Thursday, 30 April 2020

श्री. उमेश अथणीकर ....माझा मेहुणा..

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , त्यांचे नाव आहे चि. उमेश मधुकर अथणीकर , माझा मेहुणा , माझी पत्नी सौ. रजनी हिचा चुलत भाउ !
       चि. उमेशची, मी मेहुणा म्हणून ओळख करून देणार नसून , एक माणूसकीने आणि जबाबदारीने वागणारा सदगृहस्थ म्हणून, करून देणार आहे.
       माणूसकीचा पहिला निकष म्हणजे दयार्द्रता...उमेशच्या दयाळूपणाचा एक किस्सा सांगतो. तो भाड्याच्या कारने ,परगावी निघाला होता.  वाटेत कुणाच्या तरी चुकीमुळे, त्यांच्या गाडीचा धक्का लागून, एक माणूस पडला , जखमी झाला. अशा वेळी सर्वसाधारणपणे दुर्लक्ष करून ,तिथून सटकण्याची , स्वतःला गुंतवून न घेण्याची  वृत्ती असते. पण उमेशने थांबून, त्या माणसाचा त्या वेळचा दवाखान्याचा खर्च करून, शिवाय त्याला आपला पत्ता आणि फोन नंबर दिला व मगच तिथून प्रयाण केले. त्याच्या या दयार्द्रतेनं, तो जखमी माणूस ही भारावून गेला होता म्हणे !
         मदतीला चि, उमेश एक नंबर आहे. आपल्या माहितीतील कोणाला ,ही कसली ही ,मदतीची गरज आहे , हे समजताच, वेळ काळाचे कोणते ही बंधन न मानता ,तो मदतीसाठी हजर असतो. मदत करताना कोणती ही कसर, तो सोडत नाही. मना पासून आणि झोकून देउन मदत करतो.
        चि. उमेशचे वडील अचानकच गेले. अशावेळी, कोणी ही गडबडून, असहाय्य झाला असता. पण चि. उमेशने, हा प्रसंग अतिशय धीरोदात्तपणे निभावून नेला. वडील गेल्या नंतर, त्याच्यावर कौटूंबिक  कसोटी पाहणारे, अनेक प्रसंग आले. पण त्याने तो कधी ही डगमगला नाही. आलेल्या प्रसंगातून धैर्याने व मन शांत ठेवून ,मार्ग काढत तो पुढे निघून जात असे. हे असामान्यच आहे. साधे सोपे मुळीच नाही.
          चि. उमेशला सर्वथरातले मित्र आहेत. डाॅक्टर आहेत , इंजिनीयर आहेत , वकील आहेत , न्यायाधीश आहेत , किराणा मालाचे व्यापारी आहेत , सरकारी अधिकारी आहेत , रेल्वेशी संबंधीत आहेत , रिअल इस्टेट मधले आहेत , इलेक्ट्रिशियन आहेत , प्लंबर आहेत ....किती किती उदाहरणे देउ ? चि. उमेश हा मैत्रीला जागणारा माणूस असल्याने ,या आणि अगणित थरातले मित्र, तो राखून आहे. ही फार मोठी उपलब्धी आहे व हे दुर्मिळ आहे.
          चि. उमेश स्वतः अभियंता आहे. त्याच्या कार्यक्षेत्रातील किंवा इतर संबंधित कार्यक्षेत्रातील ,आपली माहिती अद्यावत ठेवण्याचा त्याचा प्रयत्न, नेहमीच वाखाणण्या सारखा असतो.
         चि. उमेशला सौंदर्यदृष्टी जबरदस्त आहे. त्याच्या घरात समोर दिवाणखान्यात लावलेले निसर्गचित्र, त्याची साक्ष देते.  बाहेर जाताना नीटनेटके असावे आणि दिसावे या वर त्याचा विशेष ,कटाक्ष असतो.
        चि, उमेशला एक मुलगा आहे. तो ही अभियंता आहे. चि, सौ. मीना वहीनी ,या त्याच्या पत्नीची ,त्याला समर्थ साथ आहे.

  •           चि. उमेश , चि. सौ, मीना वहीनी आणि त्यांचा मुलगा चि. सौरभ आणि उमेशचा भाउ चि. सुहास, या सर्वांना परमेश्वराने उदंड , निरामय आणि सुखसमृध्द आयुष्य द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो ,आणि थांबतो.

Wednesday, 29 April 2020

श्री. एम्. के. कुलकर्णी साहेब....सेवानिवृृृृृत्त प्रधान सचिव .

