Monday, 30 September 2019

श्री. शरदराव उत्तुरकर ....एक जिद्दी सायकल स्वार....

            फोटोत दिसत आहेत ते ,माझे मिरजेचे स्नेही श्री. शरद उत्तुरकर. वय वर्षे ८१ फक्त. उत्साह मात्र , वय वर्षे १८ चा ! रोज किमान २५ किमी सायकलींग करतात. बायकोशी जरा खटका उडाला, तर त्या दिवशी ३० किमी किंवा त्या  ही पेक्षा जास्त ! खटका किती " तीव्रतेचा " आहे, त्यावर किती सायकलींग करायचं ,ते ठरतं !
               एवढं सायकलींग करायचं म्हटलं, तर कंटाळा येउ शकतो. असा कंटाळा येउ नये म्हणून ,त्यावर उपाय काय ? श्री. शरद उत्तुरकरांनी त्यावर ,आपल्या कुणाला ही सुचणार नाही,  असा उपाय शोधलाय. तो म्हणजे पाढे पाठ करणे. या वयाला म्हणजे, ८१ व्या वर्षी सायकलींग करता करता, त्यांनी ९९ पर्यंतचे पाढे पाठ केले आहेत. फार पूर्वी शाळेत शिकवले जाणारे पावकी , निमकी , पाउणकी , सवायकी , दिडकी आणि अडीचकी हे पाढे ,त्यांना आज ही मुखोदगत आहेतच ! रोज किमान २५ किमी सायकलींग आणि त्याच बरोबर हे पाढे पाठ करण्याचे व्रत , हे अजब मिश्रण असलेले,  मिरजेचे श्री. शरद उत्तुरकर माझे स्नेही आहेत , याचा मला सार्थ अभिमान आहे.
             श्री. शरदरावांना हा सायकलींगचा  छंद ,कसा लागला त्याची कहाणी, ह्रदयद्रावक अशीच आहे. ते सांगली बॅंकेत  नोकरीला होते. वयाच्या चाळीशीच्या आसपास, त्यांचे पाय खूप दुखायला लागले. अनेक प्रकारचे उपचार झाले ,पण गूण नाही. पाय इतके दुखायचे की, त्यांना वाटायचे ,रेल्वे खाली जाउन आपले पाय तोडून घ्यावेत.  या त्रासाला कंटाळून, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. शेवटी मिरजेतल्या एका प्रसिध्द आर्थोपेडिक सर्जनने ,त्यांचे आॅपरेशन केले. पण कांहीही उपयोग झाला नाही.
              आॅपरेशन नंतर डाॅक्टरांनी त्यांना पथ्य म्हणून ,पोहणे आणि सायकलींग कधी ही करायचे नाही ,असे सांगीतले. मरणप्राय वेदनेने बेजार झालेल्या शरदरावांनी ,डाॅक्टरांनी सांगीतलेली पथ्ये मोडायची,  म्हणजे आपल्याला मरण येईल व या त्रासातून सुटका होईल, या भावनेने पोहणे आणि सायकलींग सुरू केले. .....आणि आश्चर्य म्हणजे, त्यांचे दुखणे हळूहळू कमी होत गेले .आज शरदरावांना आपले पाय कधी दुखत होते , याची आठवण ही येत नाही. ते  अतिशय आनंदी आणि निरामय आयुष्य जगत आहेत.
              कारणपरत्वे ते ,विविध विषयावर , कविता ही करतात .परवाच ते नाशिकला आमच्या घरी आले होते. त्या वेळी त्यांनी ,माझ्यावर केलेली कविता मला भेट दिली. आपल्यावर कोणी कविता करते आहे , ही संकल्पनाच मनाला आनंददायी आहे. असा भरभरून आनंद, त्यांनी अनेकांना दिलेला आहे. नुकताच त्यांचा काव्य संग्रह, त्यांच्या पत्नीने आणि मुलींनी प्रकाशित केला आहे.
              श्री. शरद उत्तुरकरांना ,त्यांच्या पत्नीची समर्थ साथ आहेच . त्यांना दोन कन्या आहेत. त्या दोघींची लग्ने झाली आहेत व त्या आपापल्या जागी आनंदात आहेत.          श्री. शरदरावांचे वास्तव्य मिरजेत असले ,तरी ते मधून मधून आपल्या मुलींच्याकडे जातात. तिथे त्यांच्या मुलींनी ,बाबांच्या साठी सायकल ठेवलेली असते. तिथे ही ते सायकलींग करतातच !
               अशा या कविमनाच्या , सदाबहार व आनंदी श्री. शरदराव उत्तुरकरांना व त्यांच्या पत्नीला ,परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.


