Wednesday, 29 January 2020

क्लासच्या मुलांचा निर्भेळ आनंद.....

             गेली तीन वर्षे , मी रोज संध्याकाळी एका क्लास मध्ये शिकवायला जातो . आमच्या क्लास मध्ये बहुतेक मुले ,महापालिकेच्या शाळेतील असतात. ज्यांना प्रायव्हेट क्लास परवडत नाहीत , अशी मुले या क्लास मध्ये येतात. त्यांना क्लासची " फी " नसते. मोफत शिकविले जाते.
            कांही मुले किंवा मुली घर लांब असल्याने, शाळा सुटल्यावर सरळ क्लास मध्ये येतात व क्लास संपल्यावरच ,म्हणजे संध्याकाळी साधारण सव्वासात नंतर, घरी जातात. घर लांब असल्याने त्यांना घरी चालत जायला ही ,बराच वेळ लागतो.
           विद्यार्थ्यांच्या या अडचणी वर उपाय म्हणून आम्ही ,नाशिक मधील आमच्या ओळखीच्या लोकांना, आवाहन करतो की , ज्यांच्याकडे जुन्या ,वापरात नसलेल्या सायकली पडून आहेत , त्यांनी त्या जशा आहेत तशाच, आम्हाला द्याव्यात. आम्ही त्यांच्या घरातून त्या उचलून आणतो , त्या दुरूस्त करतो आणि गरजू मुलांना वापरण्यासाठी देतो. दुरूस्तीचा खर्च मुलांना द्यावा लागत नाही . अशी सायकल आपल्याला वापरायला मिळाली की , त्या मुलांच्या चेहर्‍या वरचा आनंद , पाहण्या सारखा असतो.
             खाली प्रातिनिधिक अशा , एका मुलांचे सायकल मिळाल्यावर झालेला आनंद, दर्शविणारा फोटो आहे. हा आनंद आम्हा सर्व शिक्षकांना भरभरून मिळतो. अशा निरपेक्ष आणि निर्भेळ आनंदाची तूलनाच होउ शकत नाही......


Tuesday, 14 January 2020

सहजीवनाची ७२ वर्षे....सौ. वेणूताई व श्री. अनंतराव जोशी..

