Saturday, 12 June 2021

एका जावयाची गोष्ट...

 एका जावयाची गोष्ट..

****************

गोष्ट बरीच जुनी म्हणजे साधारण १९६० ते १९६५ सालची असावी. मिरजेच्या आमच्या वाड्यात एक भाडेकरू रहायचे. आम्ही त्यांना काका व काकू म्हणत असू. त्यांच्या जावयाची ही गोष्ट आहे. 

          मी वर सांगीतलेल्या काळी सर्वसाधारण घरात पैशांची चणचणच असायची. कुठला ही प्रवास करायचा म्हटलं की तो रेल्वेच्या " थर्ड क्लासच्या डब्यातून "च असायचा ! त्या वेळी रेल्वेत थर्ड क्लास , सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास असे तीन प्रकारचे डबे असत. सर्व साधारण जनता थर्ड क्लासने प्रवास करायची. जरा बरी आर्थिक परिस्थिती असणारे सेकंड क्लास व फर्स्ट क्लास मधून प्रवास करणारे सामान्यांना माहितीच नसायचे. 

        आमच्या या काका काकूंच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले होते. जावई दिवाळसणाला येणार होते. ते अतिश्रीमंत असल्याने रेल्वेने व फर्स्ट क्लासने येणार होते. काका काकूंचा जावई रेल्वेच्या फर्स्ट क्लासने येणार असल्याची बातमी वाड्यात वार्‍या सारखी पसरली होती. वाड्यातल्या कुणी ही फर्स्ट क्लासने प्रवास केलेला माणूस पाहिला नसल्याने प्रत्येकाच्या मनात या जावया बद्दल जबरदस्त आकर्षण होते. त्या जावयाचे दर्शन म्हणजे प्रत्येकाची " अजी मी ब्रह्म पाहिले " अशी अवस्था होणार होती. काका काकूंनी आपल्या जावयाची अशी कांही तारीफ करून ठेवलेली होती कीं प्रत्येकाला हे जावई बापू  प्रत्यक्ष परमेश्वरा सारखेच म्हणजे डोक्यावर किरीट , चेहर्‍या भोवती पसरलेली अभा , चतुर्भूज , गरूडावरून येणारे भगवान विष्णू सारखे  असतील अशी कल्पना झालेली होती. 

             अखेर दिवाळी आली. पाडव्याच्या दिवशी सकाळी आमचे जावई बापू रेल्वेने फर्स्ट क्लासने सकाळी उजाडता येणार असल्याची व्दाही काका काकूंनी फिरविलेली होती. 

            दिवाळीच्या पाडव्या दिवशी अख्खा वाडा लवकर उठून अंघोळ करून दरवाज्याकडे डोळे लाउन बसला होता. रेल्वेच्या फर्स्ट क्लासने येणारे श्रीमंत जावई पाहण्याची सर्वांना फार उत्सुकता होती. घड्याळाचे काटे जसजसे पुढे सरकत होते तशी सगळ्यांची उत्सुकता ताणली जात होती.

            एवढ्यात दरवाज्या समोर टांगा थांबल्याचा आवाज आला. टांग्यातून एक उभ्या पट्ट्यापट्ट्यांची विजार आणि बनियन घातलेला इसम हातात वातीचा स्टोव्ह घेउन उतरला व काका काकूंची चौकशी करू लागला. हा कोण फाटका माणूस उपटला आता या वेळी असे सर्वांना वाटले. तेवढ्यात काका काकू पुढे झाले आणि आश्चर्याने " या या जावई बापू , तुमचे सामान कुठे आहे आणि तुम्ही या असल्या वेषात कसे ? " असे त्यांना विचारू लागले. तो माणूस त्यांना म्हणाला " ते मी नंतर सांगतो , आधी टांगेवाल्याचे भाड्याचे पैसे द्या ". काकांनी पाकीट आणून टांगेवाल्याचे पैसे दिले . अख्या वाड्याची निराशा झाली. फर्स्ट क्लासवाला जावई  असा फाटका कसा , याचे सर्वांना आश्चर्य वाटत असतानाच खरी बातमी समजली ती अशी !

           ते जावई फर्स्ट क्लासनं येत असतानाच रेल्वेत त्यांनी झोपण्यापूर्वी आपले टिपटाॅप असलेले कपडे काढून हॅंगरला लावून ठेवले. मध्यरात्री कधीतरी चोराने त्यांची बॅग व कपडे सर्व चोरून नेले. त्यावेळी वातीचा स्टोव्ह नवीन निघाला होता. तो आपल्या सासूरवाडीला भेट देण्यासाठी त्यांनी खरेदी करून आणला होता तो मात्र चोराने नेला नाही. त्या मुळे हे जावई सकाळी सकाळी अंगात बनियन व उभ्या पट्ट्यापट्ट्यांची विजार घालून हातात वातीचा स्टोव्ह हातात घेउन दिवाळसणासाठी पहिल्यांदा सासूरवाडीच्या दारात आले . त्यांचा तो अवतार पाहून वाड्यातल्या सर्वांची रेल्वेच्या  फर्स्ट क्लास मधून येणार्‍या श्रीमंत जावयाला पाहण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

               त्या नंतर काका काकूंनी आपल्या त्या जावया बद्दल कधी ही एक चकार शब्द काढला नाही. जावयाची व त्यांची दोघांची अशा प्रकारे फजिती झाली होती. आज ही वाड्यातल्या कुणाला ही , या आठवणीने जोरदार हसू फुटल्या शिवाय रहात नाही.

No comments:

Post a Comment