Wednesday, 29 April 2020

श्री. एम्. के. कुलकर्णी साहेब....सेवानिवृृृृृत्त प्रधान सचिव .

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अतिउच्च पदावरून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीची म्हणजेच श्री. एम्. के. कुलकर्णी साहेबांची !
           एका खेडेगावातल्या शाळा मास्तरांचा मुलगा , स्वकर्तृत्वावर  , महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव पदापर्यत पोहोचतो आणि तिथून सन्मानाने सेवानिवृत्त होतो ,ही बाब मला तरी परिकथेतल्या गोष्टी प्रमाणे वाटते. पण ही वस्तूस्थिती आहे.
           श्री. कुलकर्णी साहेबांचे मूळ गाव दत्तवाड , जि. कोल्हापूर. तिथे त्यांचे वडील शिक्षक होते. परिस्थिती त्या काळच्या मानाने बेताचीच होती. श्री. कुलकर्णी साहेबांनी आर्थिक परिस्थितीशी झुंजत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्या नंतर भरपूर परिश्रम घेउन MPSC मार्फत होणार्‍या परीक्षेत ते क्लास वन् अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले. त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या दृष्टीने ही फार मोठी उपलब्धी होती.
               आम्हाला मेरी या संशोधन संस्थेत कार्यकारी अभियंता ( संशोधन अधिकारी ) या नात्याने ते अधिकारी म्हणून आले. त्या वेळी आमचा प्रथम परिचय झाला. तो आज तागायत टिकून आहे. त्याचे श्रेय अर्थातच श्री. कुलकर्णी साहेबांचेच आहे.
              मेरीतली एक आठवण सांगतो. तिथे समुद्रमातीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍यांचे डिझाईन करण्याचे काम चालत असे. एका सेक्शनचे डिझाईन करायला पाच ते सहा दिवस लागत. श्री. कुलकर्णी साहेबांनी या गोष्टीचा अभ्यास करून आम्हाला अशी पध्दत शोधून दिली की , तेच डिझाईन आम्ही दीड तासात  करायला लागलो. श्री. कुलकर्णी साहेबांचा गणित या विषयाचा सखोल अभ्यास या वेळी कामी आला होता.
             साहेब पुढे प्रधान सचिव पदापर्यत पदोन्नत होत गेले. आॅफिसच्या वेळात ते कर्तव्यदक्ष अधिकारी असत. आॅफिसची वेळ संपली की ते सर्वसामान्य नागरिक  असत. हा माझ्या दृष्टीने अतिशय  दुर्मिळातला दुर्मिळ  गूण  आहे.
             आणखीन एक आठवण त्यांच्या बद्दल सांगावी असे वाटते. त्यांची मुलगी जेंव्हा डाॅक्टर झाली त्या वेळी त्यांनी तिला काय सांगीतले असेल ? ते म्हणाले " तू डाॅक्टर म्हणून पैशाकडे अजिबात पाहू नकोस , माणूसकीच्या प्राधान्याने तू तुझा व्यवसाय कर ". हा माणुसकीचा  दृष्टीकोन आपल्या लेकीला देणारे वडील निश्चितच वंदनीय आहेत , हे तुम्हाला ही पटेलच !
           श्री. कुलकर्णी साहेबांना सेवानिवृत्त होउन ,तेरा वर्षे झाली आहेत आणि ते सध्या, मिरज सारख्या मध्यम प्रतीच्या , पण त्यांच्या आवडत्या, शहरात वास्तव्याला आहेत.
   साहेबांना एक मुलगा व दोन मुली. सर्वजण आपापल्या जागी उत्तम स्थितीत आहेत. सौ. वहिनींची साहेबांना समर्थ साथ आहेच !
अशा या अत्युच्चपदावरून सेवानिवृत्त झालेल्या ,पण निरहंकारी , निगर्वी आणि साध्या सरळ स्वभावाच्या, श्री. कुलकर्णी साहेबांना व सौ. वहिनींना परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे, ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment