Sunday, 31 May 2020

सौ, मधुरा क्षेमकल्याणी...बहुरंगी व्यक्तीमत्व

समाजात कांही लोक असे असतात की , जे स्वतः ही पुढे जात नाहीत आणि इतरांना ही जाऊ देत नाहीत. कांही असे असतात की, ज्यांना फक्त स्वतःलाच पुढे जायचं असतं , इतरांना ते पुढे जाऊच देत नाहीत . समाजात फारच थोडे लोक असे असतात,  की ज्यांना स्वतःला ही पुढे जायचं असतं आणि समाजाला ही त्यांना, आपल्या सोबत पुढे न्यायचं असतं.
           वरील पैकी , तिसर्‍या प्रकारच्या लोकांच्या पैकी, एका व्यक्तीमत्वाची, मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे ,सौ. मधुरा भोकरे क्षेमकल्याणी !
                  माहेर मिरजचे भोकरे आणि सासर नाशिकचे क्षेमकल्याणी ! मी पण मिरजचाच ! त्या मुळे मिरजेची एक माहेरवाशीण ,नाशिक मध्ये येऊन आपल्या कर्तृत्वावर स्वतःचा झेंडा फडकवते , याचा मला ही सार्थ अभिमान आहेच !
               चि. सौ. मधुरा ही LLM शिकलेली आहे. तिने कांही वर्षे, लाॅ काॅलेजात प्राध्यापक म्हणून ,काम केले आहे .तसेच कांही वर्षे ,वकीली ही केलेली आहे. हे सर्व करून फक्त स्वतः पुढे जाणे ,तिला मान्य नव्हते. समाजातली तरूण पिढी ,पुढे आली पाहिजे , हे स्वप्न तिने पाहिले. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी , धडपड सुरू केली. समाजात ज्याला पुढे जायचे आहे, त्याला चार लोकात ऊभे राहून ,आपले  व्यक्तीमत्व आणि विचार , प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत. ह्या सामाजिक जाणिवेने ,तिने नाशिक ,मध्ये खालील मार्गदर्शन पर कोर्सेस सुरू केले.
      १. स्वतःची ओळख प्रभावीपणे कशी करून द्याल ?
       २ .व्यासपीठावर  ऊस्फूर्त , मुद्देसूद आणि प्रभावीपणे कसे बोलावे ?
       ३. बोलताना वजनदार आणि प्रभाव पाडणारे शब्द कसे वापरावे ?
       ४. नट , अभिनेता आणि वक्ता यात ,फरक काय असतो ?
       ५. सभेत आणि इतरत्र उत्साहपूर्ण , मनोरंजनात्मक संवाद , कसा साधावा ?
       ६. स्वतःचा व्यक्तीमत्व विकास कसा कराल आणि विकसित व्यक्तीमत्वाचा प्रभाव , समोरच्यावर कसा पाडाल ?
        ७.संकटात यश कसे शोधाल ?
        ८. आव्हानात दडलेले वरदान, कसे प्राप्त कराल ?
        ९ . स्वतःवर विश्वास ठेऊन , येणार्‍या वार्‍याची दिशा , तुम्ही कशी  बदलू शकता ? इत्यादी , इत्यादी.
             अशा प्रकारच्या विविध  विषयावर ,तिने स्वतः कार्यशाळा घेउन ,तसेच विविध महाविद्यालये , सभा , सम्मेलने , वृत्तपत्रे , रेडीओ , टिव्ही या माध्यमांचा उपयोग करून,  समाजातील जवळ जवळ ५० हजार  तरूणांना , पुढे जाण्याचे दृष्टीने मार्गदर्शन करून ,  खूपच प्रशंसनीय कार्य केलेले आहे.
          या प्रकारच्या समाज सेवेची, तिला आवड आहे व तोच तिने व्यवसाय म्हणून ही, स्विकारलेला आहे. या व्यवसायात ती संपूर्ण व्यस्त असते. सामाजिक जाणीव समाजात बिंबविण्या साठी ,तिने " मधुरंग प्राॅडक्शन्स " ही संस्था स्थापन केलेली आहे.
            आपल्यातल्या या आगळ्या वेगळ्या पैलूंचे श्रेय ती , तिचे कै. वडील , ती.आई आणि तिच्या ९४ वर्षांच्या आज हयात असलेल्या ,अाजोबांना देते.                                 
              झी टिव्ही वरील " सुपर वुमन " या कार्यक्रमात " सुपर स्टार , रजनीकांतची अम्मा " हा स्वलिखित आणि स्वअभिनित  कार्यक्रम ,सन २०११ मध्ये सादर करून , तिने परिक्षक , अभिनेता श्री. प्रशांत दामले आणि अभिनेत्री सौ. मृणाल कुलकर्णी ,यांचे हस्ते पारितोषिक मिळविलेले आहे. हा तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता.
               सौ. मधुरा म्हणजे , विद्यार्थी प्रीय प्राध्यापिका ,यशस्वी लेखिका , अभिनेत्री , उत्कृष्ठ सूत्रसंचालिका , उत्तम वक्ता ,सामाजिक जाणीवेने विविध संस्थात काम करणारी कार्यकर्ती , श्री. जयेश यांची प्रेमळ पत्नी आणि चि. ध्रुव याची आदर्श माता, या सर्व भूमिका एकाच वेळी निभावून नेणारे ,एकमेवाद्वितीय असे व्यक्तिमत्व आहे.
            अशा या विविधरंगी व्यक्तीमत्व असलेल्या, सौ. मधुरा भोकरे क्षेमकल्याणी, हिचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त हा लेख लिहून, तिला भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.
            फोटोत दिसत आहे , सौ. मधुरा भोकरे क्षेमकल्याणी , अभिनेता प्रशांत दामले व अभिनेत्री सौ. मृणाल कुलकर्णी यांचे कडून उत्तम लेखन आणि उत्तम सादरीकरणाचे , पारितोषिक स्विकारताना......

Saturday, 30 May 2020

श्री. बाळासाहेब जोगळेकर....वज्रादपि कठोराणि.....

संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे....
        वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि
       लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हसि ।।
अर्थ-  समाजातील लोकोत्तर महनीय  लोक  ,                       त्यांचा स्वभाव, परिस्थिती नुसार बदलू शकतात. आवश्यक असेल तेंव्हा,  स्वतःचे मन वज्रा पेक्षा कठोर करतात व गरज असेल तेंव्हा आपले मन, फुलाहून ही कोमल  करू शकतात. हाच त्यांच्या मोठेपणाचा ,विशेष आहे.
           या व्याख्येत बसणारे माझे एक स्नेही, मिरजेत  आहेत. त्यांचे नाव आहे श्री. बळवंत उर्फ बाळासाहेब जोगळेकर !  तुम्ही सरळ वागा , ते तुमच्याशी सरळ वागतील , पण तुम्ही वाकड्यात शिरलात की, बाळासाहेबांचा वाकडेपणा ,तुम्ही सहन सुध्दा करू शकणार नाही.
             बाळासाहेबांचे व्यक्तीमत्व, वेगळेच आहे. मध्यम उंची , गव्हाळ रंग , डोक्यावरील केसांचे जंजाळ गायब ,  डोळ्यात एक प्रकारची जरब , आवाजात ही दटावणीचा भाव ... एकूण सहजा सहजी कोणी ही, मित्रत्वाच्या भावनेने लगट  करायला येण्याचा विचार ही करणार नाही , असे हे व्यक्तीमत्व आहे.
              असे हे  कठोर वाटणारे बाळासाहेब , मनाने अतिशय हळवे ही आहेत. त्यांचे वडील त्यांच्या शेवटच्या दिवसात ,खूप आजारी होते. बाळासाहेबांनी आपल्या वडीलांची सहसा कोणी करणार नाही, इतकी सेवा, २४ तास खपून केली. अतिशय प्रेमाने केली. वडील गेल्या नंतर ते खूप दिवस अस्वस्थ होते. कारण एकच , वडीलांच्या वरचं नितांत प्रेम !  त्यांचा मुलगा शिकायला चेन्नईला गेला. मुलगा एकटा इतक्या लांब गेल्याने, त्याच्या काळजीने ते अस्वस्थ होते. कारण नितांत प्रेम ! वेळेला, " मी नातवंडांना सांभाळणार नाही , ते माझे काम नाही " ,असे म्हणणारे बाळासाहेब , नातवंडाला जरा जरी खरचटलं , तरी अस्वस्थ होतात , त्यांच्या डोळ्यात पाणी येते ,कारण नितांत प्रेम ! आपल्या मित्रमंडळींच्यावर ही ते नितांत प्रेम करतात , पण त्याच वेळी कोणी चुकला, तर  रागाने बोलून ,त्याला ठिकाणावर ही आणतात.  गोड बोलताना ,त्यांना शब्दांची वानवा असते , पण रागावून बोलताना, त्यांचे शब्द भांडार ओसंडून वाहते असते. माणसे त्यांचा राग लक्षात ठेवतात , पण त्या मागचे त्यांचे प्रेम, लक्षात घेत नाहीत.
              बाळासाहेब अत्यंत धार्मिक आहेत. दत्त महाराजांच्यावर त्यांची नितांत श्रध्दा आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या आणि कुरवपूरला दत्त महाराजांच्या दर्शनाला ,ते कितीदा गेलेत याची गणती करणेच अवघड आहे. गुरूचरित्राची त्यांनी असंख्य पारायणे , त्यात सांगीतलेले नीतिनियम कठोरपणे पाळून, केली आहेत.
                  बाळासाहेबांच्या घरात कोणता ही छोटा किंवा मोठा समारंभ असो , बाळासाहेबांच्या मित्रांचीच यादी , साधारण शंभर ते दीडशे जणांची असते. त्या वेळी ते आवर्जून सर्वांना बोलावतात.  त्यांनी ज्याला एकदा आपला मानले, त्याला ते सहसा दूर करत नाहीत. पण कांही वेळा जवळच्या माणसांचा खोटारडेपणा , बनवाबनवी,  या कारणांनी परिस्थिती, त्यांना तसं करायला भाग पाडते व लोक दुरावतात , ही वस्तुस्थिती आहे.त्या बद्दल  बाळासाहेबांना ,दोष देता येणार नाही.
         श्री. बाळासाहेबांना दोन मुले. मुलगा चि. प्रसाद , मर्चंट नेव्हीत अधिकारी आहे. मुलगी चि. सौ. भक्ती, नवर्‍या सोबत गुजराथ मध्ये ,जामनेरला असते. दोघे ही आपल्या आपल्या जागी उत्तम परिस्थितीत आहेत. सौ. वहिनींची बाळासाहेबांना समर्थ साथ आहे.
            अशा या " वज्रादपि कठोराणि व मृदूनि कुसुमादपि " असलेल्या श्री. बाळासाहेबांना आणि सौ. वहिनींना उदंड व निरामय आयुष्य मिळो , सर्व सुखांचा त्यांच्यावर प्रचंड वर्षाव होवो , ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.

Tuesday, 26 May 2020

" वधू वर सूचक मंडळ "...एक अनुभव !

