Tuesday, 30 June 2020

कै. काशिकर गुरूजी...कष्टाळू , प्रामाणिकपणाचा " दीपस्तंभ "....

अाज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ,त्यांचे नाव आहे, वेदमूर्ति ( कै. ) दत्तात्रय वेणीमाधव जोशी उर्फ " काशिकर गुरूजी " यांची !
            ते जरी मिरजेत स्थायीक झालेले असले, तरी ते मुळचे काशीचे असल्याने ,त्यांना मिरजकर मंडळी  " काशिकर गुरूजी " या नावाने ओळखत असत. आज काशिकर गुरूजी हयात नाहीत , पण त्यांच्या आठवणीने माझ्या सारख्या अनेकांच्या मनाचा एक हळवा कोपरा, व्यापलेला आहे.
               सन १९६२ मध्ये ,कांही घरगुती वादा मुळे काशिकर गुरूजींनी काशीतील आपले घर सोडले आणि  ते  मिरजेत आले. मिरजेत ब्राह्मणपुरीत विद्या मदिर प्रशालेचे मुख्याध्यापक, श्री. तात्यासाहेब साठये रहात होते.  त्यांच्या पत्नी सौ. लिलाताई साठये, या काशिकर गुरूजींच्या मावस बहिण होत्या. काशिकर गुरूजी मिरजेत आल्यावर, श्री. तात्या साठये यांनी त्यांच्यासाठी गोरे मंगल कार्यालयाचे मालक, श्री. चिंतामणी गोरे यांच्याकडे शब्द टाकला. काशिकर गुरूजींना वेदविद्ये बरोबरच  पौरोहित्य ही येत असल्याने, श्री. चिंतामणी गोरे यांनी  त्यांना, आपल्या कार्यालयात  पौरोहित्य करण्यासाठी ठेउन घेतले.  श्री. गोरेंना एका विश्वासू सहाय्यकाची आवश्यकता होती. अशा प्रकारे ,काशिकर गुरूजी काशीहून मिरजेत आले आणि कायमचे " मिरजकर "च झाले.
              ते श्री. गोरेंच्या बरोबरीने ,पौरोहित्य करू लागले. तसेच  गोरे मंगल कार्यालयात ,पडेल ते काम करून ,त्यांनी आपली उपयुक्तता सिध्द केली. श्री. गोरेंनी त्यांच्या प्रामाणिकपणाची ,एकदोनदा परीक्षा केली. त्यात ते उत्तीर्ण झाले. अनेकदा श्री. गोरे ,काशिकर गुरूजींना " अमुक तमुक यांचे पौरोहित्य करून या " असे सांगत. काशिकर गुरूजी जाउन ,ते पौरोहित्याचे काम चोखपणे पार पाडत. तिथे जी दक्षिणा मिळे, ती  स्वतः कडे न ठेवता श्री. गोरे यांचे हाती देत. श्री. गोरे म्हणत , " तुम्ही हे काम केले आहे , दक्षिणेवर तुमचा हक्क आहे " . गुरूजी त्यांना म्हणत ,  " हे पौरोहित्याचे काम तुम्ही मला दिलेले आहे ,त्या मुळे मिळणार्‍या  दक्षिणेवर तुमचा अधिकार आहे ". केवढा हा प्रामाणिकपणा ! सर्वसाधारणपणे लोक इतर बाबतीत, प्रामाणिकपणा दाखवतात. पण पैशाचा विषय आला की, त्यांचा स्वार्थ जागा होतो. पण काशिकर गुरूजी या स्वार्था पासून ,अलिप्त होते.
                एकदा दुसर्‍या एका त्याच व्यवसायातील व्यक्तीने, गुरूजींना आपल्याकडे खेचण्यासाठी , सोन्याची घसघशीत अंगठी देउ केली. या किमती वस्तूच्या दबावा मुळे ,काशिकर गुरूजी आपल्याकडे येतील ,असा त्यांचा होरा होता . पण प्रामाणिकपणाचा " दीपस्तंभ " असलेल्या गुरूजींनी, ती अंगठी आणून श्री. गोरे यांना दिली . स्वतःकडे ठेवली नाही. हा त्यांचा प्रामाणिकपणा पाहून, श्री. गोरे संतुष्ट झाले . त्यांनी त्यांना आपल्या घरचा मानून ,आपल्या घरातच ठेउन घेतले.
             एव्हाना गुरूजी अविवाहित होते. योग्य वेळी  श्री. गोरेंनी कार्यालयात काम करणार्‍या, एका सुयोग्य मुलीशी स्वतः पुढाकार घेउन, त्यांचा विवाह करून दिला. तसेच आपल्या  घरातच, त्या दोघांची  ही रहायची व्यवस्था करून दिली. त्या दोघांना आणि त्यांच्या तीन मुलांना, श्री. चिंतामणी गोरे आणि त्यांच्या कुटूंबियांनी भरभरून प्रेम दिले.
             एव्हाना गुरूजींना मिरजेत, बर्‍यापैकी लोक ओळखू लागले होते. पौरोहित्य करण्याच्या निमित्ताने ते अनेकांच्या घरी जात. तिथे त्यांच्या शिस्तबध्द आणि आपुलकीच्या वागण्याने, त्यांनी अनेक कुटूंबे आपलीशी केली. आमचे दीक्षित कुटूंबिय ही ,त्या पैकीच एक होते. गुरूजी अगदी रोज आमच्या घरी येत व मनसोक्त  गप्पा मारत. ते एखाद्या दिवशी आले नाहीत तर, आम्हा सर्वांना चुकल्या चुकल्या सारखे होत असे.
           गुरूजींना वेद विद्येचे ज्ञान असल्याने ,मी त्यांना त्या बाबतीतल्या शंका विचारत असे. वेदांचे  पद , क्रम ,  जटा , घन म्हणजे काय ? घनपाठी वैदिक म्हणजे काय ?  किंवा " प्रस्थानत्रयी " म्हणजे काय ? गुरूजींना वेदविद्येचे  सखोल ज्ञान असल्याने, त्यांनी माझ्या या सर्व शंकांचे निरसन केले होते. काशिकर गुरूजींनी मला व माझे स्नेही श्री. चंदू लेले यांना ," रूद्र आणि शिवमहिम्न " म्हणायला शिकविले आहे.
             गोरे मंगल कार्यालयात, त्र५ग्वेद संहिता स्वहाकार होत असे. त्या वेळी गुरूजींचा उत्साह वाखाणण्या सारखा असे. सात दिवस भरगच्च कार्यक्रम असत. स्वतः श्री. गोरे व त्यांचे चिरंजीव श्री. विनोद, यांच्या बरोबरीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, गुरूजी धावपळ करीत असत.
              त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली की ते, ती उत्तमरीत्या पार पाडत असत. कोणत्या ही प्रकारच्या कष्टाला ,ते मागे हटत नसत. तसेच कोणती ही गोष्ट, ठरलेल्या  वेळेवर झालीच पाहिजे ,असा त्यांचा कटाक्ष असे. गुरूजींना कमी  झोप पुरत असे. रात्री किती ही वाजता झोपले ,तरी पहाटे साडेतीनला म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर ते उठत व  त्यांचा दिवस सुरू होत असे. कधी कधी मोकळे असले की, गुरूजी  त्यांच्या आयुष्यातले आणि मंगल कार्यालयातले एक एक किस्से, रंगवून रंगवून सांगायचे . ऐकणारा सुध्दा  त्यात रंगून गेलाच पाहिजे, अशी त्यांची हातोटी होती.
              वयोपरत्वे, गुरूजींना कांही कांही शारीरिक व्याधी सुरू झाल्या. कांही लहान मोठी आॅपरेशन्स ही करावी लागली. अखंड व्यस्त असणारे गुरूजी सन २००९ मध्ये ,वयाच्या ७२ व्या वर्षी " स्वर्गवासी " झाले.
               गुरूजींना तीन मुले. मुलीचे लग्न होउन, ती बेळगावला स्थिरस्थावर आहे. दोन्ही मुले विवाहित असून, मिरजेत स्वतंत्रपणे रहात आहेत. त्यांचे ही त्यांच्या परीने ,उत्तम चालले आहे. त्यांच्या पत्नी ,आपल्या मुलांच्या समवेत कालक्रमणा करीत आहेत.
               कै. काशिकर गुरूजी आज जरी आपल्यात नसले ,तरी त्यांचे स्थान आम्हा दीक्षित कुटूंबियांच्या ह्रदयात ,चिरंतन राहील. या लेखाचे माध्यमातून प्रामाणिक , कष्टाळू  , " वेदमूर्ति काशिकर गुरूजीं "ना , मनोमन श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.

