Sunday, 26 April 2020

श्री. रोडे साहेब ...एक अविस्मरणीय व्यक्तीमत्व...

एक नावाजलेले अभियंता , महाराष्ट्र पदवीधर अभियंता संघटनेचे एके काळचे  अध्यक्ष , जबरदस्त बुध्दिमत्ता आणि अफाट स्मरणशक्ती , माणसे ओळखण्याची अद्वितीय कला , हाता खालच्या माणसांच्या कडून ,अपेक्षित दर्जाचे काम करून घेण्याची हातोटी , इंग्रजी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व ,करारी स्वभाव , उत्तम वळणदार हस्ताक्षर ,  त्याच बरोबर प्रेमाचा ओथंबून वाहणारा झरा .......
        बापरे , एखाद्या माणसाचे एवढे वर्णन ? पण मी लिहीलेले वर्णन ,अगदी खरे आहे . त्यात कोणती ही अतिशयोक्ती नाही . मी अशा अद्वीतीय व्यक्तीमत्वाच्या सान्नीध्यात, माझ्या नोकरीचा कांही काळ घालविला आहे. हे गृहस्थ ,आम्हाला मेरी आॅफिसमध्ये, कांही काळ कार्यकारी अभियंता  ( संशोधन अधिकारी ) होते. थोडक्यात सांगायचं तर , या व्यक्तीमत्वाचे सदगृहस्थ आम्हाला, मेरी या संशोधन संस्थेत " साहेब " होते.
         साहेबांची करडी नजर , बोलण्यातला करारीपणा पाहून, सर्वजण त्यांना घाबरूनच असत. शासकीय कामात, एकदा माझ्या चुकी बद्दल, त्यांनी माझी इतकी निर्भत्सना केली होती की , आज ही, मी , ती विसरू शकत नाही. पण त्या व्यतिरिक्त, त्यांनी माणूसकीच्या नात्याने माझ्यावर भरपूर आपुलकी आणि जिव्हाळ्याचा ,वर्षाव ही केला होता.
          मला आणि माझ्या कांही सहकार्‍यांना , ते किती ही जवळचे मानत असले तरी , आम्हाला मात्र त्यांची भिती वाटायची. त्यांनी बोलावल्याचा निरोप शिपायाने आणला की , छातीचा ठोकाच चुकायचा.  आपल्या कडून कांही चूक तर झाली नसेल ना ? साहेब आपल्याला रागवणार तर नाहीत ना ? अशी भीती आमच्या सर्वांच्या मनात सतत असायची.
         त्यांच्या या करारी स्वभावा मुळे, त्यांना नावे ठेवणारे भरपूर लोक होते व त्याची ,त्यांना ही ,जाण होती.
         त्यांच्या सहवासात भरपूर रहायला मिळाल्याने, मला ही भरपूर शिकायला मिळाले. त्यांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय अनुभवाच्या अनेक गोष्टी त्यांनी मला सांगीतल्या. कधी कधी त्या ऐकताना ,मी स्तिमित होउन जात असे. त्यांची स्मरणशक्ती दांडगी असल्याने ,ते म्हणत की , दहा वर्षा पूर्वी ,मी कोणत्या शासकीय  कागदावर काय लिहीले , ते  आज ही व्यवस्थित सांगू शकतो. मी मनात आणले तर, तो कागद, मला समोर दिसतो ही !
         अशा या समृध्द व्यक्तीमत्वाच्या अधिकार्‍याला, मी कधी ही विसरणे शक्य नाही. त्यांच्या विषयी लिहीताना, मला काय लिहू आणि किती लिहू असे झाले आहे. मनात भावभावनांचा कल्लोळ माजला आहे. पण लिहीण्याला ही ,मर्यादा असतात. त्याला इलाज नाही.
         आज  साहेब हयात नाहीत. त्यांना जाउन जवळ जवळ तीस वर्षे झाली असतील. पण त्यांच्या चांगल्या स्मृति , आम्ही आमच्या  ह्रदयाच्या कप्प्यात, कायमच्या जपून ठेवल्या आहेत .त्यांच्या पवित्र स्मृतिस त्रिवार वंदन !
           या आमच्या साहेबांचे नाव होते ," श्री. सुधाकर वसंतराव रोडे " ....एक कधी ही विसरता न येणारे व्यक्तीमत्व.... !

No comments:

Post a Comment