" वधू वर सूचक मंडळ "....एक अनुभव.
*******************************
माझी पत्नी सौ. रजनी आणि तिच्या स्नेही सौ. निशा अभ्यंकर , अशा दोघींनी मिळून एकमताने सन् १९९५ ते सन् २००१ अशी सहा वर्षे, मिरज येथे ,वधू वर सूचक मंडळ चालविले. पैसे मिळविणे हा हेतू ,अजिबात नव्हता. कांही सामाजिक कार्य करावे ,या उद्देशाने आणि त्या काळची समाजिक गरज ओळखून, त्यांनी " वधू वर सूचक मंडळ " चालविले.                         सुरवातीला आपल्याकडे मुलांची किंवा मुलींची स्थळे नसतील ,तर आपल्याकडे कोण येणार ? हा विचार करून  मिरजेत,  सांगलीत , नात्यातल्या व ओळखीच्या, घरोघरी जावून ,त्यांनी स्थळांची माहिती गोळा केली. जरा बर्‍या पैकी स्थळांची माहिती गोळा झाल्यावर , मिरजेच्या मंगल कार्यालयात, " अक्षता वधू वर सूचक  मंडळाचा " बोर्ड लावला.
         वधू वर सूचक मंडळ नवीन असल्याने व या क्षेत्राचा अनुभव नसल्याने ,  शिवाय स्वभाव भिडस्त असल्याने , हे वधू वर सूचक मंडळ चालविताना आलेले अनुभव, मोठे मनोरंजक होते.
           एक दिवस, एक पाच फूट सहा इंच उंचीची मुलगी ,अवेळीच आमच्या घरी आली आणि " काकू , तुमच्याकडे सहा फुटाची मुलं आहेत का हो ? " असा प्रश्न तिने टाकला. बाजारात भाजी आणायला गेल्यावर, अमूक एक भाजी तुमच्याकडे आहे का ? असं विचारल्या प्रमाणे तिचा पवित्रा होता.
          आणखीन एकजण ओळखीचे गृहस्थ होते. त्यांची मुलगी लग्नाची होती. प्रथम आल्या आल्या ,त्यांनी जाहीर करून टाकलं " मी वधू वर सूचक मंडळाची फी देण्याचा प्रश्नच येत नाही , कारण मी घरच्या सारखाच आहे . मी आल्यावर, आदरातिथ्य म्हणून , तुम्ही मला चहा  मला चहा द्यालच !  आता माझ्या जावयासाठीच्या अपेक्षा सांगतो . रोज संध्याकाळी  ,माझ्या मुलीला फिरायला नेणारा मुलगा, जावई म्हणून, मला हवा आहे. मेकॅनिकल इंजिनीयर अजिबात नको. तो कंपनीत कामाला गेला की , रात्री कधी परतेल ते सांगता येत नाही " . त्यांची ही अजब अट पाहून आम्हाला हसावे की रडावे , तेच समजेना !
          वधू वर सूचक मंडळाची वेळ आणि वार ही , ठरविलेले होते. आमच्या गल्लीतील एक ओळखीच्या बाई ,वेळ संपल्यावर आरामात यायच्या , बैठकीवर पाय पसरून आरामात बसायच्या आणि स्थळे सावकाश लिहून घ्यायच्या. त्या वेळी ,आमच्याकडे वैयक्तीक कामासाठी कोणी आलं, तरी त्यांना त्याची फिकीर नसायची. भिडस्त स्वभावामुळे, आम्ही गप्प बसून, हे सर्व सहन करत असू.
          एकदा एक मुलगी आली आणि म्हणू लागली " काकू , ज्याच्या कडे स्वतःचा बंगला , चार चाकी , घरी नोकर चाकर असलेलं स्थळ आहे का ? " ही १९९५ ते २००१ या सालातली गोष्ट आहे. त्या वेळी मुलींचे पालक किंवा स्वतः मुली ही ,स्थळासाठी यायच्या. तिच्या वरा बद्दलच्या अटी ऐकून, तिथेच बसलेले सदगृहस्थ तिला म्हणाले " बाळ , तू पन्नास , पंचावन्न वर्षाच्या गृहस्थाशी लग्न कर , तरच तुझ्या या गहन अटी पूर्ण झालेल्या तुला मिळतील "
            असेच एक दिवस एक गृहस्थ आले आणि म्हणाले " आमच्या मुलीला बस लागते , तेंव्हा तुम्ही रेल्वेने जाता येईल ,अशाच गावची स्थळं मला सांगा " खरं तर बस लागू नये याची काळजी घेता येते , हे त्या गृहस्थांच्या गावी ही नव्हते. काय सांगायचं अशा लोकांना ?
           त्याच वेळी पुण्याहून आलेल्या, एका मुलाच्या वडीलांनी सांगीतले की , पुण्यात एका वधू वर सूचक मंडळात, ते गेले होते. तिथे एका मुलीच्या अपेक्षा ,त्यांच्या वाचनात आल्या. तिने लिहीले होते , मुलगा एकूलता एक असावा ,  पुढे त्यांनी जे सांगीतले ते कल्पनेच्या पलिकडचे होते . मुलाच्या आई वडीलांच्या फोटोला " हार " घातलेला असावा. हे ऐकून आम्ही सर्द झालो.
          आता काळ बदलला आहे. १९९५ ते २००१ या काळात ,मिरजे सारख्या मध्यम शहरात ,बहुतांशी मुलींचे पालक किंवा स्वतः मुली स्थळासाठी येत असत. आता मुलांचे पालक व मुले, वधूच्या शोधात फिरत असतात, असे ऐकले आहे.
      आमच्या " अक्षता वधू वर सूचक " मंडळा तर्फे ज्यांचे विवाह ठरले , त्या पैकी कांही जण आज ही संपर्कात आहेत ,याचे समाधान निश्चित आहे.
         वधू वर सूचक मंडळ चालविणे , हा एक वेगळा अनुभव होता, हे मात्र नक्की !

Monday, 25 May 2020

श्री. बाबा अर्जुनवाडकर , फोटोग्राफीचा बादशहा...