Thursday, 25 June 2020

श्री. बाळासाहेब राजोपाध्ये....आदर्श सिनीयर सिटीझन....

हिंदी भाषेत एक म्हण आहे, " पानी तेरा रंग कैसा ? जिसमे मिलावे लगे उस जैसा "...थोडक्यात जी प्राप्त परिस्थिती असेल ,त्यात तुम्ही सामावून गेलात तर , तुम्हाला आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना ते आनंददायी ठरते.
               वरील म्हणीशी सुसंगत वागणार्‍या  एका व्यक्तीची ,मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. लक्ष्मण उर्फ बाळासाहेब राजोपाध्ये ! वय वर्षे ८७ फक्त ! या वयात ही तब्बेत उत्तम ! शरीराची कोणतीही तक्रार नाही. रोज योगासने, प्राणायाम  व ध्यान धारणा आणि मनःशांतीसाठी आवश्यक असे, अध्यात्मिक वाचन  करतात . जमेल तेवढे रोज न चुकता फिरतात . मुख्य म्हणजे जिभेवर नियंत्रण आहे. डायबेटिस नाही. बिपी नियंत्रणात . आनंदी स्वभाव. जिथे असतील तिथे, कोणतीही अढ्यता ,अहंकार न बाळगता असेल त्या वातावरणाशी व परिस्थितीशी जुळवून घेउन ,आपल्या  उपस्थिती मुळे आनंद निर्माण व्हावा ,असा प्रयत्न करतात. अशा दुर्मिळ सदगुणांचे मिश्रण असलेल्या, श्री. बाळासाहेब राजोपाध्ये ,यांचा आज आपण परिचय करून घेऊ.
                   श्री. बाळासाहेबांचे वडील कै. वासुदेवराव, हे विसापूर ( ता. तासगाव , जि. सांगली ) या गावचे इनामदार. आपण या इनामदारी थाटातून बाहेर पडायचे आणि स्वतःचे विश्व स्वतः निर्माण करायचे, या इराद्याने श्री. बाळासाहेब १९५२ साली, SSC झाल्यावर, महसूल खात्यात सर्व्हेअर या पदावर हजर झाले. कोणते ही काम करताना ,ते प्रामाणिकपणे व झोकून देउन करायचे हा त्यांचा स्वभाव ! सुरवातीला रत्नागिरी जिल्ह्यात सर्व्हेचे काम करताना ,कधी कधी  धड रस्ते नाहीत ,अशा ठिकाणी १० ते १५ किमी डोंगर चढून ,सर्व्हे करण्यासाठी चालत जावे लागायचे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा, त्यांनी प्रामाणिकपणे व अतिशय जलद गतीने काम करून ,वरिष्ठांची वाहवा मिळविली होती. नंतर त्यांची नाशिकला बदली झाली. तिथे त्यांचे मामा, कै. के. एस. अथणीकर ,पाटबंधारे खात्यात अधिकारी होते. त्यांच्या सल्ल्या नुसार ,त्यांनी पाटबंधारे खात्यात टेक्निकल असिस्टंट या पदासाठी ,अर्ज केला. त्या पदा साठी जेवढी अर्हता अपेक्षित होती, त्या पेक्षा श्री. बाळासाहेबांची अर्हता ,बरीच वरच्या दर्जाची होती. त्या मुळे, त्यांची निवड व्हायला कांहीच अडचण पडली नाही. तिथून मात्र श्री. बाळासाहेबांनी ,मागे वळून पाहिलेच नाही. डिपार्टमेंटल परिक्षा देत देत ,स्वतःची योग्यता सिध्द करत करत ,ते शेवटी डेप्युटी इंजिनीयर या पदावर शेवटची ९ वर्षे कार्यरत होते.  या नोकरीच्या काळात त्यांनी वीर मेसनरी डॅम , आर्च कल्व्हर्ट्स , कॅनाॅल आणि त्या वरील ब्रिजेस , मातीची धरणे व तेथील गुण नियंत्रण, अशा विविध महत्वाच्या कामावर ,उत्तम प्रकारे काम करून आपला ठसा उमटविला.  श्री. बाळासाहेबांच्या नेटक्या काम करण्याच्या पध्दतीमुळे, त्यांच्या उगीचच बदल्या झाल्या नाहीत. अशा प्रकारे सर्व ठिकाणी उत्तम व प्रामाणिकपणे काम करून,  ते सन १९९१ मध्ये शासकीय नोकरीतून सेवा निवृत्त झाले.
                 श्री. बाळासाहेब ,  नोकरीत जिद्दीने आणि झोकून देउन काम करीत असत.  ते वरिष्ठांच्या बद्दल आदराने , समपदस्थांच्या बरोबर सन्मानाने आणि हाता खालच्या लोकांच्या बरोबर माणूसकीने ,वागत असत. या त्यांच्या गुणांमुळे ,आजच्या घडीला २९ वर्षा पूर्वी सेवा निवृत्त होउन ही ,त्या वेळचे त्यांचे सहकारी आज सुध्दा, मोठ्या आपुलकीने जिव्हाळ्याने ,त्यांना आवर्जून भेटतात व प्रेमाने  चौकशी करतात. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे असे मला वाटते.
               सेवा निवृत्ती नंतर त्यांनी मिरजेत,ज्येष्ठ नागरिक संघाचे काम अत्यंत तळमळीने केले. घरो घरी जाउन सभासद करणे , संघाची स्वतःची इमारत होण्यासाठी प्रयत्न करणे , इत्यादी सामाजिक कामे त्यांनी आवर्जून केली. तसेच  त्यांच्या जुन्या वाड्याचे इतर दोन भावांच्या संमतीने आणि सहकार्याने ,नूतनीकरण करून छान अपार्टमेंट बांधले. त्यात त्यांचा स्वतःचा उत्तम फ्लॅट आहे.
                 त्यांच्या पत्नी  सौ. उमा , शिक्षीका होत्या. संसाराला त्यांची सर्वंकष मदत होती. संसारात पैसा शिल्लक टाकलाच पाहिजे, या त्यांच्या मामांनी ( कै. के . एस . अथणीकर यांनी ) दिलेल्या मार्गदर्शक सल्यामुळे, त्या दोघांनी आपला संसार निगुतीने केला.  त्यांच्या पत्नी  २००७ साली दीर्घ आजाराने मिरजेत " गेल्या ".
                त्या नंतर श्री. बाळासाहेबांना, त्यांच्या मुलांनी आणि मुलींनी ,काळजी पोटी एकटे मिरजेत राहू दिले नाही. त्या मुळे ते आपल्या मुलांच्या, सुनांच्या आणि मुलींच्या , जावयांच्या  सोबतीने राहू लागले. वर अगदी सुरवातीला लिहील्या नुसार , जी परिस्थिती असेल त्यात सामावून जाण्याच्या व  " मी आणि माझं "  हा वृथा अहंकार सोडून देण्याच्या स्वभावामुळे, ते जिथे जातील तिथे आनंदात राहतात !
                श्री. बाळासाहेबांना चार मुले. दोन  मुले व दोन मुली ! मुले अभियंता आहेत. मुली उत्तम शिकलेल्या असून , सर्वजण आपापल्या जागी सुव्यस्थित आहेत.
               ज्यांच्या वागण्याचा आदर्श, सर्व सिनीयर सिटीझन्सनी घ्यावा, अशा श्री. बाळासाहेब राजोपाध्ये यांना परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Sunday, 21 June 2020

