Friday, 31 May 2019

श्री. शामकुमार दीक्षित .....शामभैय्या

पंच्याहत्तराव्या वर्षी माणसाचे मन लहान मुला सारखे निर्मळ आहे , असे सांगीतल्यास कदाचित तुमचा विश्वास ही बसणार नाही. पण हे सत्य आहे. एक व्यक्ती अशी नक्की आहे व ती व्यक्ती माझी स्नेही आहे याचा मला अभिमान आहे.
             त्या व्यक्तीचे नाव आहे श्री. शामकुमार नरहर दीक्षित उर्फ एस्. एन्. दीक्षित म्हणजेच आमचा मेरीतील मित्रांचा " शामभैय्या " !अतिशय प्रेमळ , मनात कोणता ही आप पर भाव नाही , प्रत्येक गोष्ट चांगलीच आहे , असे सरळपणे मना पासून मानून चालणारा असा  हा आमचा शामभैय्या आहे. इतकं नितळ मन आजच्या काळात पहायला फारच क्वचित सापडेल !
              शामभैय्या जसा आहे तसाच दिसतो. मध्यम पेक्षा जरा जास्त उंची , सात्विक सावळा रंग , शरीर यष्टी राजस , हसरा व प्रसन्न चेहरा !
               शामभय्या क्रिकेट छान खेळतो. तो आॅल राउंडर आहे. मेरीत असताना मेरीच्या टीमचा तो एक आधारस्तंभ होता. काॅलेज मध्ये असताना तसेच काॅलेज संपल्यावर ही तो रोज संध्याकाळी ग्राउंडर जायचा म्हणजे जायचाच !शामभैय्याने आमच्या बरोबर नाशिकच्या मेरी आॅफिसच्या एकांकिकेत ही छान व विनोदी भूमिका केल्या होत्या आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
                शामभैय्याच्या लग्नाच्या वेळची १९७२ सालची एक हसवणारी आठवण आत्ता झाली. त्याचे लग्न पुण्यात सारस बागे जवळच्या बहुतेक मित्रमंडळ कार्यालयात झाले. लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही आॅफिस संपल्यावर नाशिक पुणे प्रवास करून मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयात पोचलो. शामभैय्याने आमचे मना पासून स्वागत केले आणि आमची झोपण्याची व्यवस्था केली. शेजारी असलेल्या एका ग्राउंडवर नेमकी एक सर्कस उतरली होती. त्यांचा ही रात्रीचा खेळ संपला असावा. वाघ सिंहांची भुकेची वेळ झाली असावी. ते जोरजोरात सामुदायिक डरकाळ्या फोडत होते. आम्ही झोपायचा प्रयत्न करत होतो , पण त्या डरकाळ्यांच्या जुगलबंदीने  झोप येण्याच्या ऐवजी आम्ही मनसोक्त हसत होतो. आता वाघसिंहांच्या डरकाळ्या सिनेमात जरी ऐकल्या , तरी शामभैय्याच्या लग्नाची आठवण आम्हा सर्वांना येउन हसू फुटते.
                   आमचा शामभैय्या देवभोळा आहे. रोज मना पासून देवाचे ध्यान आणि साग्रसंगीत मंत्रोच्चार करून पुजा करणे त्याला मना पासून आवडते. सेवानिवृत्ती नंतर त्याने स्वरयुक्त रूद्र शिकून घेतले आहे. काशीविश्वनाथाला रूद्राभिषेक करण्यासाठी कांही ब्रह्मवृदांच्या सोबत तो आता वाराणसीला जाणार आहे.
शामभैय्या हा Instrumentation Engineer आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्या अंतर्गत असलेल्या मेरी आॅफिस मार्फत मातीच्या धरणात जे Instrumentation करण्यात येते त्याचा तो अगदी सुरवातीचा  जनक अभियंता आहे , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
                   मेरीची नोकरी सोडून नंतर तो खासगी नोकरीत गेला. मूलतः हुषार आणि प्रामाणिक असल्याने तिथे ही तो चमकला. त्या नंतर कांही वर्षे तो कुवैतला होता. आता तो सेवानिवृत्त होउन नव्या मुंबईत राहतो.
                 त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघे ही परदेशात स्थायिक झालेले आहेत. मुंबईत तो आणि सौ, वहिनी राहतात.मध्यंतरी तो खास आम्हा सर्वांना भेटण्यासाठी आवर्जून येउन गेला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप आनंद झाला.
                अशा या आमच्या शामभैय्याला आणि सौ. वहीनींना परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , ही प्रार्थना करतो आणि थांबतो !
              खाली फोटोत आहे तो आमचा " शामभैय्या "......

