Thursday, 8 October 2020

कै. लक्ष्मण रामचंद्र उर्फ नाना दीक्षित ...माझे परमपूज्य वडील.

 कै. लक्ष्मण रामचंद्र दीक्षित , माझे परमपूज्य वडील ! एक पुण्यात्मा ! अत्यंत धार्मिक , वेळेचे पक्के बांधील , व्यायामाची आवड असणारे , मित्रत्वाला जपणारे , मदतीला सदैव तयार , एखाद्याला आपलं मानलं की मना पासून प्रेम करणारे , असे अत्यंत आदरणीय व्यक्तीमत्व !

               आम्ही सर्वजण त्यांना, घरात " नाना " म्हणत असू. त्या मुळे या लेखात मी त्यांचा, तसाच उल्लेख करीत आहे. 

                  नानांचे लहानपण, कर्नाटकातल्या हुबळी धारवाड जवळील " लक्ष्मेश्वर " या गावी गेले. त्यांना उत्तम कानडी बोलायला येत असे. नंतरच्या आयुष्यात कानडी बोलणारा माणूस भेटला की ते ,अतिशय खूष होत असत.                                                                                           

               नानांना लहानपणा पासून ,व्यायामाची आवड होती. त्यांनी आपले शरीर व्यवस्थित कमावलेले होते. त्यांचा रोजचा व्यायाम कधी ही चुकला नाही. ते स्वर्गवासी होण्याचे अगोदर आठ दिवस आजारी होते. ते आठ दिवस सोडले तर ,त्यांनी आयुष्यभर  रोज न चुकता व्यायाम केला.

                     त्यांनी सांगली मिरज महापालिकेच्या " वाॅटर वर्क्स " मध्ये नोकरी केली. त्यांना शिफ्ट ड्युटी असायची. त्यांनी ड्युटीवर हजर राहण्याची वेळ कधी ही चुकविली नाही. नोकरीच्या २९ वर्षाच्या आयुष्यात, त्यांनी एक ही दिवस " लेट मार्क " घेतला नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे. 

                      नानांना मिलिटरीत जाण्याची फार इच्छा होती. पण त्यांना त्यांच्या वडीलांनी सोडले नाही. त्यांनी कांही दिवस होमगार्डमध्ये आपली सेवा दिली व आपली मिलिट्रित जाण्याची इच्छा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली. त्या मुळे नाना वाॅटर वर्क्सला नोकरीला जाताना, संपूर्ण खाकी ड्रेस घालून जात असत. सेवानिवृत्ती नंतर फिरायला जाताना, कायम त्यांच्या हातात  " वाॅकिंग स्टिक " असे. घरी त्यांनी विविध प्रकारच्या " वाॅकिंग स्टिक्स ", जमा करून ठेवल्या होत्या. त्यांना अंगठ्यांची खूप आवड होती. उजव्या हाताच्या चार बोटात, ते निरनिराळ्या खड्यांच्या अंगठ्या घालत असत. या अंगठ्या सोन्याच्या अजिबात नसत. विविध धातूंच्या व विविध प्रकारच्या अंगठ्या, जमा करण्याचा त्यांना छंद होता. तसेच  " जप " करण्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या माळा, त्यांनी आवर्जून जपून ठेवल्या होत्या.

                 नानांनी एखाद्याला आपलं मानलं तर, ते त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकत असत. त्यांचे सर्व थरात व सर्व धर्मिय मित्र होते. सांगलीचे लोकप्रीय नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कै. वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या नियमितपणाच्या वागण्याने ,सांगलीचे त्या  वेळचे एक डि. एस. पी. ,श्री. वेंकटाचलम यांच्याशी त्यांचा स्नेह होता. पोलिसात त्यांच्या भरपूर ओळखी होत्या. ते नोकरी साठी रेल्वेने सांगली मिरज जात येत असत.  त्या वेळी रेल्वेतले सर्व गार्ड , इंजिन ड्रायव्हर्स , टिसी यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. मी लहान असताना एकदा सांगली स्टेशन मधून सुटलेली रेल्वे , त्यांनी हात आडवा घालून थांबवली होती व आम्ही त्यात चढलो होतो, हे मला  आजही चांगलं आठवतय. नानांचे श्री. शंकरराव ताम्हणकर या नावाचे, एक मित्र होते. शंकररावांच्या शेवटच्या आजारपणाच्या दिवसात ,मित्राची सेवा करण्याचे मिषाने गप्पा मारायला , कांही धार्मिक वाचून दाखवायला , नाना  त्यांच्या घरी रोज न चुकता जात असत. ओळखीतलं कोणी आजारी असल्यास ,त्याच्या मदतीसाठी नाना आवर्जून धावून जात.

