Wednesday, 25 March 2020

श्री. रामभाऊ कुलकर्णी , कारदगेकर ....व्याही...

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, त्यांचे नाव आहे, श्री. रामचंद्र लिंगो कुलकर्णी , कारदगेकर ! माझ्या मुलीचे सासरे ! आम्ही त्यांना रामभाऊ म्हणतो.
           महाराष्ट्र शासनाच्या , वन विभागातून १९९७ साली ते सेवा निवृत्त झाले. नोकरीच्या काळात ,त्यांनी आपली नोकरी अतिशय प्रामाणिकपणे केली. पगारा व्यतिरिक्तच्या  पैशाला अजिबात हात लावला नाही. त्यांच्या या निरपेक्षवृत्ती मुळे, आज ही त्यांना, त्या काळी त्यांचे असलेले सहकारी आणि अधिकारी नावाजतात.
            आज काल शेती असलेले, आणि स्वतः कसणारे ,ब्राह्मण खूप कमी आहेत. श्री. रामभाऊ आणि त्यांच्या पत्नी सौ. लिलाताई यांनी ,वडीलोपार्जित मिळालेली शेती, अखबंद जशीच्या तशी राखली आहे. मला वाटतं १९५५ /५६ साली केंव्हा तरी ,महाराष्ट्रात कूळ कायदा लागू झाला. त्या वेळी श्री. रामभाऊंनी ,आपल्या कूळा बरोबर तडजोड करून ,आपली शेती राखली , यात त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
            श्री. रामभाऊ फणसा सारखे आहेत. ते स्पष्टवक्ते आहेत. पण त्या स्पष्टवक्तेपणा मागे, समोरच्याच्या बद्दल ,त्यांच्या मनात वसत असलेला जिव्हाळा आणि आपुलकी ,ज्याला दिसते किंवा जाणवते , त्याला त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधीच खटकत नाही.
           श्री. रामभाऊंच्यात स्टेज डेअरिंग जबरदस्त आहे. मोठ्या मोठ्या समुदाया समोर ,त्यांना अचानक कुणी बोलायला सांगीतले , तर ते अस्खलितपणे अर्धा पाउण तास सहजपणे , आपले विचार सुसंगतपणे मांडू शकतील.
           श्री. रामभाऊंनी कांही काळ, पत्रकारिता ही केलेली आहे. पत्रकारिता करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. पण ती त्यांनी यशस्वीपणे केली , ही आगळी वेगळी गोष्ट आहे.
           श्री. रामभाऊंची दिलदारवृत्ती आहे. आपल्या शेतात एखादी गोष्ट भरपूर पिकली, तर ती आपल्या नातेवाईकांना ते आवर्जून ,स्वतः नेउन ,आनंदाने देत असत.  आपल्याकडे जे विपुल आहे ,ते दुसर्‍यांना देण्यात, त्यांनी कधी ही हयगय केली नाही.
             श्री. रामभाऊ म्हणजे कष्टाळू माणूस ! शेती करताना, ते कष्टाला कधी ही मागे हटले नाहीत. शेतीत कामासाठी लावलेले गडी, व्यवस्थित काम करतात की नाही , कोणत्या कामाला किती वेळ लागतो , याचे गणित स्वतः  ते काम करून ,त्यांनी  ठरविलेले असल्याने , काम करणार्‍या गड्यांच्या गमजा ,त्यांच्या समोर कधी ही चालल्या नाहीत. या बाबतीत त्यांचा रोखठोक व्यवहार असे. श्री समर्थ रामदास स्वामी " दासबोध " ग्रंथात म्हणतात त्या प्रमाणे , माणसाने प्रत्येक व्यवहार चतुरपणे करावा. असा चतुरस्त्रपणा, श्री. रामभाऊंच्या व्यक्तीमत्वात ,जन्मजातच आहे.
        मध्यंतरी श्री. रामभाऊ बरेच आजारी होते. त्या आजारातून ते उठतील किंवा कसे, असे वाटत होते. पण सकारात्मक विचार आणि जगण्याची जबरदस्त जिद्द बाळगून  त्यांनी, त्या आजारावर मात केली व आज वयाच्या ८१ व्या वर्षी ,ते उत्तम निरामय आयुष्य व्यतीत करीत आहेत.
       श्री. रामभाऊंना दोन मुले. थोरले चिरंजीव अभियंता आहेत व धाकटे चिरंजीव म्हणजे माझे जावई नामांकित वकील आहेत. दोन्ही मुले , सुना , नातवंडे आणि त्यांच्या पत्नी सौ. लिलाताई ,सर्वजण आज ही त्यांच्या आज्ञेत आहेत , ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
          अशा या माझ्या व्याह्यांना म्हणजे श्री. रामभाऊंना, पुढील उत्तम आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.

