Wednesday, 29 July 2020

श्री. रामोळे ( भोई ) साहेब....आदर्श व्यक्तीमत्व...

प्रतिकूल परिस्थितीशी झुंजून स्वकर्तृत्वावर, अत्युच्य पदा पर्यंत पोहोचलेल्या एका व्यक्तीमत्वाची, मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. गंभीर रामोळे ( भोई ). ते मला नोकरीच्या काळात साहेब होते. त्या मुळे मी त्यांचा या लेखात, श्री. रामोळे साहेब असा आदराने  उल्लेख  करीत आहे.
             श्री. रामोळे साहेब यांच्या घरात ,पूर्वी कोणी विशेष शिकलेले नव्हते. आईच्या प्रेरणेने त्यांनी शिक्षणाचा पाया रचला. इंटर सायन्स म्हणजे आजची बारावी होई पर्यंत ,त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बरी होती. त्या नंतर कांही कौटूंबिक कलहा मुळे, घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. तरी पण इंटर सायन्सला उत्तम मार्क मिळाल्याने, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ,पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ,  मेरीटवर अॅडमिशन तर घेतली. पण आर्थिक टंचाई मुळे, कधी कुणा कडून तर कधी कुणा कडून, पैसे उसनवारीने घेत त्यांनी अभियांत्रिकीची पहिली दोन वर्षे, पूर्ण केली. वेळेला अभ्यासाची पुस्तके घेण्यासाठी, पैसेच नसायचे. त्यावर त्यांनी एक तोडगा काढला. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालया शेजारीच, इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनीयर्सचे आॅफिस आहे. तिथल्या लायब्ररीयनशी ओळख करून घेउन ,त्यांच्या कडून गोड बोलून  , अभियांत्रिकीची पुस्तके आणून, त्यांनी अभ्यास केला. पण शेवटी सर्व उपाय थकले आणि त्यांना अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला पैसे नसल्याने, प्रवेश घेता आला नाही. महाविद्यालय सोडावे लागले.
                नंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी या गावी, एक वर्षभर शाळेत शिक्षकाची नोकरी केली. तिथे त्यांना प्रत्येक महिन्याला  १२६ रू. पगार मिळायचा. काटकसर करून त्यांनी पैसे साठवले आणि मग पुढच्या वर्षी ,अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला अॅडमिशन घेतली. तिसरे आणि चौथे वर्ष त्या पुंजीवर कसे बसे ढकलले. चौथ्या म्हणजे शेवटच्या वर्षी, त्यांनी उत्तम अभ्यास करून ,यशस्विता संपादन केली. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, ते स्थापत्य अभियंता झाले. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.
                  अभियंता झाल्यावर त्यांच्या उत्तम यशस्विते  मुळे ,त्यांना सात ठिकाणी नोकरीसाठी बोलावणे आले. सर्व ठिकाणी चौकशी करून ते शेवटी, पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता पदावर हजर झाले. त्या नंतर मात्र श्री. रामोळे साहेबांनी,  मागे वळून पाहिले नाही. जिथे जिथे त्यांचे पोस्टिंग झाले ,त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे आणि जिद्दीने काम करून, वरिष्ठांची नेहमीच वाहवा मिळविली.
               आपल्या कामाच्या व कार्यक्षमतेच्या जोरावर, त्यांना  प्रमोशन  मिळत मिळत शेवटी ते मुख्य अभियंता पदावरून ,सेवा निवृत्त झाले. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांच्या उत्तम कामा मुळे, उगीचच बदल्या झाल्या नाहीत.  उलट कांही बदल्यांचे वेळी, स्थानिक नेते तुम्ही जाऊ नका, अशा विनंत्या करीत. नोकरीत असताना त्यांनी " अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट " ,या विषयाचे ट्रेनिंग घेतले होते. त्याचा त्यांनी सर्व ठिकाणी सदुपयोग करून, उत्तम काम केले व हाता खालच्या लोकांचे कडून, करवून ही घेतले. केलेल्या उत्तम कामा बद्दल आणि निष्कलंक सेवे बद्दल , महाराष्ट्र शासनाने श्री. रामोळे साहेबांना, वेळो वेळी  सन्मानित केले आहे. हा दुर्मिळ योग आहे.
                श्री. रामोळे साहेबांचा मुलगा ,चि. अभिजित , डाॅक्टर व्हावा ,अशी त्यांची इच्छा होती. ती त्याने आपल्या कर्तृत्वावर पूर्ण केली. ही आनंदाची आणि  अभिमानाची बाब आहे.
                  श्री. रामोळे साहेब व त्याच्या पत्नी सौ.शशिकला वहिनी,  नाशिकमध्ये आपला मुलगा , सून आणि नातवंडे यांच्यासह ,त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात, आनंदाने कालक्रमणा करीत आहेत. आज काल आई वडील आणि मुले, एकत्र असण्याचे योग फार कमी दिसतात. श्री. रामोळे साहेब त्या ही दृष्टीने भाग्यवान आहेत. श्री. रामोळे साहेबांना आणखी दोन मुली आहेत. त्या ही उच्च शिक्षीत असून ,विवाहा नंतर आपापल्या घरी सुस्थितीत आहेत.
                प्रतिकूल परिस्थितीवर  जिद्दीने मात करून, स्वकर्तृत्वावर अत्युच्च पदा पर्यंत गेलेल्या, श्री. रामोळे साहेबांना आणि सौ. वहिनींना , या लेखाचे माध्यमातून भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

Thursday, 23 July 2020

कै. पी. आर. मुंडरगी , वकील , माणूसकीचा दीपस्तंभ...

अॅडव्होकेट ( कै. ) पी. आर. मुंडरगी ! कोल्हापुरचे एके काळचे नामवंत वकील !  ते फौजदारी खटले जिंकण्यासाठी प्रसिध्द होतेच , पण त्या शिवाय अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष / विश्वस्त होते , तसेच ते माणूसकीने कसे वागावे ,याचा अद्वितीय आदर्श होते.
              त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील चिक्कोडी ! त्यांचे वडील  वकीलच होते. वयाच्या तिशीत पी. आर, मुंडरगी, कोल्हापुरात वकीली करण्यासाठी आले. सुरवातीला कांही वर्षे त्यांनी, सरकारी वकील म्हणून काम केले. त्या वेळची एक गंमत सांगतो. एका खटल्यात  पी. आर. मुंडरगी हे सरकारी वकील होते आणि त्यांच्या समोर आरोपींचे वकील होते, खुद्द त्यांचे वडील अॅडव्होकेट रावजी मुंडरगी ! असा हा आगळा वेगळा खटला होता. हा खटला  पी. आर.मुंडरगी  जिंकले.
                  संस्कृत मध्ये एक वचन आहे. " शिष्यात इच्छेत पराजयम्  । " अर्थ..खर्‍या गुरूला शिष्याकडून पराभव अपेक्षित असतो. म्हणजेच शिष्य आपल्या पेक्षा  सवाई ठरावा अशी खर्‍या गुरूची अपेक्षा असते. इथे तसच घडलं ! ही दुर्मिळ गोष्ट आहे.
                कांही वर्षा नंतर मुंडरगी वकीलांनी, आपली स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. वर्षाला अंदाजे तीस ते पस्तिस फौजदारी खटले, ते चालवायचे. त्यांच्या फौजदारी  खटल्याचे कामकाज ऐकण्यासाठी, तज्ज्ञ वकील मंडळी आणि सामान्य लोक, उत्सुकतेने हजर असायचे.   मुंडरगी वकील उलट तपासणी साठी कोर्टात उभे राहिले की , " पिन ड्राॅप सायलेन्स " असायचा. उलट तपासणीत, त्यांचा कायद्याचा सखोल अभ्यास दिसायचा. ते एकपाठी होते. त्यांची " फोटो मेमरी " होती. त्यांनी त्या काळी हातात घेतलेले ,जवळ जवळ सर्व खटले ,जिंकले होते.  दोन  तीन नावे वानगी दाखल सांगतो.
                पश्चिम महाराष्ट्रातील गाजलेला भगवान ससे खून खटला , रत्नागिरी येथील गाजलेला चंद्रकला लोटलीकर खून खटला, या खटल्यावर  पुढे चित्रपट ही निघाला . त्यांनी कर्नाटकात बेळगाव मध्ये एक असा खटला चालविला , ज्याचे कामकाज ऐकण्यासाठी होणार्‍या गर्दीमुळे ,कोर्टरूम अपुरी पडू लागली. शेवटी कर्नाटक सरकारने नोटिफिकेशन काढून ,तो खटला एका मोठ्या प्रशस्त " चर्च " मध्ये चालवला. " बेळगाव बार अॅसोसिएशन " च्या दृष्टीने ही एक आगळी वेगळी घटना होती.