Tuesday, 14 May 2019

कै. टि. डब्ल्यू. शूरपाल.....अविस्मरणीय व्यक्तीमत्व..

            मेरीच्या नोकरीच्या कालावधीत, असे कांही लोक भेटले की , त्यांना विसरणे सर्वथैव अशक्यच ! त्यातील एक आहेत, कै. त्रिंबक वामन शूरपाल उर्फ टी. डब्लु. शूरपाल ! त्यांच्या बद्दल मनात आदर वसत असल्याने ,मी त्यांना कायम " शूरपाल साहेब " असेच म्हणायचो.
                  शूरपाल साहेब म्हणजे शांत व विचारी व्यक्तीमत्व ! मध्यम उंची , शांत चेहरा , अप टू डेट पोशाख ,एक प्रकारे आदर वाटावा ,असे गंभीर व्यक्तीमत्व ! शूरपाल साहेब कोणती ही गोष्ट ,घाई गडबडीत किंवा धसमुसळेपणाने, कधीच करीत नसत. जे काम करायचे ,ते शांत चित्ताने आणि व्यवस्थित नियोजन करून , १०० % प्रामाणिकपणे करीत असत.
                मी त्यांच्या हाता खाली, काम केलेले आहे. शूरपाल साहेब ,कधी ही कुणालाही रागावून किंवा दटावून बोलल्याचे, मला स्मरत नाही.
             शूरपाल साहेबांना क्रिकेटचे प्रचंड वेड होते. ते शिकत असताना ,काॅलेजच्या व युनिव्हर्सिटीच्या टीमचा एक प्रमुख भाग होते. मेरी आॅफिसची ही क्रिकेटची टीम होती. त्या टीमचे ते कॅप्टन होते.
            टीव्हीवर क्रिकेटची मॅच चालू असेल तर ते, टीव्ही पासून हाताच्या अंतरावर बसून ती पहायचे. जणू एखादा कॅच त्यांच्या दिशेने आला, तर अजिबात सुटू नये.
             शूरपाल साहेब १९९४ साली सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर ,तब्बेतीच्या कांही कांही तक्रारी सुरू झाल्या. त्यातच भरीस भर म्हणून, हार्टट्रबल ही होता. दि. २५ आॅक्टोबर २०१४ रोजी, भाउबीजेच्या दिवशी ते अचानक  " गेले ".
           त्यांच्या मागे वहीनी आणि चार मुली आहेत. सर्वजण आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत.
            शूरपाल साहेबांच्यावर,  लेख लिहीण्याची फार इच्छा असल्याने ,त्यांची खूप आठवण येत होती. त्या निमित्ताने वहीनींची भेट व्हावी, अशी तीव्र इच्छा होती. एके दिवशी रात्री आठच्या सुमारास मी आणि सौ. रजनी, आम्ही दोघे नाशिकच्या इंदिरा नगर भागात, शूरपाल साहेबांचा बंगला शोधण्यासाठी जिद्दीने झटलो. अर्धा ते पाउण तासाच्या परिश्रमा नंतर ,त्यांचा बंगला सापडला. बंगल्याच्या बाहेरील पाटीवर ," शुभंकरोती " ही अक्षरे पाहून ,मला अतिशय आनंद झाला. वहीनींची आणि त्यांची कन्या  चि. अदिती ,यांची भेट झाली. जवळ जवळ तास भर मनसोक्त गप्पा झाल्या . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
                  त्यांच्या घरात शूरपाल साहेबांना ," हार घातलेल्या फोटोत " पाहून ,मन गलबलून गेले. मी क्षणभर ,त्या फोटो समोर हात जोडून ,शांत उभा राहिलो . त्यांच्या फोटोचा फोटो घेतला आणि जड अंतःकरणाने बाहेर निघालो.
         आदरणीय शूरपाल साहेबांच्या स्मृतीला त्रिवार प्रणाम !


Thursday, 2 May 2019

" निरामय जाॅगर्स "....आमचा सकाळचा फिरायचा ग्रुप....