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , ती म्हणजे पुण्यातील एके काळचे प्रसिध्द फोटोग्राफर श्री. नीलकंठ विनायक उर्फ बाबा अर्जुनवाडकर यांची ! मला सांगायला अभिमान वाटतो की बाबा हा माझा आत्ते भाऊ आहे.
           बाबाचे वडील हे संस्कृत पंडीत होते. त्याचे संस्कृत पंडीत असलेले काका , श्री. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे नाव पूर्वीच्या पिढीतील सर्वांना माहिती असेलच ! बाबाचे वडील संस्कृत पंडीत होतेच , पण त्यांना फोटोग्राफीची ही विशेष आवड होती. तो वडीलोपार्जित वारसा बाबाने निष्ठेने चालविला.
             बाबाचे वडील लवकर गेले त्या मुळे बाबा आणि त्यांच्या सर्व कुटूंबाला बेळगावहून पुण्याला यावे लागले. पुण्यात आल्यावरचे त्या सर्वांचे दिवस अतिशय कष्टात गेले. पुण्यात आल्यावर पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून बाबाने फोटोग्राफी सुरू केली. व्यवसाय करायचा म्हटलं की , ज्याला बाजारात मागणी आहे , तेच करावे लागते. बाबाने लग्न , मुंजी , शाळांची स्नेह संम्मेलने यांचे फोटो काढण्या साठी अक्षरशः रात्रंदिवस धावपळ केली. मिळेल ते काम करायचे , पण ते मन लाउन आणि जीव ओतूनच करायचे  , ही त्याची निष्ठा होती. कांही दिवसा नंतर ज्यांना फोटोग्राफीतलं कळतं , त्यांना याची जाणिव झाली की , बाबाच्या फोटोत कांही तरी वेगळे सौंदर्य आहे. जागा तीच , माणसे ही तीच , पण दुसर्‍या फोटोग्राफरने काढलेल्या फोटो पेक्षा, बाबाचा फोटो सरसच असायचा.  ज्याचा फोटो घेतोय त्याची भावमुद्रा , कॅमेरा अॅंगल , फोटोची क्लॅरिटी , करेक्ट एक्सपोजर इत्यादी तांत्रिक बाबी शिवाय बाबाची जी, साधनेतून कमविलेली सौंदर्य दृष्टी होती , त्या मुळे , त्याने काढलेला फोटो कधी ही उजवाच असायचा !
            बाबाला संगीताची ही खूप आवड आहे. तो त्यातला दर्दी ही आहे. गायकाने पहिला " साssss" लावला की, राग ओळखणारे " कानसेन " असतात. बाबाचा त्या " कानसेनात " बराच वरचा नंबर आहे.
         पुण्यातल्या " सवाई गंधर्व " या कार्यक्रमाला तो आवर्जून हजेरी लावतोच लावतो. तिथे गायन किंवा जी कला सादर होत असेल , त्यांचे असंख्य फोटो बाबाने काढलेले आहेत. हे सर्व फोटो तुम्हाला त्याच्या फेसबुक अकाउंटवर पहायला मिळतील. अनेक नामवंत कलाकारांनी , बाबाच्या फोटोचे कौतूक करून , ते आवर्जून त्याच्या कडून , स्वतः साठी मागून ही घेतलेले आहेत. असे फोटो त्यांच्या " ड्राॅईंग रूम " ची शोभा नक्कीच वाढवत आसणार , ही खात्री आहे !
           बाबाचे आणि सौ. अपर्णा वहिनींचे, आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे, ते आपल्या प्रेमळ स्वभावाने , सर्व नातेवाईकांशी , संबंध आणि संपर्क ठेउन आहेत. आज काल हे दुर्मिळ आहे.
             असा हा माझ्या पेक्षा तीन वर्षांनी वडील असलेला , माझा आतेभाऊ बाबा , सध्या, खूप अाजारी आहे. त्याला दोन मुली आहेत. चि. सौ. मधुरा आणि चि. सौ. सायली  ! त्या दोघी , त्याची आणि सौ. अपर्णा वहिनींची काळजी घेतात. त्यांना माझ्या दुसर्‍या आतेभावाचा मुलगा चि. ॐकार याची ही मोलाची साथ असते. सौ. अपर्णा वहिनींची ही तब्बेत उत्तम आहे , अशातला भाग नाही. बाबा आणि सौ. वहिनी एकमेकाला सांभाळून राहतात.
          अशा या माझ्या आत्तेभावाची म्हणजेच बाबाची, तब्बेत लवकर सुधारो , त्याला आणि सौ, अपर्णा वहिनींना परमेश्वराने उत्तम निरामय आयुष्य द्यावे , अशी परमेश्वरा जवळ कळकळीची प्रार्थना करतो आणि थांबतो.
         खाली फोटोत कॅमेर्‍यासह दिसतो तो श्री. बाबा अर्जुनवाडकर . बाकीचे त्याने काढलेले फोटो आहेत. त्यात आहेत , पंडीत जसराज , कौशिकी चक्रवर्ती , उस्ताद झाकीर हुसेन आणि हरिप्रसाद चौरासिया !




Thursday, 21 May 2020

प्रिय मित्र श्रीकांत पोंक्षे....कठीण समयी कामास आलेला मित्र !

माझ्या लग्नाची चित्तरकथा ज्याला अथ पासून इति पर्यंत माहिती होती आणि ज्याने ऐन मोक्याच्या क्षणी, आम्हाला दोघांना मोलाची मदत केली , असा माझा मिरजेचा खास जवळचा मित्र म्हणजे , श्री. श्रीकांत दिनकर पोंक्षे . आम्ही त्याला " श्री " च म्हणतो !
        श्री बरोबर माझे सुरवातीला अजिबात सख्य नव्हते. पण नंतर आमची मैत्री अशी जमली की , एखाद्याला वाटावे की , यांचे जन्म जन्मांतरीचे मैत्र आहे. मिरजेत आमची घरे जवळ असल्याने  , दिवसातून आम्ही भरपूर वेळी  एकमेकांना भेटत असू .
         श्री हा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियंता आहे. तो जर मिरज सोडून बाहेर नोकरीसाठी गेला असता तर , स्वतःच्या बुध्दीमत्तेच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर , तो कुठल्या ही खासगी कंपनीत नक्की " जनरल मॅनेजर " किंवा त्या ही पेक्षा वरच्या पदावर गेला असता , असे मी खात्री पूर्वक म्हणू शकतो.
        पण तो योग नव्हता. कारणे दोन . तो आई वडीलांचा एकूलता एक मुलगा होता आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे त्याची तब्बेत ! तब्बेत मना सारखी साथ देत नसल्याने त्याला मिरज सोडायला जमले नाही.
         तो मिरज सारख्या मध्यम दर्जाच्या गावात एका कंपनीत अभियंता होता . त्या शिवाय तो सांगली ITI मध्ये व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून जात होता. दोन्ही ही ठिकाणी त्याने आपल्या ज्ञानाने आणि कार्यकौशल्याने चांगले नाव कमविले होते.
          त्याला दोन मुले. दोघे ही उत्तम अभियंता आहेत. दोघे ही पुण्यात असतात. पुण्यात घर घेणे किती अवघड आहे याची बहूतेकांना कल्पना असेलच !  मुलांच्यासाठी व त्यांच्या जवळ आपण दोघांनी रहायचेच  , या जिद्दीवर  , त्याने एका झटक्यात , आपला मिरजेतला राहता बंगला विकला आणि पुण्यात मुलांची व आपली रहायची व्यवस्था केली. त्याचा हा निर्णय त्यावेळी फार धाडसी होता. पुण्यात , मुले , सुना आणि श्री व सौ. वहिनीं यांच्यात मतभेद झाले   व कांही कारणांनी एकत्र राहणे कठीण झाले , तर त्या दोघांनी काय करावं ? अशी भिती , आम्हाला त्या वेळी ,अस्वस्थ करीत असे. पण श्री आणि सौ. वहिनी अतिशय निर्धास्त होते .  चांगल्या भावनेनं केलेलं कोणतं ही काम , चांगलेच फळ देते  ! ही उक्ती सार्थ ठरली !
         आताची आनंदाची बाब म्हणजे , दोन्ही मुलांचे पुण्यात समोरा समोर फ्लॅट आहेत. तो आणि सौ. वहिनी दोघे ही आपली दोन्ही मुले आणि सुना , नातवंडासह पुण्यात आनंदात आहेत. आज काल आई वडील आणि मुले वेगळी वेगळी राहण्याच्या जमान्यात , श्री पोंक्षे च्या घरातला एकोपा वाखाणण्या सारखाच आहे. सर्वजण श्री आणि सौ. वहिनी यांचा योग्य मान ठेवतात आणि त्यांची मना पासून काळजी ही घेतात . हे खूप खूप दुर्मिळ दृष्य आहे . या बाबतीत ते दोघे नक्कीच भाग्यवान आहेत . श्री ला सौ. वहिनींची समर्थ साथ नक्कीच आहे.
          अशा माझ्या दिलदार आणि अगदी जवळच्या मित्राला उत्तम आयुरारोग्य लाभो. त्याच्या वर आणि त्याच्या सर्व कुटूंबावर सर्व सुखांचा वर्षाव होवो , ही सदिच्छा देतो आणि थांबतो.

