Tuesday, 29 June 2021

 लेखकाचे मनोगत....

मी सुरेश दीक्षित कांही लेखक नव्हे. शाळेत माझे निबंध नावाजले जायचे असे ही नव्हते. नोकरीत मात्र भरपूर तांत्रिक अहवाल मी लिहीले. पण असे अहवाल लिहीणे म्हणजे जबाबदारीचा तो एक भाग असायचा. 

नोकरीत असताना मी नाशिकला आणि माझे आई वडील मिरजेला अशी परिस्थिती कांही वर्षे होती. त्या वेळी मात्र मी माझ्या आई वडीलांना दर आठवड्याला दोन फुल स्केप भरतील एवढे सविस्तर पत्र पाठवत असे. 

माझ्या आई मध्ये लेखनाचा गुण होता. ती कारणपरत्वे मिळेल त्या कागदावर किंवा वहीत प्रासंगिक लेख लिहीत असे. तिचा हा गुण माझ्यात आला असावा. त्या मुळे सेवानिवृत्ती नंतर जसे आम्ही मुलगा व सुने सोबत ' निवांतपणे ' रहायला लागलो तसे आपण कांही तरी लिहावे अशी प्रेरणा मला व्हायला लागली.

नाशिक मधील आमच्या सकाळच्या फिरायच्या  ' निरामय जाॅगर्स ' या ग्रुप मधील कै. प्राचार्य एस. डी. कुलकर्णी सरांचे ' आत्मवृत्त ' प्रसिध्द झाले . त्या नंतर आपण ही आपले पुस्तक प्रसिध्द करावे असे मनात येउ लागले. मी प्रथम आमच्या फिरायच्या ग्रुपमधील श्री. सुधाकर केसकर सरांच्यावर पहिला लेख लिहीला. तो फेसबुकवर पोस्ट केला. त्याला मिळालेल्या प्रतिसादाने माझा उत्साह दुणावला. मग मी नियमितपणे व्यक्तीचित्रे आणि कांही प्रासंगिक लेख फेसबुकवर लिहु लागलो. 

कै. प्राचार्य एस. डी. कुलकर्णी सर मला प्रोत्साहित करीत असत. " तुमचे पुस्तक जेंव्हा केंव्हा तुम्ही  प्रकाशित कराल तेव्हा त्या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहीणार " असे ते मला म्हणत असत. पण दैवयोग कांही वेगळाच आहे. आता माझे पुस्तक प्रकाशित होत आहे , पण ते पहायला व त्याची प्रस्तावना लिहायला ' सर ' हयात नाहीत. त्यांच्या ' स्मृती ' प्रीत्यर्थ मी या पुस्तकाला प्रस्तावना न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

माझे हे पुस्तक म्हणजे घरगुती मामला आहे. ज्यांनी माझी जीवनयात्रा ' आनंदी ' बनविली अशा कांही लोकांची मी माझ्या मनातली ' लोभस प्रतिमा ' यातील लेखा द्वारे चितारण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा वाचकांना  हा प्रयत्न माझ्या  विषयी वाटणार्‍या जिव्हाळ्या मुळे ' आवडेल ' अशी आशा आहे.

माझे हे पुस्तक प्रकाशित होण्या मागे अनेकांचे सहकार्य मला लाभले आहे. सर्व प्रथम मी कै. एस. डी. कुलकर्णी सरांचे आभार मानतो. कारण त्यांनी मला हे पुस्तक निर्माण करण्यासाठी ते हयात असताना  वेळोवेळी प्रोत्साहित केले . 

माझा मुलगा चि. आदित्य व त्याचे महिंद्रा आणि महिंद्रा मधील  वरिष्ठ श्री. संदीप कुलकर्णी यांनी मला या पुस्तका विषयी वेळोवेळी अगत्याने चौकशी करून उत्तेजना दिल्या बद्दल त्यांचा मी ऋणी आहे. 

माझ्या फेसबुक वरील लेखांचे ज्यांनी प्रेम पूर्वक स्वागत केले त्यात  मेरीतील माझा  जवळचा मित्र श्री. राजा वर्‍हाडे , मेरीतीलच माझा स्नेही श्री. प्रकाश क्षीरसागर याच्या पत्नी सौ. रेखा वहिनी , मिरजेच्या आमच्या सुह्रुद सौ. माया गोडबोले ,  तसेच माझ्या फेसबुक फ्रेंड , ज्यांना मी कधी ही भेटलो नाही अशा  ,पुण्याच्या सौ. वैजू दातार , माझे आदरणीय व ज्ञानी स्नेही श्री. सुधाकर केसकर सर , माझी मुलगी चि. सौ. संपदा कुलकर्णी यांचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे.

तसेच हे पुस्तक उत्तम व देखणे व्हावे  कामी मला ज्यांनी मना पासून सहाय्य केले त्यात श्री. मंदार गोकर्ण ,श्री. रमेश बापट , श्री. रामभाऊ जोशी , त्यांच्या पत्नी सौ. सुहास वहिनी व त्यांची कन्या  आर्किटेक्ट चि. स्नेहल यांनी दिलेल्या सहकार्याचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे. 

या पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील चित्रे चि. श्रुती कुलकर्णी हिने तिच्या चित्रकलेच्या गुरू सौ. सुहास वहिनी जोशी आणि आर्किटेक्ट चि. स्नेहल जोशी यांच्या मार्गदर्शना खाली तयार केलेली आहेत. चि. श्रुतीचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. 

हे पुस्तक छापून प्रसिध्द करण्याचे कामी ज्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन व सहाय्य केले त्या श्री. सलील दातार व त्यांचे सहकारी श्री. तुषार यांचा मी मना पासून आभारी आहे.

सर्वात शेवटी,  जिने वेळोवेळी दिलेल्या  संपूर्ण सहकार्य व प्रोत्साहना शिवाय हे पुस्तक झालेच नसते , अशी माझी पत्नी सौ. रजनी, हिला मी शतशः धन्यवाद देतो आणि थांबतो.

दि. २९ जून २०२१

नाशिक.

 अर्पण पत्रिका

हे माझे पहिले वहिले पुस्तक 

माझे वडील कै. नाना व आई कै. सोनुताई 

यांना त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 

मनोभावे अर्पण....

Monday, 28 June 2021

 गोपाळ लक्ष्मण उर्फ सुरेश दीक्षित.

जन्म - ३१ आॅगस्ट १९४६.

शिक्षण - बी. एस्सी. 

मूळगाव - मिरज. पण सध्या  ' नाशिककर ' .

नोकरी - महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था , ( MERI ) मधून ' वैज्ञानिक अधिकारी ' या पदावरून सेवानिवृत्त.

सध्या ' दिशा '  या मोफत क्लासमध्ये आठवीच्या मुलांना गणित विज्ञान हे विषय शिकवतो आणि निरपेक्ष आनंद मिळवतो.


Saturday, 12 June 2021

संघ कार्यकर्ता...मदतीला आलेला देवदूत !


माझ्या कानावर आलेला माझ्या स्नेह्यांचा एक वेगळा अनुभव,  नक्कीच ह्रदयस्पर्शी आहे. तो त्यांच्याच शब्दात कथन करीत आहे.

         मी विविध समाज माध्यमावर कार्यरत असतो. विविध प्रकारचे लेखन करीत असतो. त्यातून माझी बर्‍याच लोकांशी आभासी ओळख होत असते. ती कायम टिकते असे नाही. कांही लोकांशी मात्र या आभासी जगतातून जिव्हाळा निर्माण होतो. त्या संदर्भातील ही गोष्ट !

          सकाळी चहा आणि ब्रेकफास्ट संपवून, मी आळसात पेपर वाचत पडलो होतो आणि माझा फोन वाजला. नंबर वरून फोन कुणाचा ते समजत नव्हते. मी फोन घेतला. पलीकडून एक बाई बोलत होत्या. 

           त्या म्हणाल्या " माझी व तुमची ओळख नाही. मी सेवानिवृत्त शिक्षिका आहे. मला नात्याचे येथे कोणीही नाही. मी एकटीच असते. माझे वय ७५ वर्षांचे आहे. माझा भाऊ ७० वर्षांचा आहे. तो पुण्यात असतो. त्याला एक मुलगी आहे. ती परदेशात असते. माझ्या भावाची बायको व माझा भाऊ यांच्यात , नवरा बायको या नात्याने प्रेम व जिव्हाळा अजिबात नाही. दोघे ही महिनोन महिने एकमेकाशी बोलत ही नाहीत. माझ्या भावाची तब्बेत बरी नाही. त्याला पुण्यात एका हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले आहे. त्याची काळजी त्याची बायको घेत नसल्याने तो अनाथ झाला आहे. मी अशी वयोवृद्ध ! पण मी भावाची सेवा करू इच्छीते ! मला भावाला आपल्या या गावी आणावे अशी इच्छा आहे. त्याला पुण्यातून इकडे आणणे मला वैयक्तीक रीत्या आणि वयोपरत्वे शक्य होणार नाही. तरी तुम्ही मला मदत करा अशी मी तुम्हाला विनंती करते. तुम्ही समाज माध्यमावर विविध विषयावर लेखन करता. मी ते वाचते. त्या वरून तुम्ही मला मदत कराल अशी आशा वाटल्याने मी तुम्हाला ही विनंती करीत आहे. "

              प्रत्यक्ष ओळख ना पाळख ! समाज माध्यमावरची आभासी ओळख ! काय करावे असा मला प्रश्नच पडला. मदत करायची इच्छा तर होती. पण मनात शंकांचे काहूर माजले होते. मदत करायला जाउन आपल्याला पश्चात्ताप तर करावा लागणार नाही ना ! मी माझ्या स्नेही मंडळींशी या विषयावर बोललो. सर्वांचे एकमत होते. ओळख ना पाळख , कोण कुठल्या बाई , त्यांचा आजारी भाऊ ! मदत करायला जाल आणि नाही त्या लफड्यात अडकाल ! पण माझे मन हा सल्ला मानायला तयार नव्हते. 