           एका खून खटल्यात, एका गरीब महिलेला आरोपी करण्यात आले होते. ती निर्दोष आहे याची खात्री पटलेली असल्याने, मुंडरगी वकीलांनी तो खटला फुकट चालवला आणि जिंकून दिला . परगावाहून कोर्टात येण्यासाठी, त्या महिलेकडे पैसे नसत.  मुंडरगी वकील प्रत्येक तारखेला, त्या गरीब महिलेला येण्या जाण्याचा खर्च, स्वतःच्या खिशातून देत असत.  वकील लोक प्रत्येक तारखेला ,आपल्या अशिला कडून ,खटला चालविण्यासाठी पैसे घेत असतात. इथे तर गंगा उलटी वहात होती. वकील दर तारखेला अशिलाला पैसे देत होते . केवढी ही माणूसकी ! आज कालच्या पैशाच्या मागे लागलेल्या जगात ,अशी " देव माणसे " विरळाच !
                 मुंडरगी वकीलांच्या हाताखाली, अनेक वकील शिकले. मुंडरगी वकीलांनी, आपले कायद्याचे ज्ञान आणि कसब मुक्त हस्ते सर्वांना दिले. ते  ज्युनियर वकीलांना ,सकाळी वकीली कामासाठी बोलावत. काम झाल्यावर  आपल्या बरोबर आग्रहाने जेवायला घालून , मगच  कोर्टात नेत असत. त्यांच्या या ज्ञान आणि अन्न भरभरून देण्याच्या वृत्तीला , त्रिवार वंदन !
                 मुंडरगी वकीलांनी अनेक सामाजिक संस्थावर अध्यक्ष , विश्वस्त , मार्गदर्शक या नात्याने काम केलेले आहे. ही बाब त्यांच्या सामाजिक जाणिवेची, निदर्शक आहे.
                  मुंडरगी वकीलांनी त्यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करणार्‍या एका मदतनीस  लेखनीकाला  आयुष्यभर पेन्शन मिळावी अशी आर्थिक तरतूद  केली आहे. केवढी ही माणूसकी आणि प्रामाणिकपणे काम करणार्‍या माणसाची कदर  ! आजच्या स्वार्थी जगात हे दुर्मिळ आहे.
                मुंडरगी वकीलांना तीन मुले. तिघेही वकीलच ! थोरले श्री. अशोक , मुंबई उच्च न्यायालयात प्रसिध्द वकील आहेत. मधल्या कन्या शैलजा. त्या ही वकीलच होत्या.  सर्वात धाकटे श्री. दिलीप ,कोल्हापुरात नावाजलेले वकील आहेत.
            सन् २००७ मध्ये , पी. आर. मुंडरगी  वकील यांचे, वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने विधिज्ञांच्या क्षेत्रात , फार मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
           कै. पी. आर .मुंडरगी वकील अतिशय टापटिपीने राहणारे , नियोजन बध्द काम करणारे , कुशाग्र बुध्दीमत्ता असलेले व देखणे व्यक्तीमत्व होते. ते हजरजबाबी होते तसेच त्यांना विनोदाचे टायमिंग ही अचूक जमायचे .
            अशा या हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या   कै. पी. आर. मुंडरगी वकीलांना या लेखाच्या माध्यमातून  आदरयुक्त श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.