*  सहजीवनाची ७२ वर्षे.....  *
********************
               आज मी तुम्हाला, अशा जोडप्याची ओळख करून देणार आहे की, ज्यांच्या लग्नाला ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी तीन वर्षांनी त्यांच्या लग्नाला ७५ वर्षे पूर्ण होतील. लग्नाला २५ वर्षे झाली की " रौप्य महोत्सव " होतो. ५० वर्षे झाली की " सुवर्ण महोत्सव" होतो . ६० वर्षे झाली की " हिरक महोत्सव " होतो आणि ७५ वर्षे झाली की " अमृत महोत्सव " होतो. थोडक्यात आणखी तीन वर्षांनी ,त्यांच्या लग्नाचा " अमृत महोत्सव " होणार आहे. हा एक दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे , असे मला वाटते. लग्ना नंतर ७२ वर्षे एकमेकाची साथ संगत मिळायला, परमेश्वराची कृपाच पाहिजे. अशी कृपा ज्यांच्यावर झालेली आहे, असे जोडपे म्हणजे, श्री. अनंतराव जोशी , वय वर्षे ९२ आणि सौ. वेणूताई जोशी , वय वर्षे ८९.
                श्री. अनंतराव जोशी ९२ वर्षांचे असले तरी, आज ही ,आपली कामे आपण स्वतः करतात. स्वतःचे कपडे स्वतः धुतात. रोजच्या कामांच्यासाठी ,त्यांना कोणाची ही मदत लागत नाही. सौ. वेणूताई जोशी , या ही ८९ वर्षांच्या असल्या तरी ,आपली रोजची कामे स्वतः करू शकतात. थोडक्यात या वयात, अशी स्वयंपूर्णता असणे ,हे  भाग्याचेच लक्षण नाही
 का ?
                 वयोपरत्वे ,दोघे घराच्या बाहेर सहसा पडत नाहीत. घरातल्या घरात हिंडून फिरून, व्यवस्थित असतात. त्यांच्या वयाचा विचार करता ,थोडेफार औषधपाणी घ्यावे लागते .  ते दोघे औषधे बिनचूकपणे घेतात व आपला बोजा कुणावर ही पडू नये, या दृष्टीने आपला दिनक्रम आखतात.
ते सध्या सांगलीला , विश्रामबाग , येथे मुला जवळ राहतात. घरातील सर्वजण ,त्यांची योग्य ती काळजी निश्चितच घेतात.
                 ७२ वर्षा पूर्वीचा त्यांचा प्रेमविवाह आहे , ही पण , त्या काळचा विचार करता , आगळी वेगळी गोष्ट आहे. श्री. अनंतराव हे कोकणस्थ ब्राह्मण आणि वेणूताई या देशस्थ ब्राह्मण ! त्या काळी प्रेमविवाह, शिवाय त्यात देशस्थ कोकणस्थ विवाह ,म्हणजे अब्रम्हण्यम् ! त्या दोघांना त्या साठी , आपण कल्पना ही करू शकणार नाही  असा , भरपूर त्रास सहन करावा लागला. दोघांनी एक दिलाने, मोठ्या कष्टाने, धाडसाने ,अक्षरशः शून्यातून आपले विश्व उभे केले आणि संसार यशस्वी करून दाखविला. त्या बद्दल त्या दोघांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.
                  आज मागे वळून पाहताना ,त्या दोघांना आपले प्रेम आणि वैवाहिक जीवन ,कृतकृत्य झाल्याचे समाधान नक्कीच असेल , यात मला तरी शंका वाटत नाही. पण त्या साठी त्या दोघांनी दिलेली " झुंज " ,आपणा कोणाला ही दिसणार नाही किंवा जाणवणार नाही. ती त्या दोघांनाच माहिती आहे.
               श्री. अनंतराव व सौ. वेणूताई या दोघांना दोन मुले. ते दोघे मुला सोबतच राहतात . मुलगी इचलकरंजीला असते. दोन्ही मुले आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत.
                श्री. अनंतराव व सौ. वेणूताई यांना उत्तम आणि निरामय दीर्घायुष्यासाठी ,भरभरून शुभेच्छा ! तसेच त्यांच्या लग्नाचा " शतक महोत्सव " साजरा  व्हावा  , ही सदिच्छा देतो आणि थांबतो.
                खाली फोटोत  माझ्या शेजारी खुर्चीत बसलेले दोघे दिसत आहेत ते श्री. अनंतराव जोशी आणि सौ. वेणूताई जोशी.

Saturday, 28 December 2019

श्री. दिलीप आपटे ...एक निरपेक्ष समाजोध्दारक....