श्री. गिरीश वडनेरकर ...एक बहुरंगी व्यक्तीमत्व.


मी एकदाच अमरनाथला आणि चारधाम यात्रेला जाउन आलो,  याचा मला खूप अभिमान आहे. पण माझ्या माहितीतील एक व्यक्ती अशी आहे की, ज्यांनी समुद्र सपाटी पासून १३,८०० फूट उंची वरील ,अमरनाथ सारखी कठीणतम यात्रा ,२४ वेळा आणि चारधाम यात्रा १७  वेळा, सातत्याने दर वर्षी केली आहे.  या अनोख्या व्यक्तीचे नाव आहे , श्री. गिरीश वडनेरकर !
                 श्री. वडनेरकरांनी १९९६ साली ,प्रथम आपल्या कुटूंबियांच्या सोबत, अमरनाथ यात्रा केली. पण कांही वातावरणीय अडचणी मुळे, अमरनाथ गुहे पासून, केवळ ३ किमी अंतरा वरून, त्यांना दर्शन न घेताच परतावे लागले. पुढच्या वर्षी नातेवाईकांच्या सोबत आणि त्या नंतर प्रत्येक वर्षी, तीस ते चाळीस लोकांचा ग्रुप घेउन, त्यांनी अमरनाथ यात्रा केली आहे. या वर्षी त्यांची २५ वी यात्रा झाली असती. पण " करोना " या विषाणूमुळे ती अडचणीत आलेली आहे.  अमरनाथच्या यात्रेत  जम्मू काश्मिर , पटणी टाॅप , गुलमर्ग , सोनमर्ग आणि वैष्णोदेवी हे स्थलदर्शन सुध्दा होते.  या प्रवासा दरम्यान ,काश्मिर आणि अमरनाथच्या अाजूबाजूचा हिमालय अनुभवणे, अत्यंत मनोहारी आहे. अतिरेकी हल्ल्यांचा धोका या प्रवासात असतो, असे म्हणतात . परंतू त्यांना या यात्रे दरम्यान, एकदा ही अतिरेकी हल्ल्यांचा, सरळ सरळ सामना करावा लागला नाही. तरी पण न भिता न घाबरता ,आपण भारतीयांनी हा प्रवास अवश्य करावाच ,अशी त्यांची आग्रही धारणा आहे.
             तसेच चारधाम यात्रा ,त्यांनी तीस चाळीस लोकांचा ग्रुप घेउन, सतरा वर्षा पासून आयोजित केली आहे. यात हरिद्वार , त्र५षिकेश , यमनोत्री , गंगोत्री , केदारनाथ व बदरीनाथ यांचा समावेश असतो. हिमालयाचे मन मोहविणारे दर्शन या यात्रेत होते. या यात्रेत कोणता ही धोका , सहसा नसतो.
               २००९ साली , त्यांनी कैलास मानसरोवरची पहिली यात्रा ,आयोजित केली होती. त्यात त्यांच्या बरोबर आलेल्या एका सहप्रवाशाचा ,अंगात ताप असताना  मानसरोवरात अंघोळ केल्या नंतर ,मृत्यू झाला. मानसरोवर चीन मध्ये आहे. बहुतेक वेळी असा मृत्यू झाल्यास ,त्याच पवित्र  ठिकाणी ,अंत्यसंस्कार केले जातात. पण मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी, त्यांचे शव नाशिकला आणून ,अंत्यसंस्कार करण्याची इच्छा प्रकट केली. श्री. वडनेरकरांनी मोठ्या धाडसाने व अनंत खटपटी लटपटी करून, त्या गृहस्थांचे शव नाशिकमध्ये आणून पोहोचविले. ही आठवण त्यांच्या कडून ऐकताना अंगावर काटाच आला. त्या नंतर त्यांनी कांही अंतराने , हीच यात्रा, तीनदा आयोजित केली होती . त्या सर्व यात्रा सुरक्षित व उत्तम प्रकारे, पार पाडल्या आहेत.
               या यात्रा ते एकहाती आयोजित करतात , हे त्यांचे अतुलनीय असे वैशिष्ठ्य आहे.
                 श्री. वडनेरकरांचे आजचे वय ,५६ वर्षांचे आहे. ते  शासकीय नोकरीत अभियंता आहेत. शासकीय नोकरीत  त्यांना उत्तम कामासाठी , कांही पुरस्कार मिळालेले आहेत.
 " डकबिल टाईप स्पिल वे " चा त्यांचा माॅडेल स्टडीवर आधारित ,संशोधन प्रबंध ," अमेरिकन सोसायटी आॅफ सिव्हील इंजिनियर्स " या संस्थेने गौरविला आहे. तसेच
 " कोयना धरणाच्या विशिष्ठ माॅडेल स्टडी "साठी, महाराष्ट्र शासनाचा गौरव ,त्यांना प्राप्त झाला आहे.
             श्री. वडनेरकर शाळेत शिकत असताना, श्रीमति रोहिणी जोशी रोडे ,या त्यांच्या शिक्षिकेने, त्यांना अत्यंत जिव्हाळ्याने, मोफत शिकविले . त्यांच्या शिकविण्याचा परिमाण म्हणा किंवा त्या त्र५णातून उतराई होण्यासाठी  म्हणा ,श्री. वडनेरकरांनी जवळ जवळ २०० विद्यार्थ्यांना इंग्रजी , गणित , विज्ञान हे विषय मोफत शिकविले. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ही, त्यांनी कांही विद्यार्थ्यांना, मोफत केले आहे.त्यांच्या सुरवातीच्या बॅचच्या मुलांची मुले सुध्दा, त्यांच्याकडे शिकायला येत होती , हा  आगळा वेगळा योगायोग आहे.
              श्री. वडनेरकर हे उत्कृष्ठ क्रिकेटपटू , कबड्डीपटू आहेत. नाशिकच्या  सुप्रसिध्द गुलालवाडी व्यायाम शाळेचे , ते  सक्रीय खेळाडू मार्गदर्शक आहेत.
               श्री. वडनेरकरांनी ७५ पेक्षा, जास्त वेळा रक्तदान करून ,अनेकांना " जीवनदान " दिलेले आहे.
              त्यांना दोन मुले आहेत. दोघेही उच्च शिक्षित असून ,आपल्या आपल्या जागी, सुव्यवस्थित आहेत. सौ. सुजाता वहिनींची त्यांना सुयोग्य आणि समर्थ साथ आहेच !
               अशा या बहुरंगी व्यक्तीमत्व असलेल्या, श्री. गिरीश वडनेरकर व सौ. सुजाता वहिनींना, " बदरीनाथाने " उदंड व निरामय आयुष्य द्यावे ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Wednesday, 17 June 2020