Sunday, 15 September 2019

श्री. विवेकराव पेंडसे....आदर्श स्नेही..

                  आज मी तुम्हाला मिरजेच्या माझ्या एका जवळच्या स्नेह्याची  ओळख करून देणार आहे. या माझ्या घनिष्ठ स्नेह्याचे नाव आहे श्री. विवेकराव पेंडसे. मी त्यांना विवेकराव असं म्हटल्यानं तुम्हाला जरा वेगळं वाटलं असेल. स्नेही आणि विवेकराव ? कांही तरी चुकतय ! मी त्यांना आदराने विवेकराव असं म्हणतो.
                मग मला आदर वाटावं असं त्यांच्याकडे काय आहे ? असं तुम्हाला वाटेल. विवेकरावांच्याकडे आदर वाटाव्या अशा अनेक गोष्टी आहेत. पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन ! विवेकराव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून ( ST  मधून) अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. ते मेकॅनिकल इंजिनियर असल्याने ST च्या तांत्रिक विभागात कार्यरत होते. ST मधील लोकांना पेन्शन नसते. विवेकरावांना सेवानिवृत्त होउन अंदाजे बारा वर्षे झाली असतील. पण त्यांचे आर्थिक नियोजन अत्यंत व्यवस्थित असल्याने , त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्वी सारखेच म्हणजे सुव्यवस्थित चालू आहेत. पैशासाठी ते कधी अडचणीत आले नाहीत. मला ही बाब फार महत्वाची वाटते.
                विवेकरावांचा स्वभाव स्पष्टवक्ता आहे. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते भिडभाड न बाळगता स्पष्टपणे सांगतात. पण मैत्री किंवा स्नेह त्याला अपवाद आहे. मैत्रीत किंवा स्नेहात सर्व माफ करण्याचा त्यांचा स्वभाव , मला महत्वाचा वाटतो. तुमची व त्यांची मैत्री किंवा स्नेह नसेल व जर तुम्ही चुकलात तर ते तुम्हाला वाजविल्या शिवाय सोडणार नाहीत. मिरजेतल्या एका उद्योगपतिच्या मुलाला , त्याचे कुत्रे विवेकरावांच्या अंगावर धावून आल्याने त्यांनी असे कांही सुनावले होते की , विवेकरावांचा तो अवतार पाहून मी पण घाबरून गेलो होतो.
                   विवेकरावांना ओरिगामीची खूप आवड आहे. कागदाचे वेगवेगळे पक्षी , प्राणी त्यांना अतिशय उत्तम प्रकारे तयार करता येतात. हे पण मला वैशिष्ठ्यपूर्णच वाटते.
                   विवेकरावांच्या मिसेस ( सौ. अरूणाताई )जाउन अंदाजे पाच वर्षे झाली असतील. विवेकरावांनी  व त्यांच्या मिसेसनी दोघांनी " देहदान " करण्याचा संकल्प सोडला होता. त्या नुसार सौ. अरूणाताईंच्या निधना नंतर त्यांनी त्यांचा देह मिरज मेडिकल काॅलेजला दान केला. ही गोष्ट पण मला खूप खूप महत्वाची वाटते. विवेकरांच्या पासून मी पण या बाबतीत प्रेरणा घेतली आहे.
                  विवेकरावांना तीन मुली. तिन्ही मुलींची लग्ने होउन त्या आपापल्या संसारात छान रममाण झालेल्या आहेत. विवेकराव कारण परत्वे मुलींच्याकडे आवर्जून जातात . पण सर्वसाधारणपणे ते मिरजेत आपल्या फ्लॅट मध्ये एकटे राहणे पसंत करतात . त्यांना सिलेक्टेड असे मित्र जोडायची कला अवगत असल्यानं , त्यांच्या घरी मित्रमंडळींचा भरपूर राबता असतो. कोणी गप्पा मारायला , कोणी पत्ते खेळायला , कोणी कांही तरी त्यांच्या कडून शिकायला असे येत असतात. " विठू माझा लेकूरवाळा " असे त्यांचे घर असते.
                 अशा या माझ्या खूप जवळच्या स्नेह्याला परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.