             आज मी तुम्हाला ,एका वेगळ्याच व्यक्तीची ओळख करून देणार आहे ! त्यांचे नाव आहे श्री. दिलीप आपटे. त्यांना कोणी आदरणीय आपटे सर , आदरणीय आपटे गुरूजी, या नावाने ही ओळखतात . मी त्यांना लहानपणा पासून ओळखतो. मिरज शहरात आम्ही एकाच गल्लीत रहात होतो. पायाने अधू असलेला पण  तल्लख बुध्दीमत्तेचा दिलीप सर्वांनाच माहिती होता. शैक्षणिक करीयर अतिशय उत्तम ! सांगली बॅंकेत उच्च पदावर नोकरी ! घरी पत्नी आणि दोन मुले ! सर्व ऐहिक सुखांचा लाभ घेत, संसार उत्तम चाललेला ! अचानक चेन्नईला बदली झाली. तिथले वातावरण आणि एकूणच, बॅंकेतल्या नोकरीचा कंटाळा आणि वीट आल्याने ,त्यांनी नोकरीचा राजिनामा दिला आणि  मिरज गाठले.
              पूर्वी संस्कृतचा व्यासंग होताच ! त्यांनी श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीमद् भागवताचा अभ्यास सुरू केला. उत्तम बुध्दीमत्ता असल्याने, त्यातील  गुह्यतम ज्ञान अगदी थोड्या कालावधीतच त्यांनी आत्मसात केले.  तसेच त्या अनुषंगाने वेद , उपनिषदे आणि इतर अध्यात्मिक ग्रंथ यातील ही ज्ञान, त्यांनी  अल्पावधीतच ग्रहण  केले . त्या नंतर ते स्वतः श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीमद् भागवतावर प्रवचन देउ लागले. त्यांच्या सुश्राव्य आणि ओघवत्या भाषेतील प्रवचनाने ,श्रोतृगण मंत्रमुग्ध होउ लागला. महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर ही, त्यांची प्रवचने होउ लागली. पण प्रकृति साथ देईना , तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या .
             त्यातच त्यांनी मिरजेत " गीता फाउंडेशनची " स्थापना केली त्या फाउंडेशन तर्फे, " प्राजक्त " हे अध्यात्मिक पाक्षिक सुरू केले. त्यात तरूणांनी, आपले कर्तव्य कर्म चोख पार पाडावे ,पण त्याच बरोबर ,आपल्या समृृृृृृृध्द भारतीय तत्वज्ञानात्मक अध्यात्माचा अभ्यास ही करावा ,अशा आशयाचे लेख  त्यांनी स्वतः लिहीले आणि आज ही लिहीत आहेत . स्वतःच्या गीता प्रवचनांचे पुस्तक , त्यांनी लिहून प्रसिध्द केले आहे. श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीसमर्थांच्या दासबोधाच्या जशा परिक्षा असतात ,तशा श्रीमद् भागवताच्या परिक्षा घेण्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली , तो उपक्रम ही सध्या, गीता फाउंडेशन मार्फत हाती घेण्यात आलेला आहे.
               मध्यंतरी मिरजेतच ,महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील अप्रगत मुलांच्यासाठी ,त्यांनी वर्ग घेतले. या वर्गांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच गीता फाउंडेशन मार्फत , हुषार पण परिस्थितीने शिकू न शकणार्‍या विद्यार्थ्यांना, आर्थिक मदत दिली जाते. हा उपक्रम ही उत्तमपणे आणि अव्याहत चालू आहे. या उपक्रमा मार्फत शिक्षण घेउन ,कांही विद्यार्थी डाॅक्टर , इंजिनीयर आणि वकील ही झालेले आहेत , होत आहेत .
          विश्व शांती साठी , " विष्णूसहस्त्रनामाची " बारा कोटी आवर्तने, सामुहिक रीत्या  करण्याचा संकल्प, त्यांनी सध्या सोडला आहे. या उपक्रमात माझ्या माहिती प्रमाणे, भारतातून आणि देशविदेशातून ,किमान वीस ते पंचवीस हजार श्रध्दाळू भक्तगण, सामील आहेत. नाशिक मध्येच किमान दहा ते पंधरा मंडळे वेगवेगळ्या मंदिरात किंवा घरात " विष्णूसहस्त्रनामाची " आवर्तने करीत असतात. या उपक्रमासाठी श्री. आपटे सरांनी ,स्वतंत्र वेबसाईट डिझाईन करून घेतली आहे.
             समाजाच्या उत्थानासाठी, एक माणूस काय काय करू शकतो , याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून श्री. आपटे सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल !
             श्री. आपटे सर हे अत्यंत साधेपणाने राहतात. ते समाज उत्थानासाठी एवढी कामे करतात, पण  या कामांच्या  मुळे निर्माण होऊ शकणार्‍या ,  अभिमानाचा  किंवा अहंकाराचा लवलेश , त्यांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला कधी ही ,दिसणार नाही.
             फोटोत दिसत आहेत ते श्री. दिलीप आपटे सर ! समाजोत्थानासाठी निरपेक्षपणे झटणार्‍या ,अशा या आदरणीय व्यक्तीमत्वाला शतशत प्रणाम !

Wednesday, 18 December 2019

डाॅ. शरद व सौ. सरोज म्हसकर....एक १००%अनुरूप जोडी....

           आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , ती अशा दांपत्याची की, ते दोघे ही उत्कृष्ठ चित्रकार आहेत , दोघे ही साहित्यिक आहेत , संगीत रसिकाग्रणी आहेत. परमेश्वर अशी जोडी, फार क्वचितच जमवतो. सर्व साधारणपणे ,जोडीतील नवरा बायको एकमेकांना पूरक असतात. पण एकमेकांची Mirror image असलेली जोडपी पहायला मिळणे ,हा भाग्य योगच म्हणायला हरकत नाही.
              मी या बाबतीत नक्कीच भाग्यवान आहे. माझ्या माहितीतील डाॅ. शरद म्हसकर आणि सौ. सरोज म्हसकर  हे जोडपे असेच " एकमेकांचे प्रतिबिंब " असलेले एक दुर्मिळ असे जोडपे आहे.
               दोघांना ही, चित्रकलेची अतोनात आवड आणि जाण आहे.  स्वतःच्या बंगल्यात त्यांच्या दोघांच्या, चित्रे काढण्याच्या दोन स्वतंत्र खोल्या आहेत. सकाळचे सगळे अन्हिक आवरले की, साधारण अकराच्या सुमारास दोघेही आपापल्या खोलीत जाउन, वेगवेगळ्या विषया वरची सुंदर रंगसंती असलेली , पाहणार्‍याला नक्कीच आनंद देतील अशी चित्रे काढून, ते स्वतः ही आनंद मिळवतात. त्यांची चित्रे त्या क्षणी स्वानंदासाठीच असतात. दोघे ही एकमेकांची चित्रे पाहून मनमुराद आनंद लुटतात. मी दोघांची ही चित्रे पाहिली आहेत. खूपच छान आणि  उत्तम चित्रांचा खजिना पाहिल्याचे समाधान ,मला निश्चितच मिळाले. त्या दोघांचे लग्न ही चित्रकलेच्या प्रेमापोटीच जमले आहे. डाॅक्टर शरद यांनी , साखरपुड्याच्या दिवशी आपल्या होणार्‍या भावी पत्नीला म्हणजे रोझा यांना ,( त्यांचे माहेरचे लाडके नाव रोझा आहे ) , सोन्याच्या अंगठी सह , एक उत्तम चित्रच भेट दिले. अशी ही आगळी वेगळी भेट ,त्यांना ही मनस्वी आवडली . हा एक वेगळा सुयोग आहे.
                  दोघांना संगीतामध्ये, जबरदस्त इंटरेस्ट आहे. जुन्या हिंदी गाण्यांचे, ते दोघे ही अक्षरशः वेडे आहेत . पूर्वी गाण्यांच्या रेकाॅड्स असत. त्याचा ही त्यांच्याकडे भरपूर साठा होता. नंतर कॅसेट्स आल्या , त्यांचा ही अमर्याद साठा त्यांनी केला , नंतर पेनड्राईव्ह्ज आले. त्यात एकावेळी हजारो गाण्यांचा संग्रह त्यांनी केला. मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळी " कारवाॅं " वर ते दोघे संगीतच ऐकत होते.
              दोघांना साहित्याची ही प्रचंड आवड आहे. नामवंत साहत्यिकांचे साहित्य ते वाचतातच , पण त्या दोघांनी स्वतःची साहित्य निर्मिती ही केलेली आहे. सौ. सरोज वहिनींचा काव्य संग्रह आणि डाॅक्टरांचा स्फूट लेखांचा संग्रह प्रसिध्द झाला आहे.
                थोडक्यात " Made for each other " असे हे जोडपे, परमेश्वराने अतिशय आनंदात असताना बनविलेले आहे. हा एक मोठा दुर्मिळ योग आहे. डाॅक्टर शरद म्हसकरांचे वय साधारण सत्त्याहत्तरच्या आसपास आहे . सौ. सरोज वहिनींचे ,त्यांच्या पेक्षा  दोन पाच  वर्षांनी कमी असेल. त्यांचा
 " अानंदवन " हा बंगला , त्या दोघांच्या रसिकतेची साक्ष देणारा आणि चांगला ऐसपैस आहे. बंगल्यात वावरताना आणि बंगल्याचे आवार पाहताना , त्या दोघांच्या रसिक मनाची साक्ष पावलो पावली दिसते. बंगल्यात डाॅक्टरांनी स्वतः बनविलेल्या  त्यांच्या आई , वडीलांच्या आणि एका नउवारी तील पुरंध्रीच्या , प्लास्टर आॅफ पॅरिसच्या निवडक मूर्ति, लक्ष वेधून घेतात.
               डाॅ. शरद व सौ. सरोज वहिनी यांना दोन मुले व एक मुलगी आहे. एक मुलगा पुण्यात व बाकीचे दोघे परदेशात असतात. नाशिकमध्ये ते दोघेच असतात, पण छान स्वानंदात रममाण झालेले दिसतात.
              डाॅ. शरद म्हसकर आणि सौ. सरोज म्हसकर यांना दोघांना " जीवेत शरदः शतम् " अशी सदिच्छा देतो व थांबतो.