Friday, 28 February 2020

डाॅ. मिलिंद शहा...." श्रावण बाळ "

आज मी तुम्हाला ,डाॅ. मिलिंद शहा, यांची ओळख करून देणार आहे. तुम्हाला वाटेल की ,त्यांच्या औषधपाण्याने मला किंवा आमच्या घरातील कुणाला, खूप चांगला गूण आला असेल , म्हणून मी त्यांची ओळख करून देतोय. पण तसं मुळीच नाहीय.
               नाशिक मधील ,आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील, श्री. नवनीतभाई यांचे ते थोरले चिरंजीव ! डाॅ. मिलिंद , M.S. ( General Surgen ) आहेत. ते नाशिकच्या अपोलो हाॅस्पिटल मध्ये, जनरल सर्जन या नात्याने, कार्यरत आहेत. त्यांचे दिवसभराचे शेड्यूल, अतिशय बिझी असते. डाॅ. मिलिंद यांचे आजचे वय आहे ५८ वर्षे. ते स्वतःच्या फिटनेस बाबत ,अतिशय जागरूक आहेत. वयाच्या ५८ व्या वर्षीही ते ,४२ किमी ची मॅरॅथाॅन पळू शकतात. दर रविवारी किंवा आपल्या कामाचा व्याप सांभाळून ते , इतर दिवशी ही शक्य असल्यास , किमान १० ते २०  किमी धावतात. त्यांच्या बरोबर त्या वेळी ,त्यांच्या  पत्नी डाॅ. सौ. संगीता ,या सुध्दा  असतात. मॅरॅथाॅन कशी पूर्ण करावी ,याचा  शास्त्रोक्त अभ्यास डाॅ. मिलींद यांनी केला आहे. या बाबतीतली असंख्य पुस्तके विकत घेउन, त्यांनी स्वतःच्या संग्रही ठेवलेली आहेत. भारतात कुठे ही मॅरॅथाॅन असली तर ,शक्यतो आपला कामाचा व्याप सांभाळून, शक्य असल्यास , ते त्यात आवर्जून भाग घेतातच !
             आणखीन एक त्यांचा विशेष गूण म्हणजे , ते मातृपितृ भक्त आहेत. त्यांचे वडील म्हणजे आमचे श्री. नवनीतभाई , यांचे आजचे वय आहे ८७ वर्षे आणि त्यांच्या पत्नीचे वय असेल साधारण ८२ किंवा ८३ वर्षे. श्री. नवनीतभाईंची तब्बेत उत्तम आहे , पण त्यांच्या पत्नीला कंपवाताचा त्रास आहे. त्या कुठे बाहेर जाउ शकत नाहीत. आपल्या आई वडीलांची या वयाची गरज ओळखून, डाॅ. मिलिंद ,आपल्या आई वडीलांना आपला सहवास आवर्जून देतात. आजच्या काळात मुले बिझी असतात , त्यांना आपल्या आई वडीलांना द्यायला वेळ असतोच असे नाही. काळा नुसार ते योग्य ही असेल. पण डाॅ. मिलिंद सकाळी अपोलो हाॅस्पिटलला जाण्या पूर्वी, अावर्जून आपल्या आई वडीलांच्या जवळ बसून ,थोडा वेळ त्यांची चौकशी करतात. उशीरा संध्याकाळी हाॅस्पिटल मधून आल्यावर प्रथम, आपल्या आई वडीलांच्या खोलीत जातात , त्यांच्याशी दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टींची चौकशी करतात व मगच आपल्या खोलीत जातात. रात्री उशीरा ,जेवण झाल्यावर , परत ते आई वडीलांच्या खोलीत येतात , आई वडीलांच्या जवळ बसून , आईचे हात पाय दाबून देतात , प्रेमाने त्यांची चौकशी करून गप्पा मारून मगच आपल्या खोलीत झोपायला जातात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम आहे. कधी तरी पेशंट्सची गर्दी असेल किंवा जास्त आॅपरेन्स असतील तर, यात थोडाफार बदल होतो , अन्यथा यात बदल होत नाही. डाॅ. मिलिंद यांची पत्नी डाॅ. सौ. संगीता यांची ही, डाॅ. मिलिंद यांना संपूर्ण साथ आहे. हे आजच्या काळात दुर्मिळातले दुर्मिळ दृष्य आहे.
           डाॅ. मिलिंद यांची बहीण डाॅ. सौ. श्रध्दा या ही आपल्या भावा प्रमाणेच आहेत. त्या ही नाशिकमध्येच असतात. डाॅ. मिलिंद यांना एक भाउ आहे . तो नोकरी व्यवसाच्या निमित्ताने दिल्लीला असतो.
            डाॅ. मिलींद म्हणजे आजच्या काळातील " श्रावण बाळ " च !
खाली फोटोत दिसत आहेत ते म्हणजे डावीकडून पहिले श्री. नवनीतभाई , मध्ये दिसतात त्या त्यांच्या पत्नी आणि " डाॅ. मिलींद " !