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अतिउच्च पदावरून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीची म्हणजेच श्री. एम्. के. कुलकर्णी साहेबांची !
           एका खेडेगावातल्या शाळा मास्तरांचा मुलगा , स्वकर्तृत्वावर  , महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव पदापर्यत पोहोचतो आणि तिथून सन्मानाने सेवानिवृत्त होतो ,ही बाब मला तरी परिकथेतल्या गोष्टी प्रमाणे वाटते. पण ही वस्तूस्थिती आहे.
           श्री. कुलकर्णी साहेबांचे मूळ गाव दत्तवाड , जि. कोल्हापूर. तिथे त्यांचे वडील शिक्षक होते. परिस्थिती त्या काळच्या मानाने बेताचीच होती. श्री. कुलकर्णी साहेबांनी आर्थिक परिस्थितीशी झुंजत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्या नंतर भरपूर परिश्रम घेउन MPSC मार्फत होणार्‍या परीक्षेत ते क्लास वन् अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले. त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या दृष्टीने ही फार मोठी उपलब्धी होती.
               आम्हाला मेरी या संशोधन संस्थेत कार्यकारी अभियंता ( संशोधन अधिकारी ) या नात्याने ते अधिकारी म्हणून आले. त्या वेळी आमचा प्रथम परिचय झाला. तो आज तागायत टिकून आहे. त्याचे श्रेय अर्थातच श्री. कुलकर्णी साहेबांचेच आहे.
              मेरीतली एक आठवण सांगतो. तिथे समुद्रमातीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍यांचे डिझाईन करण्याचे काम चालत असे. एका सेक्शनचे डिझाईन करायला पाच ते सहा दिवस लागत. श्री. कुलकर्णी साहेबांनी या गोष्टीचा अभ्यास करून आम्हाला अशी पध्दत शोधून दिली की , तेच डिझाईन आम्ही दीड तासात  करायला लागलो. श्री. कुलकर्णी साहेबांचा गणित या विषयाचा सखोल अभ्यास या वेळी कामी आला होता.
             साहेब पुढे प्रधान सचिव पदापर्यत पदोन्नत होत गेले. आॅफिसच्या वेळात ते कर्तव्यदक्ष अधिकारी असत. आॅफिसची वेळ संपली की ते सर्वसामान्य नागरिक  असत. हा माझ्या दृष्टीने अतिशय  दुर्मिळातला दुर्मिळ  गूण  आहे.
             आणखीन एक आठवण त्यांच्या बद्दल सांगावी असे वाटते. त्यांची मुलगी जेंव्हा डाॅक्टर झाली त्या वेळी त्यांनी तिला काय सांगीतले असेल ? ते म्हणाले " तू डाॅक्टर म्हणून पैशाकडे अजिबात पाहू नकोस , माणूसकीच्या प्राधान्याने तू तुझा व्यवसाय कर ". हा माणुसकीचा  दृष्टीकोन आपल्या लेकीला देणारे वडील निश्चितच वंदनीय आहेत , हे तुम्हाला ही पटेलच !
           श्री. कुलकर्णी साहेबांना सेवानिवृत्त होउन ,तेरा वर्षे झाली आहेत आणि ते सध्या, मिरज सारख्या मध्यम प्रतीच्या , पण त्यांच्या आवडत्या, शहरात वास्तव्याला आहेत.
   साहेबांना एक मुलगा व दोन मुली. सर्वजण आपापल्या जागी उत्तम स्थितीत आहेत. सौ. वहिनींची साहेबांना समर्थ साथ आहेच !
अशा या अत्युच्चपदावरून सेवानिवृत्त झालेल्या ,पण निरहंकारी , निगर्वी आणि साध्या सरळ स्वभावाच्या, श्री. कुलकर्णी साहेबांना व सौ. वहिनींना परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे, ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Sunday, 26 April 2020

श्री. रोडे साहेब ...एक अविस्मरणीय व्यक्तीमत्व...