Sunday, 19 July 2020

श्रीमति कालिंदी देशमुख...आमच्या " बाई "...

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, त्यांचे नाव आहे ,श्रीमति कालिंदी मधुकर देशमुख , वय ९१ वर्षे फक्त !  श्रीमति कालिंदी यांना ओळखणारे , सर्वजण त्यांना " बाई " म्हणतात ! आपण ही त्यांना" बाई " असेच म्हणू !
              बाईंचे वडील कै. प्रद्युम्नाचार्य वरखेडकर,  हे पंढरपुरच्या उत्तराधी या वैष्णव पंथीय मठाचे मठपति ! घरात कडक सोवळे ओवळे ! घरात अग्निहोत्र असायचे !भोजनात कांदा लसूण वर्ज्य ! घरात पाण्याचा वापर फक्त नदी किंवा आडाच्या पाण्याचाच असे  ! नळाचे पाणी वर्ज्य ! घरात संभाषणाची भाषा संस्कृत ! अगदी कारण परत्वे, कानडी किंवा मराठी भाषेचा वापर व्हायचा ! अशा  कर्मठ वातावरणात बाईंचे लहानपण गेले.
                  बाईंच्या वडीलांचे म्हणजे प्रद्युम्नाचार्यांचे एक शिष्य ,जामखेडला ( जिल्हा अहमदनगर ) येथे वास्तव्याला होते. त्यांचे आडनाव देशमुख . देशमुख घराणे मुळचे शैव पंथीय . पण उत्तराधी मठाचे शिष्यत्व पत्करल्याने ,घरात वैष्णवी वातावरण .आपल्या गुरूंची म्हणजे प्रद्युम्नाचार्यांची मुलगी ,आपल्या घरात लग्न होउन आली तर ,आपले घराणे पवित्र होईल अशी त्यांची भक्तीपूर्ण समजूत ! अशा प्रकारे ,बाईंचे देशमुख घराण्यात पदार्पण करण्याचा योग आला.
                    लग्नाचे वेळी बाईंचे म्हणजे नव वधूचे वय होते १२ किंवा १३ वर्षे ! वर मधुकर देशमुख  यांचे वय होते १५ वर्षे !  थोडक्यात हा " बालविवाह " होता. बालविवाहाला त्या भागात मान्यता नसल्याने ,हा विवाह कर्नाटकात पार पाडण्यात आला. अशा तर्‍हेने बाईंचा प्रवेश वरखेडकरांच्या घरातून ,देशमुखांचे घरात १९४२ साली झाला.
             देशमुखांच्या घरात बाईंना त्रास अजिबात झाला नाही. उलट आपल्या गुरूंची मुलगी आपल्या घराण्यात आल्याने ,त्यांचे कौतूकच झाले. बाईंचे वय लहान असल्याने लग्ना नंतर, त्या बरेच दिवस माहेरीच होत्या. त्यांचे मिस्टर श्री. मधुकरराव देशमुख ( त्यांना सर्वजण भाऊ म्हणत ),लग्नाचे वेळी शिकतच होते.  लग्ना नंतर सुध्दा ते पुण्याला व कांही दिवस अहमदनगरला, शिकायला होते. जामखेडला भरपूर शेतीवाडी , देशमुखांच्या गढी वरचा प्रशस्त वाडा होता. आपला एकूलता एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे , घरच्या ऐश्वर्यावर त्याने  लक्ष ठेवले पाहिजे, असे भाऊंच्या वडीलांना वाटले.  १९४५ साली आपल्या  वडीलांच्या आदेशा वरून शिक्षण सोडून ,भाऊ  जामखेडला परतले. बाई ही त्याच सुमारास जामखेडला आल्या. 