Sunday, 8 September 2019

शिक्षक दिना निमित्त सत्कार ... "दिशा " मोफत क्लासेस....

                  दि. ५ सप्टेंबर २०१९ . आज " शिक्षक दिना निमित्त " अखिल भारतीय मारवाडी , युवा मंच " यांचे तर्फे माझा आणि आमच्या " दिशा " या मोफत चालणार्‍या क्लासच्या, सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. एक वेगळेच समाधान मिळाले.
                  मी मुळचा शिक्षक नाही. एका संशोधन संस्थेत मी वैज्ञानिक म्हणून काम केले.
                    आयुष्याच्या सत्तरी नंतर मी  , नाशिक मधील आनंदवल्ली परिसरातील, महापालिकेच्या  शाळेतील मुलांच्यासाठी असलेल्या , " दिशा " या मोफत क्लास मध्ये, शिकवायला सुरवात केली.  आठवीच्या मराठी माध्यमाच्या मुलांना, गणित आणि विज्ञान  हे  विषय शिकवताना , मला खूप आनंद मिळतो.
                  आमचे हे क्लासेस , एका बिल्डिंगच्या पार्कींग मध्ये व शेजारच्या बागेत चालतात. पहिली ते सातवी , हे वर्ग बागेत झाडा खाली किंवा मोकळ्या जागेत चालतात. पाउस आला की , त्यांना सुट्टी मिळते. आठवी ते दहावीचे वर्ग, एका बिल्डिंगच्या पार्कींग मध्ये चालतात. मुले जमिनीवर बसतात . शिक्षक कट्ट्यावर बसतात . शेजारी बोर्ड ठेवलेला असतो.
                 " दिशा " मोफत क्लासेस सुरू करण्याचे संपूर्ण श्रेय सौ. सुधा मेहता मॅडम , यांचे आहे. आम्ही सर्व शिक्षक आणि क्लासची मुले ,त्यांना ताई म्हणतो.
                   सन् २००७ सालची गोष्ट आहे. ताईंच्या  मैत्रिणीच्या बंगल्याच्या वाॅचमनचा मुलगा शाळेला जात नव्हता. कारण त्या शाळा आवडत नव्हती. ताईंनी त्याला शिकवायला सुरवात केली. त्याला अभ्यास आवडू लागला. त्याच्या बरोबर अभ्यासाला ,त्याचे इतर मित्र ही येउ लागले. अशा प्रकारे लावलेलं हे " दिशा " मोफत क्लासेसचं रोपटं ,आज वट वृृृृृक्षात रूपांतरीत झालं आहे.
             मी तीन वर्षा पूर्वी ,म्हणजे २०१७ साली ,या उपक्रमात सहभागी झालो. मुलांना शिकवताना सुरवातीला, मला त्रास झाला. पण आता मी त्यात पूर्ण रममाण झालेलो आहे. एखाद्या दिवशी क्लास नसला तर, मला चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. मुलांच्यात वावरताना खूप आनंद मिळतो. आज  ताईंच्या सह आम्हा शिक्षकांच्या झालेल्या , या सत्काराने ही खूप आनंद मिळाला.
                        " आनंदाचे डोही आनंद तरंग "....

Wednesday, 4 September 2019

माझा " एक " अविस्मरणीय वाढदिवस !