              नाशिक मधील ,आमचा सकाळचा फिरायचा सदाबहार ग्रुप.... " निरामय जाॅगर्स "....
             आमच्या " निरामय जाॅगर्स " ग्रुपचे वैशिष्ठ्य म्हणजे फिरताना आम्ही एकत्र नसतो . जो तो आपापल्या वेगाने फिरतो . आमच्या पैकी कांहीजण , ट्रॅकवर उपलब्ध असलेल्या साधनावर, त्यांना झेपेल असा व्यायाम करतात.  सकाळी ट्रॅकवर फिरायला ,प्रत्येकजण आपापल्या वेळी येतो. फिरून झाल्यावर, सात वाजून पाच ते दहा मिनिटांनी, सर्वजण एकत्र गप्पा मारण्यासाठी जमतो. मग थोडावेळ गप्पाटप्पा होतात. गप्पात कोणी ही आपल्या घरातील कांहीही बोलत किंवा सांगत नाही. चर्चेचे विषय जनरलच असतात.
          श्री. केसकर सर, मराठी व संस्कृत या विषयातील एखाद्या शब्दाची उकल करून ,छान माहिती देतात. श्री. गुजराथी सर, केमिस्ट्रीतील कांही अनुभव किंवा वैद्यकीय व्यवसायातील एखादी माहिती देतात. श्री. एस. डी . कुलकर्णी सर , नर्म विनोद किंवा अर्थशास्त्रातील कांही गोष्टींचे विवरण करीत असतात. श्री. रामभाउ जोशी , औषधे व त्यांचे परिणाम या विषयी सांगतात. श्री. वाटपाडे , जमिनीची किंवा प्लाॅटची मोजणी त्यात होणारे घोटाळे , या विषयीच्या गमती सांगतात. श्री. व्याही जोशी, त्यांच्या पूर्व जीवनातील अनोखे अनुभव सांगून सर्वांना चकित करतात. श्री. विलास भिंगेंना सर्वजण " शास्त्रिबुवा " म्हणतात. ते त्या विषयी बोलतात. श्री. विलास औरंगाबादकर सर ,शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव सांगुन सर्वांना गंभीर करून ,मग हसवतात.  श्री. धनसिंग ठाकूर , स्टेट बॅंकेतील त्यांच्या बदल्या व तिथे भेटलेली वेगळी वेगळी माणसे ,यांचे किस्से रंगवून रंगवून सांगतात. श्री. गुडसूरकर सर, त्याच्या प्राध्यापकीय जीवनातील किस्से सांगून हसवतात. श्री. मुकूंदराव खाडीलकर, यांचा खासगी क्षेत्रातील उच्चपदस्थ अनुभव किंवा त्यांचे वाचन भरपूर असल्याने ,आमच्या जनरल नाॅलेज मध्ये भर घालतात.
             मी व श्री. दिलीपराव कुलकर्णी, या सर्वांना वाव देण्यासाठी " उत्तम श्रवण भक्ती " करतो.
          बरोब्बर सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ,सर्वांच्या मोबाईलमध्ये, वेगवेगळ्या टोनचे गजर होतात आणि ही गप्पांची रंगलेली मैफिल संपते . त्या नंतर , एकमेकांचा निरोप घेउन, सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी मार्गस्थ होतात.

एक मन हेलावून टाकणारी आठवण....भुकेलेला विद्यार्थी.....