                  माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले एक स्नेही आहेत. त्यांच्याशी या विषयावर बोललो. त्यांनी सर्व परिस्थिती समजावून घेतली त्या आजारी माणसाच्या बहीणीचा नंबर माझ्या कडून घेतला व पाहू काय करता येते , असे बोलून ते निघून गेले. एखादा दिवस मी अस्वस्थ होतो. पण नंतर मी तो विषय विसरून गेलो. 

                  आठ दिवसांनी मला त्या संघ कार्यकर्त्याचा फोन आला. आम्ही त्या आजारी माणसाला पुण्याहून येथे आणले आहे. एका चांगल्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे व त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मी हाॅस्पिटलचा पत्ता घेतला व प्रत्यक्ष तिथे गेलो. तिथे त्या आजारी गृहस्थांच्या जवळ त्यांची मला फोन केलेली बहीण हजर होती. मी त्या बहीणीला आज प्रथमच पहात होतो व भेटत होतो. 

               त्यांनी मधल्या काळात काय काय घडले ते मला सांगीतले. मी त्या संघ कार्यकर्त्याला बहीणीचा फोन नंबर दिला होता. त्याने त्या बहीणीला फोन केला. सर्व परिस्थिती समजावून घेतली. मग त्याने पुण्यातील संघ कार्यकर्त्याला फोन केला व हाॅस्पिटलमध्ये जाउन प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यास सांगीतले. तो कार्यकर्ता पुण्याच्या त्या हाॅस्पिटलमध्ये गेला. तो आजारी भाऊ आपल्या बहिणीकडे येण्यास तयार होता. तिथे त्याची आबाळ होत होतीच ! मग त्या संघ कार्यकर्त्याने त्या आजारी माणसाच्या पत्नीची भेट घेतली. आपल्या नवर्‍याने त्याच्या बहीणीकडे जाण्यास तिची कोणतीच अडकाठी नव्हती. डाॅक्टरांनी ही पेशंटला परगावी नेण्यास परवानगी दिली. हाॅस्पिटलचे बिल भागविण्यात आले. एक संघ कार्यकर्ता पेशंट बरोबर परगावी येण्यास तयार झाला. अशा प्रकारे सर्व जुळणी करून अम्ब्युलन्स मधून त्या आजारी भावाला आपल्या बहीणीच्या गावी आणण्यात आले. 

                 पंधरा वीस दिवसांच्या ट्रिटमेंट नंतर तो भाउ आपल्या बहीणीच्या घरी गेला आहे. तो चालू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याची बहीण त्याची सेवा करीत आहे व तो भाऊ ही समाधानात आपल्या बहीणी बरोबर रहात आहे. 

               अडचणीच्या वेळी परमेश्वरच तुमचा पाठीराखा असतो असे म्हणतात. परमेश्वर कोणाच्या रूपाने येउन मदत करेल ते सांगता येत नाही. या सत्यकथेत संघ कार्यकर्त्यांची साखळी त्या बहीण भावाच्या पाठीशी उभी राहिली. 

               ही सर्व गोष्ट ऐकीव आहे. मी माझ्या मगदुरा प्रमाणे मी ती विदित केली आहे. तुम्हा वाचकांच्या ह्रदयाला ती नक्कीच स्पर्श करेल अशी खात्री आहे.

" उचल की आदळ "...

 उचल की आदळ !

****************

मी जी कथा सांगणार आहे ती सत्य कथा आहे. आमच्या नात्यातले एकजण मिलिट्रित होते. त्याचे नाव दादा ! दादा दिसायला एकदम उंचापुरा व गोरापान ! कुस्तीचा शौक असल्याने  शरीर कमावलेलं ! त्या मुळे दादा एकदम आकर्षक व देखणा दिसायचा . मिलिट्रित त्यांने पहेलवान म्हणून नाव कमावलेले होते. 

         असेच एकदा सुट्टीवर आलेला असताना ,दादा आपल्या खेडेगावातल्या एका मामा भेटायला गेला. बोलता बोलता विषय निघाला आणि दादांनी आपण मिलिट्रित पहेलवान म्हणून कसे नाव कमावलेले आहे, त्या विषयी आपल्या मामांना रसभरित वर्णन करून सांगीतले. मामा त्या गावचे सरपंच होते. त्यांना या आपल्या भाच्याचे मोठे कौतूक होतेच ! त्यात भाच्याने मिलिट्रित पहेलवान म्हणून नाव कमावल्याचे ऐकताच, त्यांचा उर भरून आला. आपल्या गावातल्या लोकांना आपल्या भाच्याची मर्दुमकी दिसलीच पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले आणि भाच्याला न विचारताच त्यांनी त्याच संध्याकाळी ,कुस्तीचे मैदान भरविण्याचा निर्णय जाहीर करून टाकला.