Friday, 6 December 2019

अविनाश कुलकर्णी ...आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृृृृृष्टी.....

               सन १९९० , इंजिनीयरिंगच्या शेवटच्या  वर्षाला शिकणारी मुले ,एका धरणावर  ट्रिपला गेली होती. शेवटचे वर्ष पूर्ण करून, इंजिनीयरिंगची पदवी मिळाली की, कोण कुठे जाईल सांगता येत नाही. पुन्हा असे सगळे एकत्र कुठले जमायला ?  थोडक्यात एंजाॅयमेंटचा मूड होता.
                इतक्यात धरणावरून कोणी तरी ,खाली पडल्याचा आवाज आला. पडलेला मुलगा साठ फूट खोल , धरणाच्या उतारा वरून, आपटत आपटत खाली जाउन, बेशुद्ध  पडला होता. त्याला सर्वांनी कसंबसं वर आणलं आणि जवळच्या हाॅस्पिटल मध्ये नेलं. तिथे समजलं की, हा अपघात भयंकर आहे व त्याला चांगल्या मोठ्या हाॅस्पिटल मध्ये अॅडमिट करण्याची गरज आहे. तातडीने त्याला मोठ्या सुसज्ज हाॅस्पिटलमध्ये नेलं गेलं.  तिथे जवळ जवळ दोन महिने ,विविध उपचार व आॅपरेशन्स झाली , पण विधिलिखित बदललं नाही. तो मुलगा ,पाठीच्या मणक्याला झालेल्या दुखापतीने ,कायमचा अपंग झाला. व्हिलचेअर शिवाय, तो इकडून तिकडे जाउ  शकत नाही , ही आजची वस्तूस्थिती आहे.
                पण आलेल्या परिस्थितीवर, मात करून ,आपले जीवन कसे सुसह्य करून घ्यावे, याचा आदर्श वस्तूपाठ त्याने घालून दिलेला आहे. आपला फोटोग्राफीचा छंद ,त्याने आपला जीवनाधार बनविला आहे. विविध फोटो काढण्यासाठी त्याने काय काय उपद्व्याप केले, ते ऐकून तुम्ही स्तिमित व्हाल.
१५ जानेवारी २०१० रोजी भारतात,  कन्याकुमारी परिसरात ,कंकणाकृति सूर्यग्रहण दिसणार होतं. हा दुर्मिळयोग कॅमेर्‍यात टिपण्यासाठी , व्हिलचेअरसह रेल्वेनं हा पठ्ठ्या ,कन्याकुमारीला गेला आणि तो दुर्मिळ प्रसंग, त्याने आपल्या कॅमेर्‍यात कैद केला. तसेच सूर्य बिंबा  वरून जाणार्‍या ,शुक्राचा फोटो , त्याने अशीच वेगळी शक्कल लढवून ,आपल्या कॅमेर्‍यात सामावून टाकला. दोन महिन्या पूर्वी ,भारताने चांद्रयान दोन सोडले. तो प्रसंग टिपण्यासाठी हा श्रीहरिकोटाला गेला. तिथल्या परवानग्या काढल्या आणि तो प्रसंगही त्याने, आपल्या कॅमेर्‍यात पकडला. निसर्गचित्रे , विविध प्राणी आणि पक्ष्यांचे सुंदर व देखणे फोटो काढण्यासाठी, त्याने घेतलेले परिश्रम ऐकून ,तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल !
              त्याच्या अशा सुंदर सुंदर फोटोंची प्रदर्शने पुणे , सातारा , सांगली येथे झाली आहेत. भारतीय राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत , त्याने आपल्या फोटोंची दखल घ्यायला लावली आहे.
           तुम्हाला आता उत्सुकता लागली असेल की , मी ज्याच्या विषयी बोलतोय तो आहे तरी कोण ?
           तो आहे,माझा मामेभाऊ , चि. अविनाश अनंत कुलकर्णी. B.E (इलेक्ट्राॅनिक्स ) पदवीधर  ! सध्या मुक्काम कोल्हापूर ! कोल्हापुरातल्या " हेल्पर्स आॅफ दी हॅन्डिकॅप्ड " या संस्थेच्या ,होस्टेल मध्ये तो राहतो व तिथल्या वर्कशाॅपचा इनचार्ज या नात्याने, काम पाहतो.
            खाली फोटोत आहे तो जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारा आणि आपल्याला ही पहायला शिकविणारा , चि. अविनाश अनंत कुलकर्णी !


