Friday, 28 August 2020

माझे दोन नातू....

माझे नातू....
मला दोन नातू आहेत. फोटोत डाव्या बाजूला दिसत आहे तो चि. निषाद ,  मुलाचा मुलगा आणि उजव्या बाजूला दिसत आहे तो, चि. मानस , मुलीचा मुलगा !
               चि. मानस बाराव्वीला आहे व चि. निषाद सातवीला आहे. दोघेही मनाने अतिशय प्रेमळ आहेत. दोघांना ही आपले नातेवाईक सारखे यावेत , भेटावेत असे वाटत असते. पण ते नेहमीच शक्य असते असे नाही. " गुगल मीट " वर सगळ्यांना बोलावून ते दोघे आपली नातेवाईकांना भेटायची हौस भागवत असतात.
                   चि. मानसच्या जन्माचे वेळी २००४ साली मी नाशिकला नोकरीत होतो. चि. मानसचा जन्म मिरजचा ! त्याच्या जन्मा नंतर  दुसर्‍या दिवशी, त्याला पहायला मी मिरजला गेलो. चि. मानस म्हणजे उत्साहाचा झराच होता. इतक्या जोरात हातपाय हलवत असायचा की हा दमत कसा नाही , याचं आश्चर्य वाटावं ! रडायला लागला की असला जोरात किंचाळायचा, की ऐकवत नसे. त्याच्या लांबच्या आज्जी त्याला पहायला मिरजला  आल्या असताना त्याचा रडण्याचा आवाज ऐकून " हा आमच्या चिक्कोडीचा आवाज आहे " असं म्हणून खूष झाल्या होत्या. लहानपणीचा मानस अल्लड आणि चांगलाच दंगेखोर होता. घरभर त्याचं बारीक लक्ष असायचं.  आता चि. मानस मोठा झालाय. मिसरूड फुटलय. तो आता खूपच जबाबदारीने वागतोय. चि. मानसनं त्याच्या वडीलांच्या प्रमाणेच वकील व्हावं असं मला वाटतय. अर्थात तो जे करेल ते योग्यच करेल अशी मला खात्री आहे.
             चि. निषाद हा माझा दुसरा नातू. तो अजूनी अल्लडच आहे. चि. निषादच्या जन्माचे वेळी २००७ साली  मी सेवानिवृत्त झालो होतो. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरला मुलीकडे गेलो होतो. सुनेला दवाखान्यात नेल्याचा व्याह्यांचा फोन आला. आम्ही तातडीने कोल्हापूरहून मिरजेला आलो. चि. निषादच्या जन्मानंतर त्याला एका ट्रे मध्ये ठेवले होते. तिथे त्याला पहायला  प्रथमच  आम्ही गेलो. छान टकमक पहात होता. आम्ही मुला बरोबरच रहात असल्याने ,चि. निषादचा भरपूर सहवास मिळाला आहे. त्याची आणि माझी दोस्तीच आहे म्हणाना ! त्याला दंगा करायची लहर आली की तो आजही माझ्याकडे धाव घेतो.
                 नातवंडे म्हणजे " दुधावरची साय " असे म्हणतात. माझी दोन्ही नातवंडे अतिशय लाघवी आणि प्रेमळ आहेत.
                 नातवंडे मोठी झाली की त्यांच्या संसारात त्यांच्या बरोबर रहायची माझी इच्छा आहे. पण ती पूर्ण होणं कठीणच आहे. चि. मानस आज सोळा वर्षाचा आहे व चि. निषाद बारा वर्षाचा ! त्यांचे संसार सुरू होई पर्यंत मी " असण्याची " शक्यता कमीच आहे.
            मी कुठे ही असलो तरी त्या दोघांना माझे सदैव भरभरून शुभाशिर्वाद आहेतच !
            चि. मानस आणि चि . निषाद , खूप मोठे व्हा आणि आपल्या आई वडीलांना भरभरून सुख व समाधान द्या आणि तुम्ही ही ,सुखासमाधानात रहा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.