            भाचा म्हणजे दादा ही खूष झाला. आपली मर्दुमकी आपल्या मामा समोर ' मामाच्या गावाला ' दाखवायला मिळणार याचा त्याला आनंद झाला. ताबडतोबीने  गावात दवंडी पिटण्यात आली. फुकटची रंगतदार कुस्ती पहायला मिळणार म्हणून गावकरी ही खूष झाले. दादा तर हवेतच होता. आपण मिलिट्रितल्या एकापेक्षा एक तगड्या पहेलवानांना लोळवलय . या खेडेगावातल्या अशिक्षित  पैलवानाला आपण दोन मिनिटात आस्मान दाखवून ,कुस्ती चितपट करू याची त्याला खात्री होती. 

              संध्याकाळ झाली आणि कुस्तीचे मैदान गावकर्‍यांनी फुलून गेले. दादाला उत्सुकता होती आपल्या समोर  या खेड्यातला कोण पहिलवान उभारायला धजावतोय...आणि तिकडून जोर जोरात शड्डू ठोकत बाब्या आला. बाब्या म्हणजे त्या गावचा एक नंबरचा पहिलवान. बाब्याला पाहताच दादाचं अवसानाच गळालं . बाब्या म्हणजे काळा कभिन्न रोमणाच्या रोमणा गडी ! दादा पेक्षा वजनाने आणि आकाराने किमान दीडपट ! तरी पण आपण याला नक्की हरवू ,अशी उमलती आशा, दादाच्या मनात चमकून गेली. आपण मिलिट्रितल्या  किती  तरी मल्लाना आस्मान दाखवलय. आपण एकदम चपळ व कुस्तीचे विविध डाव करण्यात पटाईत आहोत. या बाब्याला आपण आज आस्मान दाखवूच ,या उमेदीने दादा आखाड्यात उतरला. 

             बाब्या समोरून आला तो एखाद्या माजलेल्या बैला सारखाच ! दोघांची नजरा नजर झाली. बाब्याचे डोळे तांबारलेले दिसत होते. पंचांनी शिट्टी मारली तसा बाब्या दादाच्या जवळ आला . दादानं ठरवलं ,आता थोडी खडाखडी करू व मग बाब्याच्या ताकदीचा अंदाज घेउन, आपला डाव टाकू आणि आस्मान दाखवू . पण कसचं काय अन् कसचं काय ....बाब्याने एका झटक्यात दादाला वर उचललं आणि दाणकन खाली आदळलं. दादा आता कुठला डाव करावा याचा विचार करतोय, तो पर्यंत  बाब्याने दादाला पुन्हा एकदा उचलून खाली आदळलं. बाब्या दादाला पाठ टेकवू देत नव्हता. पाठ टेकली की कुस्ती संपली. दादाला कांही सुचत नव्हतं. बाब्याचा एकच डाव चालू होता. दादाला उचल की आदळ. दादाची हाडं ढिली व्हायची वेळ आली. दादा हळूच बाब्याला म्हणाला " अरे मी पाठ टेकतो मला सोडव ". बाब्या ही हळूच म्हणाला " कुटली पाठ टेकतूयास ? माझा ह्यो डाव तुला पाठ टेकूच देनार न्हाय " दादाची बोबडी वळायची वेळ आली होती आणि बाब्याचा एकच डाव चालूच होता..." उचल की आदळ...उचल की आदळ " . शेवटी दादाने कांही युक्ती करून पाठ टेकवून घेतली आणि कुस्ती हरल्याने सुटकेचा निश्वास टाकला. 

            गावकर्‍यांनी बाब्याला डोक्यावर घेउन नाचायला सुरवात केली आणि दादानं मामांची नजर चुकवत घर गाठण्यासाठी धूम ठोकली.

एका जावयाची गोष्ट...

 एका जावयाची गोष्ट..

****************

गोष्ट बरीच जुनी म्हणजे साधारण १९६० ते १९६५ सालची असावी. मिरजेच्या आमच्या वाड्यात एक भाडेकरू रहायचे. आम्ही त्यांना काका व काकू म्हणत असू. त्यांच्या जावयाची ही गोष्ट आहे. 

          मी वर सांगीतलेल्या काळी सर्वसाधारण घरात पैशांची चणचणच असायची. कुठला ही प्रवास करायचा म्हटलं की तो रेल्वेच्या " थर्ड क्लासच्या डब्यातून "च असायचा ! त्या वेळी रेल्वेत थर्ड क्लास , सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास असे तीन प्रकारचे डबे असत. सर्व साधारण जनता थर्ड क्लासने प्रवास करायची. जरा बरी आर्थिक परिस्थिती असणारे सेकंड क्लास व फर्स्ट क्लास मधून प्रवास करणारे सामान्यांना माहितीच नसायचे. 

        आमच्या या काका काकूंच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले होते. जावई दिवाळसणाला येणार होते. ते अतिश्रीमंत असल्याने रेल्वेने व फर्स्ट क्लासने येणार होते. काका काकूंचा जावई रेल्वेच्या फर्स्ट क्लासने येणार असल्याची बातमी वाड्यात वार्‍या सारखी पसरली होती. वाड्यातल्या कुणी ही फर्स्ट क्लासने प्रवास केलेला माणूस पाहिला नसल्याने प्रत्येकाच्या मनात या जावया बद्दल जबरदस्त आकर्षण होते. त्या जावयाचे दर्शन म्हणजे प्रत्येकाची " अजी मी ब्रह्म पाहिले " अशी अवस्था होणार होती. काका काकूंनी आपल्या जावयाची अशी कांही तारीफ करून ठेवलेली होती कीं प्रत्येकाला हे जावई बापू  प्रत्यक्ष परमेश्वरा सारखेच म्हणजे डोक्यावर किरीट , चेहर्‍या भोवती पसरलेली अभा , चतुर्भूज , गरूडावरून येणारे भगवान विष्णू सारखे  असतील अशी कल्पना झालेली होती. 

             अखेर दिवाळी आली. पाडव्याच्या दिवशी सकाळी आमचे जावई बापू रेल्वेने फर्स्ट क्लासने सकाळी उजाडता येणार असल्याची व्दाही काका काकूंनी फिरविलेली होती. 

            दिवाळीच्या पाडव्या दिवशी अख्खा वाडा लवकर उठून अंघोळ करून दरवाज्याकडे डोळे लाउन बसला होता. रेल्वेच्या फर्स्ट क्लासने येणारे श्रीमंत जावई पाहण्याची सर्वांना फार उत्सुकता होती. घड्याळाचे काटे जसजसे पुढे सरकत होते तशी सगळ्यांची उत्सुकता ताणली जात होती.

            एवढ्यात दरवाज्या समोर टांगा थांबल्याचा आवाज आला. टांग्यातून एक उभ्या पट्ट्यापट्ट्यांची विजार आणि बनियन घातलेला इसम हातात वातीचा स्टोव्ह घेउन उतरला व काका काकूंची चौकशी करू लागला. हा कोण फाटका माणूस उपटला आता या वेळी असे सर्वांना वाटले. तेवढ्यात काका काकू पुढे झाले आणि आश्चर्याने " या या जावई बापू , तुमचे सामान कुठे आहे आणि तुम्ही या असल्या वेषात कसे ? " असे त्यांना विचारू लागले. तो माणूस त्यांना म्हणाला " ते मी नंतर सांगतो , आधी टांगेवाल्याचे भाड्याचे पैसे द्या ". काकांनी पाकीट आणून टांगेवाल्याचे पैसे दिले . अख्या वाड्याची निराशा झाली. फर्स्ट क्लासवाला जावई  असा फाटका कसा , याचे सर्वांना आश्चर्य वाटत असतानाच खरी बातमी समजली ती अशी !

           ते जावई फर्स्ट क्लासनं येत असतानाच रेल्वेत त्यांनी झोपण्यापूर्वी आपले टिपटाॅप असलेले कपडे काढून हॅंगरला लावून ठेवले. मध्यरात्री कधीतरी चोराने त्यांची बॅग व कपडे सर्व चोरून नेले. त्यावेळी वातीचा स्टोव्ह नवीन निघाला होता. तो आपल्या सासूरवाडीला भेट देण्यासाठी त्यांनी खरेदी करून आणला होता तो मात्र चोराने नेला नाही. त्या मुळे हे जावई सकाळी सकाळी अंगात बनियन व उभ्या पट्ट्यापट्ट्यांची विजार घालून हातात वातीचा स्टोव्ह हातात घेउन दिवाळसणासाठी पहिल्यांदा सासूरवाडीच्या दारात आले . त्यांचा तो अवतार पाहून वाड्यातल्या सर्वांची रेल्वेच्या  फर्स्ट क्लास मधून येणार्‍या श्रीमंत जावयाला पाहण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

               त्या नंतर काका काकूंनी आपल्या त्या जावया बद्दल कधी ही एक चकार शब्द काढला नाही. जावयाची व त्यांची दोघांची अशा प्रकारे फजिती झाली होती. आज ही वाड्यातल्या कुणाला ही , या आठवणीने जोरदार हसू फुटल्या शिवाय रहात नाही.

श्री. विलासराव भिंगे....सत्शील " शास्त्रीबुवा "...

 आपण सर्वांनी ड्रायफ्रुट्स खाल्लेली असतीलच ! पण ड्रायफ्रुट्सचा ' लाडू ' तुम्ही खाल्ला आहे का ? नाही ना ? मग तुम्हाला श्री. विलासराव भिंगे यांच्या नाशिक मधील ' भिंगे ब्रदर्स ' या सीबीएस शेजारच्या दुकानाला आवर्जून भेट द्यावीच लागेल. तिथला ड्राय फ्रुट्सचा ' लाडू ' तुम्ही एकदा खाल्लात तर आयुष्यभर त्याची चव विसरणार नाही.

