणि मी " पोरका " झालो. 

                      कै. सोनुताई दीक्षित उर्फ माझ्या आईला मी या लेखाचे माध्यमातून ,श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.


Saturday, 26 September 2020

कै. कृृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर....माझे सासरे.

कै. कृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर , माझे सासरे ! गोरापान रंग , बर्‍या पैकी उंची , शरीर थोडेसे राजस , चेहर्‍यावर अत्यंत सात्विक भाव , स्वभावानं तसे शांत , समाधानी वृत्ती  , विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी सदैव तत्पर , असे त्यांचे थोडक्यात वर्णन करता येईल.
                   त्यांना सर्वजण " किशानाना किंवा किशामामा " म्हणत. मी त्यांचा उल्लेख ,या लेखात " नाना " असा करीत आहे.
                   अथणीकर नानांचे घराणे म्हणजे वेदविद्यापारंगत ! त्यांचे अजोबा, कर्नाटकातल्या संकेश्वर पीठाचे शंकराचार्य होते. त्यांचे काका श्री. वामनराव अथणीकर , वेदशास्त्रसंपन्न  वेदमूर्ति होते. त्यांचे वडील श्री. शंकर अथणीकर , त्या काळचे " ताईत " मंत्रून देणारे व मोठे श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्याकडे दोन सोनार नोकरीला होते. एक " सोन्याचा  ताईत " व दुसरा " चांदीचा ताईत " बनवत असत. अशा या संपन्न घराण्यातला ,अथणीकर नानांचा जन्म होता. पूर्वीच्या म्हणी प्रमाणे, " कित्येक पिढ्या बसून खातील ", इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती !
                   अशा वेदशास्त्र संपन्न आणि आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न घराण्यात जन्म होउनही, त्यांनी स्वकर्तृत्वावर पुढे येण्यासाठी ,अभियांत्रिकी शिक्षणाची वाट चोखाळली. ते उत्तम अभियंता झाले. त्यांनी शासकीय नोकरी करण्यास सुरवात केली.
                   दुसर्‍या जागतीक महायुध्दाचे काळात, म्हणजे सन १९४१ - ४२ साली ,ते पाकिस्तान व अफगाणीस्तानच्या बाॅर्डरवर असलेल्या क्वेट्टा येथे ,रोड कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी शासकीय बदलीवर गेले. क्वेट्ट्याला त्या काळी ,भूकंप प्रवण क्षेत्र मानले जायचे.  नोकरीच्या निमित्ताने बदलीवर इतक्या लांब व धोक्याचे जागी जाण्याचे त्यांचे धाडस, वाखाणण्या सारखेच होते. दुसरा एखादा ,मी बदलीवर एवढ्या लांब जाणार नाही , मी नोकरी सोडतो असे म्हणून ,घरी बसला असता. पण नानांनी आपले कर्तव्य श्रेष्ठ मानून ,आपली पत्नी प्रेग्नंट असताना तिकडे जाण्याचे जे धाडस केले ,ते नक्कीच वाखाणण्या सारखेच आहे.
                नानांचे लग्न त्या काळच्या पध्दती प्रमाणे, वयाच्या १७ व्या वर्षी झाले. ते त्या वेळी शिकत होते. त्या काळी त्यांनी ,आपल्या पत्नीला बरोबरीच्या नात्याने वागविले. बॅंकेत जाताना , कांही महत्वाच्या घरगुती कामासाठी बाहेर जाताना, ते आपल्या पत्नीला सर्व व्यवहार समजावून सांगून , विश्वासात घेत. आपल्या बरोबरीने बाहेर ही नेत. ते सुधारक मतांचे होते.
                   नानांना तीन मुली . आपल्याला मुलीच आहेत म्हणून ,त्यांनी कधी ही मुलींना कमी लेखले नाही. मुलींनी आरामात पण व्यवस्थित शिकावं. आपले संसार  आनंदाने व समाधानाने करावेत ,अशी त्यांची माफक अपेक्षा असे .
                   एखादा विद्यार्थी आर्थिक अडचणीत असेल तर ,ते त्याला मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देत. इतर वेळी त्यांचा स्वभाव काटकसरीचा होता . पण अशा अडल्या नडलेल्यांना  मदत करण्यासाठी , ते कधी ही मागे हटले नाहीत.
                     नोकरीच्या निमित्ताने, ते बाहेरगावी असत . पण मेच्या सुट्टीत ते आपल्या गावी म्हणजे, मिरजला आवर्जून येत. ते मिरजेला आले की, त्यांची भावंडेही आवर्जून जमत. त्यांनाचार बहिणी व एक भाउ होता. नाना , मे च्या सुट्टीत नातेवाईक व शाळेतले जुने मित्र या सर्वांना एकत्र बोलावून, आमरसपुरीचे जेवण करून , सर्वांना आपल्या सहवासाचा आनंद  देत.  तसेच नातेवाईक व मित्र यांच्या सहवासाचा मनसोक्त आनंद,  ते त्या सर्वांना आपल्या बदलीच्या गावी ,आवर्जून बोलावून घेत. अशी त्यांची आनंदी व समाधानी वृत्ती होती.
                 सन १९६२ साली म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी, त्यांना ब्लड प्रेशरचा व त्या अनुषंगाने ह्रदय विकाराचा ,त्रास जाणवू लागला. त्या काळी जे वैद्यकीय उपचार उपलब्ध होते, ते त्यांनी जरूर केले. मुख्य म्हणजे आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवले.
                 शेवटची अंदाजे दहा वर्षे ते कोयना प्रकल्पावर डेप्युटी इंजिनीयर होते. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करण्यावर ,त्यांचा कटाक्ष होता. दि. ४ जानेवारी १९७१ या दिवशी, त्यांचे एक्झीक्युटिव्ह इंजिनीयर या पदावर, प्रमोशन झाल्याची आॅर्डर आली .  त्याच दिवशी संध्याकाळी अंदाजे ५ वाजता, आॅफिसात काम करीत असताना खुर्चीत बसलेल्या अवस्थेत, वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे ह्रदय विकाराने प्राणोत्क्रमण झाले. एक सत्शील, आनंदी व समाधानी  आत्मा अनंतात विलीन झाला.
                     कै. कृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर ,या माझ्या सासर्‍यांच्या स्मृतीस, मनोभावे  त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.

कै. रूक्मिणीबाई कृृष्णाजी अथणीकर , माझ्या सासूबाई.....

कै. रूक्मिणीबाई कृष्णराव अथणीकर ! माझ्या सासूबाई ! त्या अत्यंत सकारात्मक जीवन जगल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात ,परमेश्वराने कांही त्रुटी ठेवलेल्या असतात. पण त्या त्रुटींचा विचार न करता, परमेश्वराने जे चांगले दिलेले आहे त्यांचा आनंद मानून , आनंदी व सकारात्मक जीवन कसे जगावे ,याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी आमच्या समोर ठेवला.
                  त्यांचा जन्म सन १९१८ सालचा. माहेर बेळगाव जवळचे काकती . माहेरचे आडनाव काकतीकर कुलकर्णी. वडील शिक्षणाधिकारी. मुलींनी शाळेत जाण्याची पध्दत नसल्याने, त्यांना शिकवायला घरी शिक्षक येत असे. घरी एकूणच कर्मठ वातावरण.  त्या काळच्या  पध्दती प्रमाणे त्यांचे लग्न ,१४ व्या वर्षी झाले आणि त्या  " कु. कृष्णाबाई गंगाधर कुलकर्णी " च्या  " सौ. रूक्मिणीबाई  कृष्णराव अथणीकर " झाल्या. सासर मिरज. सासरच्या घरी वातावरण, त्या मानाने सुधारकी विचारांचे. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना ,आपल्या मुली प्रमाणे वागविले.
                माझ्या सासूबाईंना बरेच नातेवाईक, मामी म्हणायचे व माझ्या सासर्‍यांना नाना म्हणायचे. मी या लेखात त्यांचा तसाच उल्लेख, येथून पुढे करीत आहे.
                नाना, माझे सासरे त्या काळी, शासकीय नोकरीत अभियंता होते. त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या होत. नाना सुधारकी विचाराचे असल्याने ,बॅंकेत जाताना किंवा बाजारात जाताना ते आपल्या पत्नीला ,म्हणजे मामींना  आपल्या बरोबर नेत. त्या मुळे बाह्य जगातील सार्वजनिक व्यवहारांची, मामींना चांगली जाणीव आणि कल्पना होती.
                   मामींचा स्वभाव जरा खर्चिक होता. नवीन साड्या वेळोवेळी खरेदी करणे , घरात सर्वांच्यासाठी कांही ना कांही नवीन खरेदी करणे, त्यांना आवडायचे. नाना अभियंता असल्याने ,आर्थिक चणचणीचा प्रश्नच नव्हता. आपल्याकडे कोणी आल्यास ,त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ लक्षात ठेउन आवर्जून करून घालणे, मामींना मना पासून आवडायचे. कोणता ही पदार्थ तयार करताना, तो उत्तमच झाला पाहिजे ,अशी त्यांची खासीयत होती. आलेल्या पाहूण्यांना भेटी दाखल कांही वस्तू किंवा कापडचोपड देउन,  सन्मान करणे हे त्यांना आवडायचे. 
                    १९६२ सालच्या भारत चीन युध्दाचे वेळी,  स्वतः विविध पदार्थ तयार करून ते विकून, त्यातून आलेला पैसा,  " भारतीय संरक्षण निधी "ला त्यांनी दिला होता. १९६७ साली झालेल्या कोयना भूकंपाचे वेळी, त्या नानांचे बरोबर कोयनानगरला होत्या. त्या वेळी अंगावर घराचे दगड पडल्याने, त्यांना फ्रॅक्चर ही झाले होते. पण त्या काटक असल्याने, या शारीरिक त्रासातून लवकरच बाहेर पडल्या.
                   नानांचे म्हणजे माझ्या सासर्‍यांचे निधन झाले ,त्या वेळी त्या ५३ वर्षांच्या होत्या. त्यानंतर कांही वर्षे, त्या मिरजेत एकट्या रहात होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी, त्या चालताना पडल्या.  नंतर वर्षभर त्या अंथरूणावर झोपून होत्या. पण सकारात्मक विचारांच्या जोरावर त्यांनी तो ही कालावधी, आपल्या तीन मुलींच्या सहकार्यांने पार केला. या कालावधीत त्यांनी कधी ही " मला हे काय झाले ? आता माझं कांही खरं नाही , मला जीवनाचा कंटाळा आलाय  ! " असे निराशाजनक उद्गार, कधी ही काढले नाहीत. जे वास्तव समोर येईल ते तात्काळ आणी आनंदाने स्वीकारणे ,हा त्यांचा स्वभाव विशेष होता. हे खूपच अवघड आहे. फार कमी लोकांना हे जमते.
                 त्यांना तीन मुली . थोरली मुलगी  आशा ही कोल्हापूरला , मधली शालीनी कर्नाटकात शिरगूर ( तालूका उगार ) , धाकटी माझी पत्नी रजनी मिरजेत, यांच्याकडे त्या आलटून पालटून रहात असत.  त्यांना  शिरगूर मध्ये राहणे आवडायचे. त्या मुळे जास्तीत जास्त काळ त्या तिथेच असत. तिन्ही मुलींच्या घरचे वातावरण वेगवेगळे होते. पण त्यांनी कुठल्या ही वातावरणांची एकमेकाशी  तूलना न करता , जिथे रहात असत तिथे त्या आनंदात व समाधानात रहात. आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होउ नये ,याची त्या अटोकाट काळजी घेत. हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. हे  सर्व गूण  दुर्मिळ आणि घेण्या सारखेच आहेत.
                   त्यांना कै. नानांच्या नंतर  शासकीय " फॅमिली पेन्शन " असल्याने, त्या शेवट पर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत्या.
                 अशा या मामींचे म्हणजे माझ्या सासूबाईंचे सन २००९ साली, वयाच्या ९२ व्या वर्षी वृध्दापकाळामुळे निधन झाले. एका सकारात्मक, आनंदी , प्रेमळ व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड लुप्त झाले. आज त्या हयात असत्या तर १०२ वर्षांच्या असत्या.
          त्यांच्या पवित्र स्मृतिस हा लेख अर्पण करतो आणि थांबतो.

Sunday, 20 September 2020

चि. आदित्य..." पुत्र व्हावा ऐसा गुंडा....."

