कै. सोनुताई दीक्षित ! माझी आई ! अत्यंत हुषार , ब्रीज चॅम्पियन ,अधुनिक विचारांना , नाविन्याला जवळ करणारी , मैत्रिणींच्या गराड्यात रमणारी , कोणत्या ही बाबीचे उत्तम मॅनेजमेंट करू शकणारी , ज्याला जे आवडते ते आठवणीत ठेउन करणारी , उत्तम ज्योतिषी ,अशा अनेक गुणांनी युक्त असे तिचे विविधांगी व्यक्तीमत्व होते.
तिचे माहेर करोली. ता. कवठे महांकाळ , जि. सांगली.खेडे गाव. शिक्षणाची फारशी सोय नाही. त्या मुळे शिक्षणासाठी, तिला आजोळी जतेला मामांच्याकडे किंवा शासकीय नोकरीत असलेल्या ,काकांच्या घरी नाशिक जिल्ह्यातील सटाणा , नाशिक इथे रहावे लागले. कांही ना कांही कारणाने ,शाळा सतत बदलावी लागायची. पण ती कुठल्या ही शाळेत गेली तरी तिने, पहिला नंबर कधी ही सोडला नाही. त्या काळी मुलींना शिकविण्याची फारशी प्रथा नव्हती. ती केवळ १५ वर्षांचीच असताना, १९४२ साली तिचे लग्न झाले व ती कु. सोनूताई राजाराम कुलकर्णीची, सौ. सोनूताई लक्ष्मण दीक्षित झाली.
मिरजेत माझे अजोबा होते तो पर्यंत घरात त्यांचाच " कायदा " चालायचा. त्यांच्या निधना नंतर सर्व कारभार ,माझ्या आईच्या हातात आला. वडीलांना पगार फारसा चांगला नसल्याने , पैसे फारसे नसायचे . पण त्या ही परिस्थितीत, तिने कधी कशाची कमतरता भासू दिली नाही. कोंड्याचा मांडा करून तिने आपला संसार ,आनंदाने केला. जे आहे त्यात समाधान मानण्याची आईची व वडीलांची वृत्ती असल्याने, आमच्या घरात कायम समाधान असायचे.
आईला शिक्षणाची भरपूर आवड होती. लग्ना नंतर तिने मिरजला परिक्षेचे केंद्र नसल्याने कोल्हापूर केंद्र घेउन ,व्हर्नाक्युलर फायनल ( व्ह. फा. ) ही परिक्षा दिली. ती त्या केंद्रात पहिली आली. पण सासरच्या जबाबदारीत ,तिला पुढे शिकता आले नाही. तरी ही तिने ,हिंदी भाषेच्या प्रविण पर्यंतच्या परिक्षा दिल्या व प्रत्येक परिक्षेत ,उत्तम सुयश मिळवले.
तिने हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला होता. हात पाहून ती बरोबर ज्योतिष सांगायची. त्या मुळे ती कुठे ही गेली की, तिला हात दाखवून आपले भविष्य जाणून घेणार्यांची, तिच्या भोवती गर्दी लगेच जमायची. पत्रिके वरून ही ती भविष्य सांगत असे. थोडक्यात आपल्या भोवती माणसे जमविण्यात ,ती वाकबगार होती.
तिला खेळांची आवड होती. पण सासरच्या चाकोरीबध्द वातावरणा मुळे तिला ,ती आवड विकसित करता आली नाही. पण बैठ्या खेळा पैकी, तिने " ब्रिज " सारख्या बुध्दीला आव्हानात्मक असलेल्या, खेळात प्राविण्य मिळविले. अनेक स्पर्धात भाग घेउन सतत प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले. ब्रिजच्या तिच्या पार्टनर्स श्रीमति उषाताई आगाशे , श्रीमति शकाताई कोल्हटकर , श्रीमति मंदाताई गाडगीळ , कर्नल पोंक्षेंच्या मिसेस , कै.सुमनताई लेले , कै. उषाताई देवल , आशाताई देवल ,श्रीमति अलका कोल्हटकर , कै. प्रभाताई कातगडे ,कै . इंदूताई दीक्षित , श्रीमति स्वाती सिध्दये , कै. माई चंदूरकर , कै. प्रभावती शिराळकर यांची या निमित्ताने मला आठवण होते आहे.