Sunday, 16 February 2020

नांदूर मधमेश्वर , पक्षी अभयारण्य.....

" नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य "
****************************

        दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी मी , नाशिक मधल्या  आमच्या  सकाळच्या फिरायच्या ग्रुपसह " नांदूर मधमेश्वर " येथील ,पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी गेलो होतो. हे पक्षी अभयारण्य, नाशिक पासून अंदाजे ४० किमी अंतरावर आहे. पक्षी दर्शनासाठी सर्वसाधारणपणे १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेर , हा उत्तम कालावधी असतो .आम्ही गेलो त्या वेळी ,आमच्या बरोबर पक्षी तज्ज्ञ श्री. आगाशे आणि श्री. शशिकांत गुडसूरकर सर असल्याने, खूपच नवीन माहिती समजली.
                महाराष्ट्रात भरपूर धरणे आहेत, पण मग नांदूर मधमेश्वर धरणा जवळच ,पक्षी अभयारण्य का व कसे झाले ? इतर धरणांच्या जवळ ,कसे झाले नाही ? असा एक सहज सुलभ प्रश्न होता. त्याला श्री. आगाशे यांनी, समर्पक उत्तर दिले. नाशिकच्या गंगापूर धरणातले पाणी , नांदूर मधमेश्वर धरणात येते व इथून ते शेतीवाडीला दिले जाते. थोडक्यात गंगापूर धरणाचे पाणी वाटप ,येथून होते. याचाच अर्थ असा की , नांदूर मधमेश्वर धरणातले  पाणी कमी झाले की, गंगापूर धरणातून सोडले जाते. पाण्याची पातळी वर्षभर कमी जास्ती , कमी जास्ती होत असल्याने ,नांदूर मधमेश्वर येथे दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे. या दलदलीत पक्ष्यांचे भक्ष्य असलेले किडे , कीटक इत्यादींची वाढ होते व त्या खाद्य आकर्षणाने ,पक्षी येथे येतात. इतर धरणात, पावसाळ्यात पाणी भरते व वर्षभर हळू हळू ते कमी होते , त्या मुळे दलदलीचा प्रदेश निर्माण होत नाही , सबब तेथे पक्षी खाद्य नसल्याने पक्षी अभयारण्य निर्माण होत नाही.
                 या अभयारण्यात  राजस्थान , तिबेट , हिमालयीन प्रदेश ,इतकेच कशाला युरोप , रशिया येथून ही पक्षी येतात. हजारो किलोमीटरचा प्रवास ते करतात. गरजे नुसार , पक्षी दिवसाला तीन हजार किलोमीटर अंतर, सलग न थांबता ही प्रवास करतात. हे कसे शक्य होते ? या प्रश्नाचे उत्तर श्री. आगाशे यांनी खूप छान सांगीतले. ते म्हणाले... पक्षी इंग्रजी व्ही ( V ) या आकारात प्रवास करतात. त्या मुळे एनर्जी कमी लागते.  ( आपण लढाउ विमाने ही V आकारात जाताना पाहिली आहेत )तसेच पक्ष्यांना वार्‍याच्या प्रवाहांचा अंदाज लग्गेच येतो . वार्‍याचा स्पीड , वार्‍याची दिशा यांच्या सुसंगत ,पंखांची फडफड न करता केवळ पंख पसरून , पंखांना ठराविक कोन देउन , कमित कमी एनर्जी खर्च करून ,ते जास्तीत जास्त अंतर कापू शकतात.