एक नावाजलेले अभियंता , महाराष्ट्र पदवीधर अभियंता संघटनेचे एके काळचे  अध्यक्ष , जबरदस्त बुध्दिमत्ता आणि अफाट स्मरणशक्ती , माणसे ओळखण्याची अद्वितीय कला , हाता खालच्या माणसांच्या कडून ,अपेक्षित दर्जाचे काम करून घेण्याची हातोटी , इंग्रजी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व ,करारी स्वभाव , उत्तम वळणदार हस्ताक्षर ,  त्याच बरोबर प्रेमाचा ओथंबून वाहणारा झरा .......
        बापरे , एखाद्या माणसाचे एवढे वर्णन ? पण मी लिहीलेले वर्णन ,अगदी खरे आहे . त्यात कोणती ही अतिशयोक्ती नाही . मी अशा अद्वीतीय व्यक्तीमत्वाच्या सान्नीध्यात, माझ्या नोकरीचा कांही काळ घालविला आहे. हे गृहस्थ ,आम्हाला मेरी आॅफिसमध्ये, कांही काळ कार्यकारी अभियंता  ( संशोधन अधिकारी ) होते. थोडक्यात सांगायचं तर , या व्यक्तीमत्वाचे सदगृहस्थ आम्हाला, मेरी या संशोधन संस्थेत " साहेब " होते.
         साहेबांची करडी नजर , बोलण्यातला करारीपणा पाहून, सर्वजण त्यांना घाबरूनच असत. शासकीय कामात, एकदा माझ्या चुकी बद्दल, त्यांनी माझी इतकी निर्भत्सना केली होती की , आज ही, मी , ती विसरू शकत नाही. पण त्या व्यतिरिक्त, त्यांनी माणूसकीच्या नात्याने माझ्यावर भरपूर आपुलकी आणि जिव्हाळ्याचा ,वर्षाव ही केला होता.
          मला आणि माझ्या कांही सहकार्‍यांना , ते किती ही जवळचे मानत असले तरी , आम्हाला मात्र त्यांची भिती वाटायची. त्यांनी बोलावल्याचा निरोप शिपायाने आणला की , छातीचा ठोकाच चुकायचा.  आपल्या कडून कांही चूक तर झाली नसेल ना ? साहेब आपल्याला रागवणार तर नाहीत ना ? अशी भीती आमच्या सर्वांच्या मनात सतत असायची.
         त्यांच्या या करारी स्वभावा मुळे, त्यांना नावे ठेवणारे भरपूर लोक होते व त्याची ,त्यांना ही ,जाण होती.
         त्यांच्या सहवासात भरपूर रहायला मिळाल्याने, मला ही भरपूर शिकायला मिळाले. त्यांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय अनुभवाच्या अनेक गोष्टी त्यांनी मला सांगीतल्या. कधी कधी त्या ऐकताना ,मी स्तिमित होउन जात असे. त्यांची स्मरणशक्ती दांडगी असल्याने ,ते म्हणत की , दहा वर्षा पूर्वी ,मी कोणत्या शासकीय  कागदावर काय लिहीले , ते  आज ही व्यवस्थित सांगू शकतो. मी मनात आणले तर, तो कागद, मला समोर दिसतो ही !
         अशा या समृध्द व्यक्तीमत्वाच्या अधिकार्‍याला, मी कधी ही विसरणे शक्य नाही. त्यांच्या विषयी लिहीताना, मला काय लिहू आणि किती लिहू असे झाले आहे. मनात भावभावनांचा कल्लोळ माजला आहे. पण लिहीण्याला ही ,मर्यादा असतात. त्याला इलाज नाही.
         आज  साहेब हयात नाहीत. त्यांना जाउन जवळ जवळ तीस वर्षे झाली असतील. पण त्यांच्या चांगल्या स्मृति , आम्ही आमच्या  ह्रदयाच्या कप्प्यात, कायमच्या जपून ठेवल्या आहेत .त्यांच्या पवित्र स्मृतिस त्रिवार वंदन !
           या आमच्या साहेबांचे नाव होते ," श्री. सुधाकर वसंतराव रोडे " ....एक कधी ही विसरता न येणारे व्यक्तीमत्व.... !

Tuesday, 7 April 2020

आमची " मेरी "

