Monday, 15 July 2019

श्री. श्रीराम वैजापूरकर...यशस्वी अभियंता स्नेही.

               " जय श्रीराम "
                  तुम्ही म्हणाल , लेखाच्या सुरवातीलाच हे काय ? मी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला ,पाहिलेले नाही. पण श्रीराम वैजापूरकर ,हे माझ्या चांगल्या परिचयाचे असल्याने ,मी त्यांच्यातच श्रीरामाला पाहतो. मला त्यांच्यात ,श्रीरामाचे सर्व गूण सामावलेले दिसतात.
                    श्रीराम वैजापूरकर हे मेरीत ,  बदलीवर आले.  स्वेच्छेने मेरीत आलेले व तिथल्या संशोधनाच्या कामात रममाण झालेल्या , कांही दुर्मिळ अभियंत्यांच्या पैकी ते एक आहेत. मेरीत " इतर आवक " कांहीही नसते. त्यामुळे बर्‍याच जणांना ,मेरी मधील नोकरीचा कालावधी,   शिक्षेचा वाटतो , मेरी म्हणजे बंदिशाळा वाटते. पण श्री. श्रीराम वैजापूरकरांचे  ,इतर गोष्टींच्या पेक्षा ,कामावर प्रेम होते .त्या मुळे "जगाच्या पाठीवर " या मराठी सिनेमातील  , " जग हे बंदीशाळा " या गाण्यात म्हटल्या नुसार , " जो आला तो रमला " या उक्ती प्रमाणे , श्रीराम वैजापूरकर मेरीत आले आणि रमले ही !
                        मध्यम उंची , गोरा पान रंग , डोक्या वरचे केस ,पांढरटपणाकडे जास्तच झुकलेले . कपडे अतिशय व्यवस्थित , चेहर्‍यावर एक प्रकारचे सात्विक हास्य  , असे त्यांचे कोणावरही छाप टाकणारे ,व्यक्तीमत्व आहे. जे काम करायचे ते सुव्यवस्थितच ! त्यांचे अक्षर ही अतिशय देखणे आहे.
              श्रीराम वैजापूरकरांनी, शासकीय सेवेतून  सेवानिवृत्त झाल्यावर ,आपले छंद फार छान जोपासलेले आहेत. त्या त्या परिस्थितीशी अनुरूप असे, तांत्रिक आणि ललित लेखन ,त्यांनी  विविध वृत्तपत्रांसाठी भरपूर केले आहे.या शिवाय पक्षी निरीक्षण, हा एक आगळा वेगळा छंद त्यांनी जोपासला आहे. त्या साठी ते सुयोग्य जागा  आणि सुयोग्य वेळ शोधून ,पक्षी अभयारण्यांना आवर्जून भेटी देत असतात.
                      महाराष्ट्र राज्यात बाल भारतीचे, पाठ्यपुस्तक निर्मिती  मंडळ आहे. तिथे पाठ्य पुस्तकांची नव्याने निर्मिती करण्यासाठी, एक तज्ज्ञ समिती नेमली जाते. हे तज्ज्ञ त्या त्या विषयाची ,वेगवेगळ्या इयत्तांची पुस्तके पाहून ,त्या तील कालबाह्य झालेला मजकूर काढून , नवीन व काल सुसंगत मजकूर ,पुस्तकात समाविष्ट करण्याचे काम करतात. अशा भूगोल विषयाच्या तज्ज्ञ समितीवर, श्रीराम वैजापूरकर काम करीत आहेत. नुकतेच आठवी आणि दहावीचे भूगोलाचे नवीन  पुस्तक ,प्रकाशित करण्यात आले. या कामात, श्रीराम वैजापूरकरांचा अघाडीचा वाटा आहे.
                   श्रीराम वैजापूरकरांना दोन मुले आहेत. दोघे ही उच्च विद्याविभूषित असून, अमेरिकेत स्थायिक आहेत. सौ. वहिनींची ही त्यांना समर्थ साथ आहेच ! मुले अमेरिकेत असल्याने ,त्यांचे तिकडे ही मधून मधून वास्तव्य असते.
                   श्रीराम वैजापूरकरांनी, मला " श्रीराम पंचायतनाची " एक छानशी मूर्ती, मोठ्या प्रेमाने भेट दिलेली आहे. ती माझ्या रोजच्या पूजेत आहे. त्या मुळे त्यांची आठवण झाली नाही ,असा दिवस जात नाही.
                     अशा या श्रीराम वैजापूरकरांना आणि सौ. वहिनींना , तसेच त्यांच्या कुटूंबियांना  सुख  समाधानाचे , उदंड  आणि समृध्द , निरामय आयुष्य  " श्रीरामाने " द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो  !

Monday, 1 July 2019

सुधीर सराफ... संगीतकार , कवि आणि संशोधक.