                पक्षी विश्रांती घेण्यासाठी  झोपतात कसे ? या प्रश्नाला श्री.आगाशे म्हणाले....माणसे अंग टाकून झोपतात तसे पक्ष्यांचे कधीच नसते. जमिनीवर वावरणारे कोंबडी सारखे कांही पक्षी, बसून विश्रांती घेतात ,पण पाणस्थळी वावरणारे पक्षी ,उभ्या उभ्या विश्रांती घेतात. या विश्रांतीचे वेळी एक पाय ताठ ,तर दुसरा किंचित दुमडलेला असतो. नंतर दुसरा पाय ताठ व पहिला किंचित दुमडलेला ,अशा प्रकारे पाया वरील ताण कमी जास्त करून , पक्षी विश्रांती घेतात.
           कांही वेळेस असं घडतं की, एखाद्या वर्षी अपेक्षे एवढे पक्षी इकडे येतच नाहीत , असं का होतं ? या प्रश्नाचे उत्तर श्री. गुडसूरकर सरांनी फार छान सांगीतलं. ते म्हणाले....सगळा पक्ष्यांचा थवा ,एकदम इकडे आला व इकडची परिस्थिती बरी नाही ,म्हणून परत गेला असे होत नाही. पक्षी थव्याने येण्या पूर्वी ,त्यांचे एक दोन दूत प्रथम इकडे येतात .परिस्थितीची , हवामानाची अनुकूलता पाहणी करतात. परिस्थिती अनुकूल असेल , तर परत जाउन सांगतात व मगच पक्ष्यांचा थवा तिकडून इकडे यायला निघतो.
              पक्षी, हवामानाच्या सोयी नुसार इकडून तिकडे , तिकडून आणखी दुसरीकडे , फिरत असतात. मग त्यांचे मूळ स्थान कोणते हे कसे ठरविले जाते ? या प्रश्नाचे उत्तर ,श्री. आगाशे यांनी छान सांगीतले. ते म्हणाले , पक्षी जिथे अंडी घालतात , तो प्रदेश त्यांचा मूळ प्रदेश मानला जातो.
               मानव जातीत , पुरूषांच्या मानाने , स्त्रिया सुंदर व आकर्षक असतात. या बाबतीत  पक्ष्यांचे वेगळेपण म्हणजे , नर पक्षी हा मादी पेक्षा तेजस्वी आणि देखणा असतो. मादी नराच्या मानाने कमी तेजस्वी आणि कमी देखणी असते.
             सर्व साधारण कल्पनेपेक्षा, हे पक्ष्यांचे हे जग व माहिती नक्कीच विस्मयकारक आहे.
               आम्ही नांदूर मधमेश्वर अभयारण्यात गेलो , त्या वेळी आकाश अभ्राच्छादित असल्याने , सूर्य प्रकाश नव्हता . त्या मुळे उत्तम प्रकारची दुर्बिण, आमच्या गाईडकडे असून ही,  मनाला समाधान देणारे पक्षी दर्शन आम्हाला झाले नाही.
             नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात, माहितीप्रद बोर्ड लावलेले आहेत. त्या मुळे पक्षांची सर्व माहिती , उत्तम प्रकारे मिळते.
           नांदूर मधमेश्वर येथे घेतलेला आमचा ग्रुप फोटो.


Wednesday, 29 January 2020

क्लासच्या मुलांचा निर्भेळ आनंद.....