           खूप दिवस झाले त्या गोष्टीला ! पण आज सहज आठवण झाली .  सर्वांना सांगावीशी वाटली. फार सांगण्या सारखी आहे असं नाहीय. पण ह्रदयाला भिडणारी आहे , म्हणून सांगावीशी वाटते आहे इतकच !
            अंदाजे १९९४ - ९५ साल असेल. मे महिन्याच्या सुट्टीत , शाळेच्या अभ्यासात मागे असलेल्या , महापालिकेच्या शाळेतील  मुलांना, वर्गा बरोबर आणण्याचे दृृृृृृृृष्टीने शिकवावं  ,असं मिरजेच्या श्री. दिलीप आपटे सरांच्या मनात आलं . त्यांनी प्रत्येक महापालिकेच्या शाळेत जाउन ,अशा अप्रगत म्हणजे अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला . पहिली ते सातवी मधील अशा अप्रगत मुलांना  १ मे रोजी, एकत्र जमवलं.
            सर्व साधारण पणे ही सर्व मुले ,अतिशय गरीब परिस्थिती मधील होती. असे म्हणता येईल की , त्यांचे पालक साधारणतः मजूर  किंवा त्या ही पेक्षा ,खालच्या गरीब परिस्थिती मधील होते.
         त्यांना शिकविण्यासाठी, ज्यांची १० वीची परिक्षा झाली आहे व जी मुले सुट्टीत कांही, विधायक काम करू इच्छितात , अशा मुलांना आवाहन करण्यात आले. ज्यांना सामाजिक जाणिव आहे ,अशी मुले आवर्जून आली. शिक्षकांनी शिकविण्या पेक्षा ,विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकविल्यास फरक पडेल ,अशी त्या मागची प्रेरणा होती. या उपक्रमात मदतनीस म्हणून, मी सहभागी झालो होतो.
           हा अप्रगत विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम ,मिरजेत  तळ्यावरील गणपती मंदिराच्या प्रांगणात चालू होता. रोज सकाळी आठ ते दहा असे हे वर्ग चालत.
          एक दिवस सर्व सुरळीत चालू आहे ना , शिकविणार्‍या विद्यार्थ्यांना कांही अडचण नाही ना , हे पहात असताना मला असे दिसले कीं , एक तिसरीतील  ९ -१०  वर्षाचा मुलगा वर्गात न जाता ,मंदिराच्या खांबाला टेकून रडत आहे . मी त्याच्या जवळ गेलो , " बाळ का रडतोस ? वर्गात का गेला नाहीस ? " असे विचारले. तो म्हणाला " सकाळी  मी घरचा केर काढला नाही म्हणून, आजीने मला कांही खायला दिले नाही ,शिवाय मला  मारले , मला फार भूक लागली आहे...."...आणि तो मुलगा मोठ्याने हुंदके देउन ,रडायला लागला.
         शेजारी एक बेकरी होती. तिथे मी  त्याला नेले व पोटभर खाउ घातले. उद्या सकाळी वर्गाला येताना ,तुझ्या आजीला मी बोलावलय म्हणून सांग, असे मी त्याला आवर्जून सांगीतले.
              दुसर्‍या दिवशी तो त्याच्या आजीला घेउन आला. गाठी मारलेले व ठिगळ लावलेले पातळ , अस्ताव्यस्त  पांढरे केस  ,गळ्यात झोळी असा त्या आजीचा पोषाख होता. मी त्या आजीला म्हटले की , काल हा तुमचा नातू तुम्ही खायला दिलं नाही , शिवाय  घरचा केर काढला नाही म्हणून तुम्ही मारल्याने , रडत होता. ती म्हणाली " घरात खायला भाकर तुकडा न्हवता , मी बी कातावून गेलो हुतो ,  त्यात ह्यानं केर बी काडला न्हाइ , मला माजाच राग आला हुता , मग मी मारलं त्येला ! तुमाला काय सांगायचं सायेब , हे लेकरू माज्या वटीत सोडून ,ह्याचे आय आनि बा परागंदा झाल्यात.  म्या सकाळच्या पारी  , झोळी घीउन ,कचरा कुंडीत  काय किडूक मिडूक मिळतय, त्ये गोळा करत्ये . ते इकून आमी कसं  बसं प्वाट जाळतो . "  ह्याचे आई वडील कुठं आहेत ? असं विचारताच ,त्या माउलीच्या डोळ्यात ,चटकन पाणी आले. हुंदके देत ती बाई सांगू लागली " ह्येचा बा , तकडं नागपूराकडं बिलडिंगीच्या शेंटरिंगच्या कामाला जातो म्हनून, जो गेलाय त्यो तिकडचाच झालाय.  ह्याची आई कुना बरूबर पळून गेलीय , काय म्हाईती बी न्हाई . ह्ये लेकरू रोज, आई बा येतील म्हनून ,डोळं लावून बसतय , पन त्ये काय येतीलसं दिसत न्हाई. मी ही अशी म्हातारी , झोळी घीउन फिरतो , कदी काय मिळतय ,कदी कायबी मिळत न्हाय. कसं बसं दिस वडतूया ह्या लेकरा साठी. काय म्हायती ह्येच्या नशिबात काय हाय ते ! " असं म्हणून ती म्हातारी ओक्साबोक्शी रडायला लागली . हे मन विदीर्ण करणारं सामाजिक वास्तव पाहून, मी पण गलबलून गेलो............