                  भाऊ  शिक्षणाच्या निमित्ताने जामखेड बाहेर असताना, कम्युनिस्ट विचार सरणीच्या लोकांशी त्यांचा  संबंध आला होता. ती विचार सरणी त्यांना भावली. ते नास्तिक विचारांचे बनले. पण आपली विचार सरणी ,त्यांनी आस्तिक विचारांच्या आपल्या पत्नीवर म्हणजे बाईंच्यावर ,कधी ही लादली नाही. जामखेडला आल्यावर भाऊंनी, आपल्या शेतीवाडीवर लक्ष ठेवण्या बरोबरच, सामाजिक कार्याला सुरवात केली. गावात शिक्षण संस्था उभारली , वाचनालयाची सोय केली. त्या काळी जोमात असलेल्या,  हैदराबाद मुक्ती चळवळीला मदत केली. या सर्व कामात बाईंनी, भाऊंना सर्वार्थाने साथ दिली. दोघांचा संसार छान एकोप्याने झाला.
           दोघांच्या संसारवेलीवर पाच फुले फुलली. चार मुले व एक मुलगी. त्यांचा दोन नंबरचा मुलगा श्री. उध्दव, जामखेडलाच त्यांचे सोबत रहात असे. त्याचे लग्न १९७६ साली झाले. नवीन सून घरात आली. आता आपली घरात लुडबूड नको .नवीन दांपत्याला मोकळीक असावी. या विचाराने मुले नको नको म्हणत असताना, भाऊ आणि बाई आपल्या जामखेड मधील शेतावर ,आनंदाने रहायला गेले. एक प्रकारचा स्वानंदासाठी स्विकारलेला वानप्रस्थाश्रमच म्हणा ना ! तिथे ते दोघे १९९५ पर्यंत आनंदात राहिले. १९९५ साली भाऊंचे निधन झाले.
 तो धक्का बाईंनी आपल्या मुलांच्या सहकार्याने सोसला. 
                बाईंची मुले उच्च शिक्षीत आहेत. सर्वात मोठा मुलगा श्री. अनंत,  कार्यकारी अभियंता पदावरून  सेवानिवृत्त झालेला आहे. दोन नंबरचा मुलगा श्री. उध्दव जामखेडला आपली वडीलोपार्जित शेती पाहतो. तीन नंबरचा  मुलगा श्री. अरूण आणि पाच नंबरचा मुलगा मुलगा श्री. लक्ष्मीकांत , हे दोघे महाराष्ट्र बॅंकेतून उच्च अधिकारी पदा वरून, सेवा निवृत्त झालेले आहेत. मुलगी सौ. वैजयंती , श्री. मोहनराव बुवा या अभियंता उद्योजकाची पत्नी आहे. सर्वजण आपापल्या जागी सुस्थितीत आहेत. बाईंना परतवंडे ही झालेली आहेत.                                 सर्वजण बाईंची मना पासून काळजी घेतात.
                वयोपरत्वे बाईंना कांही कांही शारीरिक व्याधी त्रास देतात. पण मुले  , सुना आणि मुलगी , जावई यांच्या सहकार्याने त्या जास्तीत जास्त समाधानात राहण्याचा ,प्रयत्न करतात. कांही वेळा जमतं कांही वेळा नाही. दोष त्यांचा नाही. वयाचा आहे.
                  अशा या जिथे जातील तिथे अॅडजस्ट होण्याचा प्रयत्न करणार्‍या ,९१ वर्षाच्या बाईंना उदंड , उत्तम आणि निरामय आयुष्य लाभो ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Friday, 10 July 2020

श्री. प्रकाश क्षीरसागर....अभियंता ते बॅंकर...

