आपण सर्वांनी ड्रायफ्रुट्स खाल्लेली असतीलच ! पण ड्रायफ्रुट्सचा ' लाडू ' तुम्ही खाल्ला आहे का ? नाही ना ? मग तुम्हाला श्री. विलासराव भिंगे यांच्या नाशिक मधील ' भिंगे ब्रदर्स ' या सीबीएस शेजारच्या दुकानाला आवर्जून भेट द्यावीच लागेल. तिथला ड्राय फ्रुट्सचा ' लाडू ' तुम्ही एकदा खाल्लात तर आयुष्यभर त्याची चव विसरणार नाही.
आज मी तुम्हाला या ड्रायफ्रुट्सच्या लाडूचे निर्माते आणि विक्रेते श्री. विलासराव भिंगे यांची ओळख करून देणार आहे.
श्री. विलासराव भिंगे मूळचे नाशिक जवळच्या वडनेर भैरव या गावचे ! तिथे त्यांची शेतीवाडी होती. त्यांच्या शेतात " कस्तुरी मधुरा " या जातीची अप्रतीम चविष्ट द्राक्षे पिकायची. पुढे काळाच्या ओघात शेतीतून बाहेर पडून त्यांनी नाशिकला सीबीएस शेजारी किराणा मालाचे दुकान सुरू केले व नंतर कारण परत्वे त्या दुकानाचे ' ड्राय फ्रुट्स ' च्या दुकानात रूपांतर करावे लागले. आज ही ते दुकान चालू आहे. वयोपरत्वे श्री. विलासराव भिंगेंनी त्यातून सेवानिवृत्ती घेतली आहे. आता ते दुकान त्यांचे पुतणे पाहतात.
श्री. विलासरावांची व माझी ओळख कृषीनगरच्या जाॅगिंग ट्रॅकवर झाली. ती ओळख आता गाढ स्नेहात रूपांतरीत झाली आहे.
श्री. विलासराव भिंगे म्हणजे धार्मिकवृत्तीचा माणूस ! एके काळी ते पहाटे साडेतीनला उठून अंघोळ करून , जपजाप्य , पूजापाठ करून मग सकाळी साडेसहाचे सुमारास ट्रॅकवर फिरायला यायचे. रोज ठराविक जप करणे , विष्णूसहस्त्रनामाची आवर्तने करणे व दुर्गा सप्तशती पाठ वाचणे हे सर्व ते अत्यंत श्रध्देने करीत असत. त्या मुळे आम्ही आमच्या ' निरामय जाॅगर्स ' या सकाळच्या ग्रुपमध्ये त्यांना ' शास्त्रीबुवा ' म्हणतो. धार्मिक बाबतीतील सर्व शंकांचे निरसन ' शास्त्रीबुवा ' बिनचूक करीत असतात. आमच्या ग्रुपची ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
श्री.विलासरावांचे व्यक्तीमत्व अतिशय साधे आहे. मध्यम उंची , सात्विक सावळा रंग , पांढरटपणाकडे झुकलेले केस , पोशाख नीटनेटका , डोळ्यावर साजेलसा चष्मा असे ते एकूणच सात्विक व्यक्तीमत्वाचे आहेत. ते ट्रॅकवर शक्यतो एकटे फिरत नाहीत. श्री. विलासरांच्या बरोबर त्यांचे शाळे पासूनचे मित्र श्री. विलासराव औरंगाबादकर किंवा श्री. रामभाऊ जोशी असणारच ! श्री. विलासराव उगीचच कोणत्या ही वादात पडणार नाहीत. ते एकदम साधे व सरळ असे सदगृहस्थ आहेत.
वयोपरत्वे श्री. विलासराव आता अगदी पहाटे न उठता , सूर्योदयापूर्वी उठतात .रोजचे ठराविक फिरणे न चुकता करतात. थोडक्यात त्यांचे जीवन शिस्तबद्ध आहे.
श्री. विलासरावांना दोन कन्यका आहेत.दोघींचे विवाह झाले आहेत. एक दुबईला व दुसरी अमेरिकेत असते. दोघी आपापल्या जागी सुस्थितीत आहेत. कारण परत्वे श्री. विलासराव व सौ. वहिनी दुबईला व अमेरिकेला जात असतात. इतर वेळी ते दोघेच नाशिकमध्ये असतात. दोघे अतिशय आनंदात व समाधानात असतात. सौ. वहिनींची श्री. विलासरावांना समर्थ साथ आहे , हे पण महत्वाचे आहेच !
अशा धार्मिक व सात्विक वृत्तीच्या श्री. विलासराव भिंगे व सौ. भिंगे वहिनींना उत्तम निरामय , आनंदी , सुखी , समाधानी असे उर्वरित आयुष्य लाभो ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो व थांबतो.
No comments:
Post a Comment