पंच्याण्णव वर्षाचे तरूण डाॅ. फाटक....

           नाशिक मधील ,आमच्या सकाळच्या फिरायच्या ट्रॅकवर, एक गृहस्थ येतात. वय ९५ वर्षे . सतेज कांती. गोरापान रंग. चालण्याची ढब ही वाखाणण्या सारखी ! त्यांचे नाव आहे डाॅ. फाटक ! काल त्यांना ९५ वं वर्ष संपून ,९६ वं वर्ष लागलं. त्या निमित्त त्यांचा ट्रॅक वरील लोकांनी ,सत्कार केला. या सत्काराच्या निमित्तानं, त्यांच्या सौ. ही ट्रॅकवर आल्या होत्या. ९५व्या वर्षा पर्यंत, आयुष्याच्या जोडीदाराची साथ लाभणं , ही परमेश्वरी कृपाच !
        डाॅक्टर फाटक, त्यांच्या धीम्या स्पिडनं ट्रॅकवर फिरतात. समोरून येणार्‍याने ओळख दाखविल्यास ,त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलतात. त्यांच्या कडे विनोदांचा स्टाॅक भरपूर आहे. तसेच त्यांचा शेरोशायरीचा अभ्यास ही, खूपच चांगला आहे. समयोचित शेर  सादर करून, ते सर्वांची वाहवा मिळवतात. विनोद आणि शेरोशायरी ,त्यांच्या मनाचा ताजेपणा दर्शवतात. ९५ व्या वर्षी, ज्या वेळी मनुष्य पैलतीराकडे नजर लाउन सुटकेची वाट पहात असू शकतो ,त्या वेळी डाॅक्टर फाटक , प्रसन्न मुद्रेने ट्रॅकवर फिरत ,आपल्या अस्तित्वाने आनंदाचा  वर्षाव  इतरांवर करत , स्वतः ही आनंद लुटत असतात.
           आज त्यांचा सत्कार झाला त्या नंतर त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगीतले...
     १. रोज जमेल तितके चालतो. त्यात हयगय करीत नाही.
     २. घरी गेल्यावर न चुकता थोडाफार व्यायाम ही करतो.
     ३. जिभेवर नियंत्रण ठेवतो.
ते पुढे, विनोदाने म्हणाले कीं , परश्वराला जो आवडतो त्याला तो लवकर बोलावून घेतो. मी परमेश्वराला आवडत नसावा , त्या मुळे ,त्याने मला अजूनी बोलावले नाही. त्याची आॅर्डर आली की , येथे कोणी ही क्षणभर ही, थांबू शकत नाही. माझी अजूनी आॅर्डर आलेली नाही. आजच्या जमान्यात कुठली ही आॅर्डर  " कांही " दिल्या शिवाय निघत नाही आणि अशा कारणासाठी द्यायला, माझ्याकडे " कांही " शिल्लक ही नाही. बोलता बोलता त्यांनी ,एक शेर ऐकवला....
               चलनेवाले जल्दी जाते नही
               बैठनेवाले जाते है
               बैठनेवाला भी जल्दी जाता नही
               अगर वो कम खाता है
शेवटी त्यांनी गालिबचा एक छान शेर पेश केला...
                मुस्कान बनाये रख्खो
                तो दुनिया साथ देती है
                आॅंसूओंको तो
                आॅंखे भी पनाह नही देती.,..
अशा या चिरतरूण व सदाबहार ,डाॅक्टर फाटकांना परमेश्वराने उदंड व निरामय आयुष्य द्यावे अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.