Monday, 18 May 2020

औरंगाबादकर सरांच्या फार्म हाउसवर फॅमिली गेट टूगेदर,...

           आज सकाळी आमच्या नाशिक मधील " निरामय जाॅगर्स " या फिरायच्या ग्रुपला श्री. व सौ. औरंगाबादकर सरांनी अल्पोपहारासाठी त्यांच्या फार्म हाउसवर बोलावले होते. विशेष म्हणजे त्यांनी श्री. आणि सौ. असे दोघांना ही बोलावले होते. सर्वसाधारण पणे आम्ही सर्वजण पार्टीच्या निमित्त एकत्र येतो , तेंव्हा फक्त पुरूषच असतो. पण श्री. व सौ. औरंगाबादकर सरांनी जोडीने येण्याचे निमंत्रण दिल्याने कार्यक्रमाचे वेगळेपण जाणवले . सर्वांना अतिशय छान वाटले
               श्री. औरंगाबादकर सरांचे फार्म हाउस अतिशय छान आहे. नाशिक शहरा पासून अंदाजे दोन किंवा तीन किलोमीटर अंतरावर आहे. एकदम प्रशस्त वास्तू ! स्विमिंग पूल असल्याने छानच वाटले. अवती भोवती छान झाडे , वेली यांनी परिसर सुशोभित केलेला आहे. या परिसराची देखभाल नियमित आणि व्यवस्थित व्हावी या साठी स्वतंत्र माणूस त्यांनी तिथेच वास्तव्यासाठी ठेवला आहे. श्री. व सौ. औरंगाबादकर हे दोघे ही दिलदार असल्याने , आम्हाला खाण्याचे विविध पदार्थ त्यांनी खास आमच्यासाठी तयार केलेले होते , कांही बाहेरून मागविलेले ही होते. थोडक्यात सर्व मंडळी परिसर पाहून आणि पोटोबा करून तृृृृृृृप्त झाले .
त्या नंतर काढलेला हा ग्रुप फोटो.
फोटोत पहिल्या ओळीत....
१. सौ. औरंगाबादकर २. सौ. गुडसूरकर ३. सौ. ठाकूर ४. सौ. कुलकर्णी (SDK) ५.सौ. खाडिलकर  ६. सौ. जोशी. ( रामभाउ )
दुसर्‍या ओळीत...१.सौ. दीक्षित २. सौ. कुलकर्णी ( DG) ३.सौ. पटेल ४. सौ. भिंगे ५. सौ. जोशी (JOTO) ६. सौ. दुसाने
तिसर्‍या ओळीत .. १.श्री. विजयराव दुसाने २. श्री. विलासराव  भिंगे ४. श्री. दिलीपराव कुलकर्णी ५. श्री. शामसुंदर कुलकर्णी ( SDK ) ६. श्री. जयप्रकाशराव जोशी ( JOTO) ७. श्री. रामभाउ जोशी.
सर्वात शेवटची मागची ओळ..१.श्री. हिप्पळगावकर  २. श्री. गुडसूरकर सर ३.श्री. राजू पटेल ४. श्री. मुकूंदराव खाडिलकर. ५. श्री. विलासराव औरंगाबादकर सर ६. . श्री. शिवाजीराव वाटपाडे ७. श्री. नवनीतभाई गुजराथी सर ८. श्री. धनसिंग ठाकूर ९. श्री. सुरेश दीक्षित.
अनुपस्थित. १. श्री. व सौ.  सुधाकर केसकर सर २. श्री. व सौ. R D जोशी. ( व्याही )

श्री. बी. के. उर्फ नितीन वाटवे...माझा भाउच !