Wednesday, 26 August 2020

कै. नगरकर काकू ...एक रसिकाग्रणी व्यक्तीमत्व...

कै. सौ. राजेश्वरी पांडुरंग नगरकर. " मेरी " या संशोधन संस्थेच्या एके काळच्या, मुख्य अभियंता आणि संचालक श्री. पांडुरंग कृष्णाजी नगरकर साहेबांच्या पत्नी ! माहेरच्या नलिनी कान्हेरे ! यांची मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे.
               मुख्य अभियंता आणि संचालक ,या सारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या पत्नी , म्हटल्यावर त्या अहंमन्य असाव्यात अशी समजूत होणे ,स्वाभाविकच आहे. पण कै. सौ. नगरकर तशा नव्हत्या.
               आम्ही संशोधन संस्थेतील त्यांचे परिचित, त्यांना " नगरकर काकू " असे म्हणत असू. या लेखात मी त्यांचा तसाच उल्लेख करीत आहे.
                एकदा तुमचा आणि नगरकर काकूंचा परिचय झाला आणि तुमचे वागणे मर्यादेत असले व त्यांना योग्य वाटले ,तर त्या तुमच्याशी परकेपणाने वागत नसत. अशा प्रकारे शिस्तबद्ध वागणारा ,संस्थेतील शासकीय अधिकारी असो किंवा त्यांच्या शासकीय बंगल्यावर काम करणार्‍या चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो, त्या आपल्या कुटूंबातल्या व्यक्ती प्रमाणे त्यांची काळजी घेत.  त्यांच्या पैकी कुणाला कांही मदत हवी असेल तर ,आपुलकीने आणि जिव्हाळ्याने त्या जरूर करायच्या.
                   मेरीच्या संस्कृतिक जीवनात, त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. विविध धाटणीची नाटके , आनंदमेळा व इतर मनोरंजनात्मक तसेच सांस्कृतिक  कार्यक्रमांना, त्यांचा नेहमीच सक्रीय पाठींबा असायचा.
                  काकूंचे माहेर जरी सातारा असले तरी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले . महाविद्यालयीन शिक्षणाचे वेळी त्यांनी शैक्षणिक उन्नत्ती बरोबरच ,गायन व अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. सन १९५५ साली त्यांचा श्री. नगरकर साहेबांच्या बरोबर विवाह झाला. सन १९५६ मध्ये त्यांनी गो. नी. दांडेकर लिखित, " राधामाई " या नाटकात राधेची भूमिका केली होती.  त्या नाटकातील गायक अभिनेत्रीचे पहिले बक्षिस  ,त्यांना नटसम्राट बालगंधर्व यांचे हस्ते प्राप्त झाले होते. त्यांनी  १९६५ - ६६ साली  पुणे विद्यापीठातून एम. ए. केले. त्या वेळी त्या कार ड्राईव्ह करत विद्यापीठात जात असत. त्या काळात घरात कार असणं दुर्मिळ आणि बायकांनी कार चालवणं म्हणजे जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट ! पण काकूंनी तो ही आनंद मनसोक्त घेतला.  श्री. नगरकर साहेबांची बदली कोयना प्रकल्पावर झाल्यावर त्या तिकडे गेल्या. कोयनेला असताना, त्यांनी तिथल्या महिला मंडळात , अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या रसिक व्यक्तीमत्वाचा  ठसा उमटविला.
               काकूंचा स्वभाव बोलका होता. त्यांना ब्रीज खेळणं , क्रिकेट पाहणं , बाग फुलवणं  मना पासून आवडायचं. त्या  धार्मिक वृत्तीच्या होत्या. आपुलकीच्या , जिव्हाळ्याच्या माणसांचे  दुःख त्यांना आपलच वाटायचं. अशा प्रसंगी त्या निरपेक्षवृत्तीने ,आवश्यक ती सर्व मदत करीत. साहेबांच्या सेवानिवृत्ती नंतर, ते दोघे वेदान्त शिकण्यासाठी, पुरूषोत्तमशास्त्री फडके यांच्याकडे जात असत. नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात असे त्यांना वाटायचे.  त्या नाविन्याचा आस्वाद ,त्या मोठ्या आनंदाने घेत असत. काकूंचा स्वभाव रसिकाग्रणी होता. वैताग हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नव्हताच ! त्या सतत प्रसन्न असत व आपल्या अस्तित्वाने ,सभोवतालचे वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीत.
                 श्री. नगरकर साहेब आणि  नगरकर काकूंना तीन मुले. चि. श्री , चि. सौ. प्रिया भिडे व चि. अभिराम !  तिघे ही आपापल्या जागी सुस्थितीत आहेत.
                  अशा या कलासक्त , सदैव प्रसन्न असणार्‍या व रसिक मनाच्या काकूंचे, सन २००८ साली वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
                      आज दि. २६ आॅगस्ट आहे आज त्यांचा वाढदिवस आहे.  काकू हयात असत्या तर ८६ वर्षाच्या असत्या. पण तो योग नव्हता. काकू प्रत्यक्ष हयात नसल्या तरी ,आमच्या सर्वांच्या मनात त्यांचे अबाधित असे स्थान नक्कीच आहे. नगरकर काकूंना विसरणे सर्वथैव अशक्यच !
                        कै. नगरकर काकूंच्या जन्मदिनी त्यांना साश्रुपूर्ण श्रध्दांजली वाहतो आणि थांबतो !
             । । ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

