Sunday, 8 September 2019

शिक्षक दिना निमित्त सत्कार ... "दिशा " मोफत क्लासेस....

                  दि. ५ सप्टेंबर २०१९ . आज " शिक्षक दिना निमित्त " अखिल भारतीय मारवाडी , युवा मंच " यांचे तर्फे माझा आणि आमच्या " दिशा " या मोफत चालणार्‍या क्लासच्या, सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. एक वेगळेच समाधान मिळाले.
                  मी मुळचा शिक्षक नाही. एका संशोधन संस्थेत मी वैज्ञानिक म्हणून काम केले.
                    आयुष्याच्या सत्तरी नंतर मी  , नाशिक मधील आनंदवल्ली परिसरातील, महापालिकेच्या  शाळेतील मुलांच्यासाठी असलेल्या , " दिशा " या मोफत क्लास मध्ये, शिकवायला सुरवात केली.  आठवीच्या मराठी माध्यमाच्या मुलांना, गणित आणि विज्ञान  हे  विषय शिकवताना , मला खूप आनंद मिळतो.
                  आमचे हे क्लासेस , एका बिल्डिंगच्या पार्कींग मध्ये व शेजारच्या बागेत चालतात. पहिली ते सातवी , हे वर्ग बागेत झाडा खाली किंवा मोकळ्या जागेत चालतात. पाउस आला की , त्यांना सुट्टी मिळते. आठवी ते दहावीचे वर्ग, एका बिल्डिंगच्या पार्कींग मध्ये चालतात. मुले जमिनीवर बसतात . शिक्षक कट्ट्यावर बसतात . शेजारी बोर्ड ठेवलेला असतो.
                 " दिशा " मोफत क्लासेस सुरू करण्याचे संपूर्ण श्रेय सौ. सुधा मेहता मॅडम , यांचे आहे. आम्ही सर्व शिक्षक आणि क्लासची मुले ,त्यांना ताई म्हणतो.
                   सन् २००७ सालची गोष्ट आहे. ताईंच्या  मैत्रिणीच्या बंगल्याच्या वाॅचमनचा मुलगा शाळेला जात नव्हता. कारण त्या शाळा आवडत नव्हती. ताईंनी त्याला शिकवायला सुरवात केली. त्याला अभ्यास आवडू लागला. त्याच्या बरोबर अभ्यासाला ,त्याचे इतर मित्र ही येउ लागले. अशा प्रकारे लावलेलं हे " दिशा " मोफत क्लासेसचं रोपटं ,आज वट वृृृृृक्षात रूपांतरीत झालं आहे.
             मी तीन वर्षा पूर्वी ,म्हणजे २०१७ साली ,या उपक्रमात सहभागी झालो. मुलांना शिकवताना सुरवातीला, मला त्रास झाला. पण आता मी त्यात पूर्ण रममाण झालेलो आहे. एखाद्या दिवशी क्लास नसला तर, मला चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. मुलांच्यात वावरताना खूप आनंद मिळतो. आज  ताईंच्या सह आम्हा शिक्षकांच्या झालेल्या , या सत्काराने ही खूप आनंद मिळाला.
                        " आनंदाचे डोही आनंद तरंग "....

No comments:

Post a Comment