शिकवताना मुलांनी विचारलेले अडचणीचे प्रश्न

            नाशिकमध्ये ,मी रोज संध्याकाळी , सहा ते सात साडे सात ,मुलांना मोफत शिकवायला जातो. आठवीच्या मराठी माध्यमाच्या मुलांना, मी इंग्रजी , गणित आणि विज्ञान हे विषय शिकवतो. ज्यांना प्रायव्हेट क्लासेस परवडत नाहीत , असे गरीब परिस्थितील विद्यार्थी ,या क्लासला येतात.
          शिकवताना ,फजितीचे आलेले दोन प्रसंग , गंमत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. दोन्ही प्रसंग, विज्ञान हा विषय शिकवताना घडलेले आहेत.
           विज्ञानात ,कीटकांच्या प्रजोत्पादनाचा विषय होता. प्रजोत्पादनाच्या दोन पद्धतींचा उल्लेख, पुस्तकात  होता. एक लैंगिक आणि दुसरी अलैंगिक ! नुसता उल्लेख होता. पण एका विद्यार्थ्याने , प्रश्न विचारला " सर , लैंगिक आणि अलैंगिक , म्हणजे काय ? " मी एकदम गांगरलोच , असा प्रश्न येईल ही अपेक्षा नसल्यानं ,मी काय उत्तर द्यायचं, याचा विचारच केला नव्हता. पण उत्तर देणं आवश्यकच होतं ! मी क्षणभर विचार केला व उत्तर दिलं. मी सांगीतलं " ज्यांना आई वडील असतात ,त्याला लैंगिक प्रजोत्पादन म्हणतात . आई वडील नसलेल्यांना, म्हणजे अमीबा प्रमाणे एकाचे दोन , दोनाचे चार , असे स्वतःचे स्वतः निर्माण होणार्‍यांना ,अलैंगिक प्रजोत्पादन म्हणतात ". मुलांना उत्तर पटलं . पुन्हा प्रश्नोत्तरे वाढली नाहीत  आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
           दुसरा एक असाच प्रसंग....कॅन्सर कुठे कुठे होतो , त्या विषयी पुस्तकात उल्लेख होता. त्यात कॅन्सर स्तनांना होउ शकतो , असे लिहीले होते. इतक्यात एका मुलीने मला थांबवले आणि " सर , स्तन म्हणजे काय ? " असा प्रश्न केला. हा ही प्रश्न ,मला अनपेक्षितच होता. मी गांगरून गेलो. आता हिला काय सांगायचं ? पण थोडा विचार केला आणि म्हणालो " आपण लहान असताना आईचे दूध पितो , ते कुठून पितो ? त्या भागाला स्तन असे म्हणतात ". त्या विद्यार्थिनीला व इतर सर्व विद्यार्थ्यांना माझं उत्तर पटलं आणि माझी सुटका झाली.

आगळी वेगळी आदर्श सून...

                 एक आगळी वेगळी सून.....
                 *****************
         मिरज मध्ये ,माझ्या माहितीचे एक सदगृहस्थ आहेत. वय आहे अंदाजे ८४ /८५ . त्यांना अलझायमर ( स्मृतिभ्रंश ) झालेला आहे. त्यांची पत्नी आधीच गेलेली आहे. घरात मुलगा , सून , नातू आहेत.
          मुलगा व्यवसायाचे निमित्ताने ,बाहेर गावी जास्त असतो. नातू काॅलेजला जातो. थोडक्यात घरात फक्त सासरा आणि सून दोघेच असतात. सासरे बुवा स्मृतिभ्रंशा मुळे ,कधी कधी मुलाला व नातवाला ही ओळखत नाहीत. पण गंमत बघा , ते सुनेला मात्र कधी ही विसरत नाहीत. मुलाने किंवा नातवाने कांही सांगीतल्यास ,ते ऐकतील याची शाश्वती नाही. सुनेनं सांगीतलेलं मात्र हमखास ऐकतातच ! सून , त्यांची आपल्या वडीलांची घ्यावी , अशी काळजी घेते.
          सून कुठे ही बाहेर निघाली की , सासर्‍यांना बरोबर घेउन जाते. एकट्याला घरात सोडून किंवा त्यांना आत बसवून, बाहेरून कडी लावून जात नाही. सून बाजारात भाजी आणायला निघाली की , सासर्‍यांना बरोबर नेते. सर्वात कळस म्हणजे, सून माहेरी निघाली तरी जाताना ,आपल्या बरोबर सासर्‍यांना घेउन जाते. ते ही जातात , तिच्या माहेरचे  सुध्दा त्यांना सांभाळून घेतात. सून परत यायच्या वेळी ,सासरे तिच्या बरोबर परत येतात.
             मी हे जे लिहीलं आहे त्यात कोणती ही अतिशयोक्ती नाही. सर्व सत्य कथनच आहे. आजच्या काळात हे खरं वाटेल, अशी शक्यता कमीच आहे. पण हे वास्तव आहे व सत्य आहे.
          अशा या आगळ्या वेगळ्या सुनेला, शतशः प्रणाम !