Friday, 21 August 2020

कै. हणमंतराव गाडगीळ... मिरज शहर भूषण ...

मिरज शहरात ब्राह्मणपुरीत ,पूर्वी हमखास नजरेत भरणारे व्यक्तीमत्व म्हणजे, कै. हणमंतराव गाडगीळ ! तानाजी मालुसरे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, यांचे मिश्रण असलेल्या झुबकेदार मिशा , गोरापान रंग , मध्यम उंची ,कमावलेली देहयष्टी , डोक्यावर कधी कधी स्वतः बनविलेली  विशिष्ठ टोपी ! असे  रूबाबदार व्यक्तीमत्व म्हणजे ,कै. हणमंतराव गाडगीळ ! कै. हणमंतराव गाडगीळांचे व्यक्तीमत्व, विविधांगी होते.
              कै. हणमंतराव , मिरजेच्या कन्या शाळेत, कला शिक्षक होते. कन्या शाळेत दरवर्षी नवरात्रात, सरस्वतीच्या मूर्तिची प्रतिष्ठापना होत असे. ती सरस्वतीची मूर्ति ,कै. हणमंतराव स्वतःच्या कल्पनेने, दरवर्षी नवीन बनवित असत . त्यांना जन्मजात मूर्तिकलेची जाण होती. गणेशोत्सवात ते अनेकांना, सार्वजनिक आणि घरगुती गणपती बनवून देत. या सर्व मूर्ति ते स्वतः घडवित असत . साच्यातून मूर्ति बनविणे, त्यांना आवडत नसे. मूर्तिकलेची जन्मजात असलेली जाण ,त्यांनी बनविलेल्या प्रत्येक मूर्तित, प्रकर्षाने दिसत असे.
                 ते  मिरजेच्या भानू तालमीचे, एक अग्रगण्य खेळाडू होते. त्यांनी स्वतःचे गोरे पान शरीर, अतिशय उत्तमपणे व्यायामाने कमविलेले होते. त्यांचे स्वतःच्या श्वसनावर आणि स्नायूंवर  ,उत्तम नियंत्रण होते. या नियंत्रणाच्या योगे ,ते पाण्याने भरलेली मोठी घागर ,हात न लावता उचलून ,एका खांद्यावरून दुसर्‍या खांद्यावर फिरवून ,त्यातील पाण्याचा ऐक थेंब ही खाली न सांडता, परत खाली जमिनीवर ठेवत. हात न लावता, केवळ स्नायू आणि श्वसनावर नियंत्रण ठेउन, ही किमया साधणारे व्यायामपटू आता सापडणे अशक्य आहे , असे माझे स्पष्ट मत आहे.
              तसेच ते जिम्नॅस्टिक्सपटू ही होते. त्यांनी मुलांचे व मुलींचे जिम्नॅस्टिक्सचे संघ, भानू तालमीत तयार केलेले  होते. या संघांनी राज्य जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत, कै.हणमंतराव यांच्या मार्गदर्शना खाली, उज्वल यश संपादन केलेले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.
              कै. हणमंतराव उत्तम अभिनेता होते. त्यांनी  दुरितांचे तिमिर जावो  ,  रायगडला जेंव्हा जाग येते , स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संन्यस्तखड्ग इत्यादी  नाटकात ,उत्तम अभिनय  करून, रंगभूमीची सेवा केलेली आहे. मराठी नाट्य परिषदेच्या, मिरज शाखेचे अध्यक्षपद, त्यांनी कांही काळ भूषविलेले आहे. ते चांगले तबला वादक होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती.
                 या व्यतीरिक्त आणखीन एक  दुर्मिळ वैशिष्ठ्य, कै. हणमंतरावांच्या जवळ होते ! ते पगड्या तयार करीत असत. ही दुर्मिळ कला, त्यांनी स्वतः आत्मसात केलेली होती.  पुणेरी , मल्हारशाही , होळकरी , मराठेशाही , मावळी अशा सर्व प्रकारच्या पगड्या,  ते स्वतः तयार करीत असत. त्यांच्या पगड्या ,वजनाला अतिशय हलक्या असत. त्या मुळे त्यांच्या पगड्यांना, नटवर्य कै. प्रभाकर पणशीकर यांच्या सारख्या तज्ज्ञांनी ,वेळो वेळी गौरविले होते. कै. हणमंतराव फेटे बांधण्यात तरबेज होते. माझ्या ऐकण्यात आलेल्या माहिती प्रमाणे ,कै. अटल बिहारी बाजपेयी यांना, एके प्रसंगी कै. हणमंतरावांनी फेटा बांधलेला आहे.
               थोडक्यात कै. हणमंतराव गाडगीळ  कलाशिक्षक होते, मूर्तिकार होते , मिरजेच्या भानू तालमीचे एक उत्कृष्ठ खेळाडू होते , जिम्नॅस्टिक्सपटू होते , अभिनेता होते , तबला वादक होते , भारतीय शास्त्रीय संगीताचे जाणकार होते , विविध प्रकारच्या टोप्या ,पगड्या बनविण्यात आणि उत्तम प्रकारे फेटे बांधण्यात तरबेज होते.
             अशा या हरहुन्नरी आणि मिरज शहराला भूषण असलेल्या व्यक्तीमत्वाचे दि. २१ मे २०१६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
               कै. हणमंतराव गाडगीळ यांच्या विविधांगी स्मृतीस, या लेखाचे माध्यमातून ,त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.