चि. आदित्य दीक्षित , चार्टर्ड अकाऊंटंट , डेप्युटी जनरल मॅनेजर , महिंद्रा आणि महिंद्रा , नाशिक प्लान्ट ! माझा मुलगा ! समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे " पुत्र व्हावा ऐसा गुंडा , ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ". येथे गुंडा म्हणजे कर्तृत्ववान ,असा अर्थ अपेक्षित आहे. चि. आदित्यला तो नक्कीच लागू पडतो आहे.
               चि. आदित्य हा एक शांत मुलगा आहे. तो समोरच्याचे म्हणणे, अतिशय शांतपणे ऐकून घेतो. कामाचा किंवा कोणत्या ही गोष्टीचा ताण न घेता, तो आपले काम, अतिशय शांतपणे करीत असतो. हे त्याचे खास असे स्वभाव वैशिष्ठ्य आहे. त्याला पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा घरात असणे ,खूप खूप आवडते. त्याच्या लहानपणी आम्ही घरी, पामेरियन कुत्रा पाळला होता. सध्या आम्ही फ्लॅट मध्ये राहतो. फ्लॅटमध्ये राहून आपल्यामुळे इतरांना त्रास नको , म्हणून त्याने आपली प्राणी प्रेमाची आवड, बाजूला ठेवली आहे.
               चि. आदित्य मिरजला " विद्यामंदिर प्रशालेत " शिकत असताना, त्याने वक्तृत्व स्पर्धेत भरपूर बक्षिसे मिळवली होती. तो ज्या ज्या स्पर्धेत भाग घेत असे, तिथे त्याचा हमखास नंबर यायचाच.  त्याने " महाराष्ट्र टाईम्स " तर्फे होणार्‍या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेउन ,तिथे ही पारिपोषिक मिळविले होते , ही एक फार मोठी आनंदाची बाब आहे.
               चि. आदित्य बी. काॅम. करत असतानाच ,सी. ए. करीन असे म्हणत होता. सी.ए. हा कोर्स अवघड आहे. त्या पूर्वी तू बी. काॅम. झालास तर, तुझ्या हातात एक डिग्री असेल. बी. काॅम. नंतर तू सी.ए. कर, असा सल्ला मी वडीलकीच्या नात्याने, त्याला दिला. त्याने ही तो ऐकला. तो सांगलीच्या चिंतामणराव काॅलेज आॅफ काॅमर्स मधून ,प्रथम श्रेणीत बी. काॅम . झाला . नंतर सी. ए. करण्यासाठी तो पुण्याला गेला.
                सी. ए. झाल्यावर त्याने खासगी प्रॅक्टीस करण्या ऐवजी ,नोकरीचा पर्याय निवडला. तो मुंबईला कॅम्पस इंटरव्ह्यु मधून, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीत  सिलेक्ट झाला. तो किस्सा ही ऐकण्या सारखा आहे. दीडशे फ्रेश सी. ए.ना महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने, इंटरव्ह्यूला बोलावले होते. सुरवातील पंधरा पंधरा सी. एं . चा एक ग्रुप, असे दहा ग्रुप करून, ग्रुप डिस्कशन झाले. त्यात प्रत्येक ग्रुप मधील, एकच कॅन्डिडेट निवडण्यात आला. याचा अर्थ पहिल्या फेरीत, संख्या दीडशे वरून एकदम दहावर आली. या दहा कॅन्डिडेट्सचा पर्सनल इंटरव्ह्यू झाला. त्यातून फक्त तीनच सी.ए. महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने, निवडून घेतले. त्यात चि. आदित्यचा समावेश होता. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
                    आपल्या ज्ञानाच्या आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाच्या जोरावर ,तो आज त्याच कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.
                  तीन वर्षापूर्वी, एका अखिल भारतीय कंपनी तर्फे , भारतातील उत्तम काम करण्यार्‍या, शंभर सी. एं.चा  राजधानी दिल्ली येथे, केंद्रिय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार  झाला .त्यात चि. आदित्यचा समावेश होता , ही अभिमानास्पद बाब आहे.
                   त्याचा प्रेमविवाह आहे. त्याची पत्नी सौ. रमा, सी. एस. ( कंपनी सेक्रेटरी ) आहे. ती स्वतःचा व्यवसाय करते. त्या दोघांना चि. निषाद हा मुलगा आहे. तो नाशिकमध्ये " विस्डम हाय " या आय.सी. एस. सी. बोर्डाच्या शाळेत ,सातवीत शिकत आहे.
                ते तिघे व आम्ही दोघे म्हणजे मी व माझी पत्नी सौ. रजनी, आम्ही नाशिकमध्ये एकत्र राहतो. आजकाल हे दुर्मिळ आहे. पण आम्ही त्या बाबतीत नशिबवान आहोत. 
                अशा या आमच्या गुणवान , कीर्तिमान , सतशील ,प्रेमळ  सुपुत्राला , चि. आदित्यला ,परमेश्वराने उदंड , निरामय आयुष्य द्यावे व त्याच्यावर सर्व सुख समाधानांचा वर्षाव करावा , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Friday, 11 September 2020

चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी...माझी सुकन्या...

चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी . माझी सुकन्या ! जिने मला भरभरून आनंद दिला. लहानपणी तिला दोन नावे होती. शाळेत संपदा आणि घरी कीर्ती ! मला " नाट्यसंपदा " या नाट्य संस्थेची नाटके खूप आवडायची , म्हणून  " संपदा " आणि  कीर्ती शिलेदार यांचा आवाज खूप आवडायचा, म्हणून  " कीर्ती " ! शाळेतल्या तिच्या मैत्रिणी तिला " संपदा " म्हणत आम्ही घरी तिला  " कीर्ती " म्हणत असू .
                कीर्तीचा जन्म मिरजेचा. मी त्या वेळी नाशिकला नोकरीत होतो. त्या वेळी फोन्स नव्हते. त्या मुळे मला पोस्टाने आलेल्या पत्राने ,तीन दिवसांनी ती जन्मल्याचे समजले . मी लगेच मिरजेला गेलो. तिचे पहिले  " दर्शन " मला आज ही स्मरते आहे. गोरापान रंग , तरतरीत नाक , दोन्ही हात दोन्ही कानांच्या बाजूला वर ठेवलेले , मऊशार दुपट्यात झोपलेली माझी " गोड मुलगी " , मला आज ही स्पष्ट दिसते आहे.
                कीर्ती लहान असताना  ,खूप बडबड करायची .मी तिला संस्कृत श्लोक म्हणायला शिकवत असे. ती तीन वर्षांची असताना, तिने भरपूर श्लोक पाठ म्हणून दाखवून ,खूप जणांची वाहवा मिळविली आहे.
                  लहान असताना तिने ,त्रिकालाबाधित सत्याचा शोध लावला होता. ती म्हणायची " माझं मला कळलं , आपलं आपण शाहणं व्हावं ". याचा अर्थ समोरचे दुसरे किंवा परिस्थिती, बदलण्याची वाट पाहू नये. आपणच आपल्यात बदल करून ,प्राप्त परिस्थितीशी जुळवून घ्यावं. लहानपणीची तिची ही विचारांची प्रगल्भता ,कधी कधी आम्हाला ही आश्चर्य चकीत करीत असे. तिच्या लहानपणी तिच्या मावस बहीणी, लिनू आणि तेजू ,यांच्या बरोबर ती खेळायची. तिघींचे त्या काळातले " गमतीचे खेळ " आज ही आठवले, तरी हसू येते. त्या तिघींची गट्टी आज ही तितकीच घट्ट आहे.
                 कीर्तीची बाराव्वी होई पर्यंत, आम्ही नाशिकला होतो. तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण, नाशिकच्या   " सीडीओ मेरी शाळेत " झाले. त्या नंतर तिने होम सायन्सला प्रवेश घेतला. ती बाराव्वी झाली आणि माझी, नाशिकहून सातारा येथे बदली झाली. त्या मुळे आम्ही सर्वजण, मिरजला आमच्या घरी शिफ्ट झालो. मिरज सांगलीत होम सायन्स शिकण्याची सोय नव्हती. त्या मुळे तिला आर्टसला जावे लागले. मिरजेच्या " कन्या महाविद्यालयात " ,तिचे पहिले आणि दुसरे वर्ष झाले . तिसर्‍या व शेवटच्या वर्षासाठी " संस्कृत " हा अवघड विषय, तिने निवडला. त्या विषयाची शिक्षणाची सोय सांगली मिरजेत नव्हती. तिने स्वतः घरी अभ्यास करून , " संस्कृत " या विषयात पदवी प्राप्त केली . ही बाब अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच आहे.
                    काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच, तिचे लग्न ठरले. तिला पहिल्यांदाच दाखविले आणि तिथेच लग्न ठरून, झाले ही ! अशा तर्‍हेने माझी लाडकी मुलगी कीर्ती, चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी , कारदगेकर , झाली.
                     सासरी गेल्या नंतर, ती तिथे इतकी छान रमली की ,ती " दीक्षितांची , कुलकर्णी " कधी झाली, ते समजलेच नाही. माहेरी आल्या नंतर तिच्या तोंडी ,तिच्या सासरच्या माणसांच्या बद्दलचा जिव्हाळा, सतत दिसून येत असे . आम्ही सर्वजण त्या मुळे सुखावून जात होतो. ही अतिशय आनंदाची व समाधानाची बाब आहे.
                    तिचे लग्न झाल्या पासून आज तागायत , ती अत्यंत समाधानात आहे. तिला एक मुलगा आहे. आमचे जावई श्री. अजयराव ,अत्यंत सज्जन आणि कोल्हापुरातले एक निष्णात फौजदारी वकील आहेत . तिच्या सासरची माणसे, अतिशय स्नेहपूर्ण असल्याने, ती आनंदात आहे. कोल्हापुरात त्यांचा मोठा व मोक्याच्या जागी फ्लॅट आहे. कीर्तीने मोजक्याच पण जवळच्या मैत्रिणी मिळविल्या आहेत . थोडक्यात आपली मुलगी सुखा समाधानात असल्याचे ,आम्हाला संपूर्ण समाधान आहे. हे दुर्मिळ आहे.
                     अशा या आमच्या लाडक्या,  देखण्या आणि वागायला अतिशय सौदार्हपूर्ण असलेल्या मुलीवर, म्हणजेच कीर्ती उर्फ चि. सौ. संपदावर , तिच्या कुटुंबावर परमेश्वराने सर्व सुखांचा वर्षाव करावा, तिला उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे, ही प्रार्थना करतो आणि थांबतो.

Saturday, 5 September 2020

सौ. रमा आदित्य दीक्षित....माझी सून !