मिरजेला आमच्या घरा जवळ सात आठ कार्यालये असल्याने, पाहुण्यांची आवक जावक भरपूर असायची. आलेल्या पाहुण्याचे मना पासून स्वागत करून, ज्याला त्याला आवडणारा पदार्थ खायला घालून, त्यांच्या चेहर्या वरचा आनंद पाहण्यात, तिला धन्यता वाटत असे. असा साध्या साध्या गोष्टीतून सतत दुर्मिळ असा आनंद ती मिळवीत असे .
घरी कोणी ओळखीचे आल्यास, त्याच्या कडून आपले एखादे काम गोड बोलून कसे करून घ्यायचे , यात तिचा हात धरणारा, दुसरा कोणी असूच शकत नाही. तिला एकवेळ रागावणे जमत नसे . पण गोड बोलण्याची तिची कला, असामान्य अशीच होती.
ती सर्वाच्यात मिळून मिसळून रहात असे. समोरचा वयाने लहान असू दे किंवा मोठा असू दे , त्याच्याशी सुसंवाद साधण्यात तिचा हातखंडा असे. ती सर्व वयाच्या लोकात ,चटकन सामील होउ शकत असे. तिला हुषार व्यक्तींचे विशेष आकर्षण होते. अशा स्त्रियांशी तिची विशेष मैत्री जमायची. एकूणच बुध्दीने हुषार मैत्रिणींच्यात ती विशेष रमायची.
तिला बागेची खूपच आवड होती. आमच्या जुन्या वाड्याच्या परसदारी, तिने फळांची व फुलांची झाडे मोठ्या हौसेने लावली होती. बागेची स्वच्छता व झाडांची निगा, ती स्वतः लक्ष घालून करायची. अशा कामात व एकूणच घर स्वच्छ राखण्यासाठी जे कष्ट पडायचे, ते ती स्वतः आनंदाने करीत असे.
तिला नाविन्या विषयी खूप आकर्षण होते. माझ्या मुलाने चि. आदित्यने , नवीन लॅपटाॅप घेतल्यावर मला लॅपटाॅप वापरायला शिकव ,असा लकडा तिने त्याला लावला होता. नवीन गोष्ट आपण शिकली पाहिजे व त्यात आपल्याला प्राविण्य मिळालेच पाहिजे, असे तिला नेहमी वाटायचे.
राजकारण , आरोग्य , साहित्य ,क्रिडा क्षेत्र , अर्थकारण , परराष्ट्र नीती , अध्यात्म अशा कोणत्या ही विषयांचे तिला वावडे नव्हते. सर्व विषयांचे वाचन करून, अपडेटेड राहणे तिला आवडायचे. मुख्य म्हणजे ,कोणत्या ही विषयाचा " गाभा " तिला चटकन समजत असे. तिची कोणता ही विषय " ग्रहण करण्याची क्षमता" ,असाधारण होती. तिचे विचार सुटसुटित असत. अवघड विषय सुटसुटितपणे कसा मांडावा , याचे तिचे कसब अवर्णनीय असेच होते.
तिला शिकायला मिळाले नाही , अन्यथा ती त्या काळची आय. सी. एस. परिक्षा सहज पास होउन " जिल्हाधिकारी " नक्की झाली असती , असे आमच्या घरातील सर्वांचे प्रामाणिक मत आहे.
अशी आई मला मिळाली, हे माझे परमभाग्य होय. दि. २६ आॅगस्ट २०१३ रोजी तिचे अल्पशा आजाराने ,वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले अणि मी " पोरका " झालो.
कै. सोनुताई दीक्षित उर्फ माझ्या आईला मी या लेखाचे माध्यमातून ,श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.
No comments:
Post a Comment