श्री. बापट काका....एक आदरणीय व्यक्तीमत्व...

नाशिक शहरात अशी एक माता आहे की, ज्यांची " गजानन विजय ",  ही शेगावच्या गजानन महाराजांची २१ अध्यायांची पोथी , मुखोदगत आहे. त्यांचे नाव आहे , श्रीमति सुमती बापट , वय वर्षे ८५ फक्त  ! अशा पवित्र मातेच्या पोटी जन्म मिळणे, हे भाग्याचे लक्षण  नाही का ? अशा भाग्यवंताची ,मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. रमेश बापट !  बरेच लोक त्यांना " बापट काका ", या नावाने ओळखतात.
                  श्री. बापट काका काॅलेजच्या पहिल्या वर्षाला असताना, त्यांचे वडील अचानक गेले. अशा वेळी आपल्या वयाचा विचार न करता,  कुटूंबाची जबाबदारी आपलीच आहे ,असे मानून शिक्षणाला राम राम ठोकून, त्यांनी नोकरी सुरू केली. सुरवातीला गावकरी प्रेस ,त्या नंतर नाशिक मर्चन्ट्स बॅंक,  नंतर ते नाशिकच्या महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीत, १९८३ साली स्थिर झाले.
             त्यांचा स्वभाव टापटिपीचा आणि शिस्तीचा आहे. कोणते ही काम किती ही साधे असले, तरी ते अचूक ,  टापटिपीने आणि आदर्शवत  कसे करावे ,हे त्यांच्या कडूनच शिकावे.
               श्री. बापट काकांचे हस्ताक्षर, " मोत्याच्या दाण्या " प्रमाणे आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारची आणि रंगाची , १०० पेन्स आहेत. आपल्या स्नेह्याच्या , ओळखीच्या माणसाच्या, वाढदिवसाला किंवा कांही विशेष प्रसंगी, बापट काकांचे स्वहस्ते तयार केलेले ग्रीटींग,  ते आवर्जून  पाठवितात . त्या ग्रीटींगचा ले आउट , रंग संगती ,एखाद्या कमर्शियल आर्टिस्टला लाजवेल ,अशी आकर्षकच असते.
                त्यांना महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या नाशिक प्लॅन्ट मधून ,सेवा निवृत्त होऊन तीन वर्षे झाली आहेत. पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी , त्यांची आज ही आठवण काढतात. नोकरीत असताना श्री. बापट काकांचा एखादा सहकारी ,मदतीची अपेक्षा ठेऊन त्यांच्याकडे गेल्यास ,ते किती ही बिझी असले तरी ,आपले काम बाजूला ठेऊन, हसत मुखाने व आनंदाने मदत करायचे. प्रायव्हेट कंपनीच्या कल्चरचा विचार करता ,ही दुर्मिळ गोष्ट आहे ! कंपनीच्या कामाच्या निमित्ताने, त्यांचा  शासकीय अधिकार्‍यांशी संबंध यायचा. ते अधिकारी त्यांना मानाने वागवायचे . कारण  श्री. बापट काकांची कामाची शिस्त आणि त्यांचा दुर्मिळ प्रामाणिकपणा !
                 सध्या  श्री. बापट काकांनी मिरजेच्या " गीता फाऊंडेशन " च्या , सामुदायिक रीत्या करावयाच्या , श्री विष्णूसहस्त्रनामाच्या बारा कोटी आवर्तनांच्या, संकल्पाला वाहून घेतलेले आहे.
                   श्री. बापट काका डोळसपणे सश्रध्द आहेत. अंधश्रध्दा आणि कर्मकांड ,त्यांना अजिबात मान्य नाही. आपल्या माते प्रमाणे ,त्यांची शेगावच्या " गजानन महाराजांच्या " वर ,नितांत श्रध्दा आहे. आज ही त्यांच्या माहितीतील कोणी आजारी पडल्यास, ते त्या व्यक्तीला वेळोवेळी विचारपूस करण्यासाठी भेटतात.  त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून, तिथे  बसून " रामरक्षा " म्हणतात. केवढा हा जिव्हाळा आणि केवढी ही आपुलकी !
                    श्री. बापट काकांचा रक्तगट ,बी आरएच निगेटिव्ह आहे. तो दुर्मिळ आहे.  या गटाच्या अनेक गरजूंना रक्तदान करून, बापट काकांनी  " जीवनदान " दिलेले आहे.
              श्री. बापट काकांना एक बहिण आहे. नाव सौ. सुहास जोशी. त्यांच्या पाठीशी ते श्रीकृष्णा प्रमाणे, सतत उभे असतात. श्री .बापट काकांना दोन मुले. मुलगा चि. सुमित, मुंबईत उच्च पदावर नोकरी करतो. मुलगी चि. सई , कथ्थक विशारद आहे. सौ. वहिनींची बापट काकांना, समर्थ साथ आहे . तसेच  मातोश्रींचा आशिर्वाद पाठीशी आहेच !
                 अशा या आदरणीय श्री. बापट काकांना व त्यांच्या कुटूंबियांना ," गजानन महाराजांचा कृपा प्रसाद " सतत लाभो , ही सदिच्छा देतो आणि थांबतो !