                   नाना धार्मिक वृत्तीचे होते. नोकरीत असताना व सेवानिवृत्ती नंतर ,त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन करून , त्या त्या ग्रथांची स्वतःच्या हस्ताक्षरातील हस्तलिखीत  प्रत, तयार केलेली आहे. हा हस्तलिखित प्रत तयार करण्याचा, त्यांचा उपक्रम जवळ जवळ ५० वर्षे अव्याहत चालू होता. एखाद्या उपक्रमात इतके वर्ष सातत्य ठेवणे ,ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यांनी हस्तलिखित प्रत तयार केलेल्या धार्मिक ग्रंथात, फक्त आपले हिंदूंचे ग्रंथच होते असे नाही .त्यांनी कुराण व बायबलचा ही अभ्यास करून त्यांची हस्तलिखित प्रत तयार केलेली होती. लिहीलेला हस्तलिखित ग्रंथ ते आपल्या जवळ ठेवत नसत. उदाहरणार्थ..ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत आळंदीला , तुकारामांची गाथा देहुला जाउन तिथे अर्पण करायची . त्या नंतर मागे न पाहता ते निघून यायचे. आपण इतके ग्रंथ लिहीले, याचा अहंकार युक्त अभिमान  होउ नये म्हणून, ते असे करीत. ५० वर्षात त्यांनी किती ग्रंथ लिहीले ,त्याची यादी त्यांनी जवळ ठेवलेली नव्हती, कारण अहंकार होउ नये म्हणून !

                     नाना घरातल्या कोणत्या ही बाबतीत, कधीच लक्ष घालत नसत. नोकरीत असताना ते पगार व नंतर पेन्शन ,माझ्या आईकडे देत. ती सर्व घरखर्च पहात असे. नाना त्यांच्या ठरविलेल्या दिनक्रमात व्यस्त असत. नानांचा स्वतःच्या जिभेवर कंट्रोल ठेवण्याचा, एक वेगळाच मार्ग होता. ते एक वर्ष तंबाखू युक्त पान खात व एक वर्ष अजिबात खात नसत. हा त्यांचा वाखाणण्या सारखा उपक्रम होता. 

                  नानांना दोनदा  थोडा थोडा अर्धांगवायूचा त्रास झाला. पण त्यांचे व्यायामाचे शरीर असल्याने ,ते त्या दोन्ही वेळी संपूर्ण बरे झाले होते. नानांना शेवटी शेवटी अल्झायमरचा त्रास होत होता. शेवटचे आठदिवस ते अजारी होते. त्यांनी त्या काळात अन्नपाण्याचा त्याग केला होता. असे पुण्यात्मा असलेले माझे वडील " नाना " ,दि. १९ एप्रील  २००२ साली ,वयाच्या ८४ व्या वर्षी नाशिक या पवित्र क्षेत्री , शांतपणे स्वर्गवासी झाले. 

                 कै. नानांच्या पवित्र स्मृतिस त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.


सौ. रजनी दीक्षित... माझी पत्नी.

 सौ. रजनी दीक्षित. माझी पत्नी. जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहणारी , मनाने खंबीर , शंभर टक्के माझ्या पाठीशी उभीराहणारी , काटकसरी , उत्तम स्मरणशक्ती , अत्यंत सहनशील , परिस्थितीशी सतत जुळवून घेणारी , अशा शब्दात तिचे वर्णन करता येईल. 

               आमचे लग्न १९७३ साली झाले. आमचा प्रेमविवाह आहे. त्या बद्दल आता कांहीही बोलत नाही. तो एक वेगळाच " ग्रंथ " तयार होईल.

                  सौ. रजनीचे माहेर श्रीमंत ! लग्नानंतर तिला काटकसरीने रहावे लागले. पण मुळात तिचा काटकसरी स्वभाव असल्याने, तिने येईल त्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेतले. जीवनामध्ये आमच्या दोघांच्यावर, कांही कठीण प्रसंग आले . ती त्या सर्व प्रसंगी खंबीरपणे उभी राहिली. आमच्या  संसाराचे तारू तिच्या मुळे तरून गेले. आमचे लग्न झाले त्या वेळी सौ. रजनी पदवीधर नव्हती. लग्ना नंतर संसार सांभाळून, जोमाने अभ्यास करून,  तिने पदवी मिळविली. तिला नोकरी करण्याची इच्छा होती, पण केवळ माझ्या आग्रहानुसार, तिने तो विचार बाजूला सारला.

