Monday, 26 August 2019

अंधकवी कै. राम गोसावी..तेथे कर माझे जुळती.

                  अंधकवि श्री. राम गोसावी , यांचे गेल्या रविवारी दि. १८ आॅगस्ट २०१९ रोजी  निधन झाले. निधन समयी त्यांचे वय होते ९२ वर्षे ! ते गेले त्या दिवशी दुपारी बर्‍या पैकी जेवले. वामकुक्षी साठी झोपले ते झोपेतच गेले. एका मनस्वी कवीला मृत्यूने शांतपणे आपल्या पंखा खाली घेतले !
                   कै. राम गोसावी , आम्ही त्यांना रामभाउ म्हणत होतो , ते माझ्या मावशीचे मिस्टर ! माझ्या मावशीला मी शकु मावशी म्हणत असे ! आदर्श गृहिणींची यादी करायची ठरवल्यास त्यात शकू मावशीचा अग्रक्रमाने विचार करायलाच पाहिजे.
                    कै. रामभाउ हे  बी. ए. होते .ते सांगलीत शासकीय नोकरीत होते. सांगलीतल्या वास्तव्याच्या काळातले रामभाउ मला चांगले आठवतात. मोठे रसिक होते. कविता तर ते करायचेच पण त्या ही पलीकडे जाउन नाट्य , लोकनाट्य यांचा ही ते मुक्तपणे आस्वाद घ्यायचे ! घरात मात्र त्यांचा माझ्या मावशीवर चांगलाच दरारा असायचा ! असो.
                      त्यांच्या वयाच्या तेहत्तीस किंवा चौतिस वया पर्यंत त्यांचे डोळे चांगले होते. अचानक Detachment of retina झाल्याने त्यांना अंधत्व आले. त्या काळी त्यांनी उपचार करून घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण उपयोग झाला नाही. त्यांना अंधत्व आले ते कायमचेच !
                           ...आणि त्या नंतर माझी मावशी , शकू मावशी त्यांचे डोळे आणि काठी झाली. तिने त्यांच्यासाठी खूप खूप खूप केले. ती रोज रामभाउंना हाताला धरून सर्व ठिकाणी घेउन जायची. सभा , सम्मेलने या ठिकाणी ती त्यांना त्यांच्या सांगण्या प्रमाणे नेत असे.रामभाउंना  कवितेचे स्फुरण येताच हातातील कामे बाजूला ठेउन शकू मावशी , त्यांच्या साठी वही व पेन घेउन बसत असे. रामभाउंनी माझ्या माहिती नुसार अंदाजे हजारच्या आसपास कविता लिहील्या असतील.  दैवाचा दुर्विलास म्हणजे माझी मावशी , २००२ साली अचानक देवाघरी गेली.
                      त्या नंतर रामभाउ १७ वर्षे होते. बायको गेल्या नंतर पुरूष खचून जातो. पण रामभाउंनी आपण खचून गेलो आहोत , असे कधी ही दर्शवू दिले नाही. ते नेहमी फ्रेश असायचे. कपडे नीट नेटके , रोज दाढी केलेली असायची , केस नैसर्गिक रीत्याच काळे भोर होते. एकूण ते व्यवस्थित असायचे. त्याचे श्रेय त्यांचा मुलगा चि. मुकूंद , सून चि. सौ. मुक्ता आणि मुलगी चि. चित्रा यांना निश्चितच आहे. सर्वजण त्यांची आपापल्या परीने काळजी घ्यायचे. पण प्रत्येकाची कांही " लिमिटेशन्स " असतात ती आपण मान्य केलीच पाहिजेत.
                    एकूण रामभाउंचे आयुष्य निश्चितच चांगले गेले. काव्य हा त्यांचा विरंगुळा होता. त्यांना एका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही मिळाले होते. त्यांचे दोन तीन काव्य संग्रह प्रकाशित ही झाले आहेत.  त्यांची " डोळे " ही कविता महाराष्ट्र राज्याच्या दाहवीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात ही समाविष्ट करण्यात आलेली होती. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे कांही  साहित्यिक पुरस्कार ही मिळालेले आहेत.
                       एकूण कै. रामभाउंचे जीवन समृध्द असेच होते. आता प्रत्येकाच्या जीवनात कांही चढउतार , टोकाचे मनाला क्लेष देणारे प्रसंग येतच असतात. तसे त्यांच्या ही जीवनात आले असतील. पण या सर्वावर मात करत ते सकारात्मक जीवन जगले  ! सकारात्मक जीवन कसे जगावे , याचा ते आदर्श वस्तूपाठच होते !
          अशा या चिरतरूण कविच्या  आत्म्याला शांती लाभो , ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो !
                      ॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

Wednesday, 14 August 2019

कै. बी. एन. पाटील....मेरीकर संशोधक...