             गेली तीन वर्षे , मी रोज संध्याकाळी एका क्लास मध्ये शिकवायला जातो . आमच्या क्लास मध्ये बहुतेक मुले ,महापालिकेच्या शाळेतील असतात. ज्यांना प्रायव्हेट क्लास परवडत नाहीत , अशी मुले या क्लास मध्ये येतात. त्यांना क्लासची " फी " नसते. मोफत शिकविले जाते.
            कांही मुले किंवा मुली घर लांब असल्याने, शाळा सुटल्यावर सरळ क्लास मध्ये येतात व क्लास संपल्यावरच ,म्हणजे संध्याकाळी साधारण सव्वासात नंतर, घरी जातात. घर लांब असल्याने त्यांना घरी चालत जायला ही ,बराच वेळ लागतो.
           विद्यार्थ्यांच्या या अडचणी वर उपाय म्हणून आम्ही ,नाशिक मधील आमच्या ओळखीच्या लोकांना, आवाहन करतो की , ज्यांच्याकडे जुन्या ,वापरात नसलेल्या सायकली पडून आहेत , त्यांनी त्या जशा आहेत तशाच, आम्हाला द्याव्यात. आम्ही त्यांच्या घरातून त्या उचलून आणतो , त्या दुरूस्त करतो आणि गरजू मुलांना वापरण्यासाठी देतो. दुरूस्तीचा खर्च मुलांना द्यावा लागत नाही . अशी सायकल आपल्याला वापरायला मिळाली की , त्या मुलांच्या चेहर्‍या वरचा आनंद , पाहण्या सारखा असतो.
             खाली प्रातिनिधिक अशा , एका मुलांचे सायकल मिळाल्यावर झालेला आनंद, दर्शविणारा फोटो आहे. हा आनंद आम्हा सर्व शिक्षकांना भरभरून मिळतो. अशा निरपेक्ष आणि निर्भेळ आनंदाची तूलनाच होउ शकत नाही......


Tuesday, 14 January 2020

सहजीवनाची ७२ वर्षे....सौ. वेणूताई व श्री. अनंतराव जोशी..

*  सहजीवनाची ७२ वर्षे.....  *
********************
               आज मी तुम्हाला, अशा जोडप्याची ओळख करून देणार आहे की, ज्यांच्या लग्नाला ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी तीन वर्षांनी त्यांच्या लग्नाला ७५ वर्षे पूर्ण होतील. लग्नाला २५ वर्षे झाली की " रौप्य महोत्सव " होतो. ५० वर्षे झाली की " सुवर्ण महोत्सव" होतो . ६० वर्षे झाली की " हिरक महोत्सव " होतो आणि ७५ वर्षे झाली की " अमृत महोत्सव " होतो. थोडक्यात आणखी तीन वर्षांनी ,त्यांच्या लग्नाचा " अमृत महोत्सव " होणार आहे. हा एक दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे , असे मला वाटते. लग्ना नंतर ७२ वर्षे एकमेकाची साथ संगत मिळायला, परमेश्वराची कृपाच पाहिजे. अशी कृपा ज्यांच्यावर झालेली आहे, असे जोडपे म्हणजे, श्री. अनंतराव जोशी , वय वर्षे ९२ आणि सौ. वेणूताई जोशी , वय वर्षे ८९.