                   मला नाटकात काम करायची आवड होती , ज्योतिष शिकायची आवड होती,  अध्यात्माची आवड असल्याने मी, श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाच्या व शिवथर घळीच्या परिक्षा दिल्या. या सर्व बाबीत ती संपूर्ण तन मनाने ,माझ्या सोबत राहीली. तिने नाटकात कामे केली , ज्योतिष शिकली , अध्यात्माच्या परिक्षा माझ्या बरोबरीने अभ्यास करून दिल्या. जे समोर येईल त्याचा आनंदाने स्वीकार करून, आनंद मिळविण्याच्या आणि दुसर्‍याला आनंद मिळवून देण्याच्या, तिच्या स्वभावा मुळेच हे शक्य झाले. माझी पत्नी सौ. रजनी तन मनाने सतत माझ्या बरोबर असल्याने, मी जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेउ शकलो.

                 जीवनात सतत मना प्रमाणे दान पडते असे कधी ही नसते . तिथेच तुमच्या सहनशक्तीची  व सकारात्मकपणे जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची, परिक्षा असते. त्या प्रत्येक परिक्षेत, ती शंभर टक्के मार्क मिळवून पहिल्या नंबराने उत्तीर्ण झालेली आहे , असे मी अभिमानाने सांगू शकतो . 

                   मध्यंतरी तिला " संधीवाताचा खूप त्रास " झाला. परिस्थिती अवघड होती. पण तिने कधी ही मनात आलेला निराशेचा सूर ,तोंडातून बाहेर येउ दिला नाही. तिची अवस्था पाहून मीच निराशाग्रस्त होत असे . सतत जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याच्या आणि येईल त्या परिस्थितीशी खंबीरपणे झुंजण्याच्या तिच्या वृत्तीमुळे, ती त्या ही आजारातून संपूर्ण बरी झालेली आहे. तिची जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याची इच्छा आणि सहनशक्ती जबरदस्त आहे. 

                   तिने माझ्या आई वडीलांची गरजे प्रमाणे पडलेली जबाबदारी ,अतिशय उत्तमपणे , प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडलेली आहे. तिचा आणखीन एक दुर्मिळ गूण म्हणजे ,आपण केलीली कोणती ही चांगली गोष्ट ,ती पुन्हा पुन्हा बोलून घोकण्याचा तिचा स्वभाव नाही. सर्वसाधारणपणे आपण एखादी चांगली गोष्ट केली तर ती परत परत बोलून ,दुसर्‍याच्या मनात ठसविण्याचा स्वभाव असू शकतो. त्यात चूक आहे असे मी मानत नाही. पण सौ. रजनीने असे कधी ही केले नाही . " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन " ही तिची जीवन शैली  आहे. 

                     घरात संघर्ष टाळण्याची तिची वृत्ती आहे. समोरच्याची मते पटली नाहीत तर ,अशा वेळी ती गप्प बसते. आपली मते ठासून मांडण्याचा तिचा स्वभाव नसल्याने, आमच्या  कुटूंबात वाद कधी ही होत नाहीत. मतभिन्नता असू शकते पण वादावादी कधी ही होत नाही. हा दुर्मिळ गूण घरात शांतता राखतो.

                     तिची स्मरणशक्ती जबरदस्त आहे. आमच्या नातेवाईकांचे , मित्रांचे , घरातील सर्वांचे जीवनातील सर्व मुख्य दिवस ,तारीख  व वार या सह तिच्या बिनचूक लक्षात असतात. तसेच सर्व प्रकारचे मराठी " साहित्य " वाचणे, तिला मना पासून आवडते.

                    सकाळी फिरणे , घरी आल्यावर श्वसनाचे व कांही मोजके शारीरिक व्यायाम करणे , या गोष्टी  तिला मना पासून आवडतात . एखादी गोष्ट सातत्याने करायची तिने ठरविली की ,ते सातत्य टिकवण्यात तिला आनंद मिळतो. मॅगी , पिझ्झा , वडा , दाबेली असे पदार्थ खायला तिला आवडतात. जे खायचे ते " लिमीटेड पण चवीने खायचे " , हा तिचा स्वभाव आहे.