चि. सौ. रमा आदित्य दीक्षित . माझी सून. ती " कंपनी सेक्रेटरी ( सी. एस.) " झालेली आहे. स्वतःचा व्यवसाय करते. एक जिद्दी आणि अत्यंत हुषार मुलगी , उत्तम गृहिणी आणि यशस्वी व्यावसायिक असे तिचे थोडक्यात वर्णन करता येईल.
             माहेरचे तिचे नाव कु. प्राजक्ता विश्वनाथ दांडेकर. माहेर मिरज. ती बी. काॅम. झाली आणि नंतर एम. काॅम. करण्यासाठी ती पुण्याला गेली. तिने एम. काॅम. केलेच , पण त्याच बरोबर " जी.डी. सी. ए. आणि डी. सी. एस."  ही केले. प्रत्येक परिक्षेत तिने उज्वल यश संपादन केलेले आहे. ती जात्याच हुषार आहे, अभ्यासू आहे.
              माझा मुलगा चि. आदित्य आणि तिचा प्रेमविवाह आहे. दोन्ही घरचा या विवाहाला पाठींबा असल्याने ,२००६ साली त्यांचा विवाह थाटामाटात मिरज येथे झाला.
               चि. आदित्यची नोकरी नाशिकला असल्याने ते दोघे, विवाहा नंतर नाशिकला रहायला आले. लग्नानंतर  तिने कांही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. आमचा नातू चि. निषादचा जन्म २००७ साली झाला.
                 तो थोडा मोठा झाल्या नंतर, तिने " कंपनी सेक्रेटरी " चा कोर्स करण्याचे ठरविले. सी. ए. सारखा हा कोर्स ही, अतिशय कठीण आहे. या कोर्सच्या एकूण चार परिक्षा असतात. ती पहिल्या परिक्षेला बसली त्या वेळी, तिच्या आईचे अचानक निधन झाले होते. दिवस कार्य चालू असतानाच तिची परिक्षा होती. मनावर झालेल्या या आघातातून सावरून, तिने त्या परिक्षेत उत्तम सुयश मिळविले. तिने फायनलची शेवटची परिक्षा २०१५ साली दिली . त्यात ही तिने उत्तम सुयश मिळविले. ती पास झाली त्या वेळेस, नाशिक केंद्राचा सी. एस. परिक्षेचा निकाल, ०.८ % इतका कमी होता. पण तिने संसार  सांभाळून अभ्यास करून ,उत्तम सुशय मिळविले हे फार महत्वाचे आहे.
                   आता ती स्वतःचा व्यवसाय करते आहे. नुकतेच तिने व तिच्या सहकार्‍यांनी, जुन्या जागेतून नवीन जागेत  स्थलांतर करून, तिथे आपला व्यवसाय सुरू केला आहे. ही फार मोठी अभिमानाची बाब आहे.
                    ती  गृहिणी या नात्याने आपल्या सर्व जबाबदार्‍या ,अत्यंत काटेकोरपणे पार पाडते. चि. निषादचा अभ्यास घेणे , तसेच वेळोवेळी येणारे सणवार , ती निगुतीने पार पाडते. घरातल्या कामाचा तिचा उरक, वाखाणण्या सारखा आहे. पुरणा वरणाचा स्वैपाक करणे , गणपतीत उकडीचे मोदक करणे किंवा नवीन नवीन पदार्थ  शिकून तयार करणे , तिला उत्तम आणि पटापट जमते . दहा बारा लोकांचा गोडधोडाचा स्वैपाक ती कधी बनविते ,ते कुणाला समजणार ही नाही.
                 तिची आणखीन दोन वैशिष्ठ्ये म्हणजे ,ती माहेरच्या आणि सासरच्या नातेवाईकांशी आणि मित्रमंडळींशी ,आवर्जून उत्तम संपर्क ठेवते. तसेच तिचे कार ड्रायव्हिंगवर ही प्रभुत्व आहे.
                 आपला फिटनेस व्यवस्थित रहावा या साठी, जिमला जाउन एक्सरसाईझ करणे व त्याला सुसंगत डाएट सांभाळणे , ती काटेकोरपणे सांभाळते. मध्यंतरी नाशिकमध्ये झालेल्या १० किमीच्या दोन तीन मॅरेथाॅन मध्ये, तिने भाग घेउन यशस्विता मिळवली आहे.
                  ती स्वतःचा व्यवसाय करते म्हटल्यावर , आम्हा वृध्द मंडळींच्याकडे तिचे दुर्लक्ष होत असणार, असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे अजिबात नाही. चि. सौ. रमा घरातील प्रत्येकाकडे व्यवस्थित लक्ष देते . मी व माझी पत्नी सौ. रजनी ,आम्ही दोघे त्यांच्या सोबतच राहतो. आम्ही वयोवृध्द आहोत. आम्हाला कोणताही त्रास पडू नये ,उलट आम्ही आनंदात  व सुखात रहावे या दृष्टीने ,ती अत्यंतिक काळजी घेते. ही आमच्या दृष्टीने भाग्याची व समाधानाची गोष्ट आहे. अशी सून आम्हाला लाभली ,ही परमेश्वराची मोठी कृपाच आहे.
                    शैक्षणिक दृष्ट्या हुषार ,यशस्वी व्यावसायिक , गृहकृत्यदक्ष , प्रेमळ , सुस्वभावी अशा आमच्या सुनेला, म्हणजेच चि. सौ. रमाला, परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य देउन ,सुखासमाधानात ठेवावे , तिच्यावर सर्व प्रकारच्या आनंदाचा वर्षाव व्हावा , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Tuesday, 1 September 2020

अॅडव्होकेट अजय रामचंद्र कुलकर्णी , कारदगेकर , माझे जावई...

अॅडव्होकेट श्री. अजय रामचंद्र कुलकर्णी , कारदगेकर , हे माझे जावई आहेत . ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आज मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. मी त्यांना अजयराव असे म्हणतो. त्या मुळे या लेखात मी त्यांचा ,तसाच उल्लेख करीत आहे.
                 अजयराव म्हणजे देखणा माणूस ! गोरापान रंग , मध्यम उंची , राहणी एकदम टिपटाॅप ! त्यांनी एके काळी भरपूर व्यायाम करून, आपले शरीर कमावलेले आहे. ते अतिशय धार्मिक आहेत,पण कर्मकांड त्यांना विशेष आवडत नाही . त्यांना आपल्या वयोवृध्द आई ,वडीलांच्या बद्दल अत्यंतिक प्रेम आणि जिव्हाळा आहे.  त्यांच्या काळजीपोटी, ते रोज फोन करून, त्यांची ख्यालीखुशाली न चुकता विचारतात . त्यांची स्वतःची वडीलोपार्जित शेती आहे. त्यांना शेतीची आवड आणि शेतीतल्या सर्व प्रकारच्या बारकाव्यांची  जाण आहे . हे त्यांचे लक्षात घेण्या सारखे वैशिष्ठ्य आहे.
                   माझ्या मुलीला प्रथमच त्यांच्याकडे दाखवलं आणि तिथेच लग्न ठरलं. हा एक वेगळा आणि आनंदाचा योगायोग आहे.
                  श्री. अजयराव कोल्हापुरात आपला वकीली व्यवसाय करतात. ते सर्व प्रकारचे खटले चालवितात.   त्यातल्या त्यात फौजदारी खटले चालविण्यात, त्यांचा हातखंडा आहे.  त्यांच्या वकीली अनुभवाचे व विशेषतः फौजदारी खटल्यांचे  किस्से , ऐकण्या सारखेच असतात. अजयराव खूप कमी बोलतात. पण त्यातल्या त्यात तुमची चांगली ओळख असेल, वकीली आणि कोर्ट हा विषय निघाला  असेल, तर ते  मोठ्या उत्साहाने  बोलतात . अशा वेळी त्यांचे सुगम बोलणे, ऐकतच बसावे असे वाटते.
                   त्यांचे मूळ गाव कारदगा , ता. चिक्कोडी , जि. बेळगाव , कर्नाटक राज्य. कारदगा कोल्हापूर पासून अंदाजे ,तीस किमी अंतरावर आहे. तिथे त्यांचा मोठ्ठा वाडा आहे व शेतीवाडी आहे. त्यांचे आई वडील सहसा तिथेच असतात. कंटाळा आला तर कोल्हापुरला ही येतात. अजयराव मात्र सुट्टी मिळाली की आपल्या गावी जाउन ,शेतीवाडीच्या कामात लक्ष घालतात.
                     आपले घर  स्वच्छ आणि नीटनेटके असावे या दृष्टीने, गरज असेल तेंव्हा ,ते आपला आब बाजूला ठेउन, आवश्यक ती सर्व मदत करतात. त्यांचे एकत्र कुटूंब आहे. अजयरावांचे कुटूंब  व त्यांचा थोरला भाऊ, वहिनी , पुतण्या , पुतणी  असे सर्व कुटूंबिय एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. हे आजच्या काळात दुर्मिळ आहे.
                   अजयराव आपल्या आई वडीलांची जशी काळजी घेतात ,तशी आमची दोघांची ही घेतात. ते मनाने तसे खूप हळवे आहेत. त्यांना मित्र परिवार आहे, पण तो मोजकाच आहे. व्यावसायीक पार्ट्या करणे त्यांना फारसे आवडत नाही. कुणी पार्टीसाठी बोलावले तर ,ते मन मोडायचे नाही म्हणून हजर राहतात .तिथे ते सर्वांच्यात मिळून मिसळून असतात असे जाणवते ,पण प्रत्यक्षात ते  तेथील वातावरणा पासून मनोमन अलिप्त असतात. ते संपूर्ण शाकाहारी आहेत.
                 असे दुर्मिळ व्यक्तीमत्वाचे जावई मिळणे ,हे भाग्याचे लक्षण आहे , असे आम्हा दोघांचे स्पष्ट मत आहे.
                   जावई  असून  मुला  प्रमाणे  वागणार्‍या ,
श्री. अजयरावांना भरभरून शुभाशिर्वाद देतो . तसेच त्यांचे सर्व मनोरथ लवकरात लवकर पूर्ण होवोत, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Friday, 28 August 2020

माझे दोन नातू....

माझे नातू....
मला दोन नातू आहेत. फोटोत डाव्या बाजूला दिसत आहे तो चि. निषाद ,  मुलाचा मुलगा आणि उजव्या बाजूला दिसत आहे तो, चि. मानस , मुलीचा मुलगा !
               चि. मानस बाराव्वीला आहे व चि. निषाद सातवीला आहे. दोघेही मनाने अतिशय प्रेमळ आहेत. दोघांना ही आपले नातेवाईक सारखे यावेत , भेटावेत असे वाटत असते. पण ते नेहमीच शक्य असते असे नाही. " गुगल मीट " वर सगळ्यांना बोलावून ते दोघे आपली नातेवाईकांना भेटायची हौस भागवत असतात.
                   चि. मानसच्या जन्माचे वेळी २००४ साली मी नाशिकला नोकरीत होतो. चि. मानसचा जन्म मिरजचा ! त्याच्या जन्मा नंतर  दुसर्‍या दिवशी, त्याला पहायला मी मिरजला गेलो. चि. मानस म्हणजे उत्साहाचा झराच होता. इतक्या जोरात हातपाय हलवत असायचा की हा दमत कसा नाही , याचं आश्चर्य वाटावं ! रडायला लागला की असला जोरात किंचाळायचा, की ऐकवत नसे. त्याच्या लांबच्या आज्जी त्याला पहायला मिरजला  आल्या असताना त्याचा रडण्याचा आवाज ऐकून " हा आमच्या चिक्कोडीचा आवाज आहे " असं म्हणून खूष झाल्या होत्या. लहानपणीचा मानस अल्लड आणि चांगलाच दंगेखोर होता. घरभर त्याचं बारीक लक्ष असायचं.  आता चि. मानस मोठा झालाय. मिसरूड फुटलय. तो आता खूपच जबाबदारीने वागतोय. चि. मानसनं त्याच्या वडीलांच्या प्रमाणेच वकील व्हावं असं मला वाटतय. अर्थात तो जे करेल ते योग्यच करेल अशी मला खात्री आहे.
             चि. निषाद हा माझा दुसरा नातू. तो अजूनी अल्लडच आहे. चि. निषादच्या जन्माचे वेळी २००७ साली  मी सेवानिवृत्त झालो होतो. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरला मुलीकडे गेलो होतो. सुनेला दवाखान्यात नेल्याचा व्याह्यांचा फोन आला. आम्ही तातडीने कोल्हापूरहून मिरजेला आलो. चि. निषादच्या जन्मानंतर त्याला एका ट्रे मध्ये ठेवले होते. तिथे त्याला पहायला  प्रथमच  आम्ही गेलो. छान टकमक पहात होता. आम्ही मुला बरोबरच रहात असल्याने ,चि. निषादचा भरपूर सहवास मिळाला आहे. त्याची आणि माझी दोस्तीच आहे म्हणाना ! त्याला दंगा करायची लहर आली की तो आजही माझ्याकडे धाव घेतो.
                 नातवंडे म्हणजे " दुधावरची साय " असे म्हणतात. माझी दोन्ही नातवंडे अतिशय लाघवी आणि प्रेमळ आहेत.
                 नातवंडे मोठी झाली की त्यांच्या संसारात त्यांच्या बरोबर रहायची माझी इच्छा आहे. पण ती पूर्ण होणं कठीणच आहे. चि. मानस आज सोळा वर्षाचा आहे व चि. निषाद बारा वर्षाचा ! त्यांचे संसार सुरू होई पर्यंत मी " असण्याची " शक्यता कमीच आहे.
            मी कुठे ही असलो तरी त्या दोघांना माझे सदैव भरभरून शुभाशिर्वाद आहेतच !
            चि. मानस आणि चि . निषाद , खूप मोठे व्हा आणि आपल्या आई वडीलांना भरभरून सुख व समाधान द्या आणि तुम्ही ही ,सुखासमाधानात रहा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.



Wednesday, 26 August 2020

कै. नगरकर काकू ...एक रसिकाग्रणी व्यक्तीमत्व...