Sunday, 16 August 2020

डाॅ. सौ. विनीता करमरकर ... एक अनुकरणीय व्यक्तीमत्व

डाॅ. सौ. विनीता करमरकर . मिरजेच्या सुप्रसिध्द डाॅ. वसंत करमरकर यांच्या पत्नी !  तसेच एके काळचे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त " नटसम्राट ", कै.  चित्तरंजन कोल्हटकर यांच्या त्या कन्या होत. आज मी  तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे.
                सौ. विनीता वहिनींचे माहेर पुणे. वडील  चित्तरंजन कोल्हटकर अभिनेता असल्याने ,घरातले वातावरण मोकळे ढाकळे असेल ,असे वाटण्याची शक्यता आहे. पण नाही.  चित्तरंजन कोल्हटकरांना, घरात  नाटक व सिनेमा या संबंधात  बोलणे व चर्चा करणे,  मुळीच अावडायचे नाही.  घर हे घरा सारखेच असले पाहिजे, त्याचे थिएटर व्हायला नको , या बाबीवर वर त्यांचे बारकाईने लक्ष असे. मुलींनी संध्याकाळी सातच्या आत घरात आलेच पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. वेळेचे ते पक्के बांधील होते.
               सौ. वहिनींचे शालेय शिक्षण, त्या वेळच्या  मुलींच्या भावे स्कूल मध्ये व काॅलेजचे शिक्षण, पुण्याच्या एस. पी. काॅलेज मध्ये झाले. शाळेत शिकत असताना , मराठी आणि संस्कृत भाषेतल्या "  नाट्यवाचन " स्पर्धेत , सौ. वहिनींनी पारितोषके मिळविली आहेत. तसेच  माजी विद्यार्थीनींच्या, " सुवर्णतूला " या नाटकात सत्यभामा  आणि " रायगडला जेंव्हा जाग येते " या नाटकात सोयराबाईची भूमिका साकारून, त्यांनी  प्रेक्षकांची वाहवा मिळविलेली आहे.
                 सन १९७५ साली,  मिरजेच्या डाॅ. वसंत करमरकर यांच्याशी विवाह झाल्या नंतर, त्या मिरजेत वास्तव्याला आल्या. चि. उन्मेष आणि चि. मुग्धा अशी दोन गोड मुले ,त्यांच्या संसार वेलीवर फुलली . संसार चालू होता. पण मनात, आपण वेगळे कांही तरी केले पाहिजे, असा सतत विचार येत होता. याची परिणती म्हणून ,त्यांनी पीएच. डी. करून " डाॅक्टरेट " मिळवावी  असे ठरविले.
                सौ. वहिनींचे अाजोबा कै. चिंतामणराव कोल्हटकर , हे गानसम्राज्ञी श्रीमति लता मंगेशकर यांच्या वडीलांचे म्हणजेच कै. दीनानाथ मंगेशकर  यांचे, रंगभूमी वरील समकालीन नट होते. कै. चिंतामणराव कोल्हटकरांचे , मराठी रंगभूमी वरील  कर्तृत्व खूपच मोठे आहे.  त्या काळी त्यांनी कै. दीनानाथ मंगेशकरांचे साथीने , स्वतःची नाटक कंपनी चालविली होती. तसेच  त्यांनी  मराठी नटसंचात, हिंदी रंगभूमीवर  हिंदी नाटके सादर करण्याचा ,आगळा वेगळा प्रयोग केला होता. आपल्या आजोबांच्या रंगभूमी वरील कार्याचा, साकल्याने विचार करून त्यांनी, " कै. चिंतामणराव कोल्हटकर , कार्य व कर्तृत्व " या विषयावर,  पीएच. डी. चा प्रबंध लिहायचे ठरविले.