              माझा दर वर्षी ३१ आॅगस्टला वाढदिवस असतो. या वर्षीच्या माझ्या वाढदिवसाला मला ७३ वर्षे पूर्ण होउन ७४ वे वर्ष सुरू झाले. पण हा आताचा वाढदिवस एकदम स्पेशल होता. होता म्हणण्या पेक्षा मला तसा वाटला असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.
                ३१ आॅगस्ट रोजी मी नेहमी प्रमाणे सकाळी नाशिकच्या कृषी नगर जाॅगिंग ट्रॅकवर फिरायला गेलो. तिथे आमच्या सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स ग्रुप " ने मोठ्या जल्लोषात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या , हा जल्लोष पाहून ट्रॅकवर फिरणार्‍या अनेक अनोळखी लोकांनी मला शुभेच्छा दिल्या.
                   सकाळी साधारण दहाच्या सुमारास माझा मेरीतील स्नेही श्री. राजाभाउ वर्‍हाडे आणि सौ. वहिनी आवर्जून आमच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आले. तसेच आमच्याच बिल्डिंगमध्ये खाली राहणारे श्री. सुनिल सानप आणि सौ. वहिनी हे दोघे ही आले. त्यांच्या अनपेक्षित शुभेच्छांनी मी अगदी भारावून गेलो.
माझ्या वाढदिवसा निमित्त आमच्या सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स " या ग्रुप मधील स्नेह्यांनी त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावरील अंबोली धरणाच्या शेजारच्या " टायगर व्हॅली " येथे दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते. हा परिसर एकदम छान आहे. धरणाच्या बॅक वाॅटर शेजारीच " टायगर व्हॅली " अाहे. माहौल एकदम मस्त आणि चिअरफुल्ल होता. गप्पाटप्पा , हास्यविनोद यात खूप छान वेळ गेला. जेवण होउन परतायला तीन वाजले होते.
                     तीन वाजता माझा आठवीच्या वर्गाचा मोफत क्लास होता. माझ्या वाढदिवसा निमित्त क्लासचे विद्यार्थी केक आणणार असल्याची बातमी मला आधीच  मिळाली होती.  मी विद्यार्थ्यांना आई बाबांच्या कडून पैसे घेउन माझा वाढदिवस साजरा करायचा नाही , असे निक्षुन सांगीतले. तरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी कुठून कुठून रंगीत रंगीत फुले तोडून आणून , त्याचे स्वहस्ते गुच्छ बनवून आणून मला दिलेच ! मुलांच्या या " Creativity " ने मला निश्चितच आनंद मिळाला. त्या दिवशीचा अभ्यास पूर्ण झाल्यावर मुलांनी मला मधे उभे केले आणि " Happy birthday to you वगैरे गाणी आणि अभिष्ट चिंतनपर  संस्कृत श्लोक म्हणून माझ्या भोवती फेर धरला. मुलांनी त्या दिवशी मला खूप खूप आनंद दिला.
                   रात्री घरचे सगळे आणि माझे मेरीतले मित्र , अनंत देशमुख आणि अनिल कुलकर्णी सहकुटूंब सहपरिवार यांचे सह बाहेर  हाॅटेल " Big city "  मध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो ही भोजन कार्यक्रम अतिशय आनंदात व मस्त मजेत पार पडला.
                    या नंतर दि. ३ सप्टेंबरला " त्र५षीपंचमी " होती. तिथीने माझा त्या दिवशी वाढदिवस असतो. त्या दिवशी आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपला , सकाळचे फिरून झाल्यावर ,आमच्या नेहमीच्या गंगापूर रोड वरील आवडत्या  " कृष्णविजय " या हाॅटेलात मी चहापान आयोजित केले होते. तो ही कार्यक्रम गप्पाटप्पा आणि हास्यविनोदात मस्त पार पडला.
असे चार कार्यक्रम माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने झाल्याने , मला खूप खूप आनंद आणि भरभरून समाधान मिळाले.
                           माझ्या क्लासच्या मुलांच्या सोबत त्या दिवशी काढलेला फोटो.






Tuesday, 3 September 2019

कै. बाळासाहेब अनकाईकर...मेरीतील वैज्ञानिक संघटना अध्यक्ष.