                    फोटोत दिसत आहेत , ते म्हणजे (कै.) बी. एन. पाटील. चारच दिवसा पूर्वी, त्यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ,नाशिक मध्ये निधन झाले. त्यांच्या नावा मागे (कै.) हा शब्द लिहीताना मनाला अनंत वेदना होत आहेत.
                  (कै.) बी. एन. पाटील हे ,मेरी ,या पाटबंधारे खात्याच्या अभियांत्रिकी  संशोधन संस्थेत, वैज्ञानिक होते. सायन्सचे पदवीधर ( B.Sc.) ! पण त्यांचे ज्ञान , हुषारी आणि कामाची निष्ठा पाहून, त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी पगारी रजा देउन, पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवले. त्या पदव्युत्तर  परिक्षेत, ( M.Sc .) त्यांनी उत्तम यश संपादन केले.
                  तिथून परतल्यावर ,त्यांनी अभियांत्रिकी संशोधन कार्याला ,पुनश्च  वाहून घेतले . आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून त्यांनी, एक विशिष्ठ प्रचारचे Grout material तयार केले. त्याचा उपयोग, कोयना धरणातील गळती बंद करण्यासाठी झाला. त्यांनी  संशोधनाने तयार केलेले ते Grout material ,काळाच्या कसोटीवर सिध्द झाले. या त्यांच्या संशोधनाला मान्यता देउन, त्यांचा गौरव करण्यासाठी , त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील, खास मेरी आॅफिसमध्ये आले आणि त्यांनी (कै.) बी. एन. पाटील यांचा यथोचित गौरव केला. हा दुर्मिळ मान ,मेरी मधील वैज्ञानिकाला, प्रथमच मिळाला. पुढे मेरीच्या इतिहासात असा दुर्मिळ मान मिळाल्याचे, आमच्या कुणाच्याच ऐकीवात नाही. (कै.) बी. एन. पाटीलांनी तयार केलेले Grout material ,पुढे "MERI GROUT " या नावाने ओळखले गेले. त्याचे "पेटंट"  मेरी या संस्थेस प्राप्त झाले. एखाद्या गोष्टीचे पेटंट मिळविणे , ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची बरीच पूर्तता करावी लागते. हे पेटंट मिळविण्यासाठी, (कै.) बी. एन. पाटील यांनी घेतलेले परिश्रम, अतुलनीय असेच आहेत. ही घटना आहे सन् १९७५ सालची. माझ्या माहिती नुसार मेरीला मिळालेले हे पहिले आणि शेवटचेच पेटंट ! मेरीच्या आजपर्यंतच्या ६० वर्षांच्या इतिहासात ,सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशी ही अद्वितीय घटना आणि त्या घटनेचे शिल्पकार होते ( कै.)  बी. एन. पाटील.
                  (कै.) बी. एन. पाटील हे शांत आणि सरळ स्वभावाचे गृहस्थ होते. आपण बरे आणि आपले काम बरे , असा त्यांचा स्वभाव होता. समोरचा किती ही वाकड्यात शिरला ,तरी ते स्वतः  सरळच वागायचे . शासकीय नोकरीतले छक्केपंजे ,त्यांना कधी समजले ही नाहीत आणि त्यांनी ते समजावून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही , इतक्या सरळ मनाचे ते होते.
                     नोकरीच्या कालावधीत ,त्यांच्या कांही अनपेक्षित ठिकाणी बदल्या झाल्या. पण आपली बदली रद्द करण्यासाठी ,त्यांनी कधी कुणापुढे पदर पसरला नाही. जिथे बदली झाली तिथे ते गेले आणि स्वाभिमानाने व प्रामाणिकपणे,  त्यांनी आपली सेवा दिली.
                       त्यांचे मूळ गाव, परभणी जिल्ह्यातले सेलू हे आहे. तिथे त्यांची शेतीवाडी आहे. पण मुलांचे शिक्षण उत्तम व्हावे या साठी , त्यांनी नाशिक हीच आपली कर्मभूमी मानली व ते शेवट पर्यंत नाशिक मध्येच राहिले.
                   चार दिवसापूर्वी त्यांचे निधन झाल्याची वार्ता ,मनाला खूपच धक्का दायक होती.
                त्यांच्या मागे वहिनी आणि तीन मुले आहेत. तीन ही मुले आपल्या आपल्या जागी उच्च पदावर आहेत.
(कै.)  बी. एन. पाटील यांच्या आत्म्यास ,शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
                      ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

Thursday, 1 August 2019

गुरूवर्य श्री. नंदकुमार अभ्यंकर.