               भरपूर कष्ट घेउन ,त्यांनी त्यांच्या मुंबईच्या काकांच्याकडे असलेली जुनी कागदपत्रे , तसेच अाजोबांच्या डायर्‍या मिळविल्या. अाजोबांना ओळखणार्‍या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात पु. ल. देशपांडे , विष्णूपंत जोग , परशुराम सामंत , गणपतराव मोहिते उर्फ मास्टर अविनाश , विश्राम बेडेकर , चंद्रकांत गोखले इत्यादी नामवंतांचा समावेश होता.  त्या साठी मिरज ते पुणे , मुंबई अशा सारख्या खेपा घालाव्या लागत होत्या. संसार सांभाळायचा , मुलांचं हवं नको पहायचं , सासुबाईंच्या कडे लक्ष द्यायचं, अशी  सर्व तारेवरची कसरत करत त्यांनी जिद्दीने,  आपल्या गाईड  डाॅ. तारा भवाळकर यांच्या मार्गदर्शना खाली, आपली डाॅक्टरेट पूर्ण केली. त्या साठी त्यांना सात वर्षे, अथक परिश्रम घ्यावे लागले. अशा प्रकारे  जिद्दीने अभ्यास व प्रबंध लेखन पूर्ण  करून, त्यांनी  सन १९९६ मध्ये " डाॅक्टरेट " मिळविली आणि डाॅ. वसंत करमरकर यांच्या बरोबरीने , त्या डाॅ. सौ. विनीता करमरकर झाल्या.
                 मिरजे सारख्या शहरात, त्यांनी " संस्कार भारती " चे संस्थापक अध्यक्ष या नात्याने, कार्याची मूहूर्तमेढ रोवली. नाट्य परिषद , शाखा मिरजच्या त्या कार्यरत सदस्या  आहेत. या शिवाय मिरजेच्या नावाजलेल्या , " आदर्श शिक्षण मंडळ " या शैक्षणिक संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत.
                   त्यांची दोन्ही मुले , चि. उन्मेष आणि चि. सौ. मुग्धा , हे दोघे ही डाॅक्टर आहेत. चि. उन्मेष पुण्यात आणि चि. सौ. मुग्धा पुरंदरे मुंबईत ,आपापल्या व्यवसायात व्यस्त आहेत. पतिराज डाॅ. वसंत करमरकर यांची मेडिकल प्रॅक्टीस, मिरजेत आज ही जोरात चालू आहे.
                    सर्व कौटूंबिक जबाबदार्‍या उत्तम रीतीने  सांभाळून, जिद्दीने आपला व्यक्तीगत विकास करून घेणार्‍या ,डाॅ. सौ. विनीता करमरकर वहिनींना आणि डाॅ. वसंत करमरकर यांना, पुढील उदंड आणि निरामय आयुष्यासाठी  या लेखाचे माध्यमातून, भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