आपण टिव्हीवर पाहतो की , पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटायला गेले की , त्यांच्या आई प्रेमाने त्यांना घास भरवतात , तोंड स्वतःच्या रूमालाने पुसतात , मातृप्रेमाने वागतात. कारण मुलगा किती ही मोठा झाला तरी तो आईला लहानच असतो.
        थोडक्यात आपल्या समोर जन्मलेली व्यक्ती किती ही मोठी झाली , तरी आपल्याला ती लहानच वाटते. आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे , जी माझ्या समोर जन्मली आणि असिस्टंट कमिशनर , फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन , महाराष्ट्र राज्य , या सुपर क्लासवन्  पदावरून सेवानिवृत्त झाली. या व्यक्तीचे नाव आहे , श्री. भास्कर कृष्ण वाटवे , बी. के. वाटवे . घरचे आणि आम्ही सर्व त्यांना नितीन म्हणतो.
        चि. नितीन हा लहानपणा पासून कठोर शिस्तीत वाढविला गेलेला मुलगा आहे ! अभ्यासात हुषार ! स्वतःच्या जिद्दीने बी. फार्म झाला , पुढे एम्. फार्म. ही झाला. प्रथम कांही वर्षे खासगी औषध निर्माण कंपनीत नोकरी केली. तिथे तो औषध निर्माण शास्त्राच्या नियमा प्रमाणे काटेकोरपणे वागला. ज्या क्षणी हे नियम पाळले जात नाहीत असे वाटले , त्या क्षणी ती नोकरी त्याने सोडली.
        पुढे महाराष्ट्र शासनाच्या फुड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याचे सिलेक्शन झाले. तिथे ही तो अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावाजला गेला. मुख्य म्हणजे त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान आणि आपल्या विषयाशी निगडीत  , शासकीय कायद्यांचा समग्र अभ्यास त्याने केलेला होता. सर्व साधारणपणे इतका सखोल आणि समग्र अभ्यास करण्याची कुणाचीच तयारी नसते. पण चि. नितीन म्हणजे जे काम हाती घेईल ते काटेकोरपणे , शासकीय नियमांना आधीन राहून , पण  उगीचच  कुणाला ही त्रास होऊ नये ,या मानसिकतेने वागणारा अधिकारी असल्याने , त्याची जिथे जिथे बदली झाली, तेथील त्याचे वरिष्ठ आणि कनिष्ठ ,दोघे ही त्याला आज ही सेवानिवृत्ती नंतर सुध्दा ,मानाने वागवितात.
         सेवानिवृत्ती नंतर ही तो खूप व्यग्र असतो ! त्याच्या डिपार्टमेंटचे शासकीय अधिकारी ,गुंतागुंतीच्या प्रश्नात आज ही त्याचा सल्ला घेण्यासाठी येतात .कांही खासगी औषध निर्माते आणि विक्रेते औषध शास्त्राच्या नियमांच्या विषयी शंका निर्माण झाल्यास, त्याचे निराकरण करून घेण्यासाठी त्याला भेटतात.   कुणावर  अन्याय होऊ  नये , पण त्याच वेळी शासकीय नियम ही पायदळी तुडविले जाउ नयेत , या विषयी तो दक्ष असतो.
         चि. नितीनचा ओशो यांच्या तत्वज्ञानाचा प्रगाढ अभ्यास आहे. मी ओशो यांच्या तत्वज्ञाना विषयी पूर्वग्रह दुषित होतो. पण त्याच्याशी त्या बाबत चर्चा केल्या नंतर ,मला ही त्या तत्वज्ञानाची गोडी लागली. तसेच हिन्दुधर्म आणि तत्वज्ञान , यांचा ही त्याचा सखोल अभ्यास आहे व तो त्या बाबतीत खूपच आग्रही आहे. आज काल हे खूप दुर्मिळ आहे.
       चि. नितीन जन्मला त्या वेळी आम्ही सांगलीतील त्यांच्या वाड्यात भाडेकरू होतो. पण चि. नितीनने आज ही आमचे संबंध अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे ठेवले आहेत.
            त्याला दोन मुले आहेत. थोरला मुलगा मर्चंट्स नेव्ही मध्ये अधिकारी आहे व धाकटा मुलगा अभियंता आहे. दोन्ही मुले आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत. सौ. वहिनींची त्याला समर्थ साथ आहेच ! चि. नितीनच्या आई श्रीमति सुधाताई ही त्याच्या जवळ असतात.
           अशा या माझ्या डोळ्या समोर वरिष्ठ अधिकारी झालेल्या , पण मला तो अजून ही लहानच असलेल्या चि. नितीनला आणि त्याच्या कुटूंबियांना भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो .

Saturday, 16 May 2020

अनुभव करोना......

" अनुभव करोना "
*****************
आज दि. १५ मे २०२० रोजी ,माझा मेरीतला स्नेही श्री. अनिल कुलकर्णी , वय ७१ , हाॅस्पिटल मधून घरी गेला.
           त्याला ३० एप्रिलला स्कूटरचा अॅक्सिडेंट झाला. स्कूटरवर बसूनच त्याने साईड स्टॅंड लावला. तो लागला असे त्याला वाटले. पण तो लागला नव्हता. त्याने स्कूटर सोडताच तीच त्याच्या पायावर पडली. तो ही पडला. त्याचे खुब्याचे हाड फ्रॅक्चर झाले. डाव्या खुब्यातला बाॅलच तुटला . तसेच डाव्या हाताच्या मनगटाला ही फ्रॅक्चर झाले होते.  तो पडल्या पडल्या, शेजार पाजारच्या लोकांनी त्याला गंगापूर रोड जवळील डाॅ. उमेश कुलकर्णी यांच्या दवाखान्यात अॅडमिट केले. एक्स रे वगैरे काढले आणि दोन्ही ठिकाणचे आॅपरेशन करण्याची गरज असल्याचे डाॅ. नी सांगीतले.
             त्याचा मुलगा , सून , नात पुण्याला आणि जावई ,मुलगी , नात मुंबईला असतात. प्रयत्न करून ही त्यांना करोनाच्या लाॅकडाउन मुळे आणि जिल्हा बंदी मुळे , येणे जमणार नाही , हे नक्की झाले. मग त्याच्या मुलाने डाॅ. उमेश कुलकर्णी यांना फोन करून , तुम्ही सर्टिफिकेट दिले तर मी पुन्हा प्रयत्न करतो ,असे सांगीतले. त्यावर डाॅ. उमेश कुलकर्णी म्हणाले " तू नाशिकला आलास तर तुझ्या वडीलांना व पर्यायाने आम्हा सर्वांना करोना इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. शिवाय तू पुण्याहून आलास तर, पोलिस प्रशासन ,तुला येथे प्रथम १४ दिवसाचे क्वारंटाईन करतील. तेंव्हा तू येउ नकोस. आम्ही व तुझ्या बाबांचे मित्र मिळून त्यांची काळजी घेउ ".
             मग त्याच्या आॅपरेशनच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व टेस्ट्स करण्यात आल्या. त्यात करोना संबंधीची ही टेस्ट होती. सर्व टेस्ट रिपोर्टस नाॅर्मल आल्या नंतर ,त्याचे ४ मे रोजी मेजर आॅपरेशन झाले. खुब्याचा बाॅल बदलण्यात आला. त्या दिवशी रात्री तो रिकव्हरी रूम मध्येच होता. मग सौ. वहिनींच्या बरोबर सोबतीला माझी मिसेस सौ, रजनी , रात्रभर तिथे थांबली.
            आॅपरेशनच्या तिसर्‍या दिवशी डाॅक्टरांनी त्याला वाॅकरच्या सहाय्याने थोडेफार चालविले. पाचव्या दिवशी त्याला जिना चढायला लावला आणि डिसचार्ज घ्यायला परवानगी दिली.
             आता प्रश्न होता तो म्हणजे घरी गेल्यावर टाॅयलेटला कसे जायचे ? घरातल्या घरात फिरताना आधार कोण देणार ?  समजा चालताना याचा तोल गेला, तर त्या वहिनींना , ज्यांचे वय ६६ आहे , शिवाय त्यांचे गुडघे ही खूप दुखतात , अशा परिस्थितीत त्याला आधार देणे, झेपेल का ? नाही तर  दोघे ही पडायची भिती ! हाॅस्पिटलमध्ये या सर्व गोष्टींच्या वेळी मदत करायला हाॅस्पिटलची माणसे असायची. घरी हे सगळे कसे जमणार ? शिवाय तो पहिल्या मजल्यावर राहतो. लिफ्ट नाही.
ही सर्व परिस्थिती त्याने डाॅ. ना सांगीतली. डाॅ. नी त्याला पुढे सात दिवस हाॅस्पिटल मध्ये राहण्याची परवानगी दिली.
            हाॅस्पिटल मधील माणसांच्या सहकार्याने या सात दिवसात त्याने वाॅकर सह व्यवस्थित चालण्याचे आणि जिना चढण्याचे प्रॅक्टीस केले व मुख्य म्हणजे आपल्याला घरी गेल्यावर कुणाची ही मदत न घेता , एकट्याने हे सर्व करण्या इतपत आत्मविश्वास स्वतःत निर्माण केला.
                आज त्याला डिसचार्ज मिळाला. मी व माझी पत्नी आणि त्याच्या मुलाचा एक मित्र असे त्याला हाॅस्पिटल मधून कारने घरी नेले. वाॅकरच्या मदतीने तो जिन्या पर्यंत गेला. नंतर हळू हळू जपून जपून, तो कुणाच्या ही मदती शिवाय, जिना चढून घरात गेला.
त्या क्षणी आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले होते.
             मुलगा आणि मुलगी, करोना लाॅक डाउन मुळे ,जवळ नसताना त्या दोघांनी ज्या धीराने आल्या प्रसंगाला तोंड दिले , त्या बद्दल ते दोघे अभिनंदनास निश्चितच पात्र आहेत.
           करोना आणि लाॅकडाउनच्या काळातला हा एक वेगळा " अनुभव करोना ".......