                 सन् २०००. जानेवारी महिना. मी त्या वेळी सांगलीत, पाटबंधारे खात्याच्या, गुण नियंत्रण ( Quality Control ) शाखेत ,कार्यरत होतो. अनपेक्षित पणे  माझे वैज्ञानिक अधिकारी या पदावर ,प्रमोशन झाले .माझी  मेरीत ( M.E.R.I. , पाटबंधारे खात्याची संशोधन संस्था  ) नाशिकला बदलीची आॅर्डर आली .  प्रमोशनचा आनंद होण्या ऐवजी, मी मनाने दुःखी झालो. मिरजेत आम्ही सगळे, म्हणजे मी , पत्नी सौ. रजनी , मुलगा चि. आदित्य , माझी आई , वडील असे सगळे एकत्र होतो.आईचे  वय ७३, वडीलांचे वय ८३ होते.  मी  मिरजहून नाशिकला गेलो ,तर त्यांचे कसे होईल ?
                   या विचारातच , मी माझे स्नेही श्री. नंदकुमार अभ्यंकर यांचे घरी, सहज गेलो. माझ्या मनातील काहुर, मी त्यांना सांगीतले. त्यांनी शांतपणे माझी व्यथा समजून घेतली. क्षणभर विचार केला. नंतर ते मला म्हणाले " दीक्षित , तुमच्या मिरजेत असण्यामुळे ,तुमचे कुटूंब सुरक्षित आहे . तुमचे आई, वडील वृद्ध आहेत. तुम्ही मिरजेत त्यांच्या सोबत असल्या मुळे ,त्यांच्या तब्बेती  व्यवस्थित आहेत , असा तुमचा समज आहे. हा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही नाशिकला गेलात की, लगेच त्यांच्या तब्बेती बिघडतील , असा तुमचा समज असेल , तर तो चुकीचा आहे. जो तो आपल्या नशिबाने जगत असतो . त्याचे पितृत्व अहंकाराने स्वतःकडे घेणे सर्वथैव गैर आहे , चुकीचे आहे. "
                     हे सर्व ऐकून माझ्या मनात लख्ख प्रकाश पडला . मनातील सर्व जळमटे निघून गेली व मी अतिशय आनंदाने, एकटा प्रमोशनवर, नाशिकला निघून गेलो.
                    श्री. नंदकुमार अभ्यंकरांच्या या समजावण्याचा, माझ्या मनावर खूपच परिणाम झाला . त्या दिवसा पासून ,मी त्यांना, मनोमन " गुरू " मानू लागलो. आज तागायत ते मला ,गुरूस्थानीच आहेत व पुढे ही राहतील.श्री. अभ्यंकरांचा अध्यात्माचा अभ्यास ,जबरदस्त आहे.  भगवद् गीता , ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकारामाची गाथा , संत कबीर यांचे विचार वाङ्गमय आणि इतर बर्‍याच संत वाङ्गमयाचा ,साहित्याचा त्यांचा अभ्यास , त्या वरचे त्यांचे मनन आणि चिंतन , प्रचंड आहे.
                 ते सांगलीच्या गणपतराव अरवाडे हायस्कूलच्या ,ज्युनियर काॅलेजच्या तांत्रिक विभागाचे  प्रमुख होते. आता नुकतेच ,ते सेवानिवृत्त झालेले आहेत. शिक्षण क्षेत्राशी त्यांचा संबंध असल्याने , मुलांच्या मानसशास्त्राचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे. त्या मुळे ओळखीची ,तसेच ओळख नसलेली ,  मुले आणि पालक मुलांच्या शैशणिक , मानसिक अडचणी सोडविण्यासाठी ,त्यांच्याकडे आवर्जून येत असतात . त्यांचा सल्ला घेत असतात.
                 ते स्वतः अटोमोबाईल इंजिनीयर आहेत.मिरजेत त्यांचे स्वतःचे ,अटोमोबाईल वर्कशाॅप होते. खूप चांगले चालायचे. त्या व्यवसायात त्यांनी नाव कमावले होते. एक दिवस त्यांनी ते वर्कशाॅप, त्यांच्या हाताखाली बरेच वर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍याला ,देउन टाकले. मी या व्यवसायात भरपूर पैसा कमवला. आता मला पैसा नको, हा त्यांचा विचार होता. माझ्या किंवा तुमच्या ही माहितीत " मला आता पैसा नको " ,असे म्हणणारा हा पहिलाच माणूस असेल. पैशाचा मोह प्रत्येकाला असतो. म्हातारपणी ही पैशाच्या मागे पळणारी माणसे ,आपण पाहिली असतील. पण तरूणपणी मला पैसा नको , असे म्हणणारे श्री. अभ्यंकर , एकमेवाव्दितीय असेच आहेत.
                      त्यांना एक मुलगा आहे. एक नातू ही नुकताच झालेला आहे. मिरजेत किल्ला भागात , त्यांचा स्वतःचा बंगला आहे. पण  आपण  नातवंडा सोबत ,आनंदात रहावे , या उद्देशाने ,श्री. आणि सौ, अभ्यंकर दोघेही सध्या पुण्यात, मुला सोबत राहतात. सौ. वहिनींची ही त्यांना समर्थ साथ आहेच !
                       तर अशा या मला आदराने ,गुरूस्थानी असलेल्या  श्री. नंदकुमार अभ्यंकर आणि सौ. वहिनी, यांना परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे आणि त्यांचा कृपालाभ मला सतत मिळावा , हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
णे