कै. सौ. राजेश्वरी पांडुरंग नगरकर. " मेरी " या संशोधन संस्थेच्या एके काळच्या, मुख्य अभियंता आणि संचालक श्री. पांडुरंग कृष्णाजी नगरकर साहेबांच्या पत्नी ! माहेरच्या नलिनी कान्हेरे ! यांची मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे.
               मुख्य अभियंता आणि संचालक ,या सारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या पत्नी , म्हटल्यावर त्या अहंमन्य असाव्यात अशी समजूत होणे ,स्वाभाविकच आहे. पण कै. सौ. नगरकर तशा नव्हत्या.
               आम्ही संशोधन संस्थेतील त्यांचे परिचित, त्यांना " नगरकर काकू " असे म्हणत असू. या लेखात मी त्यांचा तसाच उल्लेख करीत आहे.
                एकदा तुमचा आणि नगरकर काकूंचा परिचय झाला आणि तुमचे वागणे मर्यादेत असले व त्यांना योग्य वाटले ,तर त्या तुमच्याशी परकेपणाने वागत नसत. अशा प्रकारे शिस्तबद्ध वागणारा ,संस्थेतील शासकीय अधिकारी असो किंवा त्यांच्या शासकीय बंगल्यावर काम करणार्‍या चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो, त्या आपल्या कुटूंबातल्या व्यक्ती प्रमाणे त्यांची काळजी घेत.  त्यांच्या पैकी कुणाला कांही मदत हवी असेल तर ,आपुलकीने आणि जिव्हाळ्याने त्या जरूर करायच्या.
                   मेरीच्या संस्कृतिक जीवनात, त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. विविध धाटणीची नाटके , आनंदमेळा व इतर मनोरंजनात्मक तसेच सांस्कृतिक  कार्यक्रमांना, त्यांचा नेहमीच सक्रीय पाठींबा असायचा.
                  काकूंचे माहेर जरी सातारा असले तरी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले . महाविद्यालयीन शिक्षणाचे वेळी त्यांनी शैक्षणिक उन्नत्ती बरोबरच ,गायन व अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. सन १९५५ साली त्यांचा श्री. नगरकर साहेबांच्या बरोबर विवाह झाला. सन १९५६ मध्ये त्यांनी गो. नी. दांडेकर लिखित, " राधामाई " या नाटकात राधेची भूमिका केली होती.  त्या नाटकातील गायक अभिनेत्रीचे पहिले बक्षिस  ,त्यांना नटसम्राट बालगंधर्व यांचे हस्ते प्राप्त झाले होते. त्यांनी  १९६५ - ६६ साली  पुणे विद्यापीठातून एम. ए. केले. त्या वेळी त्या कार ड्राईव्ह करत विद्यापीठात जात असत. त्या काळात घरात कार असणं दुर्मिळ आणि बायकांनी कार चालवणं म्हणजे जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट ! पण काकूंनी तो ही आनंद मनसोक्त घेतला.  श्री. नगरकर साहेबांची बदली कोयना प्रकल्पावर झाल्यावर त्या तिकडे गेल्या. कोयनेला असताना, त्यांनी तिथल्या महिला मंडळात , अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या रसिक व्यक्तीमत्वाचा  ठसा उमटविला.
               काकूंचा स्वभाव बोलका होता. त्यांना ब्रीज खेळणं , क्रिकेट पाहणं , बाग फुलवणं  मना पासून आवडायचं. त्या  धार्मिक वृत्तीच्या होत्या. आपुलकीच्या , जिव्हाळ्याच्या माणसांचे  दुःख त्यांना आपलच वाटायचं. अशा प्रसंगी त्या निरपेक्षवृत्तीने ,आवश्यक ती सर्व मदत करीत. साहेबांच्या सेवानिवृत्ती नंतर, ते दोघे वेदान्त शिकण्यासाठी, पुरूषोत्तमशास्त्री फडके यांच्याकडे जात असत. नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात असे त्यांना वाटायचे.  त्या नाविन्याचा आस्वाद ,त्या मोठ्या आनंदाने घेत असत. काकूंचा स्वभाव रसिकाग्रणी होता. वैताग हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नव्हताच ! त्या सतत प्रसन्न असत व आपल्या अस्तित्वाने ,सभोवतालचे वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीत.
                 श्री. नगरकर साहेब आणि  नगरकर काकूंना तीन मुले. चि. श्री , चि. सौ. प्रिया भिडे व चि. अभिराम !  तिघे ही आपापल्या जागी सुस्थितीत आहेत.
                  अशा या कलासक्त , सदैव प्रसन्न असणार्‍या व रसिक मनाच्या काकूंचे, सन २००८ साली वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
                      आज दि. २६ आॅगस्ट आहे आज त्यांचा वाढदिवस आहे.  काकू हयात असत्या तर ८६ वर्षाच्या असत्या. पण तो योग नव्हता. काकू प्रत्यक्ष हयात नसल्या तरी ,आमच्या सर्वांच्या मनात त्यांचे अबाधित असे स्थान नक्कीच आहे. नगरकर काकूंना विसरणे सर्वथैव अशक्यच !
                        कै. नगरकर काकूंच्या जन्मदिनी त्यांना साश्रुपूर्ण श्रध्दांजली वाहतो आणि थांबतो !
             । । ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

Friday, 21 August 2020

कै. हणमंतराव गाडगीळ... मिरज शहर भूषण ...

मिरज शहरात ब्राह्मणपुरीत ,पूर्वी हमखास नजरेत भरणारे व्यक्तीमत्व म्हणजे, कै. हणमंतराव गाडगीळ ! तानाजी मालुसरे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, यांचे मिश्रण असलेल्या झुबकेदार मिशा , गोरापान रंग , मध्यम उंची ,कमावलेली देहयष्टी , डोक्यावर कधी कधी स्वतः बनविलेली  विशिष्ठ टोपी ! असे  रूबाबदार व्यक्तीमत्व म्हणजे ,कै. हणमंतराव गाडगीळ ! कै. हणमंतराव गाडगीळांचे व्यक्तीमत्व, विविधांगी होते.
              कै. हणमंतराव , मिरजेच्या कन्या शाळेत, कला शिक्षक होते. कन्या शाळेत दरवर्षी नवरात्रात, सरस्वतीच्या मूर्तिची प्रतिष्ठापना होत असे. ती सरस्वतीची मूर्ति ,कै. हणमंतराव स्वतःच्या कल्पनेने, दरवर्षी नवीन बनवित असत . त्यांना जन्मजात मूर्तिकलेची जाण होती. गणेशोत्सवात ते अनेकांना, सार्वजनिक आणि घरगुती गणपती बनवून देत. या सर्व मूर्ति ते स्वतः घडवित असत . साच्यातून मूर्ति बनविणे, त्यांना आवडत नसे. मूर्तिकलेची जन्मजात असलेली जाण ,त्यांनी बनविलेल्या प्रत्येक मूर्तित, प्रकर्षाने दिसत असे.
                 ते  मिरजेच्या भानू तालमीचे, एक अग्रगण्य खेळाडू होते. त्यांनी स्वतःचे गोरे पान शरीर, अतिशय उत्तमपणे व्यायामाने कमविलेले होते. त्यांचे स्वतःच्या श्वसनावर आणि स्नायूंवर  ,उत्तम नियंत्रण होते. या नियंत्रणाच्या योगे ,ते पाण्याने भरलेली मोठी घागर ,हात न लावता उचलून ,एका खांद्यावरून दुसर्‍या खांद्यावर फिरवून ,त्यातील पाण्याचा ऐक थेंब ही खाली न सांडता, परत खाली जमिनीवर ठेवत. हात न लावता, केवळ स्नायू आणि श्वसनावर नियंत्रण ठेउन, ही किमया साधणारे व्यायामपटू आता सापडणे अशक्य आहे , असे माझे स्पष्ट मत आहे.
              तसेच ते जिम्नॅस्टिक्सपटू ही होते. त्यांनी मुलांचे व मुलींचे जिम्नॅस्टिक्सचे संघ, भानू तालमीत तयार केलेले  होते. या संघांनी राज्य जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत, कै.हणमंतराव यांच्या मार्गदर्शना खाली, उज्वल यश संपादन केलेले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.
              कै. हणमंतराव उत्तम अभिनेता होते. त्यांनी  दुरितांचे तिमिर जावो  ,  रायगडला जेंव्हा जाग येते , स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संन्यस्तखड्ग इत्यादी  नाटकात ,उत्तम अभिनय  करून, रंगभूमीची सेवा केलेली आहे. मराठी नाट्य परिषदेच्या, मिरज शाखेचे अध्यक्षपद, त्यांनी कांही काळ भूषविलेले आहे. ते चांगले तबला वादक होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती.
                 या व्यतीरिक्त आणखीन एक  दुर्मिळ वैशिष्ठ्य, कै. हणमंतरावांच्या जवळ होते ! ते पगड्या तयार करीत असत. ही दुर्मिळ कला, त्यांनी स्वतः आत्मसात केलेली होती.  पुणेरी , मल्हारशाही , होळकरी , मराठेशाही , मावळी अशा सर्व प्रकारच्या पगड्या,  ते स्वतः तयार करीत असत. त्यांच्या पगड्या ,वजनाला अतिशय हलक्या असत. त्या मुळे त्यांच्या पगड्यांना, नटवर्य कै. प्रभाकर पणशीकर यांच्या सारख्या तज्ज्ञांनी ,वेळो वेळी गौरविले होते. कै. हणमंतराव फेटे बांधण्यात तरबेज होते. माझ्या ऐकण्यात आलेल्या माहिती प्रमाणे ,कै. अटल बिहारी बाजपेयी यांना, एके प्रसंगी कै. हणमंतरावांनी फेटा बांधलेला आहे.
               थोडक्यात कै. हणमंतराव गाडगीळ  कलाशिक्षक होते, मूर्तिकार होते , मिरजेच्या भानू तालमीचे एक उत्कृष्ठ खेळाडू होते , जिम्नॅस्टिक्सपटू होते , अभिनेता होते , तबला वादक होते , भारतीय शास्त्रीय संगीताचे जाणकार होते , विविध प्रकारच्या टोप्या ,पगड्या बनविण्यात आणि उत्तम प्रकारे फेटे बांधण्यात तरबेज होते.
             अशा या हरहुन्नरी आणि मिरज शहराला भूषण असलेल्या व्यक्तीमत्वाचे दि. २१ मे २०१६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
               कै. हणमंतराव गाडगीळ यांच्या विविधांगी स्मृतीस, या लेखाचे माध्यमातून ,त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.