                श्री. अनंतराव जोशी ९२ वर्षांचे असले तरी, आज ही ,आपली कामे आपण स्वतः करतात. स्वतःचे कपडे स्वतः धुतात. रोजच्या कामांच्यासाठी ,त्यांना कोणाची ही मदत लागत नाही. सौ. वेणूताई जोशी , या ही ८९ वर्षांच्या असल्या तरी ,आपली रोजची कामे स्वतः करू शकतात. थोडक्यात या वयात, अशी स्वयंपूर्णता असणे ,हे  भाग्याचेच लक्षण नाही
 का ?
                 वयोपरत्वे ,दोघे घराच्या बाहेर सहसा पडत नाहीत. घरातल्या घरात हिंडून फिरून, व्यवस्थित असतात. त्यांच्या वयाचा विचार करता ,थोडेफार औषधपाणी घ्यावे लागते .  ते दोघे औषधे बिनचूकपणे घेतात व आपला बोजा कुणावर ही पडू नये, या दृष्टीने आपला दिनक्रम आखतात.
ते सध्या सांगलीला , विश्रामबाग , येथे मुला जवळ राहतात. घरातील सर्वजण ,त्यांची योग्य ती काळजी निश्चितच घेतात.
                 ७२ वर्षा पूर्वीचा त्यांचा प्रेमविवाह आहे , ही पण , त्या काळचा विचार करता , आगळी वेगळी गोष्ट आहे. श्री. अनंतराव हे कोकणस्थ ब्राह्मण आणि वेणूताई या देशस्थ ब्राह्मण ! त्या काळी प्रेमविवाह, शिवाय त्यात देशस्थ कोकणस्थ विवाह ,म्हणजे अब्रम्हण्यम् ! त्या दोघांना त्या साठी , आपण कल्पना ही करू शकणार नाही  असा , भरपूर त्रास सहन करावा लागला. दोघांनी एक दिलाने, मोठ्या कष्टाने, धाडसाने ,अक्षरशः शून्यातून आपले विश्व उभे केले आणि संसार यशस्वी करून दाखविला. त्या बद्दल त्या दोघांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.
                  आज मागे वळून पाहताना ,त्या दोघांना आपले प्रेम आणि वैवाहिक जीवन ,कृतकृत्य झाल्याचे समाधान नक्कीच असेल , यात मला तरी शंका वाटत नाही. पण त्या साठी त्या दोघांनी दिलेली " झुंज " ,आपणा कोणाला ही दिसणार नाही किंवा जाणवणार नाही. ती त्या दोघांनाच माहिती आहे.
               श्री. अनंतराव व सौ. वेणूताई या दोघांना दोन मुले. ते दोघे मुला सोबतच राहतात . मुलगी इचलकरंजीला असते. दोन्ही मुले आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत.
                श्री. अनंतराव व सौ. वेणूताई यांना उत्तम आणि निरामय दीर्घायुष्यासाठी ,भरभरून शुभेच्छा ! तसेच त्यांच्या लग्नाचा " शतक महोत्सव " साजरा  व्हावा  , ही सदिच्छा देतो आणि थांबतो.
                खाली फोटोत  माझ्या शेजारी खुर्चीत बसलेले दोघे दिसत आहेत ते श्री. अनंतराव जोशी आणि सौ. वेणूताई जोशी.