Saturday, 16 November 2019

माझे ड्रायव्हिंग प्रेम.....

माझे ड्रायव्हिंग प्रेम......

             मी 2004 साली ,अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्याने ,शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीमुळे ,बर्‍या पैकी पैसे हातात आले आणि आपल्याला ड्रायव्हिंग आले पाहिजे ,या माझ्या सुप्त इच्छेने उचल घेतली. त्या पूर्वी ,मी स्कूटर आणि मोटार सायकल चालवत होतो. पण चार चाकी चालविण्याची माझी इच्छा, अपूर्णच होती.
             ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ,स्वतःची चार चाकी असणे आवश्यक होते. मी सेकंड हॅन्ड मारूती व्हॅन विकत घेतली आणि ड्रायव्हिंगचा क्लास लावला. थोड्या दिवसात, मला कार ड्रायव्हिंग जमू लागले आणि पक्के लायसन्स ही मिळाले. पण बाहेर गावी  व्हॅन चालवत जाण्यासाठी , आवश्यक असलेला काॅन्फिडन्स , माझ्यात नव्हता. तो मला ,माझे सर्वच बाबतीतले " गुरू ", श्री. नंदकुमार अभ्यंकर यांनी मिळवून दिला आणि मी एकोणसाठाव्या वर्षी , छान गाडी चालवायला लागलो.
            मी मिरजेत आणि मुलगा चि. आदित्य , नोकरीच्या निमित्ताने नाशिकला ,अशी परिस्थिती होती. नाशिकला जायचे म्हणजे अंदाजे, 500km अंतर होते. मी पत्नी सौ. रजनीशी बोललो , तिने मला फुल सपोर्ट दिला. श्री. अभ्यंकरांशी ही बोललो , त्यांनी ही मला ग्रीन सिग्नल दिला आणि मी नाशिकला ,स्वतःच्या मारूती व्हॅनने जायचा निर्णय घेतला. पुण्यात मुक्काम करून दुसर्‍या दिवशी नाशिकला पोचलो. मिरज ते पुणे आणि पुणे ते नाशिक असे एकूण अंतर, 485 km झाले. मला उत्साह आला. नंतर नंतर वयाच्या पासष्ठीत ,एक दिवसात कोठे ही मुक्काम न करता, मी  साधारण 10 ते 11 तास ड्रायव्हिंग करून ,नाशिकला पोचू लागलो. मी सन् 2014  मध्ये  मारूती व्हॅन विकून, नवीन मारूती वॅगन आर घेतली. नाशिक मिरज आणि परत ,असा प्रवास नंतर ही बर्‍याचदा केला.
               पण  दि. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी केलेला, मिरज ते नाशिक , हाच प्रवास कायमचा लक्षात राहील असा झाला.
मिरज हून सकाळी बरोब्बर सहा वाजता निघालो आणि तासगाव , विटा , गोंदवले , दहिवडी , नातेपुते , वालचंदनगर , भिगवण , राशिन , कर्जत , अहमदनगर ,नाशिक असा प्रवास केला. हा प्रवास 492 km चा झाला. सर्व प्रवासात लागलेल्या रस्त्या पैकी ,जवळ जवळ 75 % रस्ते खराब होते. आमच्या या प्रवासाला, तेरा तास लागले. वयाच्या 74 व्या वर्षी मी तेरा तास कसे ड्रायव्हिंग केले ,माझे मलाच ठाउक ! पण मला ड्रायव्हिंग आवडत असल्याने ,थकवा अजिबात आला नाही. माझ्या सोबत गाडीत ,माझी पत्नी सौ. रजनी होती. तिला ही त्रास झाला नाही.
             माझा हा चौर्‍याहत्तराव्या वर्षी ,सलग तेरा तास ड्रायव्हिंग करण्याचा विक्रम ,तुमच्या सर्वांशी शेअर करावा असे वाटल्याने , हा लेखन प्रपंच !