Monday, 15 June 2020

श्री. चंदू लेले...एक " संत अभियंता...".

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ,त्यांचे नाव आहे ,श्री. गोविंद उर्फ  चंद्रकांत उर्फ चंदू लेले ! श्री. चंदू, हे माझ्या पेक्षा वयाने, लहान आहेत . " बालादपि सुभाषितम् ग्राह्यम् " असे एक संस्कृत वचन आहे .त्याचा अर्थ, " लहानांच्या चांगल्या गोष्टी ऐकून आत्मसात कराव्यात ". या न्यायाने श्री. चंदू यांच्या कडून, मला ही, खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व विशाल आहे , अनुकरणीय आहे.
                श्री. चंदू ,हे मातृपितृ भक्त आहेत. आता त्यांचे आई आणि वडील, दोघे ही हयात नाहीत. पण त्यांनी त्या दोघांचा शब्द कधी ही, खाली पडू दिला नाही. त्यांनी दोघांची सेवा , मना पासून केली. कारणे कांही का असेनात, पण हे आज काल दुर्मिळ आहे.
                श्री. चंदू  तन ,मन, धनाने धार्मिक आहेत. ते दर पौर्णिमेला, मिरजेहून नृसिंहवाडीला चालत जातात. केवळ दत्त महाराजांच्या दर्शनासाठी ! तसेच त्यांच्या शेतावर ,अधून मधून भजनाचा कार्यक्रम असतो. त्या भजनी मंडळींना आणि श्रोतृवृन्दाला,  नंतर उत्तम भोजनाचा आस्वाद दिला जातो. त्यांना व सौ. गायत्री वहिनींना, अन्नदान करायला फार आवडते. आपल्या शेतावर त्यांनी ,मोठ्या प्रेमाने, गो धनाचे संगोपन केलेले आहे. तसेच ते " शिव प्रतिष्ठानच्या " श्री. संभाजीराव भिडे यांचे ," धारकरी " आहेत.
                 श्री. चंदू , सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून, M.E. ( Stucture ) प्रथम श्रेणीत पास झालेले आहेत. M.E . झाल्या नंतर, त्यांनी कांही वर्षे शासकीय नोकरी केली. पण कुणाच्या हाता खाली काम करण्याचा, त्यांचा पिंड नसल्याने, त्यांनी शासकीय नोकरी सोडली व स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय मिरज , सांगली भागात सुरू केला.
                   तो उत्तम प्रकारे चालला. सर्व साधारणपणे उत्तम चाललेला व्यवसाय, आपल्या पुढच्या पिढीच्या ताब्यात देण्याची कल्पना, कुणाच्या ही मनाला शिवत नाही. व्यवसायाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातातून जातील , आपले महत्व कमी होईल , असा अहंकार त्या मागे असतो. पण ज्यांना व्यर्थ अहंकारच नाही ,अशा श्री. चंदू यांनी, स्वतःच्या वयाच्या ५४ व्या वर्षी, स्थापत्य अभियंता झालेल्या आपल्या मुलाला ,आपल्या व्यवसायाची धुरा सोपवली आणि वयाच्या ५६ व्या वर्षी ,व्यवसायातून पूर्णपणे अंग काढून घेतले.  व्यवसायातील सत्तेचा मोह , पैशाचा मोह , अहंमन्यतेचा मोह ,वयाच्या ५४ व्या वर्षी सोडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ,श्री. चंदू लेले ! असे दुसरे उदाहरण मिळणे, सर्वथैव अशक्यच ,असे मला वाटते. या निरपेक्ष वृत्तीला, त्रिवार वंदन !
                श्री. चंदू यांना, संगीताचा म्हणजेच बासरी वादनाचा, छंद आहे. ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची, " संगीत विशारद " ही परिक्षा उत्तम रीत्या, उत्तीर्ण झालेले आहेत. आपला छंद म्हणून, पहाटेच्या शांत वेळी ,ते बासरी वादनाचा रियाज करतात. ज्याला इच्छा आहे, त्याला सायंकाळी बासरी वादन शिकवितात.   श्री. चंदू निरपेक्ष वृत्तीने, बा
सरी वादनाचे कार्यक्रम ही करतात. थोडक्यात, ते आपला छंद जोपासून ,आपला वेळ आनंदात घालवितात.
                  श्री. चंदू ,आता ६४ वर्षांचे आहेत. यांना दोन मुले. थोरला मुलगा चि. गौरांग ,आर्किटेक्ट आहे. तो पुण्यात आपला व्यवसाय करतो.धाकटा मुलगा चि. सत्यजीत ,श्री. चंदू यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय ,उत्तम प्रकारे सांभाळतो. दोन्ही मुले विवाहित असून, त्यांना एक नातवंड ही आहे. सौ. गायत्री वहिनींची श्री. चंदू यांना, सर्वार्थाने  समर्थ साथ आहे.
                  अशा या आगळ्या वेगळ्या व्यक्तीमत्वाच्या, श्री. चंदू आणि सौ. गायत्री वहिनी आणि त्यांच्या सर्व परिवाराला उदंड ,निरामय आयुष्य लाभू दे , सर्व ऐहिक आणि पारमार्थिक सुखांचा वर्षाव ,त्यांच्यावर होउ दे , ही ईश चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.

Friday, 12 June 2020

श्री. जोशी साहेब...एक धीरोदात्त , यशस्वी अभियंता...