                     अशी गुणी पत्नी मला लाभली, हे माझे परमभाग्य होय. दुर्गा सप्तशती मध्ये, अर्गलास्तोत्र आहे. त्यात एक श्लोक आहे. तो श्लोक असा....

                   पत्नी मनोरमां देही

                   मनोवृत्तानुसारिणीम् ।

                    तारिणीं दुर्ग संसार

                   सागरस्य कुलोद्भवाम् ।।

अर्थ..कठीण संसार सागरातून तारून नेणारी , कुलीन , सुंदर व मना प्रमाणे वागणारी पत्नी ( हे अर्गला देवी ) मला दे. 

                   हा श्लोक सौ. रजनीला तंतोतंत लागू पडतो. तिची मला पत्नी या नात्याने जी साथ लाभली , त्या साठी मी जन्मोजन्म तिचा ऋणी आहे व राहीन.

                    इति लेखन सीमा ।


कै. सोनूताई दीक्षित..माझी आई.

 कै. सोनुताई दीक्षित ! माझी आई ! अत्यंत हुषार , ब्रीज चॅम्पियन  ,अधुनिक विचारांना , नाविन्याला जवळ करणारी , मैत्रिणींच्या गराड्यात रमणारी , कोणत्या ही बाबीचे उत्तम मॅनेजमेंट करू शकणारी , ज्याला जे आवडते ते आठवणीत ठेउन करणारी , उत्तम ज्योतिषी ,अशा अनेक गुणांनी युक्त असे तिचे विविधांगी व्यक्तीमत्व होते. 

                तिचे माहेर करोली. ता. कवठे महांकाळ , जि. सांगली.खेडे गाव. शिक्षणाची फारशी सोय नाही. त्या मुळे शिक्षणासाठी, तिला आजोळी जतेला मामांच्याकडे किंवा शासकीय नोकरीत असलेल्या ,काकांच्या घरी नाशिक जिल्ह्यातील  सटाणा , नाशिक इथे रहावे लागले. कांही ना कांही कारणाने ,शाळा सतत बदलावी लागायची. पण ती कुठल्या ही शाळेत गेली तरी तिने, पहिला नंबर कधी ही सोडला नाही. त्या काळी मुलींना शिकविण्याची फारशी प्रथा नव्हती. ती केवळ १५ वर्षांचीच असताना, १९४२ साली तिचे लग्न झाले व ती कु. सोनूताई राजाराम कुलकर्णीची, सौ. सोनूताई लक्ष्मण दीक्षित झाली. 

                       मिरजेत माझे अजोबा होते तो पर्यंत घरात त्यांचाच " कायदा " चालायचा. त्यांच्या निधना नंतर सर्व कारभार ,माझ्या आईच्या हातात आला. वडीलांना पगार फारसा चांगला नसल्याने , पैसे फारसे नसायचे . पण त्या ही परिस्थितीत, तिने कधी कशाची कमतरता भासू दिली नाही. कोंड्याचा मांडा करून तिने आपला संसार ,आनंदाने केला. जे आहे त्यात समाधान मानण्याची आईची व वडीलांची वृत्ती असल्याने, आमच्या घरात कायम समाधान असायचे.

                  आईला शिक्षणाची भरपूर आवड होती. लग्ना नंतर तिने मिरजला परिक्षेचे केंद्र नसल्याने कोल्हापूर केंद्र घेउन ,व्हर्नाक्युलर फायनल ( व्ह. फा. ) ही परिक्षा दिली. ती त्या केंद्रात पहिली आली. पण सासरच्या जबाबदारीत ,तिला पुढे शिकता आले नाही. तरी ही तिने ,हिंदी भाषेच्या प्रविण पर्यंतच्या परिक्षा दिल्या व प्रत्येक परिक्षेत ,उत्तम सुयश मिळवले. 

                     तिने हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला होता. हात पाहून ती बरोबर ज्योतिष सांगायची. त्या मुळे ती कुठे ही गेली की, तिला हात दाखवून आपले भविष्य जाणून घेणार्‍यांची, तिच्या भोवती गर्दी लगेच जमायची. पत्रिके वरून ही ती भविष्य सांगत असे. थोडक्यात आपल्या भोवती माणसे जमविण्यात ,ती वाकबगार होती.