Saturday, 9 November 2019

कै. चिंतामणी गोरे , गोरे मंगल कार्यालयाचे मालक , मिरज !

              आज , मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे  की , ज्यांनी प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर ,समाजात आपले अढळस्थान निर्माण केले. आज ती व्यक्ती हयात नाही , पण त्यांनी निर्माण केलेले अढळस्थान , आज ही ध्रुव तार्‍या प्रमाणे सर्वांना मार्गदर्शक ठरते आहे.
               त्या थोर व्यक्तीचे नाव आहे कै. चिंतामणी गणेश गोरे. मिरजेच्या गोरे मंगल कार्यालयाचे मालक. त्यांचे लहानपण ,अतिशय गरीबीत गेले. त्यांनी वेदविद्या संपादन केली, पण लोकांच्या घरी जाउन पूजाअर्चा करणे व दिवस कसाबसा ढकलणे हेच ,  त्या काळी , त्यांच्या नशिबी आले. वेळ प्रसंगी त्यांनी पैसे मिळविण्यासाठी, सर्व सनदशीर प्रयत्न केले .त्याचाच एक भाग म्हणून, रस्त्यावर बसून पंचांग विक्री सुध्दा केली . अशा परिस्थितीत जगण्यासाठी, आपण जन्माला आलो नाही. आपला जन्म फक्त भिक्षुकीसाठी नाही. या विचाराने ते अस्वस्थ असत. आपण कांही तरी चाकोरी बाहेरचे भव्य दिव्य करावे ,असे त्यांच्या मनात येत असे. पण मार्ग दिसत नव्हता.
                 १९५७ सालची, म्हणजे जवळ जवळ ६२ वर्षा पूर्वीची गोष्ट. त्या वेळी मंगल कार्यालयात लग्न , मुंजी इत्यादी कार्ये करण्याची प्रथा ,सांगली मिरज भागात नव्हती. पण, ती एक सामाजिक गरज होती. ती ओळखून श्री. चिंतामणी गोरे , श्री. विष्णूपंंत आठवले आणि श्री. त्र्यंबक अभ्यंकर ( काशिकर ) यांनी मिळून ,एकत्र येउन, मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील ,कृष्णेश्वराचे मंदिरात पहिले लग्न कार्य केले .अशा प्रकारे  मिरजेतील मंगल कार्यालयांची पहिली मूहूर्तमेढ रोवली गेली. त्या नंतर ,कांही कालावधीत ,तिघांनी तीन स्वतंत्र कार्यालये सुरू केली. त्या तिघांची पुढची पिढी, त्यांची त्यांची  कार्यालये ,आज उत्तम रीतीने चालवीत आहेत.
                 श्री. चिंतामणी गोरे यांचे, एक लक्षात घेण्या सारखे  वैशिष्ठ्य म्हणजे, कार्यालयाचा व्यवसाय करीत असताना , त्यांनी मोठमोठे " यज्ञयाग " ही केले. त्यात त्र५ग्वेद संहिता स्वाहाकार , पुरूषसूक्त स्वाहाकार , अतिरूद्र महायज्ञ , शतचंडी स्वाहाकार, यांचा समावेश होता . असे एकूण १२ किंवा थोडे जास्तच ,स्वाहाकार त्यांनी आपल्या गोरे मंगल कार्यालयात केले. त्या साठी, ते