Thursday, 8 October 2020

कै. लक्ष्मण रामचंद्र उर्फ नाना दीक्षित ...माझे परमपूज्य वडील.

 कै. लक्ष्मण रामचंद्र दीक्षित , माझे परमपूज्य वडील ! एक पुण्यात्मा ! अत्यंत धार्मिक , वेळेचे पक्के बांधील , व्यायामाची आवड असणारे , मित्रत्वाला जपणारे , मदतीला सदैव तयार , एखाद्याला आपलं मानलं की मना पासून प्रेम करणारे , असे अत्यंत आदरणीय व्यक्तीमत्व !

               आम्ही सर्वजण त्यांना, घरात " नाना " म्हणत असू. त्या मुळे या लेखात मी त्यांचा, तसाच उल्लेख करीत आहे. 

                  नानांचे लहानपण, कर्नाटकातल्या हुबळी धारवाड जवळील " लक्ष्मेश्वर " या गावी गेले. त्यांना उत्तम कानडी बोलायला येत असे. नंतरच्या आयुष्यात कानडी बोलणारा माणूस भेटला की ते ,अतिशय खूष होत असत.                                                                                           

               नानांना लहानपणा पासून ,व्यायामाची आवड होती. त्यांनी आपले शरीर व्यवस्थित कमावलेले होते. त्यांचा रोजचा व्यायाम कधी ही चुकला नाही. ते स्वर्गवासी होण्याचे अगोदर आठ दिवस आजारी होते. ते आठ दिवस सोडले तर ,त्यांनी आयुष्यभर  रोज न चुकता व्यायाम केला.

                     त्यांनी सांगली मिरज महापालिकेच्या " वाॅटर वर्क्स " मध्ये नोकरी केली. त्यांना शिफ्ट ड्युटी असायची. त्यांनी ड्युटीवर हजर राहण्याची वेळ कधी ही चुकविली नाही. नोकरीच्या २९ वर्षाच्या आयुष्यात, त्यांनी एक ही दिवस " लेट मार्क " घेतला नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे. 

                      नानांना मिलिटरीत जाण्याची फार इच्छा होती. पण त्यांना त्यांच्या वडीलांनी सोडले नाही. त्यांनी कांही दिवस होमगार्डमध्ये आपली सेवा दिली व आपली मिलिट्रित जाण्याची इच्छा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली. त्या मुळे नाना वाॅटर वर्क्सला नोकरीला जाताना, संपूर्ण खाकी ड्रेस घालून जात असत. सेवानिवृत्ती नंतर फिरायला जाताना, कायम त्यांच्या हातात  " वाॅकिंग स्टिक " असे. घरी त्यांनी विविध प्रकारच्या " वाॅकिंग स्टिक्स ", जमा करून ठेवल्या होत्या. त्यांना अंगठ्यांची खूप आवड होती. उजव्या हाताच्या चार बोटात, ते निरनिराळ्या खड्यांच्या अंगठ्या घालत असत. या अंगठ्या सोन्याच्या अजिबात नसत. विविध धातूंच्या व विविध प्रकारच्या अंगठ्या, जमा करण्याचा त्यांना छंद होता. तसेच  " जप " करण्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या माळा, त्यांनी आवर्जून जपून ठेवल्या होत्या.

                 नानांनी एखाद्याला आपलं मानलं तर, ते त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकत असत. त्यांचे सर्व थरात व सर्व धर्मिय मित्र होते. सांगलीचे लोकप्रीय नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कै. वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या नियमितपणाच्या वागण्याने ,सांगलीचे त्या  वेळचे एक डि. एस. पी. ,श्री. वेंकटाचलम यांच्याशी त्यांचा स्नेह होता. पोलिसात त्यांच्या भरपूर ओळखी होत्या. ते नोकरी साठी रेल्वेने सांगली मिरज जात येत असत.  त्या वेळी रेल्वेतले सर्व गार्ड , इंजिन ड्रायव्हर्स , टिसी यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. मी लहान असताना एकदा सांगली स्टेशन मधून सुटलेली रेल्वे , त्यांनी हात आडवा घालून थांबवली होती व आम्ही त्यात चढलो होतो, हे मला  आजही चांगलं आठवतय. नानांचे श्री. शंकरराव ताम्हणकर या नावाचे, एक मित्र होते. शंकररावांच्या शेवटच्या आजारपणाच्या दिवसात ,मित्राची सेवा करण्याचे मिषाने गप्पा मारायला , कांही धार्मिक वाचून दाखवायला , नाना  त्यांच्या घरी रोज न चुकता जात असत. ओळखीतलं कोणी आजारी असल्यास ,त्याच्या मदतीसाठी नाना आवर्जून धावून जात.

                   नाना धार्मिक वृत्तीचे होते. नोकरीत असताना व सेवानिवृत्ती नंतर ,त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन करून , त्या त्या ग्रथांची स्वतःच्या हस्ताक्षरातील हस्तलिखीत  प्रत, तयार केलेली आहे. हा हस्तलिखित प्रत तयार करण्याचा, त्यांचा उपक्रम जवळ जवळ ५० वर्षे अव्याहत चालू होता. एखाद्या उपक्रमात इतके वर्ष सातत्य ठेवणे ,ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यांनी हस्तलिखित प्रत तयार केलेल्या धार्मिक ग्रंथात, फक्त आपले हिंदूंचे ग्रंथच होते असे नाही .त्यांनी कुराण व बायबलचा ही अभ्यास करून त्यांची हस्तलिखित प्रत तयार केलेली होती. लिहीलेला हस्तलिखित ग्रंथ ते आपल्या जवळ ठेवत नसत. उदाहरणार्थ..ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत आळंदीला , तुकारामांची गाथा देहुला जाउन तिथे अर्पण करायची . त्या नंतर मागे न पाहता ते निघून यायचे. आपण इतके ग्रंथ लिहीले, याचा अहंकार युक्त अभिमान  होउ नये म्हणून, ते असे करीत. ५० वर्षात त्यांनी किती ग्रंथ लिहीले ,त्याची यादी त्यांनी जवळ ठेवलेली नव्हती, कारण अहंकार होउ नये म्हणून !

                     नाना घरातल्या कोणत्या ही बाबतीत, कधीच लक्ष घालत नसत. नोकरीत असताना ते पगार व नंतर पेन्शन ,माझ्या आईकडे देत. ती सर्व घरखर्च पहात असे. नाना त्यांच्या ठरविलेल्या दिनक्रमात व्यस्त असत. नानांचा स्वतःच्या जिभेवर कंट्रोल ठेवण्याचा, एक वेगळाच मार्ग होता. ते एक वर्ष तंबाखू युक्त पान खात व एक वर्ष अजिबात खात नसत. हा त्यांचा वाखाणण्या सारखा उपक्रम होता. 

                  नानांना दोनदा  थोडा थोडा अर्धांगवायूचा त्रास झाला. पण त्यांचे व्यायामाचे शरीर असल्याने ,ते त्या दोन्ही वेळी संपूर्ण बरे झाले होते. नानांना शेवटी शेवटी अल्झायमरचा त्रास होत होता. शेवटचे आठदिवस ते अजारी होते. त्यांनी त्या काळात अन्नपाण्याचा त्याग केला होता. असे पुण्यात्मा असलेले माझे वडील " नाना " ,दि. १९ एप्रील  २००२ साली ,वयाच्या ८४ व्या वर्षी नाशिक या पवित्र क्षेत्री , शांतपणे स्वर्गवासी झाले. 

                 कै. नानांच्या पवित्र स्मृतिस त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.


No comments:

Post a Comment