Sunday, 16 August 2020

डाॅ. सौ. विनीता करमरकर ... एक अनुकरणीय व्यक्तीमत्व

डाॅ. सौ. विनीता करमरकर . मिरजेच्या सुप्रसिध्द डाॅ. वसंत करमरकर यांच्या पत्नी !  तसेच एके काळचे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त " नटसम्राट ", कै.  चित्तरंजन कोल्हटकर यांच्या त्या कन्या होत. आज मी  तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे.
                सौ. विनीता वहिनींचे माहेर पुणे. वडील  चित्तरंजन कोल्हटकर अभिनेता असल्याने ,घरातले वातावरण मोकळे ढाकळे असेल ,असे वाटण्याची शक्यता आहे. पण नाही.  चित्तरंजन कोल्हटकरांना, घरात  नाटक व सिनेमा या संबंधात  बोलणे व चर्चा करणे,  मुळीच अावडायचे नाही.  घर हे घरा सारखेच असले पाहिजे, त्याचे थिएटर व्हायला नको , या बाबीवर वर त्यांचे बारकाईने लक्ष असे. मुलींनी संध्याकाळी सातच्या आत घरात आलेच पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. वेळेचे ते पक्के बांधील होते.
               सौ. वहिनींचे शालेय शिक्षण, त्या वेळच्या  मुलींच्या भावे स्कूल मध्ये व काॅलेजचे शिक्षण, पुण्याच्या एस. पी. काॅलेज मध्ये झाले. शाळेत शिकत असताना , मराठी आणि संस्कृत भाषेतल्या "  नाट्यवाचन " स्पर्धेत , सौ. वहिनींनी पारितोषके मिळविली आहेत. तसेच  माजी विद्यार्थीनींच्या, " सुवर्णतूला " या नाटकात सत्यभामा  आणि " रायगडला जेंव्हा जाग येते " या नाटकात सोयराबाईची भूमिका साकारून, त्यांनी  प्रेक्षकांची वाहवा मिळविलेली आहे.
                 सन १९७५ साली,  मिरजेच्या डाॅ. वसंत करमरकर यांच्याशी विवाह झाल्या नंतर, त्या मिरजेत वास्तव्याला आल्या. चि. उन्मेष आणि चि. मुग्धा अशी दोन गोड मुले ,त्यांच्या संसार वेलीवर फुलली . संसार चालू होता. पण मनात, आपण वेगळे कांही तरी केले पाहिजे, असा सतत विचार येत होता. याची परिणती म्हणून ,त्यांनी पीएच. डी. करून " डाॅक्टरेट " मिळवावी  असे ठरविले.
                सौ. वहिनींचे अाजोबा कै. चिंतामणराव कोल्हटकर , हे गानसम्राज्ञी श्रीमति लता मंगेशकर यांच्या वडीलांचे म्हणजेच कै. दीनानाथ मंगेशकर  यांचे, रंगभूमी वरील समकालीन नट होते. कै. चिंतामणराव कोल्हटकरांचे , मराठी रंगभूमी वरील  कर्तृत्व खूपच मोठे आहे.  त्या काळी त्यांनी कै. दीनानाथ मंगेशकरांचे साथीने , स्वतःची नाटक कंपनी चालविली होती. तसेच  त्यांनी  मराठी नटसंचात, हिंदी रंगभूमीवर  हिंदी नाटके सादर करण्याचा ,आगळा वेगळा प्रयोग केला होता. आपल्या आजोबांच्या रंगभूमी वरील कार्याचा, साकल्याने विचार करून त्यांनी, " कै. चिंतामणराव कोल्हटकर , कार्य व कर्तृत्व " या विषयावर,  पीएच. डी. चा प्रबंध लिहायचे ठरविले.
               भरपूर कष्ट घेउन ,त्यांनी त्यांच्या मुंबईच्या काकांच्याकडे असलेली जुनी कागदपत्रे , तसेच अाजोबांच्या डायर्‍या मिळविल्या. अाजोबांना ओळखणार्‍या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात पु. ल. देशपांडे , विष्णूपंत जोग , परशुराम सामंत , गणपतराव मोहिते उर्फ मास्टर अविनाश , विश्राम बेडेकर , चंद्रकांत गोखले इत्यादी नामवंतांचा समावेश होता.  त्या साठी मिरज ते पुणे , मुंबई अशा सारख्या खेपा घालाव्या लागत होत्या. संसार सांभाळायचा , मुलांचं हवं नको पहायचं , सासुबाईंच्या कडे लक्ष द्यायचं, अशी  सर्व तारेवरची कसरत करत त्यांनी जिद्दीने,  आपल्या गाईड  डाॅ. तारा भवाळकर यांच्या मार्गदर्शना खाली, आपली डाॅक्टरेट पूर्ण केली. त्या साठी त्यांना सात वर्षे, अथक परिश्रम घ्यावे लागले. अशा प्रकारे  जिद्दीने अभ्यास व प्रबंध लेखन पूर्ण  करून, त्यांनी  सन १९९६ मध्ये " डाॅक्टरेट " मिळविली आणि डाॅ. वसंत करमरकर यांच्या बरोबरीने , त्या डाॅ. सौ. विनीता करमरकर झाल्या.
                 मिरजे सारख्या शहरात, त्यांनी " संस्कार भारती " चे संस्थापक अध्यक्ष या नात्याने, कार्याची मूहूर्तमेढ रोवली. नाट्य परिषद , शाखा मिरजच्या त्या कार्यरत सदस्या  आहेत. या शिवाय मिरजेच्या नावाजलेल्या , " आदर्श शिक्षण मंडळ " या शैक्षणिक संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत.
                   त्यांची दोन्ही मुले , चि. उन्मेष आणि चि. सौ. मुग्धा , हे दोघे ही डाॅक्टर आहेत. चि. उन्मेष पुण्यात आणि चि. सौ. मुग्धा पुरंदरे मुंबईत ,आपापल्या व्यवसायात व्यस्त आहेत. पतिराज डाॅ. वसंत करमरकर यांची मेडिकल प्रॅक्टीस, मिरजेत आज ही जोरात चालू आहे.
                    सर्व कौटूंबिक जबाबदार्‍या उत्तम रीतीने  सांभाळून, जिद्दीने आपला व्यक्तीगत विकास करून घेणार्‍या ,डाॅ. सौ. विनीता करमरकर वहिनींना आणि डाॅ. वसंत करमरकर यांना, पुढील उदंड आणि निरामय आयुष्यासाठी  या लेखाचे माध्यमातून, भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

Saturday, 8 August 2020

" माझा आॅन लाईन क्लासचा यशस्वी प्रयोग "

" माझा आॅन लाईन क्लासचा यशस्वी प्रयोग "  **********************************

              मी रोज ज्या " दिशा " या मोफत क्लास मध्ये शिकवायला जात होतो , तो या वर्षी करोना मुळे बंद पडला. आमचा हा क्लास ,एका बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये भरत असे. शिकवताना मी एका कट्ट्यावर बसत असे . मुले व मुली माझ्या समोर जमिनीवर खाली बसत असत. शेजारी बोर्ड ठेवलेला असे. आमच्या क्लासमधील बहुसंख्य मुले, महापालिकेच्या शाळेतील असतात. त्यांचे पालक गरीब परिस्थितीतील असल्याने , ज्या मुलांना प्रायव्हेट क्लासेस परवडत नाहीत ,अशीच मुले आमच्या मोफत क्लास मध्ये येत असतात . असा साधा सोपा क्लास आहे आमचा !
                 करोनाने सगळीच गणिते, उलटी पालटी करून टाकली आहेत. क्लास घेण्यास परवानगी नाही. अर्थात ते योग्यच आहे.
                   बरेच खासगी क्लासेस " आॅन लाईन " सुरू झाल्याच्या बातम्या, कानावर येत होत्या. तो त्यांचा व्यवसाय असल्याने ,खासगी क्लासवाल्यांना पर्याय नव्हता. त्यांच्या क्लासमध्ये येणारी मुले पैसेवाल्यांची असल्याने ,अॅन्ड्राॅइड मोबाईल्स किंवा लॅपटाॅप घेण्याची त्यांची कुवत होती. आमच्या क्लासच्या मुलांचे काय ? जेमतेम उत्पन्न असलेल्या पालकांची ती मुले !  ती  " आॅन लाईन " क्लासला कशी जाॅईन होणार  ? हा प्रश्नच होता.
                  मी आठवीचा क्लास घेतो. आठवीच्या कांही मुलांचे फोन नंबर्स ,मी मिळवले. कांही नंबर्स ,माझ्या सहकारी शिक्षकांनी दिले. मी मुलांना व त्यांच्या पालकांना फोन केले. नशिबाने कांहींचे फोन अॅन्ड्राॅईड होते. कांही मुले अॅन्ड्राॅईड फोन तात्पुरते कोणा कडून तरी ,आणायला तयार झाली. अशी साधारण दहा ते पंधरा मुले शिकायला तयार झाली.
                    हा क्लास " गुगल मीट " वर घेतात हे मला माहिती होते. त्या साठी मी वयाच्या पंच्च्याहत्तरीत , गुगल मीट वापरायला शिकलो. माझा नातू चि. निषाद याने या बाबतीत ,मला अनमोल मदत केली. तो सातवीतच आहे. पण त्याचे या सर्व बाबतीतले ज्ञान, थक्क करणारे आहे.  क्लासला येउ इच्छीणार्‍या मुलांना गुगल मीट कसे वापरायचे ,त्याचे शिक्षण मोबाईलवरच मी व माझा नातू चि. निषाद याने, मोठ्या प्रयत्नांनी दिले . ज्या मुलांना नीट समजले नाही त्यांनी ,ज्यांना समजले त्या मुलांच्या कडून शिकून घेतले. विद्यार्थ्यांचा एकूणच  उत्साह वाखाणण्या सारखाच होता.
                अशा प्रकारे ,आमचा " दिशा " मोफत क्लासचा आठवीचा " आॅन लाईन " वर्ग ,सुरू झाला. आपण  पंच्च्याहत्तरीच्या वयात  सुध्दा ,काळा बरोबर धावू शकतो , ही संकल्पना  माझ्या मनाला आनंद देउन गेली....

Monday, 3 August 2020

केके...एक उत्साही व्यक्तीमत्व....

एखाद्या माणसाचं आयुष्य मोठ्या कष्टात जातं, परमेश्वर कृपेने केलेल्या कष्टाचं चीज होतं आणि " फिटे अंधाराचे जाळे , झाले मोकळे आकाश " अशी वेळ येते . पण त्याच वेळी, " जो आवडतो सर्वांना , तोचि आवडे देवाला " म्हणत, देव त्याला " आपल्या घरी " घेउन जातो.अशा अवघड  परिस्थितीतून गेलेल्या  माणसाची ,मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे अॅडव्होकेट ( कै. ) दत्तात्रय कुलकर्णी !
              अॅडव्होकेट श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना त्यांचे मित्र, " केके " या टोपण नावाने ओळखायचे. मी ही त्यांना त्याच नावाने ,ओळखत असे.
            केकेंचे मूळ गाव सावळज , ता. तासगाव , जि. सांगली. तिथे त्यांची वडीलोपार्जित शेती होती. पण कौटूंबिक वादात होती. त्यातून फारसे उत्पन्न मिळायचे नाही. घरात गरीबी पाचवीलाच पुजलेली असायची . केके केवळ अडीच वर्षांचे असताना, त्यांना व त्यांच्या भावंडांना ,सांगलीत एका अनाथालयात रहायला जावं लागलं. तेरा वर्षाचे होई पर्यंत  ते त्या अनाथालयात होते. शिक्षण ही चालू होतं . ते दहावीची बोर्डाची परिक्षा ,उत्तम मार्कांनी पास झाले. नंतर मिरजमध्ये त्यांच्या मावशीने, त्यांना आपल्या घरी आधार दिला. त्याच वेळी मिरजेतल्या एका मंगल कार्यालयात,  केके पडेल ते काम करून आपला उदर निर्वाह चालवायचे.
                 घरच्या जमिनीच्या तंट्यासाठी त्यांच्या वडीलांना सारखे वकीलांच्याकडे जावे लागायचे. वकील फी देण्यासाठी पैसे नसायचे. वडीलांनी केकेंना " तू वकील हो " असा सल्ला दिला. केकेंनी तो शिरोधार्ह मानला. सांगलीच्या लाॅ काॅलेज मध्ये अॅडमिशन घेतली. कार्यालयात दिवसभर काम करायचं ,त्यातूनच वेळ काढून लाॅ काॅलेज अटेंड करायचं , रहायला मावशीच्या घरी जायचं . थोडक्यात कसे ही करून वकील व्हायचेच ,या जिद्दीवर मिळेल तेव्हा  झटून अभ्यास करून, केके वकील झाले. एखादा माणूस एखाद्या ध्येयाने झपाटलेला असल्यास, अडचणींच्यावर मात करून, काय काय करू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे " केके " !
                वकील झाल्यावर केकेंनी, आपले जमिनीचे कौटूंबिक आणि इतर सर्व वाद ,कायद्याच्या मार्गाने आणि सामोपचाराने सोडविले. आपल्या हक्काची वडीलोपार्जित जमीन ,स्वतःच्या कब्जात मिळवली. त्या नंतर वकीली आणि शेती दोन्ही करायला सुरवात केली.
                आर्थिक दृष्ट्या ,थोडे बरे दिवस दिसायला लागल्यावर, त्यांनी मिरजेत एका अपार्टमेंटमध्ये ,स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे लग्न ठरविले. त्यांना डाॅक्टर पत्नी मिळाली. डाॅ. दीप्ती सांभारे ,डाॅ. सौ. दीप्ती कुलकर्णी झाली. छान संसार चालू होता. संसारवेलीवर चि. मनवा नावाचे गोड कन्यारत्न फुलले.
                    साधारण २०१५ सालची गोष्ट. दोघे नवरा बायको लेह लडाखच्या ट्रिपला गेले. तिथले हवामान केकेंना सहन झाले नाही. डोकं प्रचंड दुखायला लागलं , उलट्या सुरू झाल्या आणि केके बेशुध्द झाले. बरोबरच्या लोकांच्या मदतीने, त्यांना तिथेच लेहच्या  हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलं गेलं. तिथे उपचारांची फारशी सोय नसल्यानं, त्यांना दिल्लीला विमानाने आणण्यात आलं. तिथे डाॅक्टरांनी,  केके " कोमात "  गेल्यानं, केस हाता बाहेरची असल्याचं सांगीतलं. मग केकेंच्या भाचीचे मिस्टर श्री. अभय आठवले ( मिरजेच्या गजानन मंगल कार्यालयाचे मालक ) हे दिल्लीला गेले . त्यांना अॅम्ब्युलन्स मधून मिरजेला घेऊन येऊ लागले. मिरजेच्या जवळ आले असतानाच ,केकेंची प्राणज्योत मालवली. 
                 स्वकष्टातून वर आलेले , चांगले आनंदाचे दिवस पाहण्याची स्वप्ने रंगविणारे केके,  वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी,  पत्नी आणि सात वर्षाच्या मुलीला मागे ठेऊन, अनंताच्या प्रवासाला निघून गेले .
                केकेंचे आयुष्य कष्टप्रद गेले. " एक एक रूपयाची किंमत मला माहिती आहे " , असे ते म्हणत .   स्वतःची कामे ते स्वतः करीत. अवलंबून राहण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.  स्वतःच्या अडचणी बाजूला सारून ,दुसर्‍याला मदत करण्यात केके सर्वात पुढे असत.
                  आज रक्षा बंधनाचा आदला दिवस आहे. तिथीने केकेंचा " महानिर्वाण दिन " आज आहे.  अशा सर्वांशी प्रेमाने वागणार्‍या  व स्वतःच्या कष्टाने स्वतःचे " अढळ स्थान " निर्माण करणार्‍या , केकेंच्या पवित्र स्मृतिस वंदन करून, आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो.