अभियंता , संशोधक ,अभिनेता  आणि बॅंकर असा विविधांगी प्रवास असलेला, माझा एक मित्र आहे. मी आज तुम्हाला त्याची ओळख करून देणार आहे. त्याचे नाव आहे श्री. प्रकाश विश्वनाथ क्षीरसागर ! असे विविधांगी व्यक्तीमत्व असणारा प्रकाश, आमचा मित्र आहे ही आम्हा मित्रांना ,अभिमानास्पद गोष्ट आहे .
           श्री. प्रकाश क्षीरसागर ,पुण्यातून अभियंता झाला आणि नाशिकच्या " मेरी " या महाराष्ट्र राज्याच्या, पाटबंधारे खात्याच्या संशोधन संस्थेत, वैज्ञानिक  पदावर हजर झाला. तेथील महामार्ग संशोधन विभागात त्याने, पाच वर्षे संशोधनाचे काम केले. काम करताना  ते नीट समजावून घेउन अभ्यासपूर्ण करण्याचा, त्याचा स्वभाव असल्याने ,वरिष्ठांची त्याच्यावर मर्जी असायची. पाच वर्षांचा बाॅन्ड पूर्ण होताच , त्याने ती नोकरी सोडली. नंतर  कुवैत या देशात,  तिथल्या रिफायनरींशी संबंधित  " वाॅटर कूलींग प्रकल्पावर, " क्वालिटी कंट्रोल अभियंता म्हणून त्याने नोकरी स्विकारली . तिथे त्याने चार वर्षे,  उत्तम प्रकारे काम केले. पण तिथले हवामान आणि एकटे राहण्याने होणारे खाण्या जेवण्याचे हाल , यांचा विचार करून त्याने ती नोकरी सोडली .त्या  नंतर  मुंबईत भाभा अणू संशोधन केंद्रात, प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी कंट्रोल अभियंता, अशा दोन्ही जबाबदार्‍या त्याने उत्तम प्रकारे पार पाडल्या. पण कांही कौटूंबिक अडचणी मुळे, त्याला ही नोकरी वर्षभरातच सोडावी लागली आणि श्री. प्रकाशच्या आयुष्याला, एक वेगळे वळण मिळाले.
                 नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत, तो  अधिकारी पदावर हजर झाला. तिथे बॅक जी कर्जे देत असे, त्यांची तांत्रिक छाननी करण्याचे काम ,त्याच्या कडे होते. तसेच त्याने नाशिक जिल्ह्यातील कांही तालूक्या मधील  , द्राक्षे व कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या विकासासाठी,  फलोत्पादन योजने अंतर्गत, त्या काळी ५० कोटी रूपयांच्या मागणीचा अभ्यासपूर्ण अहवाल , नाबार्डला सादर केला. तो मंजूर झाला आणि प्रकाशच्या बॅंकिंगच्या कामाला गती मिळाली.  नंतर त्याने  " बॅलन्स शीट अॅनॅलॅसिस " इत्यादी महत्वाच्या बाबींचा स्वतः अभ्यास करून, बॅंकिंगच्या परीक्षा दिल्या व तो  अभियंता होताच , आता " बॅंकर " सुध्दा झाला. ही श्री. प्रकाशची फार मोठी उपलब्धी आहे ,असे मला वाटते. १९८४ ते २००५ अशी २१ वर्षे ,त्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत ,उत्तम प्रकारे काम केले. त्याच्या तडफदार  कामा मुळे , नाशिकच्या बॅंकिंग क्षेत्रात ,एव्हाना त्याच्या नावाचा दबदबा तयार झाला होता.
               नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून सेवानिवृत्त झाल्या झाल्या  लगेच, गोदावरी सहकारी बॅंक आणि त्या नंतर देवळा मर्चंट्स सहकारी बॅंक, येथे कांही काळ त्याने सेवा दिली .
                  आता तो गेली आठ वर्षे, राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचारी  सहकारी बॅंकेत  " मुख्य कार्यकारी अधिकारी " या उच्च पदावर, कार्यरत आहे. या आठ वर्षात, त्याने बॅंकेच्या ठेवी १०० कोटी वरून, ४२० कोटी रूपयांवर नेल्या आहेत. बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांना शिस्त लावून, बॅंकेच्या हेड आॅफिस व्यतिरिक्त  चार नवीन शाखा उघडल्या आहेत.   पंधरा हजार तीनशे सभासद असलेली ही बॅंक, अतिशय शिस्तबद्धपणे श्री. प्रकाश क्षीरसागरने , उर्जितावस्थेला आणलेली आहे. ही बॅंक नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यात ,सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकावर आहे , ही अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आहे.
               श्री. प्रकाशने जिथे जिथे काम केले, तिथल्या अधिकारी , कर्मचारी आणि ग्राहक यांच्या मानसिकतेचा, मानसशास्त्राच्या विशिष्ठ  दृष्टीकोनातून  अभ्यास केल्याने, तो सर्वत्र यशस्वी झाला आहे.
             " मेरी " या संशोधन संस्थेत असताना, श्री. प्रकाश आणि त्याच्या पत्नी सौ. रेखा वहिनी, यांनी तिथल्या गणेशोत्सवातील  विविध नाटकात कामे करून, आपल्या अभिनयाचे दर्शन ,रसिकांना घडविले आहे.
            श्री. प्रकाश याला तीन मुले. दोन मुली आणि एक मुलगा. सर्वजण उच्च शिक्षित असून, आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत. श्री. प्रकाशला , सौ. रेखा वहिनींची समर्थ साथ आहेच !
          अशा या बहुरंगी व्यक्तीमत्व असलेल्या व जिथे जाईल तिथे स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेल्या, माझ्या मित्राला आणि सौ. वहीनींना पुढील निरामय  आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.