Saturday, 28 December 2019

श्री. दिलीप आपटे ...एक निरपेक्ष समाजोध्दारक....

             आज मी तुम्हाला ,एका वेगळ्याच व्यक्तीची ओळख करून देणार आहे ! त्यांचे नाव आहे श्री. दिलीप आपटे. त्यांना कोणी आदरणीय आपटे सर , आदरणीय आपटे गुरूजी, या नावाने ही ओळखतात . मी त्यांना लहानपणा पासून ओळखतो. मिरज शहरात आम्ही एकाच गल्लीत रहात होतो. पायाने अधू असलेला पण  तल्लख बुध्दीमत्तेचा दिलीप सर्वांनाच माहिती होता. शैक्षणिक करीयर अतिशय उत्तम ! सांगली बॅंकेत उच्च पदावर नोकरी ! घरी पत्नी आणि दोन मुले ! सर्व ऐहिक सुखांचा लाभ घेत, संसार उत्तम चाललेला ! अचानक चेन्नईला बदली झाली. तिथले वातावरण आणि एकूणच, बॅंकेतल्या नोकरीचा कंटाळा आणि वीट आल्याने ,त्यांनी नोकरीचा राजिनामा दिला आणि  मिरज गाठले.
              पूर्वी संस्कृतचा व्यासंग होताच ! त्यांनी श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीमद् भागवताचा अभ्यास सुरू केला. उत्तम बुध्दीमत्ता असल्याने, त्यातील  गुह्यतम ज्ञान अगदी थोड्या कालावधीतच त्यांनी आत्मसात केले.  तसेच त्या अनुषंगाने वेद , उपनिषदे आणि इतर अध्यात्मिक ग्रंथ यातील ही ज्ञान, त्यांनी  अल्पावधीतच ग्रहण  केले . त्या नंतर ते स्वतः श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीमद् भागवतावर प्रवचन देउ लागले. त्यांच्या सुश्राव्य आणि ओघवत्या भाषेतील प्रवचनाने ,श्रोतृगण मंत्रमुग्ध होउ लागला. महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर ही, त्यांची प्रवचने होउ लागली. पण प्रकृति साथ देईना , तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या .
             त्यातच त्यांनी मिरजेत " गीता फाउंडेशनची " स्थापना केली त्या फाउंडेशन तर्फे, " प्राजक्त " हे अध्यात्मिक पाक्षिक सुरू केले. त्यात तरूणांनी, आपले कर्तव्य कर्म चोख पार पाडावे ,पण त्याच बरोबर ,आपल्या समृृृृृृृध्द भारतीय तत्वज्ञानात्मक अध्यात्माचा अभ्यास ही करावा ,अशा आशयाचे लेख  त्यांनी स्वतः लिहीले आणि आज ही लिहीत आहेत . स्वतःच्या गीता प्रवचनांचे पुस्तक , त्यांनी लिहून प्रसिध्द केले आहे. श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीसमर्थांच्या दासबोधाच्या जशा परिक्षा असतात ,तशा श्रीमद् भागवताच्या परिक्षा घेण्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली , तो उपक्रम ही सध्या, गीता फाउंडेशन मार्फत हाती घेण्यात आलेला आहे.
               मध्यंतरी मिरजेतच ,महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील अप्रगत मुलांच्यासाठी ,त्यांनी वर्ग घेतले. या वर्गांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच गीता फाउंडेशन मार्फत , हुषार पण परिस्थितीने शिकू न शकणार्‍या विद्यार्थ्यांना, आर्थिक मदत दिली जाते. हा उपक्रम ही उत्तमपणे आणि अव्याहत चालू आहे. या उपक्रमा मार्फत शिक्षण घेउन ,कांही विद्यार्थी डाॅक्टर , इंजिनीयर आणि वकील ही झालेले आहेत , होत आहेत .
          विश्व शांती साठी , " विष्णूसहस्त्रनामाची " बारा कोटी आवर्तने, सामुहिक रीत्या  करण्याचा संकल्प, त्यांनी सध्या सोडला आहे. या उपक्रमात माझ्या माहिती प्रमाणे, भारतातून आणि देशविदेशातून ,किमान वीस ते पंचवीस हजार श्रध्दाळू भक्तगण, सामील आहेत. नाशिक मध्येच किमान दहा ते पंधरा मंडळे वेगवेगळ्या मंदिरात किंवा घरात " विष्णूसहस्त्रनामाची " आवर्तने करीत असतात. या उपक्रमासाठी श्री. आपटे सरांनी ,स्वतंत्र वेबसाईट डिझाईन करून घेतली आहे.
             समाजाच्या उत्थानासाठी, एक माणूस काय काय करू शकतो , याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून श्री. आपटे सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल !
             श्री. आपटे सर हे अत्यंत साधेपणाने राहतात. ते समाज उत्थानासाठी एवढी कामे करतात, पण  या कामांच्या  मुळे निर्माण होऊ शकणार्‍या ,  अभिमानाचा  किंवा अहंकाराचा लवलेश , त्यांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला कधी ही ,दिसणार नाही.
             फोटोत दिसत आहेत ते श्री. दिलीप आपटे सर ! समाजोत्थानासाठी निरपेक्षपणे झटणार्‍या ,अशा या आदरणीय व्यक्तीमत्वाला शतशत प्रणाम !

Wednesday, 18 December 2019

डाॅ. शरद व सौ. सरोज म्हसकर....एक १००%अनुरूप जोडी....

           आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , ती अशा दांपत्याची की, ते दोघे ही उत्कृष्ठ चित्रकार आहेत , दोघे ही साहित्यिक आहेत , संगीत रसिकाग्रणी आहेत. परमेश्वर अशी जोडी, फार क्वचितच जमवतो. सर्व साधारणपणे ,जोडीतील नवरा बायको एकमेकांना पूरक असतात. पण एकमेकांची Mirror image असलेली जोडपी पहायला मिळणे ,हा भाग्य योगच म्हणायला हरकत नाही.
              मी या बाबतीत नक्कीच भाग्यवान आहे. माझ्या माहितीतील डाॅ. शरद म्हसकर आणि सौ. सरोज म्हसकर  हे जोडपे असेच " एकमेकांचे प्रतिबिंब " असलेले एक दुर्मिळ असे जोडपे आहे.
               दोघांना ही, चित्रकलेची अतोनात आवड आणि जाण आहे.  स्वतःच्या बंगल्यात त्यांच्या दोघांच्या, चित्रे काढण्याच्या दोन स्वतंत्र खोल्या आहेत. सकाळचे सगळे अन्हिक आवरले की, साधारण अकराच्या सुमारास दोघेही आपापल्या खोलीत जाउन, वेगवेगळ्या विषया वरची सुंदर रंगसंती असलेली , पाहणार्‍याला नक्कीच आनंद देतील अशी चित्रे काढून, ते स्वतः ही आनंद मिळवतात. त्यांची चित्रे त्या क्षणी स्वानंदासाठीच असतात. दोघे ही एकमेकांची चित्रे पाहून मनमुराद आनंद लुटतात. मी दोघांची ही चित्रे पाहिली आहेत. खूपच छान आणि  उत्तम चित्रांचा खजिना पाहिल्याचे समाधान ,मला निश्चितच मिळाले. त्या दोघांचे लग्न ही चित्रकलेच्या प्रेमापोटीच जमले आहे. डाॅक्टर शरद यांनी , साखरपुड्याच्या दिवशी आपल्या होणार्‍या भावी पत्नीला म्हणजे रोझा यांना ,( त्यांचे माहेरचे लाडके नाव रोझा आहे ) , सोन्याच्या अंगठी सह , एक उत्तम चित्रच भेट दिले. अशी ही आगळी वेगळी भेट ,त्यांना ही मनस्वी आवडली . हा एक वेगळा सुयोग आहे.
                  दोघांना संगीतामध्ये, जबरदस्त इंटरेस्ट आहे. जुन्या हिंदी गाण्यांचे, ते दोघे ही अक्षरशः वेडे आहेत . पूर्वी गाण्यांच्या रेकाॅड्स असत. त्याचा ही त्यांच्याकडे भरपूर साठा होता. नंतर कॅसेट्स आल्या , त्यांचा ही अमर्याद साठा त्यांनी केला , नंतर पेनड्राईव्ह्ज आले. त्यात एकावेळी हजारो गाण्यांचा संग्रह त्यांनी केला. मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळी " कारवाॅं " वर ते दोघे संगीतच ऐकत होते.
              दोघांना साहित्याची ही प्रचंड आवड आहे. नामवंत साहत्यिकांचे साहित्य ते वाचतातच , पण त्या दोघांनी स्वतःची साहित्य निर्मिती ही केलेली आहे. सौ. सरोज वहिनींचा काव्य संग्रह आणि डाॅक्टरांचा स्फूट लेखांचा संग्रह प्रसिध्द झाला आहे.
                थोडक्यात " Made for each other " असे हे जोडपे, परमेश्वराने अतिशय आनंदात असताना बनविलेले आहे. हा एक मोठा दुर्मिळ योग आहे. डाॅक्टर शरद म्हसकरांचे वय साधारण सत्त्याहत्तरच्या आसपास आहे . सौ. सरोज वहिनींचे ,त्यांच्या पेक्षा  दोन पाच  वर्षांनी कमी असेल. त्यांचा
 " अानंदवन " हा बंगला , त्या दोघांच्या रसिकतेची साक्ष देणारा आणि चांगला ऐसपैस आहे. बंगल्यात वावरताना आणि बंगल्याचे आवार पाहताना , त्या दोघांच्या रसिक मनाची साक्ष पावलो पावली दिसते. बंगल्यात डाॅक्टरांनी स्वतः बनविलेल्या  त्यांच्या आई , वडीलांच्या आणि एका नउवारी तील पुरंध्रीच्या , प्लास्टर आॅफ पॅरिसच्या निवडक मूर्ति, लक्ष वेधून घेतात.
               डाॅ. शरद व सौ. सरोज वहिनी यांना दोन मुले व एक मुलगी आहे. एक मुलगा पुण्यात व बाकीचे दोघे परदेशात असतात. नाशिकमध्ये ते दोघेच असतात, पण छान स्वानंदात रममाण झालेले दिसतात.
              डाॅ. शरद म्हसकर आणि सौ. सरोज म्हसकर यांना दोघांना " जीवेत शरदः शतम् " अशी सदिच्छा देतो व थांबतो.