Wednesday, 29 July 2020

श्री. रामोळे ( भोई ) साहेब....आदर्श व्यक्तीमत्व...

प्रतिकूल परिस्थितीशी झुंजून स्वकर्तृत्वावर, अत्युच्य पदा पर्यंत पोहोचलेल्या एका व्यक्तीमत्वाची, मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. गंभीर रामोळे ( भोई ). ते मला नोकरीच्या काळात साहेब होते. त्या मुळे मी त्यांचा या लेखात, श्री. रामोळे साहेब असा आदराने  उल्लेख  करीत आहे.
             श्री. रामोळे साहेब यांच्या घरात ,पूर्वी कोणी विशेष शिकलेले नव्हते. आईच्या प्रेरणेने त्यांनी शिक्षणाचा पाया रचला. इंटर सायन्स म्हणजे आजची बारावी होई पर्यंत ,त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बरी होती. त्या नंतर कांही कौटूंबिक कलहा मुळे, घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. तरी पण इंटर सायन्सला उत्तम मार्क मिळाल्याने, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ,पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ,  मेरीटवर अॅडमिशन तर घेतली. पण आर्थिक टंचाई मुळे, कधी कुणा कडून तर कधी कुणा कडून, पैसे उसनवारीने घेत त्यांनी अभियांत्रिकीची पहिली दोन वर्षे, पूर्ण केली. वेळेला अभ्यासाची पुस्तके घेण्यासाठी, पैसेच नसायचे. त्यावर त्यांनी एक तोडगा काढला. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालया शेजारीच, इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनीयर्सचे आॅफिस आहे. तिथल्या लायब्ररीयनशी ओळख करून घेउन ,त्यांच्या कडून गोड बोलून  , अभियांत्रिकीची पुस्तके आणून, त्यांनी अभ्यास केला. पण शेवटी सर्व उपाय थकले आणि त्यांना अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला पैसे नसल्याने, प्रवेश घेता आला नाही. महाविद्यालय सोडावे लागले.
                नंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी या गावी, एक वर्षभर शाळेत शिक्षकाची नोकरी केली. तिथे त्यांना प्रत्येक महिन्याला  १२६ रू. पगार मिळायचा. काटकसर करून त्यांनी पैसे साठवले आणि मग पुढच्या वर्षी ,अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला अॅडमिशन घेतली. तिसरे आणि चौथे वर्ष त्या पुंजीवर कसे बसे ढकलले. चौथ्या म्हणजे शेवटच्या वर्षी, त्यांनी उत्तम अभ्यास करून ,यशस्विता संपादन केली. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, ते स्थापत्य अभियंता झाले. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.
                  अभियंता झाल्यावर त्यांच्या उत्तम यशस्विते  मुळे ,त्यांना सात ठिकाणी नोकरीसाठी बोलावणे आले. सर्व ठिकाणी चौकशी करून ते शेवटी, पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता पदावर हजर झाले. त्या नंतर मात्र श्री. रामोळे साहेबांनी,  मागे वळून पाहिले नाही. जिथे जिथे त्यांचे पोस्टिंग झाले ,त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे आणि जिद्दीने काम करून, वरिष्ठांची नेहमीच वाहवा मिळविली.
               आपल्या कामाच्या व कार्यक्षमतेच्या जोरावर, त्यांना  प्रमोशन  मिळत मिळत शेवटी ते मुख्य अभियंता पदावरून ,सेवा निवृत्त झाले. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांच्या उत्तम कामा मुळे, उगीचच बदल्या झाल्या नाहीत.  उलट कांही बदल्यांचे वेळी, स्थानिक नेते तुम्ही जाऊ नका, अशा विनंत्या करीत. नोकरीत असताना त्यांनी " अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट " ,या विषयाचे ट्रेनिंग घेतले होते. त्याचा त्यांनी सर्व ठिकाणी सदुपयोग करून, उत्तम काम केले व हाता खालच्या लोकांचे कडून, करवून ही घेतले. केलेल्या उत्तम कामा बद्दल आणि निष्कलंक सेवे बद्दल , महाराष्ट्र शासनाने श्री. रामोळे साहेबांना, वेळो वेळी  सन्मानित केले आहे. हा दुर्मिळ योग आहे.
                श्री. रामोळे साहेबांचा मुलगा ,चि. अभिजित , डाॅक्टर व्हावा ,अशी त्यांची इच्छा होती. ती त्याने आपल्या कर्तृत्वावर पूर्ण केली. ही आनंदाची आणि  अभिमानाची बाब आहे.
                  श्री. रामोळे साहेब व त्याच्या पत्नी सौ.शशिकला वहिनी,  नाशिकमध्ये आपला मुलगा , सून आणि नातवंडे यांच्यासह ,त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात, आनंदाने कालक्रमणा करीत आहेत. आज काल आई वडील आणि मुले, एकत्र असण्याचे योग फार कमी दिसतात. श्री. रामोळे साहेब त्या ही दृष्टीने भाग्यवान आहेत. श्री. रामोळे साहेबांना आणखी दोन मुली आहेत. त्या ही उच्च शिक्षीत असून ,विवाहा नंतर आपापल्या घरी सुस्थितीत आहेत.
                प्रतिकूल परिस्थितीवर  जिद्दीने मात करून, स्वकर्तृत्वावर अत्युच्च पदा पर्यंत गेलेल्या, श्री. रामोळे साहेबांना आणि सौ. वहिनींना , या लेखाचे माध्यमातून भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

Thursday, 23 July 2020

कै. पी. आर. मुंडरगी , वकील , माणूसकीचा दीपस्तंभ...

अॅडव्होकेट ( कै. ) पी. आर. मुंडरगी ! कोल्हापुरचे एके काळचे नामवंत वकील !  ते फौजदारी खटले जिंकण्यासाठी प्रसिध्द होतेच , पण त्या शिवाय अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष / विश्वस्त होते , तसेच ते माणूसकीने कसे वागावे ,याचा अद्वितीय आदर्श होते.
              त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील चिक्कोडी ! त्यांचे वडील  वकीलच होते. वयाच्या तिशीत पी. आर, मुंडरगी, कोल्हापुरात वकीली करण्यासाठी आले. सुरवातीला कांही वर्षे त्यांनी, सरकारी वकील म्हणून काम केले. त्या वेळची एक गंमत सांगतो. एका खटल्यात  पी. आर. मुंडरगी हे सरकारी वकील होते आणि त्यांच्या समोर आरोपींचे वकील होते, खुद्द त्यांचे वडील अॅडव्होकेट रावजी मुंडरगी ! असा हा आगळा वेगळा खटला होता. हा खटला  पी. आर.मुंडरगी  जिंकले.
                  संस्कृत मध्ये एक वचन आहे. " शिष्यात इच्छेत पराजयम्  । " अर्थ..खर्‍या गुरूला शिष्याकडून पराभव अपेक्षित असतो. म्हणजेच शिष्य आपल्या पेक्षा  सवाई ठरावा अशी खर्‍या गुरूची अपेक्षा असते. इथे तसच घडलं ! ही दुर्मिळ गोष्ट आहे.
                कांही वर्षा नंतर मुंडरगी वकीलांनी, आपली स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. वर्षाला अंदाजे तीस ते पस्तिस फौजदारी खटले, ते चालवायचे. त्यांच्या फौजदारी  खटल्याचे कामकाज ऐकण्यासाठी, तज्ज्ञ वकील मंडळी आणि सामान्य लोक, उत्सुकतेने हजर असायचे.   मुंडरगी वकील उलट तपासणी साठी कोर्टात उभे राहिले की , " पिन ड्राॅप सायलेन्स " असायचा. उलट तपासणीत, त्यांचा कायद्याचा सखोल अभ्यास दिसायचा. ते एकपाठी होते. त्यांची " फोटो मेमरी " होती. त्यांनी त्या काळी हातात घेतलेले ,जवळ जवळ सर्व खटले ,जिंकले होते.  दोन  तीन नावे वानगी दाखल सांगतो.
                पश्चिम महाराष्ट्रातील गाजलेला भगवान ससे खून खटला , रत्नागिरी येथील गाजलेला चंद्रकला लोटलीकर खून खटला, या खटल्यावर  पुढे चित्रपट ही निघाला . त्यांनी कर्नाटकात बेळगाव मध्ये एक असा खटला चालविला , ज्याचे कामकाज ऐकण्यासाठी होणार्‍या गर्दीमुळे ,कोर्टरूम अपुरी पडू लागली. शेवटी कर्नाटक सरकारने नोटिफिकेशन काढून ,तो खटला एका मोठ्या प्रशस्त " चर्च " मध्ये चालवला. " बेळगाव बार अॅसोसिएशन " च्या दृष्टीने ही एक आगळी वेगळी घटना होती.
           एका खून खटल्यात, एका गरीब महिलेला आरोपी करण्यात आले होते. ती निर्दोष आहे याची खात्री पटलेली असल्याने, मुंडरगी वकीलांनी तो खटला फुकट चालवला आणि जिंकून दिला . परगावाहून कोर्टात येण्यासाठी, त्या महिलेकडे पैसे नसत.  मुंडरगी वकील प्रत्येक तारखेला, त्या गरीब महिलेला येण्या जाण्याचा खर्च, स्वतःच्या खिशातून देत असत.  वकील लोक प्रत्येक तारखेला ,आपल्या अशिला कडून ,खटला चालविण्यासाठी पैसे घेत असतात. इथे तर गंगा उलटी वहात होती. वकील दर तारखेला अशिलाला पैसे देत होते . केवढी ही माणूसकी ! आज कालच्या पैशाच्या मागे लागलेल्या जगात ,अशी " देव माणसे " विरळाच !
                 मुंडरगी वकीलांच्या हाताखाली, अनेक वकील शिकले. मुंडरगी वकीलांनी, आपले कायद्याचे ज्ञान आणि कसब मुक्त हस्ते सर्वांना दिले. ते  ज्युनियर वकीलांना ,सकाळी वकीली कामासाठी बोलावत. काम झाल्यावर  आपल्या बरोबर आग्रहाने जेवायला घालून , मगच  कोर्टात नेत असत. त्यांच्या या ज्ञान आणि अन्न भरभरून देण्याच्या वृत्तीला , त्रिवार वंदन !
                 मुंडरगी वकीलांनी अनेक सामाजिक संस्थावर अध्यक्ष , विश्वस्त , मार्गदर्शक या नात्याने काम केलेले आहे. ही बाब त्यांच्या सामाजिक जाणिवेची, निदर्शक आहे.
                  मुंडरगी वकीलांनी त्यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करणार्‍या एका मदतनीस  लेखनीकाला  आयुष्यभर पेन्शन मिळावी अशी आर्थिक तरतूद  केली आहे. केवढी ही माणूसकी आणि प्रामाणिकपणे काम करणार्‍या माणसाची कदर  ! आजच्या स्वार्थी जगात हे दुर्मिळ आहे.
                मुंडरगी वकीलांना तीन मुले. तिघेही वकीलच ! थोरले श्री. अशोक , मुंबई उच्च न्यायालयात प्रसिध्द वकील आहेत. मधल्या कन्या शैलजा. त्या ही वकीलच होत्या.  सर्वात धाकटे श्री. दिलीप ,कोल्हापुरात नावाजलेले वकील आहेत.
            सन् २००७ मध्ये , पी. आर. मुंडरगी  वकील यांचे, वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने विधिज्ञांच्या क्षेत्रात , फार मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
           कै. पी. आर .मुंडरगी वकील अतिशय टापटिपीने राहणारे , नियोजन बध्द काम करणारे , कुशाग्र बुध्दीमत्ता असलेले व देखणे व्यक्तीमत्व होते. ते हजरजबाबी होते तसेच त्यांना विनोदाचे टायमिंग ही अचूक जमायचे .
            अशा या हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या   कै. पी. आर. मुंडरगी वकीलांना या लेखाच्या माध्यमातून  आदरयुक्त श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.

Sunday, 19 July 2020

श्रीमति कालिंदी देशमुख...आमच्या " बाई "...