                     तिला खेळांची आवड होती. पण सासरच्या चाकोरीबध्द वातावरणा मुळे तिला ,ती आवड विकसित करता आली नाही. पण बैठ्या खेळा पैकी, तिने " ब्रिज " सारख्या बुध्दीला आव्हानात्मक असलेल्या, खेळात प्राविण्य मिळविले. अनेक स्पर्धात भाग घेउन सतत प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले. ब्रिजच्या तिच्या पार्टनर्स श्रीमति उषाताई आगाशे , श्रीमति शकाताई कोल्हटकर , श्रीमति मंदाताई गाडगीळ , कर्नल पोंक्षेंच्या मिसेस , कै.सुमनताई लेले , कै. उषाताई देवल , आशाताई देवल ,श्रीमति अलका कोल्हटकर , कै. प्रभाताई कातगडे ,कै . इंदूताई दीक्षित , श्रीमति स्वाती सिध्दये , कै. माई चंदूरकर , कै. प्रभावती शिराळकर यांची या निमित्ताने मला आठवण होते आहे.

                  मिरजेला आमच्या घरा जवळ सात आठ कार्यालये असल्याने, पाहुण्यांची आवक जावक भरपूर असायची. आलेल्या पाहुण्याचे मना पासून स्वागत करून, ज्याला त्याला आवडणारा पदार्थ खायला घालून, त्यांच्या चेहर्‍या वरचा आनंद पाहण्यात, तिला धन्यता वाटत असे. असा साध्या साध्या गोष्टीतून सतत दुर्मिळ असा आनंद ती मिळवीत असे . 

                   घरी कोणी ओळखीचे आल्यास, त्याच्या कडून आपले एखादे काम गोड बोलून कसे करून घ्यायचे , यात तिचा हात धरणारा, दुसरा कोणी असूच शकत नाही. तिला एकवेळ रागावणे जमत नसे . पण गोड बोलण्याची तिची कला, असामान्य अशीच होती. 

                 ती सर्वाच्यात मिळून मिसळून रहात असे. समोरचा वयाने लहान असू दे किंवा  मोठा असू दे , त्याच्याशी सुसंवाद साधण्यात तिचा हातखंडा असे. ती सर्व वयाच्या लोकात ,चटकन सामील होउ शकत असे. तिला हुषार  व्यक्तींचे विशेष आकर्षण होते. अशा स्त्रियांशी तिची विशेष मैत्री जमायची. एकूणच बुध्दीने हुषार मैत्रिणींच्यात ती विशेष रमायची.

                   तिला बागेची खूपच आवड होती. आमच्या जुन्या वाड्याच्या परसदारी, तिने  फळांची व फुलांची झाडे मोठ्या हौसेने लावली होती. बागेची स्वच्छता व झाडांची निगा, ती स्वतः लक्ष घालून करायची. अशा कामात व एकूणच घर स्वच्छ  राखण्यासाठी जे कष्ट पडायचे, ते ती स्वतः आनंदाने करीत असे. 

                 तिला नाविन्या विषयी खूप आकर्षण होते. माझ्या मुलाने चि. आदित्यने , नवीन लॅपटाॅप घेतल्यावर मला लॅपटाॅप वापरायला शिकव ,असा लकडा तिने त्याला लावला होता. नवीन गोष्ट आपण शिकली पाहिजे व त्यात आपल्याला प्राविण्य मिळालेच पाहिजे, असे तिला नेहमी वाटायचे. 

                  राजकारण , आरोग्य , साहित्य ,क्रिडा क्षेत्र , अर्थकारण  , परराष्ट्र नीती , अध्यात्म अशा कोणत्या ही विषयांचे तिला वावडे नव्हते. सर्व विषयांचे वाचन करून, अपडेटेड राहणे तिला आवडायचे. मुख्य म्हणजे ,कोणत्या ही विषयाचा " गाभा " तिला चटकन समजत असे. तिची कोणता ही विषय  " ग्रहण करण्याची क्षमता" ,असाधारण होती. तिचे विचार सुटसुटित असत. अवघड विषय सुटसुटितपणे कसा मांडावा , याचे तिचे कसब अवर्णनीय असेच होते. 

                    तिला शिकायला मिळाले नाही , अन्यथा ती त्या काळची आय. सी. एस. परिक्षा सहज पास होउन " जिल्हाधिकारी  " नक्की झाली असती , असे आमच्या घरातील सर्वांचे प्रामाणिक मत आहे. 

                     अशी आई मला मिळाली, हे माझे परमभाग्य होय. दि. २६ आॅगस्ट २०१३ रोजी तिचे अल्पशा आजाराने ,वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले अणि मी " पोरका " झालो. 

                      कै. सोनुताई दीक्षित उर्फ माझ्या आईला मी या लेखाचे माध्यमातून ,श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.