Thursday, 14 May 2020

नाटककार श्री. राम कुलकर्णी....माझा मित्र !

मराठी माणूस म्हटलं की तो नाटकवेडा असणार , हे वेगळे सांगावे लागतच नाही.  पण नाट्यलेखनाचे वेड ही दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे . त्याला दैवी देणगीच असावी लागते.
       आज मी तुम्हाला माझ्या नाट्य लेखक मित्राची ओळख करून देणार आहे. त्याचे नाव आहे श्री. राम कुलकर्णी. वास्तव्य मिरज.
         राम हा बॅंकेत नोकरीला होता. पण त्या ही अरसिक वातावरणात त्यानं आपली रसिकता जपली आणि ती फुलवली ही ! त्या फुलोर्‍याचा आनंद त्याने दुसर्‍यांना भरभरून मुक्त हस्ते वाटला.
           राम, मिरज सारख्या छोट्या शहरातच राहिला. नाटकात काम करण्याची संधी मिळविण्यासाठी लोक घरदार सोडून ,पुण्या मुंबईची वाट धरतात . हा तर नाटककार माणूस ! पण याने नोकरीच्या निमित्ताने म्हणा, किंवा अन्य कांही कारणाने म्हणा, पण मिरज सोडलं नाही.
           नटवर्य प्रभाकर पणशीकर उर्फ पंत ,यांनी त्याचे नाटक वाचून ,आपल्या " नाट्यसंपदा " मार्फत ,करण्याचे ठरविले ही असते. नाटका संबंधी त्यांची चर्चा चालू होती आणि त्याच वेळी पंतांचे निधन झाले व ती उत्तम संधी रामच्या हातून निसटली.
        रामने नाटक लिहीताना फक्त ठराविक साच्याची नाटकेच लिहीली असे नाही.  कौटूंबिक , सामाजिक , संगीतमय , रहस्यमय अगदी वगनाट्य ही , असे विविध विषय त्याने लीलया हाताळले आहेत. राम हा कायम एखाद्या नाटकाच्या तंद्रीतच असतो. तो खरा खरा नाट्यवेडा नाटककार आहे.
         त्याच्या रिंगण , निष्पर्ण झाले गाणे , सारे ययाती , गोष्ट स्वप्नांची , निशीगंधाच्या फुलाचे स्वस्तिक , राॅंग नंबर , लाकुडतोड्याचा वग , क्विन्स चेंबर इत्यादी नाटकांना मानाचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
         वैयक्तीकरीत्या नाटककार म्हणून , कुसूमाग्रज करंडक ,  पु. भा. भावे नाट्यसेवा पुरस्कार , भावगीत लेखन पुरस्कार , राम कोलारकर सर्वोत्कृष्ठ कथा पुरस्कार , मिरज भूषण पुरस्कार यांनी त्याला गौरविण्यात आले आहे.
         इतके पुरस्कार मिळून ही त्याचा अहंकार न बाळगता , जमिनीवर पाय असलेल्या ,या साध्या आणि सरळ स्वभावी मित्राचा, मला सार्थ अभिमान आहे.
          रामला दोन कन्यका आहेत. एक नामांकित आर्किटेक्ट आहे तर दुसरी शिक्षण क्षेत्रात आपले नाव उज्वल करीत आहे. सौ. संजीवनी वहिनींची त्याला समर्थ साथ आहेच !
          अशा या माझ्या मित्राला परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Saturday, 9 May 2020

चि. विवेक वसंतराव कुलकर्णी....माझा आदर्श मामे भाउ.