" आमची मेरी "
**************
              " मेरी "....तुम्हाला वाटेल, मेरी म्हणजे मी आज कुणाची ओळख करून देतोय ? मेरी या नावामुळे,  तुमचा गैरसमज होउ शकतो . हे कुणा व्यक्तीचे नाव नाही.  मेरी हे एका शासकीय आॅफिसचे नाव आहे. M.E.R.I. म्हणजेच Maharashtra Engineerin Research Institute. ( महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ).  महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाची ही संशोधन संस्था ,नाशिक ,येथेआहे. पाटबंधारे प्रकल्पावर किंवा राज्यातून जाणार्‍या महामार्ग बांधणीत येणार्‍या समस्यावर किंवा अनेक मजली बिल्डींगच्या बांधकामात येणार्‍या अडचणीवर, अभ्यास करून , त्या समस्येची उकल या संस्थेत केली जाते.
             या समस्यांवर आधारित संशोधन प्रबंध !राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात, सादर केले जातात. या संस्थेत, अभियंते आणि वैज्ञानिक, असे दोन प्रकारचे लोक काम करतात. अभियंत्यांची मेरीतून बाहेर किंवा बाहेरून मेरीत अशी बदली होते. पण वैज्ञानिक ,कायमचे मेरीतच कार्यरत असतात. त्यांची सहसा बदली होत नाही. संशोधन ही,  सलग व सतत  चालणारी प्रक्रिया आहे. त्यात अभियंते व वैज्ञानिकांचा खूप मोठा सहभाग आहे.
        मेरीत, संशोधनाचे काम असल्याने ,येणारा प्रत्येक दिवस वेगळा असायचा. मेरीत संशोधनाचे दृष्टीने   मातीवर , सिमेंटवर , रस्त्यासाठी वापरल्या जाणार्‍या डांबरावर , विविध शासकीय किंवा खासगी बिल्डींगच्या बांधकामात येणार्‍या समस्यांवर , पिण्याच्या पाण्यावर , तसेच धरणांच्या विविध प्रतिकृृृृती, तयार करून त्यावर ,   विविध विभागात विविध प्रकारच्या चांचण्या , होत असतात. चांचण्या करून मिळालेल्या निष्कर्षावर सुयोग्य विचार करून, मिळालेला निष्कर्ष योग्य आहे की नाही , नसल्यास तो तसा का आला नाही , असे बुध्दीला चालना देणारे काम ,मेरीत चालते. हे मी थोडक्यात सांगीतले.  या पेक्षा भरपूर क्लिष्ट विषय मेरीत हाताळले जातात आणि नंतर त्यावर, संशोधन प्रबंध लिहीले जातात.
           अशा या संस्थेत बदलीवर आलेले निवडक अभियंते आणि  आयुष्यभर मेरीतच नोकरी करीत असलेले वैज्ञानिक , यांना  या संस्थे बद्दल , मनात एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झालेला दिसतो . केलेल्या कामाचे चीज झाले की , कामाचा उत्साह दुणावतो आणि दुप्पट जोमाने तो कामास लागतो.
             मेरीचा वरिष्ठ अधिकारी वर्ग ,संशोधनाला चालना देणारा किंवा त्यात रस असणारा असल्यास ,कामाची गुणवत्ता, फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या संदर्भात ,मेरीचे एके काळी संचालक असलेल्या ,श्री. पां. कृ .नगरकर साहेबांची आठवण झाल्या शिवाय रहात नाही.
            मेरीत काम करणार्‍यांना, शासकीय निवासस्थाने मिळायची. मेरीची स्वतंत्र काॅलनी आहे. ही काॅलनी म्हणजे, एके काळी एक मोठे कुटूंबच असायचे. काॅलनीत वेगवेगळे सण , उत्सव मोठ्या उत्साहाने व सहकुटूंब सहपरिवारासह साजरे व्हायचे. गणेशोत्सवात नाटके व विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम व्हायचे. त्यात  लहान , मोठे सर्वजण मनसोक्त आनंद लुटत असत. त्या शिवाय आनंदमेळा ही असायचा. त्यात विविध खाण्याचे स्टाॅल्स असत. एकूण खवय्यांची चैन असे. तसेच मेरीच्या आॅडिटोरियम मध्ये, विविध चित्रपट दाखविले जायचे. त्या काळी घरोघरी टिव्ही नसल्याने व काॅलनी शहरा पासून लांब असल्याने ,मिळणारी ही करमणूक  मोठी मोलाची वाटत असे. काॅलनीतील प्रत्येकजण ,त्याचा पुरेपुर आनंद लुटत असे.
          पुढे काळ बदलला , तसे सर्वच बदलले. काॅलनी ओसाड पडली , मेरी आॅफिस मधील विविध विभाग बंद झाले. अभियंत्यांची आणि वैज्ञानिकांची पदे कमी झाली. मेरीचा सुवर्णकाळ ,ज्यांनी पाहिला आहे व अनुभवला आहे त्यांना आजची मेरीची अवस्था पाहून ,अक्षरशः डोळ्यात पाणी येते. पण याला इलाज नाही. कालाय तस्मै नमः ।
        आम्ही मेरीत काम केलेले व आता सेवानिवृत्त झालेले लोक ,एकमेकांना कारण परत्वे भेटतो आणि जुन्या आठवणीत रमतो. " मेरी " ,हा आमच्या काळजाचा एक अविभाज्य भाग आहे.
           खाली दिसते ती आमच्या परमप्रीय " मेरी " ची देखणी इमारत !