                 शासकीय नोकरी म्हणजे तशी निरसच ! त्यात  संशोधनात्मक काम करावे लागणारी माणसे ,म्हणजे जास्तीत जास्त निरस असणार , असा समज होणे स्वाभावीकच आहे. पण शासकीय नोकरीत असून ,  किचकट संशोधनाचे काम करीत असताना , आपल्यातला  कलाकार जपणे ,ही गोष्ट अशक्यच वाटते ना ? पण नाही !  माझा एक जवळचा स्नेही असा आहे की , ज्याने अभियांत्रिकी संशोधन करता करता , आपला संगीताचा छंद ही जोपासला आहे. आता तुम्हाला वाटू शकते की , हा माझा स्नेही गायक असणार ! पण तुमचा अंदाज चुकला . माझा हा स्नेही ,एका वाद्यवृंदाचा जनक आहे.माझ्या या  कलाचार स्नेह्याचे नाव आहे श्री. सुधीर सराफ.
                    सुधीरचे व्यक्तीमत्व म्हणजे गोरापान रंग , उत्तम उंची , डोक्या वरचे केस थोडे विरळ झालेले , बांधा राजस , कोणी ही पाहता क्षणी त्याच्या व्यक्तीमत्वाने भारून जावे , असेच एकूण व्यक्तीमत्व !
               सुधीर , मेरीच्या महामार्ग संशोधन विभागात कार्यरत होता. त्याला कामासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा होती. त्या प्रयोगशाळेचा तो सर्वेसर्वा होता. वेगवेगळ्या  महामार्गांच्या  कामात , विमानतळांच्या धावपट्टीसाठी उत्तम डांबरी करण केलेला रस्ता किंवा धावपट्टी बांधताना, त्यात डांबराचे प्रमाण किती असावे ,तसेच त्या डांबराची गुणवत्ता कशी असावी , या विषयी तो संशोधन करीत असे. त्याचे काम तो एकाग्रतेने करीत असे. आपल्या कामात इतर कुणी ,ढवळाढवळ केलेली, त्याला चालत नसे.
                      तर अशा या रुक्ष कामात व्यग्र असलेला माझा स्नेही सुधीर , आॅफीस संपल्या नंतर मात्र ,एकदम  रसिकाच्या भूमिकेत दिसायचा. त्याने स्वतःचा वाद्यवृन्द निर्माण केला होता. स्वतः एखादे वाद्य वाजविणे आणि वाद्यमेळ तयार करणे ,यात खूपच अंतर आहे. वाद्य वाजविणार्‍याला ,आपल्या वाद्यात उत्तम गती असते. पण वाद्यवृन्द निर्माण करणार्‍याला ,सर्वच वाद्यात, तसेच गाण्यात ही गती असावी लागते. कोणते वाद्य ,कोणत्या जागी कसे वाजविले गेले पाहिजे , याची जाण असल्या शिवाय " वाद्यवृन्द " निर्मिती कठीणच !
              सुधीरच्या वाद्यवृन्दाचे नाव होते " साउंड अॅन्ड सिंफनी " . त्यात तो स्वतः पियानो अॅकाॅर्डियन वाजवायचा. सर्व वाद्यवृन्दाच्या मध्यभागी ,सुधीर उभा राहून सर्व वाद्यवृन्द नियंत्रणात ठेउन, पियाॅनो अॅकाॅर्डियन वाजवताना पाहणे ,म्हणजे स्वर्गीय आनंद असायचा ! एखाद्या " राजा " प्रमाणे ,तो त्यात शोभून दिसायचा !प्रेक्षकांची व श्रोत्यांची नस ओळखून, तो त्या प्रमाणे गाणी सादर करायचा. जेणे करून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच जायचा !
                     सुधीरने वाद्यवृन्दा बरोबरच ,वेगवेगळ्या गाण्यांचा , गाण्यात वापरल्या गेलेल्या विशिष्ठ शब्दांचा ,  वापरल्या गेलेल्या वाद्यांचा व त्यांच्या परिणामांचा, सखोल अभ्यास केलेला आहे. नाशिक आकाशवाणी साठी त्याने ,अशा प्रकारच्या सुंदर कार्यक्रमाची मालिका , स्वतः लिहून  सादर केली होती.
              या शिवाय सुधीर कवि मनाचा ही आहे. त्याच्या स्वरचित हिंदी काव्यांचे संग्रह , मन आकाश , लैला मजनूॅं , मानस मीरा , इ. प्रसिध्द झालेले आहेत. या शिवाय वंशवृृृृृध्दी ,हा मार्गदर्शक शास्त्रीय ग्रंथ ही , प्रकाशित झालेला आहे.
                     मी आणि सुधीर शासकीय नोकरीतून ,कधीचेच सेवानिवृत्त झालोय ! आता आमची भेट ही क्वचितच होते. सुधीरचा वाद्यवृन्द ,चालू आहे की नाही मला कल्पना नाही. पण अशा या कवि मनाच्या , संगीत रसिक मित्राची ओळख करून देताना, मला अतिशय आनंद होत आहे.
                       फोटोत दिसतोय तो , प्रसन्न हसणारा ,माझा स्नेही श्री. सुधीर सराफ ! त्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.