         सर्वसाधारणपणे ,कोणत्या ही क्रियेला प्रतिक्रिया देताना माणसे,फारसा विचार करत नाहीत. पण जर समोरच्याची क्रिया थोडी झेलली , प्रतिक्रिया देताना जरा विचार केला , थोडं नमतं घेतलं ,तर प्रश्न सुटायला नक्कीच मदत होते.  थोडक्यात माणसाने विवेक मोकळा न सोडता , बाळगला तर शांति आणि समाधान लाभते.
      आज मी ,अशाच विवेकी व्यक्तीची ओळख करून देणार आहे. त्याचे नाव आहे...श्री. विवेक वसंतराव कुलकर्णी. माझा मामे भाऊ . माझ्या पेक्षा वयाने लहान आहे , पण त्याचे गूण घेण्यासारखे आहेत.
         चि. विवेक कधी चिडून, रागावून ,अद्वातद्वा बोललाय , विवेक सोडून बोललाय, असं मला तरी माहिती नाही. कौटूंबिक कलहाचे प्रसंग, प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. पण अशा प्रसंगी संयम बाळगला, तर प्रश्न ही सुटतात आणि संबंध ही बिघडत नाहीत. चि. विवेकने अशा प्रकारे खुबीने वागून आपले संबंध ,कधीच बिघडू दिले नाहीत. सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना धरून राहणारा, म्हणून मला चि. विवेकचा नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे.
        चि. विवेक अभियंता आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाबंधारे खात्यातून, चांगल्या अधिकारी पदावरून तो ,सेवानिवृत्त झालेला आहे. नावा प्रमाणेच तो विवेकी असल्याने ,नोकरीत ही त्याच्या कडून , वादाचे प्रसंग सहसा आलेच नसावेत असे मला वाटते.
        मध्यंतरी चि. विवेकच्या बहिणीला, अर्धांगवायूचा त्रास झाला. त्या वेळी चि. विवेक आणि त्याची पत्नी सौ. शुभदा वहिनी यांनी घेतलेले परिश्रम, अत्यंत वाखाणण्या सारखेच आहेत.  दोघे ही त्या वेळी नोकरीत होते. आपली नोकरी, शिवाय घरचे व्याप सांभाळून ,त्यांनी ही जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली , ही आदर्शवत आणि तितकीच दुर्मिळ बाब आहे असे मला वाटते.
         आर्थिक नियोजन करणे , कुठे केंव्हा कशी गुंतवणूक करायची याचे नियोजन करणे ,या बाबतीत चि. विवेक अतिशय काळजी घेतो. या बाबतीत त्याला त्याची पत्नी, सौ. शुभदा वहिनी ,यांचे मोलाचे सहाय्य असते.
         आज काल शेती असणारे ब्राह्मण ,खूप कमी आहेत. चि. विवेक हा त्या पैकी एक आहे, ही गोष्ट ही मला अभिमानास्पद वाटते !
       चि. विवेकला दोन मुले. मोठा मुलगा अमेरिकेत असतो व धाकटा मुलगा पुण्यात असतो. मुलांच्यासाठी ही, विवेकने, खूप केले आहे. दोन्ही मुले आपापल्या जागी सुस्थितीत आहेत . चि. विवेकला सौ. शुभदा वहिनींची समर्थ साथ आहेच !
          अशा या विवेकी आणि बर्‍याच बाबतीत ज्याचा आदर्श घ्यावा, अशा चि. विवेकला आणि चि. सौ. शुभदा वहिनींना ,परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे आणि त्याच्यावर सर्व सुखांचा निरंतर वर्षाव व्हावा , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Monday, 4 May 2020

ती. सुधाताई वाटवे....लढवय्या स्त्री...

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, ती एका लढवय्या स्त्रीची , ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडून ,आपले  कर्तव्य मोठ्या निष्ठेने आणि नियोजनबध्द रीतीने पार पाडले.
       मी ओळख करून देणार आहे त्यांचे नाव आहे, श्रीमति वसुधा कृष्ण वाटवे. आजचे त्यांचे वय आहे ८९ वर्षे. तब्बेत आज ही वयाच्या मानाने उत्तम आहे. मी व त्यांचे परिचित त्यांना सुधाताई असे म्हणतो.
        ती. सुधाताईंचे मिस्टर डाॅक्टर होते. डाॅ. कृष्ण वाटवे. त्या काळातले MBBS. सांगलीत उत्तम प्रॅक्टिस होती. पण डायबेटिसने घात केला. प्रकृतीत गुंतागुंत होत गेली व त्यातच त्यांचे निधन झाले. सौभाग्यवती सुधाताई, एका क्षणात ,श्रीमति सुधाताई झाल्या. वय अवघे ३५ च्या आसपास. तीन मुले , सासू सासरे यांची संपूर्ण जबाबदारी, अचानक अंगावर पडली.  तशा ही प्रतिकूल  परिस्थितीत ,त्यांनी आपले पदवीचे शिक्षण आणि बी, एड . ही  पूर्ण केले. नंतर एका शाळेत त्या शिक्षिका , म्हणून रूजू झाल्या.
         सासू सासर्‍यांचं रोजचं हवं नको पहायचं. तीन मुलांनी व्यवस्थित मार्गी लागावं म्हणून ,त्यांच्यावर लक्ष ठेवायचं , घरातलं सगळं पहायचं व शिवाय नोकरी ही करायची. कसं केलं असेल त्यांनी ?  नवर्‍याची वडीलोपार्जित शेती होती. त्याचे ही प्राॅब्लेम्स ,कांही कमी नसत. एक चांगली बाब म्हणजे त्यांचे शेतीचे वाटेकरी, अतिशय प्रामाणिक व मदत करणारे होते.
            मुले मोठी झाली. त्यांचा शिक्षणाचा खर्च , घरखर्च , त्या मानाने शिक्षक या नात्याने मिळणारी आवक, मर्यादितच होती. अशा ही अवस्थेत त्यांनी केवळ स्वतःच्या हिंमतीवर  ,कोणाच्या ही मदतीची अपेक्षा न धरता, पुढचा  संसार अक्षरशः ओढला. मुलांना व सासू सासर्‍यांना कांहीही कमी पडू न देता....
            आता वयाच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना ,त्यांना अतिशय समाधान आहे. इतरांना कुणाला त्या अमूक ठिकाणी कमी पडल्या , तमूक ठिकाणी कमी पडल्या, असे म्हणता येईल ही ! पण त्या त्या वेळी त्यांनी आर्थिक किंवा इतर बाबतीत घेतलेले निर्णय, त्या त्या परिस्थितीचा त्रयस्थपणे विचार केल्यास, योग्यच होते,  असे काळाच्या कसोटीवर सिध्द झालेले आहे.
           ती. सुधाताईंचा स्वभाव तसा कडक व काटेकोर आहे. पण तो त्यांनी माहेरी व सासरी जे अनुभवले , भोगले, त्या मुळेच तो तसा तयार झालेला आहे. त्या बाबतीत त्यांना मुळीच दोष देता येणार नाही.
              ती.सुधाताईंचा मुलगा शासकीय नोकरीतून ,उच्चपदस्थ अधिकारी म्हणून ,निवृत्त झालेला आहे. एक मुलगी ,डाॅक्टर पत्नी आहे. धाकटी मुलगी कॅन्सरने गेली. तिच्या अकाली निधनाचे ,त्यांच्या सर्व कुटूंबियांना दुःख आहेच ! सुधाताईंना चार नातवंडे आहेत. सर्वजण आपल्या आपल्या जागी ,सुव्यवस्थित आहेत.
          ती. सुधाताई सध्या मुला सोबत सांगली , ( विश्रामबागला) राहतात. त्यांना डायबेटिस आहे ,पण गोळी न घेता केवळ आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवून , त्यांनी तो काबूत ठेवला आहे , ही बाब खूप महत्वाची आहे.
           अशा या आमच्या आदर्श गृहिणी असलेल्या ती. सुधाताईंना उत्तम निरामय आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.