माझी  " मेरी"  या शासकीय संशोधन संस्थेतून,  बाहेर साईटवर , क्वालिटी कंट्रोलला बदली झाली. तिथे मी, यशस्वी अभियंता असलेल्या ,श्री. एस. ए. जोशी ,यांच्या सहवासात आलो. त्यांनी मला " साईट " चे तांत्रिक व प्रशासकीय ज्ञान दिले. त्या मुळे मी त्यांना ,कधी ही विसरू शकत नाही. मी त्यांना आदराने, जोशी साहेब म्हणत असतो.
                  श्री. जोशी साहेब कोणते ही काम करताना, बारकाईने अभ्यास करून करीत असत. त्यांची सगळी नोकरी साईटवरच झालेली असल्याने, साईटवरच्या कामाचे आणि इतर विषयांचे भरपूर किस्से, त्यांच्याकडे होते. ते ऐकताना, आमची दोघांची छान करमणूक व्हायची.
                  श्री. जोशी साहेबांच्या प्रमोशन नंतर झालेल्या  बदली मुळे , त्यांचा " चार्ज " मला मिळाला.  माझा अभ्यास व श्री. जोशी साहेबांनी सांगीतलेले कामातले बारकावे , यांच्या सहाय्याने ,मी साईटवर उत्तम प्रकारे काम करू शकलो.
                  श्री. जोशी साहेब ,सन २००० साली सेवानिवृत्त झाले. त्या नंरचा त्यांचा दिनक्रम ,अतिशय शिस्तबध्द असतो. ते पहाटे साडेतीनला उठतात. ध्यान धारणा करून , देवघराचा परिसर झाडून ,स्वच्छ करतात. एवढ्या पहाटे अंघोळ करून ,ते साग्रसंगीत देवपूजा करतात. देवाच्या नैवेद्यासाठी, रोज ताजा पदार्थ, स्वतः बनवितात. पूजा झाल्यावर प्रसाद भक्षण करतात . एव्हाना  सकाळचे साडे सहा वाजलेले असतात. मग सकाळच्या प्रसन्न वेळी  ,ते  फिरायला जातात. एकूणच त्यांचा दिनक्रम ,आखीव रेखीव असतो.
                  ते  मूळचे कानडी भाषिक आहेत. त्यांच्या घरात, श्रीमद् भागवतावर कानडीत प्रवचने देणारे प्रवचनकार, ते स्वखर्चाने बोलावत असत . सौ. जोशी वहिनी सुध्दा, खूपच धार्मिक होत्या.
                   श्री. जोशी साहेबांच्या आयुष्यात ,एक अशी घटना घडली आहे की, जी ऐकून कोणाचे ही ह्रदय, पिळवटून जाईल. श्री. जोशी साहेबांच्या सेवानिवृत्ती नंतर, ते दोघे मिळून दर वर्षी माघ महिन्यात, अलाहाबादला ( प्रयागला ) जात असत. माघ महिना म्हणजे थंडीचे दिवस ! उत्तरेत थंडी फार असते. ते रोज पहाटे चार वाजता, होडीने त्रिवेणी संगमावर अंघोळ करून , तिथे चाललेली प्रवचने ऐकत . हा कार्यक्रम माघ महिना भर ,चालत असे. अशी अकरा वर्षे, त्यांनी सातत्याने , हा पवित्र  उपक्रम , मोठ्या श्रध्देने पार पाडला.
                 बाराव्या वर्षी ते दोघे ,नेहमी प्रमाणे प्रयागला, माघ महिन्यात गेले होते. ठरल्या प्रमाणे, ते पहाटे चार वाजता होडीतून, त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेले. थंडीत गारपाण्या मुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, सौ. वहिनींना त्रिवेणी संगमावर स्नान केल्या नंतर , छातीत गंभीरपणे  दुखायला लागले. होडीवाला व इतरांच्या मदतीने, त्यांना एवढ्या पहाटे ,कसेबसे हाॅस्पिटलमध्ये नेले गेले. डाॅक्टरांनी खूप प्रयत्न केले ,पण उपयोग झाला नाही. सौ. वहिनी " गेल्या ".
                  अलाहाबाद सारख्या दूरच्या  ठिकाणी, श्री. जोशी साहेब ,एकटे पडले. काय करावे समजेना. मुलगा मुलगी सांगलीत. त्यांना कळवून ते यायला ,खूप वेळ लागणार . सौ. जोशी वहिनींना  " तशा अवस्थेत ", रूग्णवाहिकेने  सांगलीला न्यायचे ,तर दोन दिवस लागणार. श्री. जोशी साहेबांनी निर्णय घेतला व सौ. वहिनींचा  " अंत्यविधी " प्रयाग क्षेत्री स्वतःच केला.  नंतर मुलगा आणि मुलगी यांना , त्यांच्या आई , ( सौ. जोशी वहिनी ) गेल्याचा आणि अंत्यविधी स्वतः  केल्याचा, फोन केला. असा प्रसंग ,कोणावर ही येउ नये. तो श्री. जोशी साहेबांच्या वर आला , पण त्यांनी ज्या धीराने तो हाताळला, त्याला तोड नाही.
               या गोष्टीला, अंदाजे आठ वर्षे झाली असतील. सध्या श्री. जोशी साहेब , सांगलीत आपल्या स्वतःच्या, " गौरी शंकर " या बंगल्यात मुलगा, सून आणि नातवंडे , यांच्या सह निरपेक्ष वृत्तीने ,आनंदात कालक्रमणा करीत आहेत. त्यांची विवाहित मुलगी सुध्दा, सांगलीतच असते.
                अशा या धीरोदात्त आणि अत्यंत धार्मिक वृत्तीच्या,  यशस्वी अभियंता असलेल्या ,श्री. एस. ए. जोशी साहेबांना, उत्तम व निरामय आयुष्य लाभो, ही प्रार्थना करतो आणि थांबतो.

Tuesday, 9 June 2020

श्री. सागर लोया.....एक धडपड्या यशस्वी तरूण...

संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे...
           उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।
           न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः ।।
अर्थ.... तुम्ही मनात योजलेले काम किंवा तुमचे मनोरथ , उद्योग ( धडपड ) केल्या शिवाय ,साध्य होणार नाहीत. कारण , झोपलेल्या सिंहाची ( भूक भागविण्यासाठी ), कोणते ही हरिण स्वतःहून ,त्याच्या तोंडात शिरत नाही.
         या सुभाषिताशी सुसंगत ,अशा एका प्रगतीशील व धडपड्या तरूणाची, मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. असा तरूण आमचा शेजारी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या तरूणाचे नाव आहे ,श्री. सागर लोया.
            श्री. सागर यांचे लहानपण ,  कष्टात आणि त्रासातच गेले. ते काॅलेजमध्ये शिकत असताना, आपला खर्च आपल्या कुटूंबावर पडू नये म्हणून, त्यांनी नोकरी केली. त्या नोकरीचा अनुभव विचारात घेऊन, त्यांनी धडपड करत ,स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीच्या काळात, अपेक्षे प्रमाणे फायदा होत नव्हता. पण जिद्दीने पाय रोवून उभे राहून,  त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली व आज ते यशस्वी व्यावसायिक झालेले आहेत.
             आता तुमच्या मनात प्रश्न येईल की ,ते  असा कोणता व्यवसाय करीत आहेत  ?  उत्तर आहे........
 " Financial Adviser "  ( आर्थिक सल्लागार ) !  श्री. सागर लोया , " आर्थिक सल्लागार " आहेत.
           तुम्ही तुमचे पैसे सरधोपट विचार करून, बॅंक , पोस्ट  इत्यादीत ठेवले , तर तुम्हाला जे व्याज मिळेल, त्याने तुम्ही फक्त वाढत्या महागाईशी, कसाबसा सामना करू शकाल. पण तुम्हाला त्यातून , आर्थिक फायदा मिळणार नाही.  जाणवण्या इतपत किंवा भरपूर आर्थिक फायदा मिळवायचा असेल , तर तुम्हाला थोडाफार धोका पत्करावाच लागेल.  तुम्हाला Aggressive investment ( आक्रमक गुंतवणूक ) करावी लागेल. त्या साठी तुम्हाला  ,आर्थिक सल्लागाराची गरज आहे. तो तुमच्या आर्थिक अपेक्षांचा विचार करून, सुयोग्य गुंतवणूक कोणती ते सांगू शकतो.
              श्री. सागर , जवळ जवळ सर्व प्रकारच्या, आर्थिक  गुंतवणुकी संबंधी सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्या नुसार ,भारतातील केवळ ५ ते ७ % लोक आक्रमक गुंतवणुकीचा विचार करतात. त्यात आर्थिक जाणीव असलेल्या, तरूणाईचेच प्रमाण जास्त आहे. अमेरिकेत हेच प्रमाण ,जवळ जवळ ३० ते ३५ % आहे.
             श्री. सागर लोया यांचे वय ,फक्त ३६ वर्षे आहे. गेली १७ वर्षे ते या व्यवसायाचा अभ्यास करत करत, आता त्यात आता सुस्थिर झालेले आहेत.
            श्री. सागर यांना , त्यांच्या " आर्थिक सल्लागार " या व्यवसाया संबंधी  अनेक प्रश्न  , मी विचारले. उदाहरणार्थ , आर्थिक गुंतवणूकीचे किती प्रकार आहेत ? आक्रमक गुंतवणूकीत फायदे कोणते ? त्यात धोका कशा प्रकारचा व कितपत आहे ? शेअर बाजार म्हणजे नक्की काय ? मेन  ब्रोकर व सब ब्रोकर म्हणजे काय ? त्यांचे क्वालिफिकेशन काय असते ?  शेअर बाजारातील तेजी आणि मंदी ,कशा मुळे होते ? प्रत्यक्ष गुंतवणूक आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक , म्हणजे काय ?  आर्थिक गुंतवणूक सल्लागाराला कोणते कोणते आर्थिक विषय , हाताळावे लागतात ? इत्यादी इत्यादी...... त्या सर्वांची ,त्यांनी सविस्तर आणि समाधानकारक उत्तरे दिली. त्यांच्या त्या क्षेत्रातील  सखोल ज्ञानाने, मी अक्षरशः दिपून गेलो.
            श्री. सागर लोया यांच्या लहान वयाचा विचार करता , ते अजूनी खूप खूप प्रगती करून ,आपली उन्नती करून घेतील ,यात मुळीच शंका नाही. श्री. सागर यांना त्यांच्या व्यवसायात , त्यांची पत्नी सौ. हिरल लोया यांची बहुमूल्य मदत होते , हे त्यांनी अत्यंत अभिमानाने सांगीतले. त्या दोघांना  चि. अरूष हा मुलगा आहे. तो लहान आहे.
              एकूण श्री. सागर यांनी ,त्यांच्याशी बोलताना मला आर्थिक विश्वाचे  , थोडेफार " विश्वरूप दर्शन "  घडविले ,असे म्हणायला हरकत नाही. त्यांची व्यवसायात पुढे जाण्याची सर्वंकष  जिद्द पाहून , मी स्तिमित झालो.                                       
              शेवटी श्री. व सौ. आणि चिरंजीव लोया परिवाराचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत , त्यांची खूप खूप भरभराट होवो , अशी  शुभेच्छा देतो आणि थांबतो.

Friday, 5 June 2020

कै. बाबूराव आणि कै. उषा वहिनी चांदोरकर

आज, मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , त्यांचे नाव आहे ,कै. अरूण विश्वंभर ऊर्फ बाबूराव चांदोरकर. आज ते आणि त्यांच्या पत्नी उषा वहिनी  , दोघे ही हयात नाहीत. पण त्या दोघांच्या आठवणीने , माझ्या मनाचा हळवा कोपरा, नक्कीच व्यापलेला आहे.
              बाबूराव आणि मी , आम्ही दोघेही, " मेरी " या शासकीय संशोधन संस्थेत नोकरीला असल्याने ,आमचा परिचय होता. पण ते जेंव्हा आमच्याच विभागात बदलून आले , त्या वेळी परिचयाचे रूपांतर, प्रगाढ स्नेहात झाले.
                  बाबूराव म्हणजे शिस्तप्रिय माणूस !  त्यांना वाचनाची जबरदस्त आवड होती. सुट्टीच्या दिवशी एखादे पुस्तक हातात धरले, तर ते संपविल्या शिवाय खाली ठेवत नसत.  बाबूराव एके काळी,  मल्लखांब पटू होते. त्यांना बाईक चालविण्याचा शौक होता. तसेच ते पोहण्यात ही तरबेज होते. एकदा नाशकातील गोदावरी नदीला पूर आलेला असताना, त्यांनी पुरात उडी ठोकून ,बुडणार्‍या माणसाला वाचविण्याचे यशस्वी धाडस केले होते.  बाबूरावांना पाठ दुखीचा त्रास सुरू झाल्या नंतर  मल्लखांब , बाईक चालविणे , पोहणे या गोष्टी डाॅक्टरांच्या सल्ल्या नुसार , बंद कराव्या लागल्या.
               कोणती ही नवीन गोष्ट शिकण्यात , त्यांना रस होता. गणित या विषयात, त्यांना विशेष गती होती. मुलांना गणित शिकविताना ,त्यातली एखादी गोष्ट अडली, तर त्याचा पिच्छा करून ,  गणित सोडविल्या शिवाय बाबूराव स्वस्थ बसायचे नाहीत.
               बाबूराव तसे कडक आणि वेळेला स्पष्ट वक्ते होते. बाबूराव मैत्रीला जागणारे होते. एकदा आॅफिसमध्ये,  मला कोणीतरी कांही तरी , लागट बोलले.  त्या बरोबर बाबूरावांचा पारा चढला .त्यांनी त्या व्यक्तीला, असं कांही सुनावलं की ,त्यांने तिथून काढता पाय घेतला.  त्या व्यक्तीने पुन्हा  ,तो विषय काढण्याचे धाडस ,कधी ही केले नाही.
              बाबूरावांच्या मनाचा हळवा कोपरा म्हणजे, त्यांची मुले ! मुलांना बरं नसलं तर ,एरवी मनाने कडक असणारे बाबूराव ,फार हळवे व्हायचे.
             बाबूराव म्हणजे खवैय्या माणूस ! त्यांच्या पत्नी   उषावहीनी , या चांदोरकरांच्या घरची अन्नपूर्णाच  होत्या.  वहिनींचं माहेर त्र्यंबकेश्वर ! तिथे माहेरी आणि इथे सासरी ,दोन्हीकडे माणसांची आवक जावक भरपूर असायची.  पण