Thursday, 2 April 2020

कै. विश्वनाथ दांडेकर....माझे व्याही...

नुकतीच मी तुम्हाला, माझ्या मुलीच्या सासर्‍यांची म्हणजेच माझे व्याही श्री. रामभाउ कुलकर्णी, कारदगेकर , यांची ओळख करून दिली. आज, मी तुम्हाला माझ्या सुनेचे वडील , म्हणजेच माझे व्याही कै. विश्वनाथ पांडूरंग दांडेकर ,यांची ओळख करून देणार आहे.
           दांडेकर जरी माझे व्याही असले ,तरी आमचे दोघांचे संबंध ,अगदी मित्रत्वाचे होते.  दांडेकर हे ITI मधून २००७ साली ,वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर, त्यांनी आपल्या वेळेचे नियोजन ,व्यवस्थित केलेले असल्याने ,ते कधी कंटाळलेले दिसलेच नाहीत.  गप्पा मारायला , बोलायला आवडत असल्याने , त्यांनी मित्र परिवार भरपूर जमा केलेला होता. त्यांच्या मित्र परिवारात ,सर्व धर्मीय मित्र होते. सर्वांशी त्यांचे संबंध अतिशय घनिष्ठ, असेच होते.
       त्यांना दोन मुले. मोठा मुलगा अभय आणि दुसरी प्राजक्ता ! प्राजक्ता ही माझी सून आहे. मुले लहान असताना व एकूणच , त्यांनी घरात  स्वनियोजित अशी शिस्त पाळली होती. त्यांच्या मुलांनी शिस्त मोडलेली त्यांना अजिबात चालायची नाही. शिस्त मोडल्यास शिक्षा मिळे , त्या मुळे त्यांची दोन्ही ही मुले  शिस्तप्रीय आहेत.
          मदतीला दांडेकर म्हणजे, एक नंबर माणूस ! तुम्हाला मदत आवश्यक आहे , हे त्यांना कळायचा अवकाश , ते न बोलावता ,पडेल ती मदत करायला तयार असायचे. मदत करताना त्यांनी,  प्रसंगी स्वतः झळ सोसून सुध्दा  ,मदत केलेली आहे. हा त्यांचा मोठा वाखाणण्या सारखा गूण होता.
           आपल्या नातेवाईंना धरून राहण्याचा ,त्यांचा स्वभाव होता. बायकोच्या माहेरच्या लोकांना ही, ते हवेहवेसे वाटायचे. नातेवाईंना आवर्जून भेटायचं , त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध रहावेत, या दृष्टीने आपले प्रेमाचे बंध ,त्यांनी निर्माण केलेले होते.
             सौ. दांडेकरांचे निधन २०१० साली झाले.  पत्नी गेल्या नंतर ,पुरूष पोरके होतात , असे म्हणतात . पण दांडेकरांनी मिरजेतच ,आपलं स्वतंत्र सर्कल निर्माण केलेलं असल्याने , त्यांनी एकटेपणावर सहजपणे मात केली होती. त्यांचा मुलगा अभय पुण्याला असतो व मुलगी म्हणजे माझी सून , आम्ही नाशिकला असतो. ते अधून मधून मुलाकडे व मुलीकडे येत जात असत . पण त्यांचा जास्त मुक्काम ,मिरजेतच असे.
          दांडेकरांना ,कार ड्रायव्हिंग मना पासून आवडे. तसेच आपल्याला आवडणारी नवीन वस्तू बाजारात आली की , ती मोठ्या उत्साहाने ,ते खरेदी करीत असत.  मिरज शहरातली पहिली टाटा नॅनो कार ,दांडेकरांच्याकडे होती. त्या वेळी त्यांची कार निघाली की, मिरजेतले लोक मोठ्या आदराने त्यांच्याकडे  पहात. त्यांना ही ते मना पासून आवडे.
             २०१५ साली दांडेकरांना, शेवटी कॅन्सरने गाठले. कॅन्सरचे निदान झाल्या पासून, तीन महिन्यांच्या आत ते गेले. त्या तीन महिन्यात त्यांचा मुलगा , सून , मुलगी यांनी त्यांची भरपूर सेवा केली.
             अशा या  दिलदार व्यक्तीमत्वाच्या, माझ्या व्याह्यांच्या नावा मागे , कै. हे अक्षर लावणे ,माझ्या मनाला वेदनादायकच आहे . पण इलाज नाही.
          या लेखाच्या निमित्ताने त्यांना, " भावपूर्ण श्रध्दांजली " अर्पण करतो आणि थांबतो.