Saturday, 8 August 2020

" माझा आॅन लाईन क्लासचा यशस्वी प्रयोग "

" माझा आॅन लाईन क्लासचा यशस्वी प्रयोग "  **********************************

              मी रोज ज्या " दिशा " या मोफत क्लास मध्ये शिकवायला जात होतो , तो या वर्षी करोना मुळे बंद पडला. आमचा हा क्लास ,एका बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये भरत असे. शिकवताना मी एका कट्ट्यावर बसत असे . मुले व मुली माझ्या समोर जमिनीवर खाली बसत असत. शेजारी बोर्ड ठेवलेला असे. आमच्या क्लासमधील बहुसंख्य मुले, महापालिकेच्या शाळेतील असतात. त्यांचे पालक गरीब परिस्थितीतील असल्याने , ज्या मुलांना प्रायव्हेट क्लासेस परवडत नाहीत ,अशीच मुले आमच्या मोफत क्लास मध्ये येत असतात . असा साधा सोपा क्लास आहे आमचा !
                 करोनाने सगळीच गणिते, उलटी पालटी करून टाकली आहेत. क्लास घेण्यास परवानगी नाही. अर्थात ते योग्यच आहे.
                   बरेच खासगी क्लासेस " आॅन लाईन " सुरू झाल्याच्या बातम्या, कानावर येत होत्या. तो त्यांचा व्यवसाय असल्याने ,खासगी क्लासवाल्यांना पर्याय नव्हता. त्यांच्या क्लासमध्ये येणारी मुले पैसेवाल्यांची असल्याने ,अॅन्ड्राॅइड मोबाईल्स किंवा लॅपटाॅप घेण्याची त्यांची कुवत होती. आमच्या क्लासच्या मुलांचे काय ? जेमतेम उत्पन्न असलेल्या पालकांची ती मुले !  ती  " आॅन लाईन " क्लासला कशी जाॅईन होणार  ? हा प्रश्नच होता.
                  मी आठवीचा क्लास घेतो. आठवीच्या कांही मुलांचे फोन नंबर्स ,मी मिळवले. कांही नंबर्स ,माझ्या सहकारी शिक्षकांनी दिले. मी मुलांना व त्यांच्या पालकांना फोन केले. नशिबाने कांहींचे फोन अॅन्ड्राॅईड होते. कांही मुले अॅन्ड्राॅईड फोन तात्पुरते कोणा कडून तरी ,आणायला तयार झाली. अशी साधारण दहा ते पंधरा मुले शिकायला तयार झाली.
                    हा क्लास " गुगल मीट " वर घेतात हे मला माहिती होते. त्या साठी मी वयाच्या पंच्च्याहत्तरीत , गुगल मीट वापरायला शिकलो. माझा नातू चि. निषाद याने या बाबतीत ,मला अनमोल मदत केली. तो सातवीतच आहे. पण त्याचे या सर्व बाबतीतले ज्ञान, थक्क करणारे आहे.  क्लासला येउ इच्छीणार्‍या मुलांना गुगल मीट कसे वापरायचे ,त्याचे शिक्षण मोबाईलवरच मी व माझा नातू चि. निषाद याने, मोठ्या प्रयत्नांनी दिले . ज्या मुलांना नीट समजले नाही त्यांनी ,ज्यांना समजले त्या मुलांच्या कडून शिकून घेतले. विद्यार्थ्यांचा एकूणच  उत्साह वाखाणण्या सारखाच होता.
                अशा प्रकारे ,आमचा " दिशा " मोफत क्लासचा आठवीचा " आॅन लाईन " वर्ग ,सुरू झाला. आपण  पंच्च्याहत्तरीच्या वयात  सुध्दा ,काळा बरोबर धावू शकतो , ही संकल्पना  माझ्या मनाला आनंद देउन गेली....

Monday, 3 August 2020

केके...एक उत्साही व्यक्तीमत्व....

