Saturday, 4 July 2020

संसार सागर...

संसार सागर....
माणूस संसार सागरात डुबक्या मारताना, नाकातोंडात पाणी जातं , प्राण कासावीस होतो , पण संसाराचे प्रेम कांही सोडवत नाही. त्या विषयीची एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे.
               एकदा भगवंत स्वर्गात आपल्या महालात, चिंताक्रांत होउन फेर्‍या मारत होते. एवढ्यात नेहमी प्रमाणे, नारदमुनी तिथे पोचले. भगवंत चिंताक्रांत होउन फेर्‍या मारत आहेत ,हे पाहून त्यांनी विचारलं..." भगवंत , आपण एवढे चिंताक्रांत का ? कांही अडचण आहे का ? " भगवंतांनी नारदमुनींच्या कडे पाहिलं आणि ते म्हणाले " नारदा मला माझा खरा खुरा भक्त ,खूप दिवसात न भेटल्यानं ,मी अस्वस्थ आहे ".
                 नारदमुनी म्हणाले " भगवंत , अहो तिकडे पृथ्वीतलावर ,तुमचा किती जयजयकार चालू आहे. देवस्थाना समोर तासनतास लोक तुमच्या दर्शनासाठी, रांगा लावून उभे आहेत. वारकरी मैलोनमैल चालत, तुमच्या दर्शनासाठी जात आहेत. गणपती उत्सव , दुर्गा उत्सव , त्या निमित्ताने भंडारा , जेवणावळी उठत आहेत. राजकारणी लोक दानधर्म करीत आहेत . भजन कीर्तनाचा दंगा उसळलेला आहे. एवढे भक्त असताना, तुम्ही खरा भक्त भेटत नाही, असे कसे म्हणता ?"
                  भगवंत कसनुसे हसले आणि म्हणाले " नारदा , तूच मला माझ्या खर्‍या भक्ताला आणून भेटव ". नारदमुनी म्हणाले " हा असा टाकोटाक जातो आणि तुमच्या खर्‍याखुर्‍या भक्ताला घेउन येतो."
                   नारदमुनी पृथ्वीतलावर आले. तिथे एका ठिकाणी कीर्तन चालू होते. श्रोतृवृन्द बुवांच्या कीर्तनावर खूष होउन डोलत होता. नारदमुनींनी त्यात एक अजोबा पाहिले. ते भक्तीने तंद्री लावून डोळे मिटून कीर्तन ऐकत होते. नारदमुनींना  " खरा भक्त " सापडला. ते खुष झाले. त्या अजोबांच्याकडे गेले आणि म्हणाले " अजोबा , तुमच्या भक्तीवर भगवंत खूष झाले आहेत. तुम्हाला स्वर्गात त्यांनी बोलावलय. मी तुम्हाला न्यायला आलोय. चला. "
                     अजोबांनी डोळे उघडले आणि म्हणाले
 " नारदा , एवढ्या लोकात मीच बरा सापडलो रे तुला ? अरे माझं स्वर्गात जायचं वय झालय का ?  माझा एकुलता एक मुलगा नुकताच निवडून आलाय , तो मंत्री होणार असं ऐकतोय. तो मंत्री झाला की त्याचं वैभव बघायला " मी " नको का ? शिवाय त्याचं लग्न व्हायचय , नातवंड बघायचं सोडून ,मी आता कुठला येतोय रे बाबा स्वर्गात ? एखाद दुसरं वर्ष जाउ दे मग बघू ."
                   दोन वर्षे गेली. नारदमुनी तिथे पुन्हा हजर झाले. मंत्र्याच्या बंगल्यात भरपूर वर्दळ सुरू होती. पण अजोबा कांही दिसत नव्हते. नारदमुनींनी बारकाईनं पाहिलं. दरवाज्यात एक गलेलठ्ठ कुत्रा दिसला. नारदमुनींनी ओळखलं , हेच ते अजोबा ! पुढच्या जन्मात कुत्रा होउन आलेत.
                    नारदमुनी कुत्र्या जवळ जाउन म्हणाले
 " अजोबा , काय ही तुमची अवस्था ? माणसाच्या जन्मा नंतर तुम्हाला कुत्र्याचा जन्म मिळालाय. आता तरी चला. भगवंत स्वर्गात तुमची वाट पहात आहेत. " कुत्रं रूपी अजोबा म्हणाले " नारदा ,आता लगेच मी कुठला येतोय बाबा ? अरे माझा मुलगा आता मोठ्ठा मंत्री झालाय. रग्गड पैसा मिळवतोय. त्याचं चोरा पासून रक्षण " माझ्या " शिवाय कोण करणार ? कुणावर विश्वास ठेवायचं युग आहे का हे ? शिवाय माझ्या सुनेला दिवस गेलेत. नातवंड पहायचं सोडून मी कुठला स्वर्गात येतोय रे बाबा ? अजूनी एकदोन वर्ष जाउ देत मग बघू !"
                     दोन वर्षा नंतर नारदमुनी अजोबांना शोधत पुन्हा तिथे आले. दारात कुत्रा दिसत नव्हता. नारदमुनींनी जरा बारकाईनं शोध घेतला . ते अजोबा आता बेडूक झाले होते आणि मुलाच्या बंगल्याच्या ड्रेनेजच्या पाण्यात बसले होते. नारदमुनी त्या बेडका जवळ गेले आणि म्हणाले " अजोबा , काय ही तुमची अवस्था ? माणसा नंतर कुत्रं झालात. त्या नंतर आता बेडूक झालात आणि या घाण पाण्यात बसलाय ? अजोबा म्हणाले " नारदा अरे हे पाणी घाण मुळीच नाही. माझी नातवंडं रोज सकाळी सुगंधी तेल आणि साबण लाउन ,गरम पाण्यानं अंघोळ  करतात . नातवंडांच्या अंगावरचं सुगंधी गरम पाणी माझ्या अंगावर आलं की किती आनंद होतो म्हणून सांगू ? तू ब्रह्मचारी माणूस ! तुला हा आनंद कसा समजणार ? "
                  ही कथा अशी बरीच वाढवता येईल. पण माणूस संसारात किती आणि कशा प्रकारे आनंद मानेल ते सांगता येत नाही. सगळं अकल्पितच आहे हे ! माणूस इकडे संसाराच्या सागरात डुंबतोय , नाका तोंडात पाणी जातय ,पण संसाराचा मोह कांही सुटत नाही.
आहे की नाही गमतीची गोष्ट ! वाचा आणि विचार करा !

No comments:

Post a Comment