             आज मी तुम्हाला या ड्रायफ्रुट्सच्या लाडूचे निर्माते आणि विक्रेते श्री. विलासराव भिंगे यांची ओळख करून देणार आहे. 

            श्री. विलासराव भिंगे मूळचे नाशिक जवळच्या वडनेर भैरव या गावचे ! तिथे त्यांची शेतीवाडी होती. त्यांच्या शेतात " कस्तुरी मधुरा " या जातीची अप्रतीम चविष्ट द्राक्षे पिकायची. पुढे काळाच्या ओघात शेतीतून बाहेर पडून त्यांनी नाशिकला सीबीएस शेजारी किराणा मालाचे दुकान सुरू केले व नंतर कारण परत्वे त्या दुकानाचे ' ड्राय फ्रुट्स ' च्या दुकानात रूपांतर करावे लागले. आज ही ते दुकान चालू आहे. वयोपरत्वे श्री. विलासराव भिंगेंनी त्यातून सेवानिवृत्ती घेतली आहे. आता ते दुकान त्यांचे पुतणे पाहतात.

               श्री. विलासरावांची व माझी ओळख कृषीनगरच्या जाॅगिंग ट्रॅकवर झाली. ती ओळख आता गाढ स्नेहात रूपांतरीत झाली आहे. 

             श्री. विलासराव भिंगे म्हणजे धार्मिकवृत्तीचा माणूस ! एके काळी ते पहाटे साडेतीनला उठून अंघोळ करून , जपजाप्य , पूजापाठ  करून मग सकाळी साडेसहाचे सुमारास ट्रॅकवर फिरायला यायचे. रोज ठराविक जप करणे , विष्णूसहस्त्रनामाची आवर्तने करणे व दुर्गा सप्तशती पाठ वाचणे हे सर्व ते अत्यंत श्रध्देने करीत असत. त्या मुळे आम्ही आमच्या ' निरामय जाॅगर्स ' या सकाळच्या ग्रुपमध्ये त्यांना ' शास्त्रीबुवा ' म्हणतो. धार्मिक बाबतीतील सर्व शंकांचे निरसन ' शास्त्रीबुवा ' बिनचूक करीत असतात. आमच्या ग्रुपची ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. 

               श्री.विलासरावांचे व्यक्तीमत्व अतिशय साधे आहे. मध्यम उंची , सात्विक सावळा रंग , पांढरटपणाकडे झुकलेले केस , पोशाख नीटनेटका , डोळ्यावर साजेलसा चष्मा  असे ते एकूणच सात्विक व्यक्तीमत्वाचे  आहेत. ते ट्रॅकवर शक्यतो एकटे फिरत नाहीत. श्री. विलासरांच्या बरोबर त्यांचे शाळे पासूनचे मित्र श्री. विलासराव औरंगाबादकर किंवा श्री. रामभाऊ जोशी असणारच ! श्री. विलासराव उगीचच कोणत्या ही वादात पडणार नाहीत. ते एकदम साधे व सरळ असे  सदगृहस्थ आहेत. 

                वयोपरत्वे श्री. विलासराव आता अगदी पहाटे न उठता , सूर्योदयापूर्वी उठतात .रोजचे ठराविक फिरणे न चुकता करतात. थोडक्यात त्यांचे जीवन शिस्तबद्ध आहे. 

                 श्री. विलासरावांना दोन कन्यका आहेत.दोघींचे विवाह झाले आहेत. एक दुबईला व दुसरी अमेरिकेत असते. दोघी आपापल्या जागी सुस्थितीत आहेत. कारण परत्वे श्री. विलासराव व सौ. वहिनी दुबईला व अमेरिकेला जात असतात. इतर वेळी ते दोघेच नाशिकमध्ये असतात. दोघे अतिशय आनंदात व समाधानात असतात. सौ. वहिनींची श्री. विलासरावांना समर्थ साथ आहे , हे पण महत्वाचे आहेच !

                 अशा धार्मिक व सात्विक वृत्तीच्या श्री. विलासराव भिंगे व सौ. भिंगे वहिनींना उत्तम निरामय , आनंदी , सुखी , समाधानी असे उर्वरित आयुष्य लाभो ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो व थांबतो.


Monday, 29 March 2021

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य भेट


 " नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य "

****************************


काल दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी मी , नाशिक मधल्या  आमच्या  सकाळच्या फिरायच्या ग्रुपसह " नांदूर मधमेश्वर " येथील पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी गेलेलो होतो. हे पक्षी अभयारण्य नाशिक पासून अंदाजे ४० किमी अंतरावर आहे. पक्षी दर्शनासाठी सर्वसाधारणपणे १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेर , हा उत्तम कालावधी असतो .आम्ही गेलो त्या वेळी आमच्या बरोबर पक्षी तज्ज्ञ श्री. आगाशे आणि श्री. शशिकांत गुडसूरकर सर असल्याने खूपच नवीन माहिती समजली. 