                     सन २०१९ मध्ये , आमचे मेरी आॅफिस मधील सहकारी ,श्री. बाळासाहेब अनकईकर त्यांचे ,वृध्दापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८३ होते.
                      कै. बाळासाहेब ," मेरी " या पाटबंधारे खात्याच्या संशोधन संस्थेत ,वरिष्ठ वैज्ञानिक होते. मृद् यांत्रिकी विभागात ते कार्यरत होते. तिथे चालणार्‍या ,त्रिदिक् कृंतन चांचणी ( Triaxial shear test ) करण्यात ,ते वाकबगार होते. त्यांच्या काळात ही चांचणी संपूर्ण ज्ञानासह करणारी माणसे ,महाराष्ट्रात ,हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतील किंवा नसतील ही !
                    कै. बाळासाहेब स्पष्टवक्ते होते , त्या मुळे सहजासहजी कोणी त्यांच्या वाट्याला जात नसे. पण त्याच बरोबर ,खरोखर अडलेल्या व गरजू माणसाला ,आर्थिक मदत करायला त्यांनी कधी मागे पुढे पाहिले नाही. आर्थिक मदतीचा दुरूपयोग होतोय असे दिसताच, त्या माणसाला धडा शिकविण्याची हिंमत दाखवावी, ती फक्त आणि फक्त कै. बाळासाहेबांनीच ! कै. बाळासाहेबांच्या सत्यवादी स्पष्टवक्तेपणाला, त्यांचा अधिकारी वर्ग ही दबून असे.
                       मेरीच्या वैज्ञानिकांची  मान्यताप्राप्त संघटना होती. त्या संघटनेचे अध्यक्षपद, कै. बाळासाहेबांनी कांही वर्षे समर्थपणे सांभाळले.
                        कै. बाळासाहेब हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या ," काळ्यारामाचे दर्शन " त्यांनी कधी ही चुकविले नाही. जाण्याचे आधी, प्रकृति अस्वास्थ्यामुळे ,त्यांना प्रत्यक्ष देवळात जाउन रामदर्शन घेणे जमेनासे झाल्यावर , काळाराम मंदिराचे दिशेने हात जोडून ,ते प्रार्थना करीत असत. रामाची त्यांच्यावर खरोखरच कृपा होती.
                         ते व्यवसायाने सोनार होते. पण त्यांनी व्यवसाय करताना, आपला प्रामाणिकपणा कधी ही नजरे आड केला नाही. शासकीय नोकरी आणि व्यवसाय, हे दोन्ही त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणेच केले. एका वेळी दोन्ही करायचे म्हणजे ,तारेवरची कसरतच होती , पण ती त्यांनी यशस्विपणे सांभाळली.
                     दर महिन्याला पायी त्र्यंबकेश्वरला जाउन ,त्र्यंबकेश्वराचे आणि निवृत्तीनाथ समाधीचे दर्शन घेणे ,हा त्यांचा परिपाठ ,अनेक वर्षे चालू होता.परमेश्वरावर त्यांची अनन्य साधारण निष्ठा होती. परमेश्वराची निष्ठा आणि रोजच्या जीवनातील व्यवहार ,यांची सांगड घालणे फार थोड्यांना जमते. कै. बाळासाहेब ,हे अशा थोर व्यक्ती पैकी एक निश्चितच होते .त्यांनी हा तोल सांभाळला आणि समृध्द ,समाधानी जीवनाचा आनंद मिळविला.
                      कै. बाळासाहेबांच्या शेवटच्या आजारपणात ,त्यांच्या पत्नीने ,  मुलाने , मुलीने , जावयाने आणि आप्तेष्टांनी त्यांची खूप काळजी घेतली. पण शेवटी एकवेळ अशी येते की , जिथे मानवी प्रयत्न संपतात आणि मानवाला अनंताच्या प्रवासाला जावेच लागते.
                        कै. बाळासाहेब अनकईकरांच्या आत्म्याला, परमेश्वराने चिरशांती द्यावी, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
                   ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः॥