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, त्यांचे नाव आहे ,श्रीमति कालिंदी मधुकर देशमुख , वय ९१ वर्षे फक्त !  श्रीमति कालिंदी यांना ओळखणारे , सर्वजण त्यांना " बाई " म्हणतात ! आपण ही त्यांना" बाई " असेच म्हणू !
              बाईंचे वडील कै. प्रद्युम्नाचार्य वरखेडकर,  हे पंढरपुरच्या उत्तराधी या वैष्णव पंथीय मठाचे मठपति ! घरात कडक सोवळे ओवळे ! घरात अग्निहोत्र असायचे !भोजनात कांदा लसूण वर्ज्य ! घरात पाण्याचा वापर फक्त नदी किंवा आडाच्या पाण्याचाच असे  ! नळाचे पाणी वर्ज्य ! घरात संभाषणाची भाषा संस्कृत ! अगदी कारण परत्वे, कानडी किंवा मराठी भाषेचा वापर व्हायचा ! अशा  कर्मठ वातावरणात बाईंचे लहानपण गेले.
                  बाईंच्या वडीलांचे म्हणजे प्रद्युम्नाचार्यांचे एक शिष्य ,जामखेडला ( जिल्हा अहमदनगर ) येथे वास्तव्याला होते. त्यांचे आडनाव देशमुख . देशमुख घराणे मुळचे शैव पंथीय . पण उत्तराधी मठाचे शिष्यत्व पत्करल्याने ,घरात वैष्णवी वातावरण .आपल्या गुरूंची म्हणजे प्रद्युम्नाचार्यांची मुलगी ,आपल्या घरात लग्न होउन आली तर ,आपले घराणे पवित्र होईल अशी त्यांची भक्तीपूर्ण समजूत ! अशा प्रकारे ,बाईंचे देशमुख घराण्यात पदार्पण करण्याचा योग आला.
                    लग्नाचे वेळी बाईंचे म्हणजे नव वधूचे वय होते १२ किंवा १३ वर्षे ! वर मधुकर देशमुख  यांचे वय होते १५ वर्षे !  थोडक्यात हा " बालविवाह " होता. बालविवाहाला त्या भागात मान्यता नसल्याने ,हा विवाह कर्नाटकात पार पाडण्यात आला. अशा तर्‍हेने बाईंचा प्रवेश वरखेडकरांच्या घरातून ,देशमुखांचे घरात १९४२ साली झाला.
             देशमुखांच्या घरात बाईंना त्रास अजिबात झाला नाही. उलट आपल्या गुरूंची मुलगी आपल्या घराण्यात आल्याने ,त्यांचे कौतूकच झाले. बाईंचे वय लहान असल्याने लग्ना नंतर, त्या बरेच दिवस माहेरीच होत्या. त्यांचे मिस्टर श्री. मधुकरराव देशमुख ( त्यांना सर्वजण भाऊ म्हणत ),लग्नाचे वेळी शिकतच होते.  लग्ना नंतर सुध्दा ते पुण्याला व कांही दिवस अहमदनगरला, शिकायला होते. जामखेडला भरपूर शेतीवाडी , देशमुखांच्या गढी वरचा प्रशस्त वाडा होता. आपला एकूलता एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे , घरच्या ऐश्वर्यावर त्याने  लक्ष ठेवले पाहिजे, असे भाऊंच्या वडीलांना वाटले.  १९४५ साली आपल्या  वडीलांच्या आदेशा वरून शिक्षण सोडून ,भाऊ  जामखेडला परतले. बाई ही त्याच सुमारास जामखेडला आल्या. 
                  भाऊ  शिक्षणाच्या निमित्ताने जामखेड बाहेर असताना, कम्युनिस्ट विचार सरणीच्या लोकांशी त्यांचा  संबंध आला होता. ती विचार सरणी त्यांना भावली. ते नास्तिक विचारांचे बनले. पण आपली विचार सरणी ,त्यांनी आस्तिक विचारांच्या आपल्या पत्नीवर म्हणजे बाईंच्यावर ,कधी ही लादली नाही. जामखेडला आल्यावर भाऊंनी, आपल्या शेतीवाडीवर लक्ष ठेवण्या बरोबरच, सामाजिक कार्याला सुरवात केली. गावात शिक्षण संस्था उभारली , वाचनालयाची सोय केली. त्या काळी जोमात असलेल्या,  हैदराबाद मुक्ती चळवळीला मदत केली. या सर्व कामात बाईंनी, भाऊंना सर्वार्थाने साथ दिली. दोघांचा संसार छान एकोप्याने झाला.
           दोघांच्या संसारवेलीवर पाच फुले फुलली. चार मुले व एक मुलगी. त्यांचा दोन नंबरचा मुलगा श्री. उध्दव, जामखेडलाच त्यांचे सोबत रहात असे. त्याचे लग्न १९७६ साली झाले. नवीन सून घरात आली. आता आपली घरात लुडबूड नको .नवीन दांपत्याला मोकळीक असावी. या विचाराने मुले नको नको म्हणत असताना, भाऊ आणि बाई आपल्या जामखेड मधील शेतावर ,आनंदाने रहायला गेले. एक प्रकारचा स्वानंदासाठी स्विकारलेला वानप्रस्थाश्रमच म्हणा ना ! तिथे ते दोघे १९९५ पर्यंत आनंदात राहिले. १९९५ साली भाऊंचे निधन झाले.
 तो धक्का बाईंनी आपल्या मुलांच्या सहकार्याने सोसला. 
                बाईंची मुले उच्च शिक्षीत आहेत. सर्वात मोठा मुलगा श्री. अनंत,  कार्यकारी अभियंता पदावरून  सेवानिवृत्त झालेला आहे. दोन नंबरचा मुलगा श्री. उध्दव जामखेडला आपली वडीलोपार्जित शेती पाहतो. तीन नंबरचा  मुलगा श्री. अरूण आणि पाच नंबरचा मुलगा मुलगा श्री. लक्ष्मीकांत , हे दोघे महाराष्ट्र बॅंकेतून उच्च अधिकारी पदा वरून, सेवा निवृत्त झालेले आहेत. मुलगी सौ. वैजयंती , श्री. मोहनराव बुवा या अभियंता उद्योजकाची पत्नी आहे. सर्वजण आपापल्या जागी सुस्थितीत आहेत. बाईंना परतवंडे ही झालेली आहेत.                                 सर्वजण बाईंची मना पासून काळजी घेतात.
                वयोपरत्वे बाईंना कांही कांही शारीरिक व्याधी त्रास देतात. पण मुले  , सुना आणि मुलगी , जावई यांच्या सहकार्याने त्या जास्तीत जास्त समाधानात राहण्याचा ,प्रयत्न करतात. कांही वेळा जमतं कांही वेळा नाही. दोष त्यांचा नाही. वयाचा आहे.
                  अशा या जिथे जातील तिथे अॅडजस्ट होण्याचा प्रयत्न करणार्‍या ,९१ वर्षाच्या बाईंना उदंड , उत्तम आणि निरामय आयुष्य लाभो ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Friday, 10 July 2020

श्री. प्रकाश क्षीरसागर....अभियंता ते बॅंकर...

अभियंता , संशोधक ,अभिनेता  आणि बॅंकर असा विविधांगी प्रवास असलेला, माझा एक मित्र आहे. मी आज तुम्हाला त्याची ओळख करून देणार आहे. त्याचे नाव आहे श्री. प्रकाश विश्वनाथ क्षीरसागर ! असे विविधांगी व्यक्तीमत्व असणारा प्रकाश, आमचा मित्र आहे ही आम्हा मित्रांना ,अभिमानास्पद गोष्ट आहे .
           श्री. प्रकाश क्षीरसागर ,पुण्यातून अभियंता झाला आणि नाशिकच्या " मेरी " या महाराष्ट्र राज्याच्या, पाटबंधारे खात्याच्या संशोधन संस्थेत, वैज्ञानिक  पदावर हजर झाला. तेथील महामार्ग संशोधन विभागात त्याने, पाच वर्षे संशोधनाचे काम केले. काम करताना  ते नीट समजावून घेउन अभ्यासपूर्ण करण्याचा, त्याचा स्वभाव असल्याने ,वरिष्ठांची त्याच्यावर मर्जी असायची. पाच वर्षांचा बाॅन्ड पूर्ण होताच , त्याने ती नोकरी सोडली. नंतर  कुवैत या देशात,  तिथल्या रिफायनरींशी संबंधित  " वाॅटर कूलींग प्रकल्पावर, " क्वालिटी कंट्रोल अभियंता म्हणून त्याने नोकरी स्विकारली . तिथे त्याने चार वर्षे,  उत्तम प्रकारे काम केले. पण तिथले हवामान आणि एकटे राहण्याने होणारे खाण्या जेवण्याचे हाल , यांचा विचार करून त्याने ती नोकरी सोडली .त्या  नंतर  मुंबईत भाभा अणू संशोधन केंद्रात, प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी कंट्रोल अभियंता, अशा दोन्ही जबाबदार्‍या त्याने उत्तम प्रकारे पार पाडल्या. पण कांही कौटूंबिक अडचणी मुळे, त्याला ही नोकरी वर्षभरातच सोडावी लागली आणि श्री. प्रकाशच्या आयुष्याला, एक वेगळे वळण मिळाले.
                 नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत, तो  अधिकारी पदावर हजर झाला. तिथे बॅक जी कर्जे देत असे, त्यांची तांत्रिक छाननी करण्याचे काम ,त्याच्या कडे होते. तसेच त्याने नाशिक जिल्ह्यातील कांही तालूक्या मधील  , द्राक्षे व कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या विकासासाठी,  फलोत्पादन योजने अंतर्गत, त्या काळी ५० कोटी रूपयांच्या मागणीचा अभ्यासपूर्ण अहवाल , नाबार्डला सादर केला. तो मंजूर झाला आणि प्रकाशच्या बॅंकिंगच्या कामाला गती मिळाली.  नंतर त्याने  " बॅलन्स शीट अॅनॅलॅसिस " इत्यादी महत्वाच्या बाबींचा स्वतः अभ्यास करून, बॅंकिंगच्या परीक्षा दिल्या व तो  अभियंता होताच , आता " बॅंकर " सुध्दा झाला. ही श्री. प्रकाशची फार मोठी उपलब्धी आहे ,असे मला वाटते. १९८४ ते २००५ अशी २१ वर्षे ,त्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत ,उत्तम प्रकारे काम केले. त्याच्या तडफदार  कामा मुळे , नाशिकच्या बॅंकिंग क्षेत्रात ,एव्हाना त्याच्या नावाचा दबदबा तयार झाला होता.
               नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून सेवानिवृत्त झाल्या झाल्या  लगेच, गोदावरी सहकारी बॅंक आणि त्या नंतर देवळा मर्चंट्स सहकारी बॅंक, येथे कांही काळ त्याने सेवा दिली .
                  आता तो गेली आठ वर्षे, राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचारी  सहकारी बॅंकेत  " मुख्य कार्यकारी अधिकारी " या उच्च पदावर, कार्यरत आहे. या आठ वर्षात, त्याने बॅंकेच्या ठेवी १०० कोटी वरून, ४२० कोटी रूपयांवर नेल्या आहेत. बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांना शिस्त लावून, बॅंकेच्या हेड आॅफिस व्यतिरिक्त  चार नवीन शाखा उघडल्या आहेत.   पंधरा हजार तीनशे सभासद असलेली ही बॅंक, अतिशय शिस्तबद्धपणे श्री. प्रकाश क्षीरसागरने , उर्जितावस्थेला आणलेली आहे. ही बॅंक नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यात ,सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकावर आहे , ही अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आहे.
               श्री. प्रकाशने जिथे जिथे काम केले, तिथल्या अधिकारी , कर्मचारी आणि ग्राहक यांच्या मानसिकतेचा, मानसशास्त्राच्या विशिष्ठ  दृष्टीकोनातून  अभ्यास केल्याने, तो सर्वत्र यशस्वी झाला आहे.
             " मेरी " या संशोधन संस्थेत असताना, श्री. प्रकाश आणि त्याच्या पत्नी सौ. रेखा वहिनी, यांनी तिथल्या गणेशोत्सवातील  विविध नाटकात कामे करून, आपल्या अभिनयाचे दर्शन ,रसिकांना घडविले आहे.
            श्री. प्रकाश याला तीन मुले. दोन मुली आणि एक मुलगा. सर्वजण उच्च शिक्षित असून, आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत. श्री. प्रकाशला , सौ. रेखा वहिनींची समर्थ साथ आहेच !
          अशा या बहुरंगी व्यक्तीमत्व असलेल्या व जिथे जाईल तिथे स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेल्या, माझ्या मित्राला आणि सौ. वहीनींना पुढील निरामय  आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.

Saturday, 4 July 2020

संसार सागर...