                महाराष्ट्रात भरपूर धरणे आहेत पण मग नांदूर मधमेश्वर धरणा जवळच पक्षी अभयारण्य का व कसे झाले ? इतर धरणांच्या जवळ कसे झाले नाही ? असा एक सहज सुलभ प्रश्न होता. त्याला श्री. आगाशे यांनी समर्पक उत्तर दिले. नाशिकच्या गंगापूर धरणातले पाणी नांदूर मधमेश्वर धरणात येते व इथून ते शेतीवाडीला दिले जाते. थोडक्यात गंगापूर धरणाचे पाणी वाटप येथून होते. त्या मुळे येथे पाणी कमी झाले की गंगापूर धरणातून सोडले जाते. पाण्याची पातळी वर्षभर कमी जास्ती , कमी जास्ती होत असल्याने नांदूर मधमेश्वर येथे दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे. या दलदलीत पक्ष्यांचे भक्ष्य असलेले किडे , कीटक इत्यादींची वाढ होते व त्या खाद्य आकर्षणाने पक्षी येथे येतात. इतर धरणात पावसाळ्यात पाणी भरते व वर्षभर हळू हळू ते कमी होते , त्या मुळे दलदलीचा प्रदेश निर्माण होत नाही , सबब तेथे पक्षी खाद्य नसल्याने पक्षी अभयारण्य निर्माण होत नाही. 

                पक्षी राजस्थान , तिबेट , हिमालयीन प्रदेश इतकेच कशाला युरोप , रशिया येथून नांदूर मधमेश्वर येथे येतात. हजारो किलोमीटरचा प्रवास ते करतात. गरजे नुसार पक्षी दिवसाला तीन हजार किलोमीटर अंतर सलग न थांबता ही प्रवास करतात. हे कसे शक्य होते ? या प्रश्नाचे उत्तर श्री. आगाशे यांनी खूप छान सांगीतले. ते म्हणाले... पक्षी इंग्रजी व्ही ( V ) या आकारात प्रवास करतात. त्या मुळे एनर्जी कमी लागते.  ( आपण लढाउ विमाने ही V आकारात जाताना पाहिली आहेत )तसेच पक्ष्यांना वार्‍याच्या प्रवाहांचा अंदाज लग्गेच येतो . वार्‍याचा स्पीड , वार्‍याची दिशा यांच्या सुसंगत पंखांची फडफड न करता केवळ पंख पसरून , पंखांना ठराविक कोन देउन , कमित कमी एनर्जी खर्च करून ते जास्तीत जास्त अंतर कापू शकतात. 

                पक्षी विश्रांती घेण्यासाठी  झोपतात कसे ? या प्रश्नाला श्री.आगाशे म्हणाले....माणसे अंग टाकून झोपतात तसे पक्ष्यांचे कधीच नसते. जमिनीवर वावरणारे कोंबडी सारखे , कांही पक्षी बसून विश्रांती घेतात पण पाणस्थळी वावरणारे पक्षी उभ्या उभ्या विश्रांती घेतात. या विश्रांतीचे वेळी एक पाय ताठ तर दुसरा किंचित दुमडलेला असतो. नंतर दुसरा पाय ताठ व पहिला किंचित दुमडलेला ,अशा प्रकारे पाया वरील ताण कमी जास्त करून , पक्षी विश्रांती घेतात. 

           कांही वेळेस असं घडतं की एखाद्या वर्षी अपेक्षे एवढे पक्षी इकडे येतच नाहीत , असं का होतं ? या प्रश्नाचे उत्तर श्री. गुडसूरकर सरांनी फार छान सांगीतलं. ते म्हणाले....सगळा पक्ष्यांचा थवा आला व इकडची परिस्थिती बरी नाही म्हणून परत गेला असे होत नाही. पक्षी थव्याने येण्या पूर्वी त्यांचे एक दोन दूत प्रथम इकडे येतात , परिस्थितीची , हवामानाची अनुकूलता पाहणी करतात. परिस्थिती अनुकूल असेल , तर परत जाउन सांगतात व मगच पक्ष्यांचा थवा तिकडून इकडे यायला निघतो. 

              पक्षी हवामानाच्या सोयी नुसार इकडून तिकडे , तिकडून आणखी दुसरीकडे , फिरत असतात. मग त्यांचे मूळ स्थान कोणते हे कसे ठरविले जाते ? या प्रश्नाचे उत्तर श्री. आगाशे यांनी छान सांगीतले. ते म्हणाले , पक्षी जिथे अंडी घालतात , तो प्रदेश त्यांचा मूळ प्रदेश मानला जातो.

               मानव जातीत , पुरूषांच्या मानाने , स्त्रिया सुंदर व आकर्षक असतात. या बाबतीत  पक्ष्यांचे वेगळेपण म्हणजे , नर पक्षी हा मादी पेक्षा तेजस्वी आणि देखणा असतो. मादी नराच्या मानाने कमी तेजस्वी आणि कमी देखणी असते. 