Saturday, 4 July 2020

संसार सागर...

संसार सागर....
माणूस संसार सागरात डुबक्या मारताना, नाकातोंडात पाणी जातं , प्राण कासावीस होतो , पण संसाराचे प्रेम कांही सोडवत नाही. त्या विषयीची एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे.
               एकदा भगवंत स्वर्गात आपल्या महालात, चिंताक्रांत होउन फेर्‍या मारत होते. एवढ्यात नेहमी प्रमाणे, नारदमुनी तिथे पोचले. भगवंत चिंताक्रांत होउन फेर्‍या मारत आहेत ,हे पाहून त्यांनी विचारलं..." भगवंत , आपण एवढे चिंताक्रांत का ? कांही अडचण आहे का ? " भगवंतांनी नारदमुनींच्या कडे पाहिलं आणि ते म्हणाले " नारदा मला माझा खरा खुरा भक्त ,खूप दिवसात न भेटल्यानं ,मी अस्वस्थ आहे ".
                 नारदमुनी म्हणाले " भगवंत , अहो तिकडे पृथ्वीतलावर ,तुमचा किती जयजयकार चालू आहे. देवस्थाना समोर तासनतास लोक तुमच्या दर्शनासाठी, रांगा लावून उभे आहेत. वारकरी मैलोनमैल चालत, तुमच्या दर्शनासाठी जात आहेत. गणपती उत्सव , दुर्गा उत्सव , त्या निमित्ताने भंडारा , जेवणावळी उठत आहेत. राजकारणी लोक दानधर्म करीत आहेत . भजन कीर्तनाचा दंगा उसळलेला आहे. एवढे भक्त असताना, तुम्ही खरा भक्त भेटत नाही, असे कसे म्हणता ?"
                  भगवंत कसनुसे हसले आणि म्हणाले " नारदा , तूच मला माझ्या खर्‍या भक्ताला आणून भेटव ". नारदमुनी म्हणाले " हा असा टाकोटाक जातो आणि तुमच्या खर्‍याखुर्‍या भक्ताला घेउन येतो."
                   नारदमुनी पृथ्वीतलावर आले. तिथे एका ठिकाणी कीर्तन चालू होते. श्रोतृवृन्द बुवांच्या कीर्तनावर खूष होउन डोलत होता. नारदमुनींनी त्यात एक अजोबा पाहिले. ते भक्तीने तंद्री लावून डोळे मिटून कीर्तन ऐकत होते. नारदमुनींना  " खरा भक्त " सापडला. ते खुष झाले. त्या अजोबांच्याकडे गेले आणि म्हणाले " अजोबा , तुमच्या भक्तीवर भगवंत खूष झाले आहेत. तुम्हाला स्वर्गात त्यांनी बोलावलय. मी तुम्हाला न्यायला आलोय. चला. "
                     अजोबांनी डोळे उघडले आणि म्हणाले
 " नारदा , एवढ्या लोकात मीच बरा सापडलो रे तुला ? अरे माझं स्वर्गात जायचं वय झालय का ?  माझा एकुलता एक मुलगा नुकताच निवडून आलाय , तो मंत्री होणार असं ऐकतोय. तो मंत्री झाला की त्याचं वैभव बघायला " मी " नको का ? शिवाय त्याचं लग्न व्हायचय , नातवंड बघायचं सोडून ,मी आता कुठला येतोय रे बाबा स्वर्गात ? एखाद दुसरं वर्ष जाउ दे मग बघू ."
                   दोन वर्षे गेली. नारदमुनी तिथे पुन्हा हजर झाले. मंत्र्याच्या बंगल्यात भरपूर वर्दळ सुरू होती. पण अजोबा कांही दिसत नव्हते. नारदमुनींनी बारकाईनं पाहिलं. दरवाज्यात एक गलेलठ्ठ कुत्रा दिसला. नारदमुनींनी ओळखलं , हेच ते अजोबा ! पुढच्या जन्मात कुत्रा होउन आलेत.
                    नारदमुनी कुत्र्या जवळ जाउन म्हणाले
 " अजोबा , काय ही तुमची अवस्था ? माणसाच्या जन्मा नंतर तुम्हाला कुत्र्याचा जन्म मिळालाय. आता तरी चला. भगवंत स्वर्गात तुमची वाट पहात आहेत. " कुत्रं रूपी अजोबा म्हणाले " नारदा ,आता लगेच मी कुठला येतोय बाबा ? अरे माझा मुलगा आता मोठ्ठा मंत्री झालाय. रग्गड पैसा मिळवतोय. त्याचं चोरा पासून रक्षण " माझ्या " शिवाय कोण करणार ? कुणावर विश्वास ठेवायचं युग आहे का हे ? शिवाय माझ्या सुनेला दिवस गेलेत. नातवंड पहायचं सोडून मी कुठला स्वर्गात येतोय रे बाबा ? अजूनी एकदोन वर्ष जाउ देत मग बघू !"
                     दोन वर्षा नंतर नारदमुनी अजोबांना शोधत पुन्हा तिथे आले. दारात कुत्रा दिसत नव्हता. नारदमुनींनी जरा बारकाईनं शोध घेतला . ते अजोबा आता बेडूक झाले होते आणि मुलाच्या बंगल्याच्या ड्रेनेजच्या पाण्यात बसले होते. नारदमुनी त्या बेडका जवळ गेले आणि म्हणाले " अजोबा , काय ही तुमची अवस्था ? माणसा नंतर कुत्रं झालात. त्या नंतर आता बेडूक झालात आणि या घाण पाण्यात बसलाय ? अजोबा म्हणाले " नारदा अरे हे पाणी घाण मुळीच नाही. माझी नातवंडं रोज सकाळी सुगंधी तेल आणि साबण लाउन ,गरम पाण्यानं अंघोळ  करतात . नातवंडांच्या अंगावरचं सुगंधी गरम पाणी माझ्या अंगावर आलं की किती आनंद होतो म्हणून सांगू ? तू ब्रह्मचारी माणूस ! तुला हा आनंद कसा समजणार ? "
                  ही कथा अशी बरीच वाढवता येईल. पण माणूस संसारात किती आणि कशा प्रकारे आनंद मानेल ते सांगता येत नाही. सगळं अकल्पितच आहे हे ! माणूस इकडे संसाराच्या सागरात डुंबतोय , नाका तोंडात पाणी जातय ,पण संसाराचा मोह कांही सुटत नाही.
आहे की नाही गमतीची गोष्ट ! वाचा आणि विचार करा !