संसार सागर....
माणूस संसार सागरात डुबक्या मारताना, नाकातोंडात पाणी जातं , प्राण कासावीस होतो , पण संसाराचे प्रेम कांही सोडवत नाही. त्या विषयीची एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे.
               एकदा भगवंत स्वर्गात आपल्या महालात, चिंताक्रांत होउन फेर्‍या मारत होते. एवढ्यात नेहमी प्रमाणे, नारदमुनी तिथे पोचले. भगवंत चिंताक्रांत होउन फेर्‍या मारत आहेत ,हे पाहून त्यांनी विचारलं..." भगवंत , आपण एवढे चिंताक्रांत का ? कांही अडचण आहे का ? " भगवंतांनी नारदमुनींच्या कडे पाहिलं आणि ते म्हणाले " नारदा मला माझा खरा खुरा भक्त ,खूप दिवसात न भेटल्यानं ,मी अस्वस्थ आहे ".
                 नारदमुनी म्हणाले " भगवंत , अहो तिकडे पृथ्वीतलावर ,तुमचा किती जयजयकार चालू आहे. देवस्थाना समोर तासनतास लोक तुमच्या दर्शनासाठी, रांगा लावून उभे आहेत. वारकरी मैलोनमैल चालत, तुमच्या दर्शनासाठी जात आहेत. गणपती उत्सव , दुर्गा उत्सव , त्या निमित्ताने भंडारा , जेवणावळी उठत आहेत. राजकारणी लोक दानधर्म करीत आहेत . भजन कीर्तनाचा दंगा उसळलेला आहे. एवढे भक्त असताना, तुम्ही खरा भक्त भेटत नाही, असे कसे म्हणता ?"
                  भगवंत कसनुसे हसले आणि म्हणाले " नारदा , तूच मला माझ्या खर्‍या भक्ताला आणून भेटव ". नारदमुनी म्हणाले " हा असा टाकोटाक जातो आणि तुमच्या खर्‍याखुर्‍या भक्ताला घेउन येतो."
                   नारदमुनी पृथ्वीतलावर आले. तिथे एका ठिकाणी कीर्तन चालू होते. श्रोतृवृन्द बुवांच्या कीर्तनावर खूष होउन डोलत होता. नारदमुनींनी त्यात एक अजोबा पाहिले. ते भक्तीने तंद्री लावून डोळे मिटून कीर्तन ऐकत होते. नारदमुनींना  " खरा भक्त " सापडला. ते खुष झाले. त्या अजोबांच्याकडे गेले आणि म्हणाले " अजोबा , तुमच्या भक्तीवर भगवंत खूष झाले आहेत. तुम्हाला स्वर्गात त्यांनी बोलावलय. मी तुम्हाला न्यायला आलोय. चला. "
                     अजोबांनी डोळे उघडले आणि म्हणाले
 " नारदा , एवढ्या लोकात मीच बरा सापडलो रे तुला ? अरे माझं स्वर्गात जायचं वय झालय का ?  माझा एकुलता एक मुलगा नुकताच निवडून आलाय , तो मंत्री होणार असं ऐकतोय. तो मंत्री झाला की त्याचं वैभव बघायला " मी " नको का ? शिवाय त्याचं लग्न व्हायचय , नातवंड बघायचं सोडून ,मी आता कुठला येतोय रे बाबा स्वर्गात ? एखाद दुसरं वर्ष जाउ दे मग बघू ."
                   दोन वर्षे गेली. नारदमुनी तिथे पुन्हा हजर झाले. मंत्र्याच्या बंगल्यात भरपूर वर्दळ सुरू होती. पण अजोबा कांही दिसत नव्हते. नारदमुनींनी बारकाईनं पाहिलं. दरवाज्यात एक गलेलठ्ठ कुत्रा दिसला. नारदमुनींनी ओळखलं , हेच ते अजोबा ! पुढच्या जन्मात कुत्रा होउन आलेत.
                    नारदमुनी कुत्र्या जवळ जाउन म्हणाले
 " अजोबा , काय ही तुमची अवस्था ? माणसाच्या जन्मा नंतर तुम्हाला कुत्र्याचा जन्म मिळालाय. आता तरी चला. भगवंत स्वर्गात तुमची वाट पहात आहेत. " कुत्रं रूपी अजोबा म्हणाले " नारदा ,आता लगेच मी कुठला येतोय बाबा ? अरे माझा मुलगा आता मोठ्ठा मंत्री झालाय. रग्गड पैसा मिळवतोय. त्याचं चोरा पासून रक्षण " माझ्या " शिवाय कोण करणार ? कुणावर विश्वास ठेवायचं युग आहे का हे ? शिवाय माझ्या सुनेला दिवस गेलेत. नातवंड पहायचं सोडून मी कुठला स्वर्गात येतोय रे बाबा ? अजूनी एकदोन वर्ष जाउ देत मग बघू !"
                     दोन वर्षा नंतर नारदमुनी अजोबांना शोधत पुन्हा तिथे आले. दारात कुत्रा दिसत नव्हता. नारदमुनींनी जरा बारकाईनं शोध घेतला . ते अजोबा आता बेडूक झाले होते आणि मुलाच्या बंगल्याच्या ड्रेनेजच्या पाण्यात बसले होते. नारदमुनी त्या बेडका जवळ गेले आणि म्हणाले " अजोबा , काय ही तुमची अवस्था ? माणसा नंतर कुत्रं झालात. त्या नंतर आता बेडूक झालात आणि या घाण पाण्यात बसलाय ? अजोबा म्हणाले " नारदा अरे हे पाणी घाण मुळीच नाही. माझी नातवंडं रोज सकाळी सुगंधी तेल आणि साबण लाउन ,गरम पाण्यानं अंघोळ  करतात . नातवंडांच्या अंगावरचं सुगंधी गरम पाणी माझ्या अंगावर आलं की किती आनंद होतो म्हणून सांगू ? तू ब्रह्मचारी माणूस ! तुला हा आनंद कसा समजणार ? "
                  ही कथा अशी बरीच वाढवता येईल. पण माणूस संसारात किती आणि कशा प्रकारे आनंद मानेल ते सांगता येत नाही. सगळं अकल्पितच आहे हे ! माणूस इकडे संसाराच्या सागरात डुंबतोय , नाका तोंडात पाणी जातय ,पण संसाराचा मोह कांही सुटत नाही.
आहे की नाही गमतीची गोष्ट ! वाचा आणि विचार करा !

Wednesday, 1 July 2020

कै. लालासाहेब घोरपडे.....एक वनस्पती प्रेमी....

आज मी तुम्हाला माझा वर्गमित्र, कै. प्रा. डाॅ. लालासाहेब निवृत्ती घोरपडे,याची ओळख करून देणार आहे.त्याच्या नावा मागे ( कै.) लिहीणं ,मनाला अत्यंत वेदनादायी आहे.
                आमचा हा मित्र उत्साहाचा झरा होता.  सिटी हायस्कूल , सांगली ,मधील शाळेतल्या मित्रांचा आमचा एक  " व्हाॅट्स अॅप " ग्रुप आहे. त्यात रोज सकाळी लालासाहेब  विविध वनस्पती , फुले , पाने यांची शास्त्रिय माहिती, फोटो सह पाठवायचा. त्या मुळे आमची सकाळ ,अतिशय प्रसन्न असायची.
              आमचे वर्ग मित्रांचे दोन स्नेहमेळावे झाले. दोन्हीत तो उत्साहाने सामिल झाला होता. तिथे त्याने अतिशय कमी वेळात , विविध प्रकारची मन मोहक पुष्परचना ,आम्हाला करून दाखविली. त्याच्या वनस्पती सृष्टीच्या ज्ञाना बरोबरच, त्याच्या सौंदर्य दृष्टीचे, आम्हाला सर्वांना अतिशय कौतूक वाटले होते.
                आमच्या या मित्राचे मूळ गाव सातवे ( ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर ). तिथेच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. दहावी आणि अकरावी अशी दोन वर्षे, तो आमच्या वर्गात सिटी हायस्कूल ,सांगली ,येथे होता. नंतर त्याने शिवाजी युनिव्हर्सिटीतून वनस्पतीशास्त्रात, एम. एस्सी. आणि " उसावर पडणारे रोग " या संदर्भात, आपली " डाॅक्टरेट " पूर्ण केली. त्याच्या या संशोधन प्रबंधाला, आंतर राष्ट्रीय मान्यता देणारी
" प्रशस्तीपत्रके ", मिळालेली आहेत. तो डाॅक्टरेट करीत असताना, त्याला तांत्रिक आणि प्रशासकीय, अशा अनंत अडचणींचा सामना करावा लागला . पण त्याने जिद्दीने आपली डाॅक्टरेट पूर्ण केली. त्याच्या त्या जिद्दीला त्रिवार
 वंदन !
              एम. एस्सी. झाल्या नंतर ,तो ज्या काॅलेज मधून ग्रॅज्युएट झाला, त्या वारणानगर काॅलेज मध्ये तो प्रथम डेमाॅन्स्ट्रेटर या पदावर ,हजर झाला. आपल्या गुणवत्तेच्या आणि शिकविण्याच्या कौशल्याच्या जोरावर , तो तिथेच प्राध्यापक ही झाला. त्याची शिकविण्याची हातोटी अतिशय चांगली असल्याने ,त्याचे विद्यार्थी आज ही त्याची मना पासून ,आठवण काढतात .
                   हे सगळं सुरळीत चालू असताना १९९८ साली, त्याच्या पत्नी कॅन्सरने " गेल्या ". हा त्याला मोठा मानसीक धक्का होता. त्यातून सावरायला त्याला खूप वेळ लागला. दुसरा विवाह करण्या विषयी नातेवाईकांच्या कडून, दबाव येत होता. पण त्याने आपल्या मुलांचा विचार करून तो विषय, निग्रहाने बाजूस सारला.
              सन २००५ मध्ये, तो काॅलेजच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाला. सेवानिवृत्ती नंतर " वारणा कोडोली ज्येष्ठ नागरीक संघ " या  सेवाभावी संस्थेच्या कामाला, त्याने वाहून घेतले. त्या नागरीक संघातर्फे अनेक सामाजोपयोगी उपक्रम ,त्याने पार पाडले. नागरीक संघाला स्वतःची इमारत नव्हती. ती बांधून मिळण्यासाठी, त्याने शासन दरबारी तसेच आमदार खासदारांना भेटून, ते काम पूर्णत्वास नेले. वारणानगर मधील मुलांच्यासाठी " चिल्ड्रेन पार्क " व्हावा ,या साठी त्याने विशेष प्रयत्न केले. हा प्रकल्प " कोल्हापूर रोटरी क्लब " मार्फत त्याने पूर्ण केला . वारणानगर ज्येष्ठ नागरीक संघाचे वरिष्ठ पद स्विकारण्या विषयी ,त्याला आग्रह झाला. पण त्याने विनम्रपणे कोणते ही पद स्विकारण्यास, नकार दिला. पद आणि पैसा मिळविण्यासाठी ,आजकाल सर्वजण आसुसलेले असतात , अशा वेळी लालासाहेबाचा हा निर्णय, त्याच्या निरपेक्ष मनाची साक्ष देतो.
              लालासाहेब यास बागेत विविध रोपे लावून , त्यांची प्रेमाने निगा राखण्याची ,विशेष आवड होती. बोनसाय तयार करण्याचे विशिष्ठ तंत्र, त्याने आत्मसात केलेले होते. विविध मनोहारी पुष्परचना करणे, हा त्याचा छंद होता. त्याने आपल्या बागेत ,कमळाची फुले फुलावीत या साठी खूप प्रयत्न केले. ती फुललेली कमल पुष्पे ,कै. लालासाहेब याची वाट पहात आहेत, असे रोज त्याच्या मुलांना वाटते व त्यांचे मन हेलावते.
               लालासाहेब याला दोन मुले व एक मुलगी. तीन ही मुले उच्च शिक्षित असून, आपल्या आपल्या क्षेत्रात ,कर्तृत्व सिध्द करीत आहेत.
                  झाडे , फळे आणि फुले  यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या आमच्या मित्राला शेवटी कॅन्सरने गाठले.  त्याच्या मुलांनी त्याची सेवा करण्यात आणि उपचारात ,कोणती ही कसर सोडली नाही. पण काळापुढे ,कुणाचे कांही चालले नाही आणि आमचा हा जिवलग मित्र, दि. ८ फेब्रुवारी २०२० रोजी ,काळाच्या पडद्या आड  निघून " गेला ".
               या लेखाच्या माध्यमातून, कै.प्रा. डाॅ.  लालासाहेब निवृत्ती घोरपडे, या आमच्या मित्राला, साश्रुपूर्ण नयनांनी श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.
          ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।