काशी पासून रामेश्वरा पर्यंतच्या त्र५ग्वेद , यजुर्वेद , सामवेद आणि अथर्ववेद या चार ही वेदांच्या, ज्ञानी ब्रह्मवृदांना ,मोठ्या सन्मानाने आमंत्रित करीत. या ब्रह्मवृदांची येण्या जाण्याची , राहण्याची आणि सात सात दिवस केल्या जाणार्‍या, स्वाहाकाराची व्यवस्था, श्री. चिंतामणी गोरे ,स्वतःच्या खिशातून करीत. या स्वाहाकारांचे वेळी, भरपूर अन्नदान ही होत असे. नामांकित कीर्तनकारांची कीर्तने आणि नामांकित प्रवचनकारांची प्रवचने, या कालावधीत ,गोरे मंगल कार्यालयात होत असत. एकूणच या स्वाहाकारांचे वेळी ,मिरजेतील गोरे मंगल कार्यालयात, सणाचे वातावरण असे. मिरजकरांना ही एक मोठी दुर्लभ  पर्वणीच असे.
               हे सर्व करण्या मागचा त्यांचा हेतू , ज्ञानी ब्रह्मवृदांची सेवा करणे , तसेच मिरजेतील व अाजूबाजूच्या परिसरातील लोकांना ,आपल्या वैदिक परंपरेची ओळख करून देणे , हाच होता. यात त्यांचा वैयक्तीक स्वार्थ, कोणता ही नसे.  केवळ आणि केवळ  निरपेक्ष बुध्दीनेच श्री. चिंतामणी गोरे ,हे सर्व आयोजन करीत असत . आपल्याला कष्टाने मिळालेल्या पैशातून ,अशा प्रकारे समाजाला  कांही परत देणे ,ही संकल्पना ,मला खूप खूप उदात्त वाटते.
                 मिरज आणि आजूबाजूच्या परिसराला भूषण असलेले वेदविद्या उपासक , श्री. चिंतामणी गोरे २००३ साली ,म्हणजे वयाच्या ८३ व्या वर्षी, स्वर्गवासी झाले. त्यांनी देह ठेवण्या पूर्वी , रोजच्या नियमा प्रमाणे रूद्र , श्रीसूक्त , पुरूषसूक्त यांची आवर्तने, हाॅस्पिटल मध्ये ही केली आणि मगच देह ठेवला. असा हा पुण्ण्यात्मा, स्वर्गात आल्या बद्दल स्वर्गस्थ देवतांनी ,नक्कीच त्यांचे अत्यादराने स्वागत केले असेल.
                कै. चिंतामणी गोरे यांच्या नंतर ,त्यांचा मुलगा श्री. विनोद गोरे यांनी ,आपल्या वडीलांची परंपरा, उत्तम रीत्या सांभाळली. आता त्यांचा मुलगा श्री. अनिरूध्द गोरे या कार्यालयाची आणि या वैदिक परंपरेची धुरा वाहण्यास, सज्ज झाला आहे , हा एक मोठा सुयोग आहे.
              श्री. अनिरूध्द गोरे व त्यांची पत्नी सौ. मृण्मयी, हे दोघे उच्च विद्या विभूषित आहेत. पण आपल्याला परंपरागत प्राप्त झालेला ,  उच्च आचार आणि विचारांचा हा दुर्मिळ  ठेवा जपण्यासाठी ,ते दोघे सज्ज झाले आहेत. त्यांना भरभरून शुभेच्छा !
                खाली फोटोत दिसत आहेत ते कै. चिंतामणी गोरे. त्यांना त्रिवार वंदन करतो आणि थांबतो !