Friday, 14 June 2019

श्री. देगांवकर काका......मेरीचे कॅप्टन.

                आज मी ज्यांच्या बद्दल लिहीणार आहे , त्यांनी एके काळी म्हणजे ,साधारण १९७० ते १९७६ या कालावधीत , नाशिक मधील " मेरी " या संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या , प्रत्येकाचे आयुष्य नक्कीच व्यापून टाकले होते. असे उत्साही आणि प्रसन्न व्यक्तीमत्व म्हणजे, " कॅप्टन देगांवकर " !
                 आम्ही नुकतेच नोकरीला लागलेले सर्वजण त्यांना, देगांवकर काका असे म्हणत असू. देगांवकर काका म्हणजे, एक प्रसन्न उत्साहाचा झराच होते. १९७० ते १९७६ या कालावधीत, मेरीत किंवा मेरी काॅलनीत , कोणताही कोणताही शासकीय , निमशासकीय किंवा अशासकीय कार्यक्रम असो ,त्यात देगांवकर काकांचा सक्रिय सहभाग ,हमखास असायचाच ! जिथे जातील तिथे " संपूर्ण कॅनव्हास "  व्यापून टाकणारे असे ,त्यांचे व्यक्तीमत्व होते.
                  भव्य कपाळ , चेहर्‍यावर कायम प्रसन्नतेचे स्मित हास्य , मध्यम उंची , शर्ट कायम इन केलेला , त्यावर पट्टा ,कपडे कायम टिपटाॅप , पायात बूट , वागण्यात एक प्रकारची कमांडिंग पोझीशन , असे त्यांचे लक्षात राहण्या सारखे व्यक्तीमत्व होते.
                   त्यांना  " कॅप्टन देगांवकर " असे सर्व अधिकारी संबोधायचे ! कारण देगांवकर काकांनी ,आर्मी मध्ये शाॅर्ट सर्व्हिस कमिशन घेउन ,कॅप्टन या पदावर काम केलेले होते. आर्मीची शिस्त ,त्यांच्या वागण्या बोलण्यात जाणवत असे.
                    मेरीच्या प्रत्येक गणेशोत्सवात आणि रंगपंचमीत ,काकांचा उत्साही सहभाग असायचा ! गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकी नंतर ,जेवढे लोक मिरवणूकीत सहभागी असायचे ,त्या सर्वांना आवर्जून घरी बोलावून, ते चहापानाचा कार्यक्रम करीत असत. रंगपंचमीच्या दिवशी ही त्यांच्याकडे ,सर्वांना चहापान असायचे.अधिकारी असून ही , सर्वांना बरोबर नेणारे ,  सर्वांच्यात मिळून मिसळून राहून आनंद लुटणारे ,असे काकांचे व्यक्तीमत्व होते.
                    माझ्या लग्नात ,काकांचा फार मोठा सहभाग होता. त्यांच्या त्या सहभागासाठी ,मी त्यांचा कायमचा त्र५णी आहे. काका मेरीतून ,१९७६ साली बाहेर बदलीवर गेले. ते १९९३ साली  ,अधीक्षक अभियंता या पदावरून ,सेवानिवृत्त झाले.
                  सेवानिवृत्ती पूर्वी ,त्याच्या तीन ही मुलींची  (चि. सुनिता , चि. संगीता आणि चि. सुजाता ) लग्ने झालेली होती. मुलगा चि. संजय ,याचे लग्न व्हायचे होते.
                 सेवानिवृत्ती नंतर ,काका आवर्जून आपल्या सर्व मित्रमंडळींना , सुह्रुदांना, त्यांच्या त्यांच्या गावी जाउन ,आवर्जून भेटले. त्या नंतर थोड्याच  दिवसात ,त्यांना असाध्य अशा कर्करोगाने गाठले. बरेच उपचार झाले ,पण फारसा उपयोग होत नव्हता. मधल्या काळात , मुलगा चि. संजयचे लग्न ठरले होते. पण काका आजारी असल्याने , ते कसे करायचे असा प्रश्न होता. काका औरंगाबाद मधील एका हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट होते. कशाचा कांही भरोसा नव्हता .त्या कठीण अवस्थेत , काकांनी चि. संजयचे लग्न, आपल्या समक्ष करायचा निर्णय घेतला. हे लग्न ते ज्या हाॅस्पिटल मध्ये ,ज्या खोलीत अॅडमिट  होते , त्याच खोलीत डाॅक्टरांच्या परवानगीने झाले....आणि त्याच रात्री काका "गेले"....आपली सर्व कर्तव्ये पार पाडून गेले.....ती तारीख होती २३ जानेवारी १९९५ ! काकांची जन्म तारीख २६ जून १९३५ !
             आज काका हयात असते तर, या येणार्‍या २६ जून २०२० ला त्यांना, ८५ वर्षे पूर्ण होउन त्यांनी ८६ व्या वर्षात ,पदार्पण केले असते. पण तो योग नाही.....
             " जो आवडतो सर्वांना , तोची आवडे देवाला "  ही उक्ती, काकांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते....माझ्या मते काका गेलेले नाहीतच , ते आमच्या सर्वांच्या ह्रदयात ,कायम आहेतच आणि सदैव राहतीलच !
                    फोटोत दिसत आहेत ते देगावकर काका आणि काकू ! काकू औरंगाबादला ,आपल्या मुलाकडे असतात . काका वर लिहील्या प्रमाणे आमच्या सर्वांच्या ह्रदयात कायम आहेतच !............


No comments:

Post a Comment