Wednesday, 1 July 2020

कै. लालासाहेब घोरपडे.....एक वनस्पती प्रेमी....

आज मी तुम्हाला माझा वर्गमित्र, कै. प्रा. डाॅ. लालासाहेब निवृत्ती घोरपडे,याची ओळख करून देणार आहे.त्याच्या नावा मागे ( कै.) लिहीणं ,मनाला अत्यंत वेदनादायी आहे.
                आमचा हा मित्र उत्साहाचा झरा होता.  सिटी हायस्कूल , सांगली ,मधील शाळेतल्या मित्रांचा आमचा एक  " व्हाॅट्स अॅप " ग्रुप आहे. त्यात रोज सकाळी लालासाहेब  विविध वनस्पती , फुले , पाने यांची शास्त्रिय माहिती, फोटो सह पाठवायचा. त्या मुळे आमची सकाळ ,अतिशय प्रसन्न असायची.
              आमचे वर्ग मित्रांचे दोन स्नेहमेळावे झाले. दोन्हीत तो उत्साहाने सामिल झाला होता. तिथे त्याने अतिशय कमी वेळात , विविध प्रकारची मन मोहक पुष्परचना ,आम्हाला करून दाखविली. त्याच्या वनस्पती सृष्टीच्या ज्ञाना बरोबरच, त्याच्या सौंदर्य दृष्टीचे, आम्हाला सर्वांना अतिशय कौतूक वाटले होते.
                आमच्या या मित्राचे मूळ गाव सातवे ( ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर ). तिथेच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. दहावी आणि अकरावी अशी दोन वर्षे, तो आमच्या वर्गात सिटी हायस्कूल ,सांगली ,येथे होता. नंतर त्याने शिवाजी युनिव्हर्सिटीतून वनस्पतीशास्त्रात, एम. एस्सी. आणि " उसावर पडणारे रोग " या संदर्भात, आपली " डाॅक्टरेट " पूर्ण केली. त्याच्या या संशोधन प्रबंधाला, आंतर राष्ट्रीय मान्यता देणारी
" प्रशस्तीपत्रके ", मिळालेली आहेत. तो डाॅक्टरेट करीत असताना, त्याला तांत्रिक आणि प्रशासकीय, अशा अनंत अडचणींचा सामना करावा लागला . पण त्याने जिद्दीने आपली डाॅक्टरेट पूर्ण केली. त्याच्या त्या जिद्दीला त्रिवार
 वंदन !
              एम. एस्सी. झाल्या नंतर ,तो ज्या काॅलेज मधून ग्रॅज्युएट झाला, त्या वारणानगर काॅलेज मध्ये तो प्रथम डेमाॅन्स्ट्रेटर या पदावर ,हजर झाला. आपल्या गुणवत्तेच्या आणि शिकविण्याच्या कौशल्याच्या जोरावर , तो तिथेच प्राध्यापक ही झाला. त्याची शिकविण्याची हातोटी अतिशय चांगली असल्याने ,त्याचे विद्यार्थी आज ही त्याची मना पासून ,आठवण काढतात .
                   हे सगळं सुरळीत चालू असताना १९९८ साली, त्याच्या पत्नी कॅन्सरने " गेल्या ". हा त्याला मोठा मानसीक धक्का होता. त्यातून सावरायला त्याला खूप वेळ लागला. दुसरा विवाह करण्या विषयी नातेवाईकांच्या कडून, दबाव येत होता. पण त्याने आपल्या मुलांचा विचार करून तो विषय, निग्रहाने बाजूस सारला.
              सन २००५ मध्ये, तो काॅलेजच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाला. सेवानिवृत्ती नंतर " वारणा कोडोली ज्येष्ठ नागरीक संघ " या  सेवाभावी संस्थेच्या कामाला, त्याने वाहून घेतले. त्या नागरीक संघातर्फे अनेक सामाजोपयोगी उपक्रम ,त्याने पार पाडले. नागरीक संघाला स्वतःची इमारत नव्हती. ती बांधून मिळण्यासाठी, त्याने शासन दरबारी तसेच आमदार खासदारांना भेटून, ते काम पूर्णत्वास नेले. वारणानगर मधील मुलांच्यासाठी " चिल्ड्रेन पार्क " व्हावा ,या साठी त्याने विशेष प्रयत्न केले. हा प्रकल्प " कोल्हापूर रोटरी क्लब " मार्फत त्याने पूर्ण केला . वारणानगर ज्येष्ठ नागरीक संघाचे वरिष्ठ पद स्विकारण्या विषयी ,त्याला आग्रह झाला. पण त्याने विनम्रपणे कोणते ही पद स्विकारण्यास, नकार दिला. पद आणि पैसा मिळविण्यासाठी ,आजकाल सर्वजण आसुसलेले असतात , अशा वेळी लालासाहेबाचा हा निर्णय, त्याच्या निरपेक्ष मनाची साक्ष देतो.
              लालासाहेब यास बागेत विविध रोपे लावून , त्यांची प्रेमाने निगा राखण्याची ,विशेष आवड होती. बोनसाय तयार करण्याचे विशिष्ठ तंत्र, त्याने आत्मसात केलेले होते. विविध मनोहारी पुष्परचना करणे, हा त्याचा छंद होता. त्याने आपल्या बागेत ,कमळाची फुले फुलावीत या साठी खूप प्रयत्न केले. ती फुललेली कमल पुष्पे ,कै. लालासाहेब याची वाट पहात आहेत, असे रोज त्याच्या मुलांना वाटते व त्यांचे मन हेलावते.
               लालासाहेब याला दोन मुले व एक मुलगी. तीन ही मुले उच्च शिक्षित असून, आपल्या आपल्या क्षेत्रात ,कर्तृत्व सिध्द करीत आहेत.
                  झाडे , फळे आणि फुले  यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या आमच्या मित्राला शेवटी कॅन्सरने गाठले.  त्याच्या मुलांनी त्याची सेवा करण्यात आणि उपचारात ,कोणती ही कसर सोडली नाही. पण काळापुढे ,कुणाचे कांही चालले नाही आणि आमचा हा जिवलग मित्र, दि. ८ फेब्रुवारी २०२० रोजी ,काळाच्या पडद्या आड  निघून " गेला ".
               या लेखाच्या माध्यमातून, कै.प्रा. डाॅ.  लालासाहेब निवृत्ती घोरपडे, या आमच्या मित्राला, साश्रुपूर्ण नयनांनी श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.
          ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।