एखाद्या माणसाचं आयुष्य मोठ्या कष्टात जातं, परमेश्वर कृपेने केलेल्या कष्टाचं चीज होतं आणि " फिटे अंधाराचे जाळे , झाले मोकळे आकाश " अशी वेळ येते . पण त्याच वेळी, " जो आवडतो सर्वांना , तोचि आवडे देवाला " म्हणत, देव त्याला " आपल्या घरी " घेउन जातो.अशा अवघड  परिस्थितीतून गेलेल्या  माणसाची ,मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे अॅडव्होकेट ( कै. ) दत्तात्रय कुलकर्णी !
              अॅडव्होकेट श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना त्यांचे मित्र, " केके " या टोपण नावाने ओळखायचे. मी ही त्यांना त्याच नावाने ,ओळखत असे.
            केकेंचे मूळ गाव सावळज , ता. तासगाव , जि. सांगली. तिथे त्यांची वडीलोपार्जित शेती होती. पण कौटूंबिक वादात होती. त्यातून फारसे उत्पन्न मिळायचे नाही. घरात गरीबी पाचवीलाच पुजलेली असायची . केके केवळ अडीच वर्षांचे असताना, त्यांना व त्यांच्या भावंडांना ,सांगलीत एका अनाथालयात रहायला जावं लागलं. तेरा वर्षाचे होई पर्यंत  ते त्या अनाथालयात होते. शिक्षण ही चालू होतं . ते दहावीची बोर्डाची परिक्षा ,उत्तम मार्कांनी पास झाले. नंतर मिरजमध्ये त्यांच्या मावशीने, त्यांना आपल्या घरी आधार दिला. त्याच वेळी मिरजेतल्या एका मंगल कार्यालयात,  केके पडेल ते काम करून आपला उदर निर्वाह चालवायचे.
                 घरच्या जमिनीच्या तंट्यासाठी त्यांच्या वडीलांना सारखे वकीलांच्याकडे जावे लागायचे. वकील फी देण्यासाठी पैसे नसायचे. वडीलांनी केकेंना " तू वकील हो " असा सल्ला दिला. केकेंनी तो शिरोधार्ह मानला. सांगलीच्या लाॅ काॅलेज मध्ये अॅडमिशन घेतली. कार्यालयात दिवसभर काम करायचं ,त्यातूनच वेळ काढून लाॅ काॅलेज अटेंड करायचं , रहायला मावशीच्या घरी जायचं . थोडक्यात कसे ही करून वकील व्हायचेच ,या जिद्दीवर मिळेल तेव्हा  झटून अभ्यास करून, केके वकील झाले. एखादा माणूस एखाद्या ध्येयाने झपाटलेला असल्यास, अडचणींच्यावर मात करून, काय काय करू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे " केके " !
                वकील झाल्यावर केकेंनी, आपले जमिनीचे कौटूंबिक आणि इतर सर्व वाद ,कायद्याच्या मार्गाने आणि सामोपचाराने सोडविले. आपल्या हक्काची वडीलोपार्जित जमीन ,स्वतःच्या कब्जात मिळवली. त्या नंतर वकीली आणि शेती दोन्ही करायला सुरवात केली.