वहिनींनी कधी ही ,कोणाला टाळलं नाही. त्यांच्या हाताला वेगळीच चव होती. त्यांच्या हातचा एखादा पदार्थ तुम्ही खाल्लात,  तर ती विशिष्ठ चव ,तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. दर नवरात्रात ते आम्हा दोघांना मेहूण म्हणून, जेवायला बोलावत. वहिनींच्या हातच्या स्वादिष्ट पुरण पोळीची चव , अजून ही  आमच्या दोघांच्या जिभेवर रेंगाळते आहे. तसेच वहिनींच्या हातचा तिळगूळ ! तो चविष्ठ, खुसखुशीत तिळगूळ ,मी आयुष्यात कधी ही विसरणार नाही. दर  वर्षी संक्रांतीला ,मला त्या तिळगुळा मुळे ,बाबुराव आणि उषा वहिनींची आठवण झाल्या शिवाय रहात नाही.
             बाबूराव दि. ८ जून १९९३ ला नोकरीत असतानाच  गेले. बरेच दिवस ते आजारी होते. भरपूर उपचार झाले , पण उपयोग झाला नाही. ते गेले त्या वेळी मी , शासकीय बदलीवर सांगलीत होतो. बाबूरावांची व माझी , ते जाण्या पूर्वीची , शेवटची भेट झाली नाही , याचे मला आज ही दुःख होते आहे.
               उषावहिनी दि. २२ जून १९९८ ला गेल्या. एक हसत मुख , सुगरण ,व्यक्तीमत्व काळाच्या पडद्या आड गेलं !
                  बाबुरावांना  चि. उदय व  चि. सौ. कल्याणी कुलकर्णी , अशी दोन मुले आहेत. दोघे ही आपापल्या संसारात  सुव्यवस्थित आहेत.
                 मी हा लेख लिहीतो आहे, त्या वेळी जून महिनाच चालू आहे. दोघांचे ही स्मृतिदिन , याच महिन्यात आहेत. कै. बाबूराव आणि कै. उषावहिनी या दोघांना , प्रेमपूर्वक आदरांजली वाहतो आणि थांबतो.

Thursday, 4 June 2020

श्री. श्रीकृृृृृष्ण दास्ताने , टायपिंगची AK 47....

मराठीत एक म्हण आहे. " लाथ मारीन , तिथे पाणी काढीन ". त्याचा अर्थ ,मी ज्या क्षेत्रात पदार्पण करीन , तिथे यशस्वी होईन !
            या म्हणीचा प्रत्यय करून देणार्‍या व्यक्तीमत्वाची,  मी , आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे ,श्री. श्रीकृष्ण दास्ताने.
             श्री. दास्ताने, मेरीत आॅफिस मध्ये  टायपिस्ट होते. तुम्ही म्हणाल, यात विशेष काय ? भरपूर टायपिस्ट आम्ही पाहिलेत. पण श्री. दास्ताने यांचे वैशिष्ठ्य म्हणजे , त्यांनी अखिल भारतीय स्तरावर, टायपिंगच्या ज्या स्पर्धा होतात, त्यात उत्तुंग यश मिळविले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ठ्य म्हणजे , सतत तीन तास टायपिंग करावे लागते . तुमची टायपिंगची अचुकता, ९९.९ % इतकी लागते. शिवाय तुमचा स्पिड ही ठेवावा लागतो. तीन तास केलेल्या इंग्रजी टायपिंग मध्ये,  केवळ ०.१ %  इंग्रजी स्पेलिंगची  चूक चालते. त्या पेक्षा जास्त  चुका झाल्यास, तुमचा पेपर बाजूला फेकून दिला जातो. अशा या कठीण स्पर्धेत ,श्री. दास्ताने यांचा नंबर थोडक्यात
चुकला ,अन्यथा ते ,जागतीक टायपिंग स्पर्धेसाठी पात्र ठरले असते. ही  फार मोठी उपलब्धी आहे.
             गोदरेज कंपनी तर्फे ,त्यांनी मुंबईत व पुण्यात झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत, प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत साठी अचुकता किमान ९९ % लागते. शिवाय स्पीड ही महत्वाचा असतो.
              श्री. दास्ताने टायपिंग करताना ,त्यांच्या टायपिंग मशिनचा आवाज, ऐकण्या सारखा असतो. सिनेमात एके 47 मशिन गन मधून ,गोळ्या बाहेर पडताना ,जसा आवाज आपण ऐकलेला असतो , अगदी तसाच आवाज ,श्री. दास्ताने यांच्या टायपिंग मशिनचा असतो. पण त्यात ही एक प्रकारची , नाद मधुरता असते.
                   श्री. दास्ताने ,उत्तम क्रिकेटर ही आहेत.  ते फास्ट बोलर आहेत. एके काळी , ते मेरी आॅफिसच्या टीमचे ,मुख्य आधार स्तंभ होते. त्यांची  नाशिक जिल्हा स्तरा वरील क्रिकेट टीम मध्ये, निवड झालेली होती. नाशिकच्या आंतर जिल्हा मॅचेस मध्ये , त्यांनी एका डावात ९ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. प्रसिध्द क्रिकेटर ,श्री. एकनाथ सोलकर, यांचे मार्गदर्शन ,श्री. दास्ताने यांना लाभलेले आहे. मेरी आॅफिसच्या टीम तर्फे खेळताना, त्यांनी तीन चार शतके ही ठोकली आहेत. कांही कारणाने क्रिकेट खेळणं, त्यांना फार काळ पुढे चालू ठेवता आले नाही  , अन्यथा त्यांनी भारतीय क्रिकेट विश्व ही ,नक्की गाजवून सोडलं असतं , यात मला तरी शंका वाटत नाही.
                 साईड बिझीनेस म्हणून ,श्री. दास्ताने यांनी, HDFC Fixed Deposit , LIC ची एजन्सी , Mediclaim पाॅलिसी इत्यादी ,लोकांना देण्याचा व्यवसाय केलेला आहे. नुसता व्यवसाय करून ते थांबले नाहीत. तिथे ही त्यांनी ,नाशिक जिल्ह्यात एक नंबर मिळविला आहे. सर्वात जास्ती व्यवसाय केल्या बद्दल, त्यांना अनेकदा गौरविण्यात आलेले आहे.
              श्री. दास्ताने यांचा, मित्र संग्रह ही भरपूर आहे. त्यांची वाणी गोड असल्याने, एखादा माणूस त्यांचा मित्र झाला की ,तो कायमचा त्यांच्या सपर्कात राहतोच .
               श्री. दास्ताने यांचे वय, आता ७२ वर्षांचे आहे. त्यांना कधी ही भेटलं की ,त्यांच्यातला सळसळता उत्साहाचा झरा, नेहमीच समोरच्याला आनंद देतो. श्री. दास्ताने यांना दोन मुले आहेत. दोन्ही ही मुले उत्तम रीत्या स्थिर स्थावर आहेत. सौ. वहिनींची त्यांना समर्थ साथ आहेच !
                  जिथे जातील, तिथे कायम नंबरात येणार्‍या, श्री. श्रीकृष्ण दास्ताने यांना आणि सौ. वहिनींना,  उदंड आणि निरामय आयुष्य लाभो, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.