लग्न जुळवण्याचे नवीन निकष....

           एके काळी मुलगी देताना मुलाची व मुलीची कुंडली जमली आणि मुलाचा होकार आला की ,लग्न जमायचे. मुलीचा होकार , मुलीचे पालक गृृृृहितच धरायचे.
             नंतरच्या काळात मुलगा व मुलगी शिकलेले असल्याने ,मुलीची व मुलाची पत्रिका जमल्या नंतर ,मुलीचा त्या मुलाच्या स्थळाला होकार आहे किंवा नाही ,ही बाब ही महत्वाची मानली जाऊ लागली. मुलाचा होकार आहे , पण मुलीचा नसल्यास , ते लग्न होत नसे.
           नंतरच्या काळात, मुली ही मुलांच्या बरोबरीने , स्वतंत्रपणे अर्थार्जन ही करू लागल्या , त्या मुळे त्या स्वतःच्या मताचा आग्रह धरू लागल्या.बदलत्या काळानुसार ते योग्य मानले गेले.
           नवीन आर्थिक युगात ,लग्न जमविण्याचे जुने निकष कालबाह्य झाले आणि नवीन निकष उदयाला आले.
           मुलीचे किंवा मुलाचे आई वडील ,आता होणार्‍या सुनेची किंवा जावयाची आणि त्यांच्या कुटूंबाची ,आर्थिक पत जाणून घेत आहेत. समोरच्या पार्टीचे जे वैभव दिसत आहे ते खरे आहे की , कर्जावर उभारलेले आहे ? मुलाने किंवा मुलीने किंवा त्यांच्या पालकांनी , घरा / बंगल्यासाठी  किंवा व्यवसाया साठी , कर्ज घेतले असल्यास ते फेडण्याची , त्यांची खरीखरी आर्थिक कुवत आहे की नाही ? घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जातात की थकवले जातात , याची माहिती घेतली जाते.         
            त्या साठी त्या त्या कुटूंबांची, गुप्त रीत्या आर्थिक माहिती मिळविणार्‍या , स्वतंत्र गुप्तचर  यंत्रणा कार्यरत आहेत. थोडक्यात मुलाच्या व मुलीच्या कुटूंबाची आर्थिक कुंडली जुळते की नाही , ते पाहिले जाते आणि त्याला सध्याच्या काळात लग्न ठरविण्या पूर्वी ,महत्व ही दिले जाते.
             या संबंधीची बातमी  दिव्य मराठी या दैनिकाच्या नाशिक आवृत्ती मध्ये आलेली होती.
             आता मुलगी देताना किंवा करून घेताना ,मुलाच्या आणि मुलीच्या कुटूंबांची आर्थिक कुंडली जमणे , हे ही खूप महत्वाचे ठरणार आहे.
             नवीन काळाची नवीन दिशा व नवीन विचार प्रवाह , हा असा आहे.........

परमेश्वराचे शतशः आभार....

        सावरकर नगर , नाशिक , मधील  आमच्या नवीन घरा जवळचा एक शांत रस्ता !
          रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर, शतपावली करायला अतिशय उत्तम !या फोटोत पाठमोरी निघालेली दिसते ती ,माझी पत्नी सौ. रजनी ! तिच्या उजव्या हाताला ,पन्नास फुटावरून ,गोदावरी नदी वाहते. डाव्या बाजूला एकांत नावाचा, एक पाॅश असा रेसिडेन्शियल काॅंप्लेक्स आहे. समोर गंगाजल नर्सरीचा विस्तार आहे. सध्या आम्ही राहतो , तो भाग अतिशय शांत व छान आहे. मी घरात झोपतो ,तिथे शेजारी असलेल्या खिडकीतून ,मला गोदावरी नदीचे दर्शन होते. खूप छान वाटते.     
            मुलगा , सून , नातू यांच्या सहवासात राहण्याचा , सध्याच्या काळात सहसा दुर्मिळ असणारा आनंद, आम्हाला निश्चितच आहे. त्यात छान परिसर ! म्हणजे दुग्धशर्करा योगच !
        वयाच्या या टप्प्यावर आणखी काय पाहिजे ?                                  परमेश्वराचे शतशः धन्यवाद !