             सर्व साधारण कल्पनेपेक्षा हे पक्ष्यांचे वेगळे जग व वेगळी माहिती नक्कीच विस्मयकारक आहे.

               आम्ही नांदूर मधमेश्वर अभयारण्यात गेलो , त्या वेळी आकाश अभ्राच्छादित असल्याने , सूर्य प्रकाश नव्हता , त्या मुळे उत्तम प्रकारची दुर्बिण आमच्या गाईडकडे असून ही आम्हाला मनाला समाधान देणारे पक्षी दर्शन झाले नाही. 

            

श्री. सुनिल सानप ...एक प्रामाणिक यशस्वी व्यावसायीक.


 श्री. सुनिल सानप . "  एक यशस्वी व्यावसायिक

*************************************             नाशिक शहराचा " हार्ट आॅफ द सिटी " भाग कोणता असे विचारल्यास " रविवार कारंजा " असे कोणी ही नाशिककर चटकन् सांगेल. अशा रविवार कारंजा भागात गेल्या सत्तर ते पंचाहत्तर वर्षा पासून एक व्यवसाय तीन पिढ्या चालवीत आहेत. त्या व्यावसायिक दुकानाचे नाव आहे " सानप बंधू चिवडा आणि भेळ भत्ता " . सर्व सानप बंधू एक दिलाने हा व्यवसाय चालवतात. त्या सानप बंधूंच्या पैकी श्री. सुनिल सानप हे नाशिकमध्ये आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये राहतात. आज मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. 

      श्री. सुनिलजी हे अतिशय साधे आणि सरळ स्वभावाचे गृहस्थ आहेत. ते माझ्या पेक्षा वयाने बरेच लहान आहेत. पण त्यांचे व्यक्तीमत्व पाहता क्षणी आदर वाटावा , जिव्हाळा वाटावा असेच आहे. आपल्याकडे माणसे अागत्याने व प्रेमाने यावीत , असा त्यांचा दिलदार, प्रेमळ स्वभाव आहे. ते वागायला अगदी टाईमशीर आहेत. दुकानात जाण्याची वेळ ते कधी ही चुकवत नाहीत. येण्याच्या वेळेत कामा प्रमाणे थोडाफार बदल होउ शकतो. 

         आपल्या दुकानात मिळणारा " चिवडा व भेळ भत्ता " एक नंबरचाच असला पाहिजे , त्याच्या गुणवत्तेत फरक पडू नये याची ते सर्वजण अत्यंतिक काळजी घेतात.  या साठी शक्य ते सर्व पदार्थ स्वतःच्या जागेत , ते व त्यांचे बंधू , वैयक्तीक लक्ष घालून तयार करतात. पूर्वीच्या काळी माणसांच्या मदतीने हे सर्व पदार्थ बनविले जायचे , आता काळा प्रमाणे बदलून त्यांनी यांत्रिकी करण केले आहे. 

           पूर्वी फक्त रविवार कारंज्यावर एकच दुकान होते पण आता " सानप बंधू चिवडा व भेळ भत्ता " अशी पाच दुकाने नाशिकच्या विविध भागात कार्यरत आहेत. श्री. सुनिल सानप व त्यांचे बंधू मिळून हा  दिवसे दिवस वाढणारा व्याप अतिशय कुशलतेने सांभाळतात. 

            श्री. सुनिलजी हे स्वतः काॅमर्स ग्रॅज्युएट आहेत. त्यांना या वडीलोपार्जित व्यवसाया पेक्षा आपण कांही तरी वेगळे करावे अशी इच्छा होती. पण वडीलांच्या अवेळी झालेल्या निधनाने व व्यवसायात काकांना मदतीची आवश्यकता असल्याने , त्यांनी स्वतःची महत्वाकांक्षा बाजूला ठेउन ते व्यवसायात आले व इथेच रमले ही ! वयाच्या १२ व्या वर्षा पासून ते आज तागायत या व्यवसायाची धुरा ते आपल्या बंधुंच्या सह , समर्थपणे सांभाळत आहेत. 

         व्यवसाय म्हटले की अनेक प्रकारच्या लोकांशी संबंध येतो. सर्वसाधारणपणे लोक व्यवस्थित असतात. पण कांही लोक मुद्दाम त्रास देतात. त्यांना एरवी शांत असणारे सुनिलजी अशा वेळी , त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या शिवाय रहात नाहीत.

           श्री. सुनिलजींना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सर्वजण उत्तम शिकलेले व आपापल्या जागी व्यवस्थित आहेत. सौ. विद्या वहिनींची त्यांना समर्थ साथ आहेच !

          अशा या माझ्या जवळच्या स्नेह्यांना व सौ. विद्या वहिनींना उत्तम , निरामय दीर्घायुष्य लाभो , सुस्वभावी सून मिळो व त्यांच्यावर सुख , समाधान आणि आनंदाचा वर्षाव होवो , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.