आपण टिव्हीवर पाहतो की , पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटायला गेले की , त्यांच्या आई प्रेमाने त्यांना घास भरवतात , तोंड स्वतःच्या रूमालाने पुसतात , मातृप्रेमाने वागतात. कारण मुलगा किती ही मोठा झाला तरी तो आईला लहानच असतो.थोडक्यात आपल्या समोर जन्मलेली व्यक्ती किती ही मोठी झाली , तरी आपल्याला ती लहानच वाटते. आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे , जी माझ्या समोर जन्मली आणि असिस्टंट कमिशनर , फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन , महाराष्ट्र राज्य , या सुपर क्लासवन् पदावरून सेवानिवृत्त झाली. या व्यक्तीचे नाव आहे , श्री. भास्कर कृष्ण वाटवे , बी. के. वाटवे . घरचे आणि आम्ही सर्व त्यांना नितीन म्हणतो.
चि. नितीन हा लहानपणा पासून कठोर शिस्तीत वाढविला गेलेला मुलगा आहे ! अभ्यासात हुषार ! स्वतःच्या जिद्दीने बी. फार्म झाला , पुढे एम्. फार्म. ही झाला. प्रथम कांही वर्षे खासगी औषध निर्माण कंपनीत नोकरी केली. तिथे तो औषध निर्माण शास्त्राच्या नियमा प्रमाणे काटेकोरपणे वागला. ज्या क्षणी हे नियम पाळले जात नाहीत असे वाटले , त्या क्षणी ती नोकरी त्याने सोडली.
पुढे महाराष्ट्र शासनाच्या फुड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याचे सिलेक्शन झाले. तिथे ही तो अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावाजला गेला. मुख्य म्हणजे त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान आणि आपल्या विषयाशी निगडीत , शासकीय कायद्यांचा समग्र अभ्यास त्याने केलेला होता. सर्व साधारणपणे इतका सखोल आणि समग्र अभ्यास करण्याची कुणाचीच तयारी नसते. पण चि. नितीन म्हणजे जे काम हाती घेईल ते काटेकोरपणे , शासकीय नियमांना आधीन राहून , पण उगीचच कुणाला ही त्रास होऊ नये ,या मानसिकतेने वागणारा अधिकारी असल्याने , त्याची जिथे जिथे बदली झाली, तेथील त्याचे वरिष्ठ आणि कनिष्ठ ,दोघे ही त्याला आज ही सेवानिवृत्ती नंतर सुध्दा ,मानाने वागवितात.
सेवानिवृत्ती नंतर ही तो खूप व्यग्र असतो ! त्याच्या डिपार्टमेंटचे शासकीय अधिकारी ,गुंतागुंतीच्या प्रश्नात आज ही त्याचा सल्ला घेण्यासाठी येतात .कांही खासगी औषध निर्माते आणि विक्रेते औषध शास्त्राच्या नियमांच्या विषयी शंका निर्माण झाल्यास, त्याचे निराकरण करून घेण्यासाठी त्याला भेटतात. कुणावर अन्याय होऊ नये , पण त्याच वेळी शासकीय नियम ही पायदळी तुडविले जाउ नयेत , या विषयी तो दक्ष असतो.
चि. नितीनचा ओशो यांच्या तत्वज्ञानाचा प्रगाढ अभ्यास आहे. मी ओशो यांच्या तत्वज्ञाना विषयी पूर्वग्रह दुषित होतो. पण त्याच्याशी त्या बाबत चर्चा केल्या नंतर ,मला ही त्या तत्वज्ञानाची गोडी लागली. तसेच हिन्दुधर्म आणि तत्वज्ञान , यांचा ही त्याचा सखोल अभ्यास आहे व तो त्या बाबतीत खूपच आग्रही आहे. आज काल हे खूप दुर्मिळ आहे.
चि. नितीन जन्मला त्या वेळी आम्ही सांगलीतील त्यांच्या वाड्यात भाडेकरू होतो. पण चि. नितीनने आज ही आमचे संबंध अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे ठेवले आहेत.
त्याला दोन मुले आहेत. थोरला मुलगा मर्चंट्स नेव्ही मध्ये अधिकारी आहे व धाकटा मुलगा अभियंता आहे. दोन्ही मुले आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत. सौ. वहिनींची त्याला समर्थ साथ आहेच ! चि. नितीनच्या आई श्रीमति सुधाताई ही त्याच्या जवळ असतात.
अशा या माझ्या डोळ्या समोर वरिष्ठ अधिकारी झालेल्या , पण मला तो अजून ही लहानच असलेल्या चि. नितीनला आणि त्याच्या कुटूंबियांना भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो .
No comments:
Post a Comment