                आर्थिक दृष्ट्या ,थोडे बरे दिवस दिसायला लागल्यावर, त्यांनी मिरजेत एका अपार्टमेंटमध्ये ,स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे लग्न ठरविले. त्यांना डाॅक्टर पत्नी मिळाली. डाॅ. दीप्ती सांभारे ,डाॅ. सौ. दीप्ती कुलकर्णी झाली. छान संसार चालू होता. संसारवेलीवर चि. मनवा नावाचे गोड कन्यारत्न फुलले.
                    साधारण २०१५ सालची गोष्ट. दोघे नवरा बायको लेह लडाखच्या ट्रिपला गेले. तिथले हवामान केकेंना सहन झाले नाही. डोकं प्रचंड दुखायला लागलं , उलट्या सुरू झाल्या आणि केके बेशुध्द झाले. बरोबरच्या लोकांच्या मदतीने, त्यांना तिथेच लेहच्या  हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलं गेलं. तिथे उपचारांची फारशी सोय नसल्यानं, त्यांना दिल्लीला विमानाने आणण्यात आलं. तिथे डाॅक्टरांनी,  केके " कोमात "  गेल्यानं, केस हाता बाहेरची असल्याचं सांगीतलं. मग केकेंच्या भाचीचे मिस्टर श्री. अभय आठवले ( मिरजेच्या गजानन मंगल कार्यालयाचे मालक ) हे दिल्लीला गेले . त्यांना अॅम्ब्युलन्स मधून मिरजेला घेऊन येऊ लागले. मिरजेच्या जवळ आले असतानाच ,केकेंची प्राणज्योत मालवली. 
                 स्वकष्टातून वर आलेले , चांगले आनंदाचे दिवस पाहण्याची स्वप्ने रंगविणारे केके,  वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी,  पत्नी आणि सात वर्षाच्या मुलीला मागे ठेऊन, अनंताच्या प्रवासाला निघून गेले .
                केकेंचे आयुष्य कष्टप्रद गेले. " एक एक रूपयाची किंमत मला माहिती आहे " , असे ते म्हणत .   स्वतःची कामे ते स्वतः करीत. अवलंबून राहण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.  स्वतःच्या अडचणी बाजूला सारून ,दुसर्‍याला मदत करण्यात केके सर्वात पुढे असत.
                  आज रक्षा बंधनाचा आदला दिवस आहे. तिथीने केकेंचा " महानिर्वाण दिन " आज आहे.  अशा सर्वांशी प्रेमाने वागणार्‍या  व स्वतःच्या कष्टाने स्वतःचे " अढळ स्थान " निर्माण करणार्‍या , केकेंच्या पवित्र स्मृतिस वंदन करून, आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो.